धोंडिराम अर्जुन
सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, मका, तूर, बाजरी, सोयाबीन, उडीद याव्यतिरिक्त क्व चितच पिकाची लागवड शेतकरी करायचे. द्राक्षे, डाळिंब आणि के ळी या फळपिकाबरोबर आता आंब्याचे उत्पादनही शेतकरी घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या बदलत्या पीक पद्धतीबाबत..

सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, मका, तूर, बाजरी, सोयाबीन, उडीद याव्यतिरिक्त क्व चितच पिकाची लागवड शेतकरी करायचे. जिल्ह्य़ातील बहुतेक पिके  पावसावर अवलंबून होती. पुढे उजनी धरण, भीमा नदी, सीना नदी, तलाव आदी सिंचनांच्या कामामुळे हळूहळू जिल्ह्यात बागायत क्षेत्र वाढले. उसाचे क्षेत्र सर्वात जास्त झाले. यापाठोपाठ शेतकरी द्राक्षे, डाळिंब आणि केळी ही फळपिकेही घेत आहेत. उसाला जादा पाणी लागत असल्याने आणि जमिनीचा कस कमी होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी आंबा लागवडीकडे वळू लागला आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. कोकणचा राजा आता सोलापूर जिल्ह्यातही वेगाने वाढत आहे.

Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर असते. आंबा पिकाला लागणारे तापमान, खडकाळ जमीन आणि कमी पाणी यामुळे शेतकऱ्यांनी आंबा लागवडीला प्राधान्य देण्यास सुरूवात केली आहे. शास्त्रीय आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली तर कधीच तोटय़ात येत नाही. शास्त्रीय माहिती, तंत्रज्ञान कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवित आहे, मात्र अंमलबजावणी करण्यात शेतकरी पुढे येताना दिसत नाहीत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कमी पाण्यात, आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली तर हा व्यवसायही फायद्याचा होऊ शकतो, हे आता प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

आंब्याची वाढती लागवड

जिल्ह्यात जास्त पाणी लागणाऱ्या उसाच्या शेतीला शेतकरी प्राधान्य देत आहे. परंतु जास्त पाणी दिल्यामुळे हळूहळू जमिनीचा कस कमी होत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी पुन्हा या पिकाकडून अन्यत्र आपला मोर्चा वळवला आहे. यात सर्वाधिक पसंती ही फळ लागवडीला मिळाली आहे. फलोत्पादनात जिल्ह्यात सर्वात जास्त क्षेत्र डाळिंबाचे ४७ हजार ३७६ हेक्टर आहे. त्याखालोखाल द्राक्षाचे १७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. केळी, बोरे, सीताफळाचे क्षेत्रही आता विस्तारत आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत आंब्याचे क्षेत्र १८३१ हेक्टरपर्यंत वाढले आहे.

सोलापूर जिल्ह्यात हापूस जातीच्या आंब्याला पोषक वातावरण नसल्याने याची लागवड कमी प्रमाणात होते. मात्र उर्वरित आंब्याच्या जातीला पोषक वातावरण असल्याने केशर, पायरी, तोतापुरी, रत्ना, सिंधू, मलिका, रायवळ जातीच्या आंब्यांची लागवड वाढू लागली आहे. जिल्ह्यात आंब्याची लागवड वाढत असून उत्पादनही मोठय़ा प्रमाणात निघत आहे. यातही हे उत्पादन गुणवत्तेत दर्जेदार असल्याने युरोप आणि आखाती देशातून सोलापूरच्या आंब्याला मागणी होत आहे. यामुळे सोलापूरचा आंबा आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. मागील वर्षी सोलापुरातून युरोप, आखाती देशात आंब्याची तब्बल ३०० टन निर्यात झाली आहे. राज्य शासन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीसाठी मदत करीत आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही याची मदत करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून हेक्टरी दोन लाख १९ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. आंबा फळाला १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे लागते. यामुळे आंबा बागेत १० वर्षांपर्यंत भाजीपाला, द्विदल, भुईमूग, पालेभाज्या, ताग अशी आंतरपिके घेता येतात.

या बदललेल्या पीक पद्धतीमुळे सोलापूर जिल्ह्यात सुमारे दोन हजार आंबा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांना कृषी विभाग, कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्थे(आत्मा) तर्फे मार्गदर्शन केले जाते. विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंबा लागवड, कीड नियंत्रण, व्यवस्थापन, छाटणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान, निर्यात, बाजारपेठ याविषयीची माहिती दिली जाते.

समाजमाध्यमांचा वापर

जिल्ह्यात ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे यांनी समाजमाध्यमाद्वारे दोन गट तयार केले आहेत. या गटांमध्ये कृषी अधिकारी, निवडक कर्मचारी, शास्रज्ञ, आंबा उत्पादक शेतकरी, निर्यातदार आहेत. या समाजमाध्यम गटांवर थेट शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. करोना काळात शेतकऱ्यांना आंबा लागवडविषयी, तंत्रज्ञानाची  माहिती क्षणात मिळत आहे. गटावरील तज्ज्ञ अनुभवी शेतकरी, शास्रज्ञ, अधिकारी मार्गदर्शन करतात. गटावर आंबा उत्पादनाचे मार्केटिंग प्रभावीपणे कसे करायचे याविषयी चर्चा घडवून आणली जाते. पुढे यातून शेतकऱ्यांनी स्वत:हून अन्य १४ गट तयार केले आहेत. याद्वारेही ते एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करीत आहेत.

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री

या समाजमाध्यम गटांच्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकरी खरेदीदारांशी जोडला गेला आहे. यामुळे गटांवर फळाबाबत चर्चा, माहिती, तपशील, छायाचित्रे यांची देवाणघेवाण होते. यातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची संधी प्राप्त झाली आहे. विक्रीसाठी प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ  लागली आहे. जेऊ र (ता. अक्कलकोट) येथील निवृत्त कृषी अधिकारी विजयकुमार बरबडे यांनी केशर आंब्याचा विजयराज फार्मफ्रेश ब्रँड तयार केला आहे. त्यांनी सात एकरमध्ये १८०० केशर आंब्याची लागवड केली आहे. परागीकरणासाठी इतर २०० आंब्याची लागवड  करून वर्षांला १५ ते २० टन उत्पादन घेत आहेत.

आंबा लागवडीचे क्षेत्र वाढणार

मागील वर्षी भरपूर पाऊ स झाला होता. यावर्षीही पाऊ स चांगला होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा आंबा लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. शेतकऱ्यांना ‘एमआरईजीएस’ (महात्मा गांधी रोजगार हमी योजना)मधून मदत करण्यात येत आहे. जिल्ह्यात आंबा उत्पादनाला पोषक वातावरण, खडकाळ, पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कल आंबा लागवडीकडे वाढत आहे.

– रवींद्र माने, सोलापूर जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

आंबा उत्पादक संघाचे नियोजन

जिल्ह्यात डाळिंब, द्राक्षे या फळबागांचे संघ असल्यामुळे ते संघटित शेतकरी आहेत. मात्र आंबा, पेरू, ‘ड्रॅगन फ्रू ट’ यामधील शेतकरी संघटित नसल्यामुळे विक्रीवर परिणाम होतो. तालुका, जिल्हास्तरावर समाज माध्यम गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चळवळ उभी राहत आहे. त्यांच्या कामाला संस्थात्मक स्वरूप देण्याच्या हेतूने तालुका, जिल्हास्तरावर आंबा उत्पादक व खरेदीदार संघ स्थापन करण्याचे नियोजन  आहे.

– मदन मुकणे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा