प्रा. विजय मोहिते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभ १९२० साली भरलेल्या माणगाव परिषदेत झाला. महाराष्ट्रातील ‘सोशल इंजिनीअिरग’चा पहिला प्रयोग ठरलेल्या या परिषदेची शताब्दीपूर्ती येत्या आठवडय़ात होत आहे. त्यानिमित्ताने..

solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Babasaheb Ambedkar Research and Training Institute
बार्टीचे अधिकारी निघाले लंडनला! ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली वंचित विद्यार्थ्यांच्या पैशाचा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभ १९२० साली भरलेल्या माणगाव परिषदेत झाला. १९२७च्या महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्यासाठी केलेल्या सत्याग्रहाच्या तुलनेत माणगाव परिषद काहीशी उपेक्षित राहिली आहे. या परिषदेची शताब्दीपूर्ती यंदा होत असल्याने आजच्या संदर्भात तिचा धांडोळा घेण्याची आवश्यकता वाटते.

१९१७ साली डॉ. आंबेडकर परदेशी उच्चशिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर दोन वर्षांत साऊथबरो कमिशन आले. तत्कालीन ब्रिटिश शासन भारतीय जनतेला जे काही देऊ पाहात होते, त्यात बहिष्कृतांच्या वाटय़ाला काय येईल, असा डॉ. आंबेडकर यांचा रोखठोक सवाल होता. ‘डिप्रेस्ड क्लास’च्या वतीने महर्षी वि. रा. शिंदे यांनी- अस्पृश्यांचे प्रतिनिधी हे कायदे मंडळाने निवडावे, अशी भूमिका घेतली होती. त्या वेळी डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, ‘‘वरिष्ठ हिंदू अस्पृश्यांवर राष्ट्रीय गुलामगिरी लादू पाहात आहेत, पण अस्पृश्य लोक त्यांचे प्रयत्न हाणून पाडतील.’’ या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या १६ जानेवारी १९१९च्या अंकात ‘महार’ हे टोपणनाव वापरून डॉ. आंबेडकर यांनी ‘अ महार ऑन अ होम रुल’ हे पत्र लिहून- ‘स्वातंत्र्य मिळविणे हा टिळकांचाच नव्हे, तर महारांचादेखील जन्मसिद्ध हक्क आहे,’ असे सांगितले. जातिसंस्थेने अस्पृश्य ठरविलेल्या समाजाचा हा स्वाभिमानी हुंकार होता.

त्याचे पडसाद शाहू महाराजांच्या संवेदनशील कानावर न पडते तर नवलच! त्यानंतर सप्टेंबर १९१९ मध्ये डॉ. आंबेडकर यांना लिहिलेल्या पहिल्याच पत्रात शाहू महाराजांनी त्यांना ‘राजश्री लोकमान्य आंबेडकर’ असा मायना लिहून- ‘आजकाल सर्व अस्पृश्य लोकांचे ‘स्पिरिट’ नाहीसे झाले आहे व त्यातल्या त्यात विशेषत: महार लोकांना ‘सेल्फ रिस्पेक्ट’चा स्पर्शदेखील नाही. आपण मनुष्य आहोत किंवा पशूहून नीच आहोत, याची कल्पना एक फर्लाग अंतरावरून त्यांच्याभोवती फिरते. परंतु त्यांना स्पर्शदेखील करत नाही, मग त्यांच्या मनात कोठून येणार? याचे कारण काय, विचार करता मला असे वाटते की, एक तर त्यांना विद्यादान देणारा कोणीही नाही. एखादा माईचा पूत जर देण्यास तयार झाला, तर ते घेण्यास कबूल होत नाहीत. अशा मागासलेल्या लोकांत जागृती करून त्यांचा उद्धार करण्याचे श्रेय आपण घ्याल काय?’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशोद्धारासाठी करण्याचा पूर्वनिश्चय केलेल्या डॉ. आंबेडकरांना यामुळे अनपेक्षित पाठिंबा मिळाल्यासारखे वाटले असेल. पुढे दत्तोबा पोवार आणि सी. ता. शिवतरकर यांच्या साहाय्याने मुंबईत १७ डिसेंबर १९१९ रोजी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांची भेट घडून आली. माणगाव परिषदेची ही पार्श्वभूमी विचारात घेणे आवश्यक आहे.

माणगाव परिषदेच्या वेळी शाहू महाराज हे देशातील नामवंतांमध्ये ओळखले जात होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या प्रभावाखाली १९०२ साली ब्राह्मणेतरांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा राबवून शाहू महाराजांनी सामाजिक आंदोलनात सहकार्य केले. दत्तोबा पोवार यांना वकिलीची सनद देणे, गंगाराम कांबळे यांना हॉटेल उघडून देणे, भास्कर जाधव यांना संस्थानात नोकरी देणे यातून (आज कुठे शोधूनही न सापडणारी) त्यांची सर्वसमावेशक नजर दिसून येते.

माणगाव परिषद घेण्याचे ठरले तेव्हा ठिकाण कोल्हापूरऐवजी माणगावच का ठरवण्यात आले, याचा तपशील अत्यंत उद्वेग आणणारा आहे. सामाजिकदृष्टय़ा पुरोगामी भूमिका घेतल्यामुळे शाहू महाराजांना बदनामीकारक टीकेसह प्राणांतिक हल्ल्यांनाही तोंड द्यावे लागले होते. १९१९ साली महाराजांना बेसावध करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा काही सनातनी मंडळींकडून प्रयत्न झाला. महाराजांनी सामाजिक परिवर्तनासाठी जे कायदे व सुधारणा केल्या, त्या आपल्या विरोधी जाणाऱ्या होत्या अशी त्यांची धारणा होती. या कटाचा प्रमुख के. डी. कुलकर्णी याला पकडून बिंदू चौकातील तुरुंगामध्ये डांबून ठेवले होते, तर तुरुंगात असणाऱ्या दामू जोशीने तुरुंग फोडून पळून जाताना आपल्यासोबत काही साथीदारांना पळविले होते आणि महाराजांनाच बॉम्बने उडविण्याचे प्रतिआव्हान दिले होते. याच दरम्यान राजवाडय़ाच्या पिछाडीस असणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत भागात बॉम्बस्फोट झाला होता. या ठिकाणी कोल्हापूर संस्थानाचे रिजंट मि. वूडहाऊस व स्वत: महाराजांनी भेट दिली होती. या घटनेचा अहवाल महाराजांना २८ ऑगस्ट १९१९ रोजी प्राप्त झाला. तो पाहून ते अस्वस्थ झाले होते. याचे कारण या बॉम्बने घटनास्थळी मोठय़ा आकाराचा खड्डा पडला होता. हा बॉम्ब राजवाडय़ावर पडला असता तर आपले सारे कुटुंब उद्ध्वस्त झाले असते, असे त्यांना वाटले. (संदर्भ : ‘छ. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार’)

अशा वातावरणात कोल्हापूरला परिषद घेणे काहीसे धोक्याचे ठरले असते. ही परिषद कोल्हापूर किंवा करवीर संस्थानात झाली असती तर महाराजांवर सनातनी वृत्तपत्रांनी कडाडून हल्ला केला असता, तसेच संस्थानांतर्गत चालू असलेल्या ब्रिटिशविरोधी चळवळीचा या परिषदेशी संबंध जोडून हे संस्थान ब्रिटिशांनी खालसा करावे या मागणीसाठी सनातनी मंडळींकडून जोर धरण्यात आला असता. त्यामुळे ही परिषद संस्थानापासून दूर घेणे आवश्यक होते. यासाठीच सखोल विचारांती जाणीवपूर्वक माणगाव हे गाव निवडले गेले.

माणगाव हे कागल जहागिरीत मोडत असून या परिषदेची व्यवस्था करवीर संस्थानातील कोणत्याही जहागीरदारावर न सोपवता ती कागल संस्थानातील एक जहागीरदार अप्पासाहेब दादगोंडा पाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. या गृहस्थांचा माणगावात वाडा होता. या वाडय़ाच्या सर्वात वरच्या मजल्यावरून पंचक्रोशीत घडणाऱ्या घटनांवर टेहळणी करणे सोपे जात होते. याशिवाय नि:स्पृह म्हणून त्यांची ख्याती होती व लोकांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीचा आदर होता. म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्यावर माणगाव परिषदेची जबाबदारी टाकली.

परिषद भरविण्याच्या दृष्टीने दत्तोबा पोवार यांनी पुढाकार घेऊन कोल्हापुरातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. डॉ. आंबेडकरांशी चर्चा व पत्रव्यवहार करून सल्ला व संमती मिळविली. परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. आंबेडकरांना निमंत्रित करण्याचा पोवारांचा प्रस्ताव शाहू महाराजांनी मान्य तर केलाच; पण परिषदेला स्वत: उपस्थित राहून सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही मान्य केले. त्याप्रमाणे पत्रके छापून गावोगावी वाटण्यात आली. परिषद यशस्वी करण्यासाठी कामाच्या विभागणीनुसार विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व असलेल्या कार्यकर्त्यांच्या समित्या सर्वानुमते स्थापन करण्यात आल्या.

