17 January 2021

News Flash

करोनाकाळातील असाही ‘मोह’!

शहरांतील अनेक मद्यप्रेमींचा टाळेबंदीतील आळस या मोहाच्या दारूने घालवला

अनिकेत साठे, नाशिक

दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर ‘मोहाची दारू’ हे आदिवासी बांधवांच्या श्रमपरिहाराचे एकमेव साधन. करोना संकटात काम गेले; पण हिची साथ कायम राहिली. तशात करोनावर हे रामबाण औषध असल्याची आवई उठली आणि स्त्रियांसह लहानग्यांनादेखील ती ‘औषध’ म्हणून दिली जाऊ लागली. मद्यपानापासून चार हात लांब राहणारे माळकरी असोत वा महाविद्यालयांतून शिक्षण घेणारे युवक असोत, सगळेच तिच्या मोहात पडले. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात काही महिने मद्याची दुकाने सर्वत्र बंद होती. त्यावेळी काळ्या बाजारात मिळणारे देशी-विदेशी मद्य परवडणे शक्य नव्हते. त्यामुळे आदिवासीबहुल गावांनजीकच्या शहरांतील मद्यप्रेमींनाही मोहाची दारू खुणावत होती.

नाशिक जिल्ह्य़ातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यांत बहुतांश कोरडवाहू शेती आहे. पावसाच्या पाण्यावर पीक काढले की आदिवासी बांधव कुटुंबाला घेऊन रोजगारासाठी बाहेरचा रस्ता धरतात. मेअखेरीस मजुरीतून जे काही उत्पन्न मिळते, त्यावर पुढील हंगामातील लागवड आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवला जातो. परंतु यंदा मार्चमध्ये अकस्मात जाहीर झालेल्या टाळेबंदीने हजारो आदिवासी बांधवांचे हे अर्थचक्र विस्कटले. रणरणत्या उन्हात रिकाम्या हाताने पाणीटंचाईच्या या काळात त्यांना गावात परतावे लागले. गेल्या कित्येक वर्षांत असे घडले नव्हते. एरवी वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहानगी चिल्लीपिल्ली वगळता स्थलांतराने ओस पडणारी गावे पुन्हा माणसांनी गजबजली. काही दिवसांत करोना जाईल, ही त्यांची भाबडी आशा फोल ठरली. दिवस जसजसे पुढे सरकत होते, तसतसा रिकामा खिसा अन् हात चिंता वाढवीत होते. अशावेळी अनेकांसाठी ‘मोहाचा प्याला’ मानसिक आधार बनला. टाळेबंदीची घोषणा नेमकी मोहाची फुले झाडावरून गळण्याच्या सुमारासच झाली. आदिवासी पट्टय़ांत मोहाच्या झाडांची कमतरता नाही. एक-दोन एकर जमीन धारण करणाऱ्याकडे मोहाची किमान १५-२० तरी झाडे सहज असतात. ज्यांच्याकडे जमीन नाही, ते वनजमिनींवरील झाडांवर अवलंबून असतात. विपुल प्रमाणात झाडे असल्याने मोहाच्या फुलांपासून बनवलेल्या अस्सल मद्याचे या परिसरात अप्रुप नसते. कुडाच्या घरांतदेखील मोहाच्या फुलांची एक-दोन पोती दिसतातच. गरज पडेल तशी ती गाळून मद्यपानाचा आनंद घेतला जातो. करोनाकाळात मोहाच्या फुलांना इतकेमोल येईल, हा विचार कोणीही केला नव्हता.

होळीनंतर तापमान वाढू लागते. मोहाच्या झाडांवरील परिपक्व फुले ऊन टिपेला पोहोचल्यावर गळायला लागतात. टाळेबंदीमुळे गावाकडे परतलेल्यांना काहीच काम नव्हते. एका झाडावरून १५ ते १६ दिवस फुले पडतात. ती वेचण्यासाठी सकाळपासून देखरेख ठेवावी लागते. कारण माणसांप्रमाणेच ही फुले गुरांनाही तितकीच आवडतात. दुपापर्यंत फुलांचा सडा पडतो. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास शेळ्या-मेंढय़ा, गाई काही वेळातच ती फस्त करतात. अन्य कोणी फुले उचलून नेण्याची शक्यताही असतेच. पुढील काही महिन्यांच्या मद्याच्या बेगमीकरता सगळ्यांनीच या झाडांवर बारकाईने नजर ठेवली. मुबलक झाडे असणाऱ्यांनी जास्तीची मोहाची फुले हरसूलसह आसपासच्या बाजारांत विकली. दरवर्षी २५ ते ३० रुपये किलो भाव मिळणाऱ्या फुलांना करोनाकाळात दुप्पट- म्हणजे ५० रुपये इतका दर मिळाला. हंगामात पशुखाद्य म्हणून ही फुले विकण्यास परवानगी असते.

