12 December 2018

News Flash

नवश्रीमंतीची बदलती केंद्रे

पैसा खेळू लागल्याने राजकारण्यांनाही या पंचतारांकित संस्कृतीचा मोह आवरला नाही.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये मॉल व पब संस्कृती वाढू लागली आहे.

मुंबईतील कमला मिलच्या आवारातील ‘वन अबव्ह’ पबमध्ये लागलेल्या आगीत १४ जण गुदमरून मरण पावले. यानंतर पब किंवा पंचतारांकित संस्कृतीची चर्चा सुरू झाली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये मॉल व पब संस्कृती वाढू लागली आहे. या भागांतील नवश्रीमंतांच्या विरंगुळ्याची ही केंद्रे. आधुनिकतेच्या नव्या जाणिवा आणि महत्त्वाकांक्षा असलेला हा वर्ग. त्यांच्यासाठी महानगरांमध्ये सोयीसुविधा पुरवल्या. पैसा खेळू लागल्याने राजकारण्यांनाही या पंचतारांकित संस्कृतीचा मोह आवरला नाही. मग या परिसरातील पब, हॉटेल्समध्ये राजकारण्यांनी बेनामी गुंतवणूक केली. राजकारणी, सरकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि पब किंवा हॉटेल्स मालक यांची भ्रष्ट साखळीच तयार झाली. सारे नियम धाब्यावर बसविले गेले. शहरांमधील बदल कसे होत गेले याचा हा आढावा.

गिरण्या ते पब, रेस्तराँ..

मुंबई : मुंबईमधील कापड गिरण्यांमध्ये १९८२ मध्ये कामगारांनी संप पुकारला आणि गिरणी मालक व कामगार संघटनांमधील तिढा वाढतच गेला. मुंबईमधील कापड गिरण्यांची धडधड बंदच झाली.  कायद्यातील पळवाटीचा आधार घेत मालकांनी गिरण्यांमधील मूळ वास्तू ‘जैसे थे’ ठेवून विकासाची कास धरली. गिरण्यांमधील मूळ बांधकामात अंतर्गत फेरबदल करून कार्यालये, हॉटेल, पब, रेस्तराँसाठी जागा देण्यास सुरुवात केली. कमला, एम्पायर, सेंच्युरी, बॉम्बे डाइंग, रघुवंशी, फिनिक्स मिल आणि तोडी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये चकचकीत हॉटेल्स, पब, रेस्तराँ उभे राहिले. हुक्का पार्लरनीही तेथे मोक्याच्या जागा मिळविल्या. पाहता पाहता या गिरण्यांमध्ये एक विश्व उभे राहिले आणि गिरण्यांमधील पबमध्ये रात्री-अपरात्री मद्याचे प्याले रिचवत संगीताच्या ठेक्यावर थिरकणाऱ्यांची संख्या वाढू लागली. हळूहळू मोठय़ा संख्येने तरुणाईची पावले गिरण्यांकडे वळू लागली. केवळ लक्ष्मीपुत्रच नव्हे तर उच्च मध्यमवर्गीयांनीही गिरण्यांमधील या नव्या विश्वात हजेरी लावण्यास सुरुवात केली. सेंच्युरी आणि बॉम्बे मिलमधील पब, रेस्तराँ आणि हॉटल्सनी दहा पावले पुढे टाकली. या दोन्ही गिरण्यांच्या आवारातील हॉटेल, पब, रेस्तराँमध्ये येणाऱ्यांचा दर्जा राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उंची गाडीमधून येणाऱ्यांनाच गिरणीच्या आवारात प्रवेश दिला जातो. हॉटेल, रेस्तराँ आणि पबमधील चार जणांच्या टेबलसाठी दोन बाऊन्सर आणि सेवा देण्यासाठी एक व्यक्ती अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबलवर किमान १५ हजार रुपये तर कमाल ५० हजार रुपयांहून अधिक बिल होते. गिरण्यांमधील यंत्रांची धडधड बंद झाली, मात्र बेधुंद संगीताच्या सुरांनी गिरण्या आणि आसपासचा परिसर गजबजून गेला. मनोरंजनासाठी एक नवे विश्व मुंबईत उभे राहिले. मनोरंजनासाठी एक नवे विश्व मुंबईकरांना खुणावू लागले. मात्र या विश्वाचा पाया अनधिकृत बांधकामावर रचण्यात आल्याचे कमला मिलमधील अग्नितांडवाने दाखवून दिले. बांधकामापासून अग्निसुरक्षेपर्यंतच्या सर्वच नियमांना हरताळ फासून गिरण्यांमध्ये बांधकामे करण्यात आली. इमारतीच्या गच्चीवरील हॉटेलला पालिकेकडून परवानगी मिळण्यापूर्वीच मिलमधील इमारतींच्या गच्चीवरील हॉटेल सुरू झाली. हॉटेल, पब, रेस्तराँमधील सजावटीसाठी मोठय़ा प्रमाणावर ज्वालाग्राही वस्तूंचा वापर करण्यात आला. त्यामुळे मनोरंजनाची ही छोटी छोटी विश्वे मृत्यूचे सापळे बनले. पालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन, अग्निसुरक्षाविषयक उपाययोजना करून बांधकामे करण्यात आली असती तर गिरण्यांमधील हे नवे विश्व मनोरंजनाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित बनले असते. या नव्या संस्कृतीत पैसा खेळू लागला आणि राजकारण्यांचे लक्ष गेले. मग राजकारण्यांच्या मदतीने सारे नियम धाब्यावर बसविण्यावर हॉटेल, पबचालकांनी भर दिला. ‘वन अब्हव’च्या आगीनंतर राजकारणी आणि आजी-माजी सरकारी अधिकाऱ्यांची जोडली गेलेली नावे हे त्याचे उत्तम उदाहरण.

आधुनिक नवे प्रवाह : जुने विरुद्ध नवे ठाणे

ठाणे : बदलत्या शहरी संस्कृतीमुळे ठाणे शहरासाठी विकासाची दारे खुली झाली. जुनं ते सोनं म्हणत नवं तेही आपलंसं केल्यास कोणत्याही शहराचा सर्वागीण विकास होत असतो. गेल्या अनेक वर्षांत जुनं ते जपत ठाणे शहराने नव्या दिशेने पावले उचलली आहेत. हा विकास साधताना या शहराचे दोन टप्प्यांत विभाजन होताना दिसते. ठाणे शहरातील गोखले रस्ता, नौपाडा परिसर आज जुने ठाणे असा परिचित आहे. तलावपाळीजवळ आज इतक्या वर्षांनीही ठाणेकरांची गर्दी असतेच. गडकरी रंगायतन हे रसिकांसाठीचे आजही हक्काचे ठिकाण.

या शहराने जसं पूर्वीपासून स्थायिक असलेल्या ठाणेकरांना जपले तसे या शहरात नव्याने संसार मांडणाऱ्या अनेक नवोदित ठाणेकरांना आपलेसे केले. शहरात नव्याने येणाऱ्या नागरिकांसाठी उभे राहिले नवे ठाणे. घोडबंदर, लोकपुरम, बाळकुम, वसंतविहार या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आणि नवीन ठाणेकर या भागात विसावला. मुख्य शहरापासून लांब पल्ल्यावर असल्याने शहराच्या गर्दीपासून अलिप्त राहून निवांतपणा या नव्या ठाण्यातील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. उंची राहणीमानासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुखसोयींनी समृद्ध असलेले हे नवीन ठाणे अनेकांना खुणावत आहे. पूर्वी संबंधित विभागात भरणारे बाजार, मुख्य भाजी मंडईतून बाजारहाट होत होता. नवी ओळख निर्माण करणाऱ्या शहरात आता या सगळ्याची जागा शहरात विसावलेल्या मॉल्सनी घेतली आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार खरेदीचा आनंद नागरिकांना देण्यासाठी शॉपिंग मॉल्स उभे राहिले आहेत. दैनंदिन व्यापातून खेळाचा आनंद लुटण्यासाठी या गृहसंकुलांच्या आसपास स्पोर्ट्स क्लबमध्ये नागरिक सुट्टीच्या दिवशी गर्दी करीत असतात. वडापाव-मिसळसाठी जुन्या ठाण्यातील अनेक खाद्यपदार्थाचे कट्टे पूर्वीपासूनच ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचे आहेत. मात्र या नव्या ठाण्यात नवीन चवीचे खाद्यपदार्थ मिळत असल्याने या परिसराचे आकर्षण वेगळे ठरते. अनेक गृहसंकुलांबाहेर उभ्या असणाऱ्या फूड व्हॅन, रेस्तराँजवळ सुट्टीच्या दिवशी नागरिकांचा घोळका जमतो.