परिषदेच्या दिवशी, म्हणजे २१ मार्च रोजी पाडवा होता. डॉ. आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापुरात सकाळच्या रेल्वेने दाखल झाले. त्यांच्यासोबत तल्यारखान नावाचे पारशी वकील होते. डॉ. आंबेडकर चारच्या सुमारास सभास्थानी पोहोचले. सभेला सुमारे सात ते आठ हजारांचा समुदाय आपल्या भावी नेत्याला पाहात होता. डॉ. आंबेडकर यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अध्यक्षीय भाषण सुरू झाले. प्रारंभीच त्यांनी शाहू महाराजांच्या कार्याबद्दल कृतज्ञतापूर्वक प्रशंसोद्गार काढले. तसेच ही परिषद कशी अपूर्व आहे, याचे सखोल विवेचन केले. मुंबई इलाख्यातील हा तसा पहिलाच प्रसंग आहे आणि आपल्या लोकांत उन्नतीबद्दल कळकळदेखील तितकीच अपूर्व आहे, असे सांगून ते म्हणाले की- ‘‘महाराजांनी आपल्या सर्वापुढे ज्या कामासाठी आवाहन केले आहे ते मी स्वीकारले आहे. त्यांना मी अशी खात्री देतो की, हे कार्य पूर्ण होण्यासाठी मी प्राणपणाने लढेन, पण शेवटास नेल्याशिवाय राहणार नाही.’’ या परिषदेत भाग घेण्यासाठी बेळगाव, निपाणी या भागांतील बरीच मंडळी आली असल्याने त्यांना उद्देशून यल्लमाला मुली जोगत्या सोडण्याची, त्या भागातील अनिष्ट प्रथा बंद करण्याचे, तसेच अस्पृश्यांनी मृत जनावरांचे मांस खाण्याचे बंद करण्याचे कळकळीचे आवाहन केले. चळवळ कायम ठेवली पाहिजे, त्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे, कारण शिक्षणाशिवाय आपला तरणोपाय नाही, असेही डॉ. आंबेडकर या वेळी म्हणाले. (संदर्भ : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे (भाग पहिला)’; संपादन- विजय सुरवाडे)

आधी ठरल्याप्रमाणे मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून शिकारीला गेलेले शाहू महाराज शिकार करण्याच्या पोशाखात माणगावात पोहोचले. त्यांनी परिषदेला फक्त उपस्थितीच लावली नाही तर भाषणसुद्धा केले. ‘‘तुमचा खरा पुढारी तुम्ही निवडला,’’ याबद्दल अभिनंदन करून ते पुढे म्हणाले, ‘‘माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे, तर एक वेळ अशी येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते.’’ अस्पृश्यांच्या वतीने ठराव संमत करताना १५ ठराव मांडले गेले; त्यातील ठराव क्र. दोन असा आहे की, ‘श्रीमन्म महाराज शाहू छत्रपती सरकार इलाखा करवीर यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे. याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा, असे या परिषदेचे मत आहे.’ याच परिषदेनंतर डॉ. आंबेडकरांनी ठरवले की, पुढारी बनायचे असेल तर स्वतंत्र व्यवसाय अर्थात वकिली व पुस्तकलेखन करूनच चरितार्थ करावा.

वरील वृतान्तावरून दिसून येते की, माणगाव परिषदेमुळे शाहू महाराज-डॉ. आंबेडकर ही नवीन जोडी महाराष्ट्राच्या सामाजिक क्षितिजावर अवतीर्ण झाली. यानिमित्ताने पूर्वास्पृश्य समाजातील अनेक जाती, शेतकरी असे सर्व समाजघटक एकत्रित आले आणि ‘सोशल इंजिनीअिरग’च्या पहिल्या प्रयोगास आरंभ झाला. तथापि, माणगाव परिषदेनंतर अवघ्या दोन वर्षांत शाहू महाराजांचे निधन झाले. महाराजांना अधिक आयुष्य लाभले असते तर या प्रयोगामुळे महाराष्ट्राचेच नव्हे, तर उभ्या देशाचे चित्र बदलले असते. आजचे जाती-जमातींत पसरलेले अविश्वासाचे आणि विषारी धार्मिक वातावरण विचारात घेता, अशा ‘सोशल इंजिनीअिरग’ची तसेच त्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शाहू महाराज-डॉ. आंबेडकर यांच्या दूरदृष्टीची व मुत्सद्देगिरीची प्रकर्षांने आठवण येते. या परिषदेपासून अशी प्रेरणा घेऊन उद्याच्या सुखी व समृद्ध भारताच्या निर्मितीचे आव्हान स्वीकारण्याची निकड आहे.

(लेखक पाली भाषा आणि इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

vijaymohite385@gmail.com