यंदा अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी गावांत येऊन मोहाची फुले खरेदी केल्याचे शिरसगावचे काशिनाथ शिंदे सांगतात. केवळ फुलेच नाही, तर मोहाच्या दारूचे दरही चांगलेच वधारले होते. या फुलांपासून तीन दिवसांत मद्य तयार करता येते. फुलांपासून दारू कशी करायची याची पद्धत साऱ्यांनाच अवगत आहे. गावातील किराणा वा अन्य लहान-मोठय़ा टपऱ्यांमध्ये ती प्लास्टिक बाटलीत अनधिकृतपणे विकली जाते. करोनाच्या आधी एक लिटर मद्य ५० ते ६० रुपयांना विकले जायचे. करोनाकाळात १५० ते २०० रुपयांपर्यंत हा भाव गेला. शहरांत, तसेच आसपासच्या सधन तालुक्यांतील ग्राहकांनी ती खरेदी केली. स्थानिक पातळीवर मात्र ती कमी दरात विकावी लागे. गावातील मंडळी आर्थिक चणचणीत होती. त्यांना माफक दरात, उधारीत द्यावी लागल्याचे अनुभव अनेक पाडय़ांतील ग्रामस्थ सांगतात.

शहरांतील अनेक मद्यप्रेमींचा टाळेबंदीतील आळस या मोहाच्या दारूने घालवला. शहरांतून तिला इतकी मागणी होती, की आदिवासी भागांतून रात्रीच्या वेळी दुचाकीवरून तिची वाहतूक केली गेली. मोहाची फुले वा मद्यविक्रीतून अमाप उत्पन्न मिळाले नसले तरी ऐन अडचणीच्या काळात किरकोळ वाणसामान खरेदीला ती उपयोगी ठरली. मोहाच्या फळांमुळे अनेकांच्या घरातील काही महिन्यांच्या तेलाचा प्रश्न मिटला. थकवा घालवण्यासाठी बहुतांश आदिवासी घरच्या घरी तयार केलेल्या बिनखर्चिक मोहफुलाच्या दारूला प्राधान्य देतात. या काळात करोनापासून बचावासाठी ती रामबाण उपाय असल्याची अफवादेखील पसरली. त्यामुळे महिला आणि लहान मुलांनाही काही ठिकाणी ती देण्यात आली. मुरमाडीतील धर्मराज गोतारणे या मोहापासून दूर राहिला. शेतातील मोहाच्या झाडांची फुले त्याने व्यापाऱ्यांना विकली. टाळेबंदीत गावोगावी मद्यपिणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे तो सांगतो. ‘माळकरी’ व्यक्ती खरे तर मांस, मद्याला शिवत नाहीत. पण तेदेखील या काळात मद्यपान करू लागले. महाविद्यालयांत शिक्षण घेणारे अनेक युवकही तिच्या आहारी गेले. खरे तर आदिवासी भागांत विरळ वस्तीमुळे करोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. आता तर निर्बंध शिथिल झाल्यावर सारे काही सुरळीत झाले आहे. परंतु संबंधितांची मद्यसेवनाची सवय मात्र कायम राहिल्याचे तो सांगतो. आदिवासी भागांत मद्यसेवनाचे प्रमाण वाढण्यामागचे अस्वस्थता हे प्रमुख कारण असल्याचा अंदाज ‘प्रगती अभियान’च्या अश्विनी कुलकर्णी व्यक्त करतात. टाळेबंदीत गावी आलेल्यांना रोजगार हमीची कामे दोन-अडीच महिने मिळाली नाहीत. भविष्याची चिंता त्यांना ‘मोहा’च्या अधिक जवळ घेऊन गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 3:58 am

Web Title: mahua liquor consumption more during coronavirus crisis in nashik zws 70
Next Stories
1 चाँदनी चौकातून : तडजोड?
2 शिक्षण-आव्हानांचा ‘अर्थ’..
3 लोकशाहीत लिहिण्याची भीती नको!
Just Now!
X