*  नव्या ठाण्यातील ग्लॅडी अलवारीस रस्त्यावरील कोठारी कंपाऊंडजवळील पब्ज, रेस्तराँ, हुक्का पार्लरचे केवळ ठाण्यातील तरुणांनाच नव्हे तर मुंबईहून येणाऱ्या नागरिकांना आकर्षण असते.

*  आधुनिक संगीताच्या तालावर थिरकत मद्याचा प्याला रिचवण्यासाठी या नव्या ठाण्यातील पब्जमध्ये नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. या पब्जमध्ये येणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त असून पाटर्य़ाचा आनंद साजरा करण्यासाठी आवडते ठिकाण बनले आहे.

*  आधुनिक जीवनशैली जगताना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता या नवीन ठाणे शहरात होत असल्याने घोडबंदर, वसंतविहार, कोठारी कंपाऊंड, मानपाडा या परिसराविषयी ठाणेकरांना कायमच आकर्षण असते.

‘रात्रजीवना’चे वाढते प्रस्थ

पुणे : सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांची रेलचेल असलेले शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यात ‘पब कल्चर’ही वाढले असून आठवडय़ातील दोन दिवस पुण्यातील पब, कॅफे आणि तारांकित हॉटेल्स तरुणाईने फुललेली असतात. पुण्यातील ‘रात्रजीवना’चे वाढते प्रस्थ पाहून मुंबईकरांनाही हेवा वाटेल.   तरुणाईच्या दृष्टीने पुण्याच्या कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्ता पूर्वी आकर्षणाचा भाग होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. महात्मा गांधी रस्त्यावर असलेली पाश्चात्त्य शैलीतील उपाहारगृहे शहरातील वेगवेगळ्या भागांतही पाहायला मिळतात.

गेल्या दोन दशकांमध्ये बोट क्लब रस्ता, महात्मा गांधी रस्ता भागात दोन, तीन पब सुरू झाले. तारांकित हॉटेल्समधील पबमध्ये गर्दी सुरू झाली. कोरेगाव पार्क भागातील एबीसी फार्म रस्ता हा एके काळी शहरापासून लांब असणारा परिसर होता. या रस्त्याचा चेहरामोहरा गेल्या दहा वर्षांत बदलून गेला आहे. या भागात गगनचुंबी इमारती आणि तारांकित हॉटेल्स उभी राहिली आहेत. एबीसी फार्मपासून मुंढव्यापर्यंतच्या भागात किमान तीस ते चाळीस कॅफे, हॉटेल्स आणि पब आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हॉटेल्स आणि पब आहेत आणि सर्व ठिकाणी तरुणाईची मोठी गर्दी असते. गेल्या काही वर्षांत आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणी बाहेरगावाहून पुण्यात स्थिरावले. पुण्यात मोठय़ा संख्येने देशभरातून आणि परदेशातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आयटी क्षेत्र तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणाईच्या दृष्टीने कोरेगाव पार्क, विमाननगर, बोट क्लब रोड, एबीसी फार्म रस्ता म्हणजे ‘हॉट स्पॉट’ ठरले आहेत. या भागात रात्री पब आणि झगमगाटाचा अनुभव येतो. येथे गेल्यास आपण मुंबईतील एखाद्या उच्चभ्रू भागात असल्याचा आभास होतो. आठवडय़ातील दोन दिवस रात्री या भागातील झगमगाटाच्या नशेत तरुणाई मुक्तपणे वावरते आणि याच कल्लोळात पहाट उजाडते.

वाइनरीजकडे लक्ष्मीपुत्रांची ओढ

नाशिक : सुवर्ण त्रिकोणातील एक कोन म्हणून गणले जाणारे नाशिक वेगळे आहे ते आल्हाददायक आणि थंड वातावरणामुळे. येथे मॉलमध्ये रमणारा एक घटक आहे, तसाच गजबजाटापासून दूर वाइनरीज्, रिसॉर्ट आणि धरण परिसरातील शांततेत रममाण होणारा नवश्रीमंतांचा वर्गही उदयास आला आहे. विशेष म्हणजे, वाइनच्या राजधानीत देशभरातील पर्यटकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन शहराच्या सभोवताली पर्यावरणस्नेही रिसॉर्टपासून ते पाण्याच्या खेळासाठी खास पार्कचीही उभारणी झाली आहे. वन विभाग साहसी खेळांसाठी निर्मिलेल्या केंद्रांद्वारे पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यासाठी धडपड करीत आहे.

धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये मागील काही वर्षांत वाइनरीजला भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. जिल्ह्य़ात सुमारे ४० वाइनरीज असून वाइन महोत्सवाच्या निमित्ताने पर्यटकांना थेट पारंपरिक पद्धतीने वाइन निर्मिती प्रक्रियेतील आनंद लुटता येतो. खरेतर वाइनची निर्मिती अत्याधुनिक यंत्रसामग्रीवर होते. लाकडी भांडय़ात द्राक्ष टाकून संगीताच्या तालावर ती विशिष्ट बूट घालून पायदळी तुडविण्याची पारंपरिक पद्धत होती. वाइनसाठीच्या द्राक्षांचा जानेवारी ते मार्च हा हंगाम असतो. याच काळात पारंपरिक पद्धतीतील द्राक्ष पायदळी तुडविण्याचा आनंद पर्यटकांना मिळतो.   बहुतांश वाइनरीजमध्ये पर्यटकांना निवास व्यवस्थेसह आधुनिक जीवनशैलीला साजेशा सर्व सुविधांची रेलचेल आहे.  इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात ‘स्पा’, योगा, जलतरण आदी आरामदायी अन् आधुनिक जीवनशैलीला साजेशा सुविधा देणाऱ्या रिसॉर्टची संख्या वाढली आहे.  पर्यावरण संवर्धन, अपारंपरिक ऊर्जेचा वापर आणि पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या पर्यावरणस्नेही रिसॉर्टकडे पर्यटक आकर्षित होत आहेत.

विरंगुळ्याचे विविध पर्याय

नागपूर : एकीकडे ‘मेट्रो सिटी’च्या दिशेने धावणाऱ्या शहरात आता याच नवश्रीमंतांच्या विरंगुळ्यांची साधनेही वेगाने उदयास येत आहेत.  मॉल्सची संख्या झपाटय़ाने वाढतेय आणि हे मॉल्स म्हणजे निव्वळ वस्तू विक्रीचे केंद्र नाही तर मनोरंजनाचीदेखील केंद्रे ठरत आहेत.

एम्प्रेस मॉल हा शहरातील सर्वात मोठा मॉल आहे. या ठिकाणी कपडय़ांपासून तर सर्वच वस्तूंची विक्री केंद्रे असली तरीही जोडीला आधुनिक चित्रपटगृह आणि मनोरंजनाची इतरही अनेक साधने आहेत.  खरेदीची नवी परंपरा मॉलने निर्माण केली आहे.  इटर्निटी मॉलमध्येही  नानाविध ब्रँड्सची दुकाने तर आहेतच, पण बार्बेक्यू, पब ही तरुणाईची पहिली पसंती असणाऱ्या सुविधा आहेत.  माऊंट रोडवरील ‘आइस-क्यूब रेस्टॉरंट अँड पब’ तसेच तुली इंटरनॅशनल हॉटेलमधला संपूर्णपणे इंग्लिश संस्कृतीवर आधारित ‘ऱ्हिदम अँड ब्ल्यूज पब’,  रात्रीच्या मनोरंजनाची ठिकाणे आहेत. सदरमधलाच ‘अंडरग्राऊंड पब’ हा सर्वच वयोगटांसाठी असून अल्पावधीतच तो प्रसिद्ध झालाय. काही वर्षांपूर्वी शहरातील क्लब हे नवश्रीमंतांच्या मनोरंजनाची साधने होती, आता त्यात वेगाने बदल होत आहे.

मॉलची सहल!

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी चंगळ करायची म्हटलं की, औरंगाबादकर फारतर भल्ला खायला बाहेर पडायचे. गुलमंडी भागातले भल्ला आणि इम्रती असे दोन चवदार पदार्थ खाल्ले की झाली चंगळ. एवढय़ाच माफक अपेक्षेत मध्यमवर्ग असे. गाव बदलले. रुपडेही बदलू लागले आहे. फॅशनही जोर धरू लागली आहे. आता करमणुकीच्या दोन गोष्टींसह खिशात पैसे खुळखुळायला लागले की, माणसे मॉल गाठतात. औरंगाबादमध्ये झालेला प्रोझोन मॉल तसे चंगळ करण्याचे ठिकाण झाले आहे. पाच रुपयांच्या कॅडबरीचे एकेकाळी मोठे कौतुक होते. मग चॉकलेटच्या किमतीच वाढत गेल्या. आकार बदलत गेले. आता द्रवरूप चॉकलेट खाण्याचे दिवस आले. हे लिक्विड चॉकलेट खाण्यासाठी तरुणाई खास मॉलपर्यंत जाते. या मॉलमध्येच मसाज सेंटर सुरू होते. तेथे अलीकडेच पोलिसांनी छापा टाकला आणि देहविक्रय करणाऱ्या विदेशी १८ मुलींना पकडण्यात आले. थायलंडच्या या मुलींना परत त्यांच्या देशात पाठविण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले आणि त्या गेल्या. चंगळवादाची केंद्रे अशी बदलताहेत. मॉलमध्ये जाणारे हौशे-गवशे सारे. नवशे इथे नसतात. झगमगाटी दुनियेत एकदा तरी जाऊन यावे आणि सरकणाऱ्या जिन्यावर आपणही चढून यावे, अशी मानसिकता असणारे अनेक जण हमखास मॉलमध्ये जाऊन येतात. अगदी चंगळ करायची म्हटले की, एक चित्रपट पाहून येतात. पण खरी मजा अनुभवतात आणि खिशातले पैसे अंमळ जरा जास्तच खर्च झाले, असे वाटू लागते. तेव्हा ते खाद्यपदार्थाच्या दालनाभोवती घुटमळत असतात. बाहेर गाडय़ांवर मिळणारी पाणीपुरी मॉलमध्ये सहा-सातपटीने महागते. पण तीही चव एकदा घेतातच. औरंगाबादही हळूहळू बदलू लागला आहे. कपडय़ांची, आभूषणांची एक वेगळीच दुनिया अनुभवायची म्हणून मॉलमध्ये जाणे ही औरंगाबादकरांसाठीची चंगळ आहे. कोणत्या तरी पुतळ्याला एक छानसा पेहरावा घातलेला असतो. तो आपल्याही अंगाला घालून पाहता येतो का, हे अजमावून पाहण्यासाठी तरुणी आवर्जून जातात. काही जणांना अगदी मॉलमध्ये जाऊन केस कापण्याचाही शौक आहे. तिथे अगदी वातानुकूलित एक केशकर्तनालय आहे. थकलेल्या पायांना आराम देण्याच्या खुर्च्या आहेत. मुलांना खेळण्याचे चार प्रकार जास्तच आहेत. कोणाला मऊ गादीवर उडय़ा मारता येतात, तर कोण्या पालकाला त्यांच्या मुलांना हवेत तरंगणाऱ्या दोन बांबूंच्या साहाय्याने उडय़ा मारणाऱ्या दोऱ्यांना लटकवता येते. येथे कधी फ्लॅश डान्स होतात. तर कधी एखादा सणवारही साजरा होतो. नाताळात हा मॉल सजतो. सांताक्लॉज येऊन जातो. शहर बदलू लागले आहे. पेहराव्यात बदलात जीन्सची पँट अपरिहार्य असल्याने त्याची दुकाने पाहूनच माणूस थक्क होऊन जातो. मोदी जॅकेटची फॅशन होती तेव्हा मॉलमधून जॅकेट घेणारे बरेच औरंगाबादकर होते. औरंगाबादची चंगळ म्हणजे मॉलची सहल.

संकलन

प्रसाद रावकर, किन्नरी जाधव, राहुल खळदकर, अनिकेत साठे, राखी चव्हाण, सुहास सरदेशमुख

First Published on January 7, 2018 1:40 am

Web Title: malls and pubs cultures increase in cities of maharashtra