एमान्युएल मॅक्रॉन या ३९ वर्षांच्या व्यक्तीने २०१६ साली जेव्हा आपली ‘एन मार्श’ ही चळवळ सुरू केली तेव्हा तो फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष होऊ  शकेल असं कुणाला वाटलं नव्हतं. अगदी राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या मतदानाच्या पहिल्या फेरीतदेखील ७५ टक्के फ्रेंच जनतेची मतं त्याला मिळालेली नव्हती. आज मात्र फ्रान्सच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये प्रचंड बहुमत मिळवून राष्ट्राची नव्यानं उभारणी करायला तो सज्ज झाला आहे. उद्योजकांना आकर्षित करणारी उजवी आर्थिक धोरणं आणि सर्वसामान्यांचाही विकास होऊ  शकेल अशी डावीकडे झुकलेली सामाजिक धोरणं अशी कसरत मॅक्रॉन करू  पाहताहेत.. फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात बॅस्टिलचा तुरुंग फोडून झाली. त्या दिवसाचे स्मरण म्हणून १४ जुलै हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिन असतो. त्या निमित्ताने हा विशेष लेख..

फ्रान्समध्ये सध्या एक नवी राजकीय क्रांती घडते आहे. १७८९ची राज्यक्रांती रक्तरंजित होती, पण आताची मात्र रक्त न सांडता होते आहे. १५-२० महिन्यांपूर्वीपर्यंत त्या क्रांतीचा उद्गाता फ्रान्सबाहेर कुणाला माहीत नव्हता, पण आता मात्र त्याचा डंका जगभर निनादतो आहे. एमान्युएल मॅक्रॉन या ३९ वर्षांच्या व्यक्तीने २०१६ साली जेव्हा आपली ‘एन मार्श’ ही चळवळ सुरू केली तेव्हा तो फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष होऊ  शकेल असं कुणाला वाटलं नव्हतं. अगदी राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या मतदानाच्या पहिल्या फेरीतदेखील ७५ टक्के फ्रेंच जनतेची मतं त्याला मिळालेली नव्हती. आज मात्र फ्रान्सच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये प्रचंड बहुमत मिळवून राष्ट्राची नव्यानं उभारणी करायला तो सज्ज झाला आहे. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या काही देशांतल्या जनमताच्या ताज्या कौलांच्या तुलनेत फ्रेंच जनतेचा हा कौल अधिकच लक्षवेधक ठरतो आहे. इतकंच नव्हे, तर भारतीय चौकटीतल्या काही ताज्या यशस्वी-अयशस्वी राजकीय चळवळींशी त्याची तुलना केली, तर आपल्या समकालीन राजकारणासंदर्भातही काहीतरी उद्बोधक त्यात सापडू शकेल. याची कारणं अनेक आहेत. मार्च २०१७ पर्यंत फ्रेंच राजकारण एका हतोत्साहित वळणावर उभं राहिल्याचा अनुभव येत होता. विद्यमान अध्यक्ष ओलांद यांची निस्तेज कारकीर्द मावळत आलेली होती. फ्रान्सला नवा राष्ट्राध्यक्ष देण्याची क्षमता त्यांच्या सोशालिस्ट पक्षात आहे असं चिन्ह दिसत नव्हतं. रिपब्लिकन पक्षाचे फिलों यांना यश मिळू शकेल असं वातावरण आधी होतं, पण आर्थिक घोटाळ्यांमध्ये त्यांचं नाव अडकलं आणि त्यांची ताकद दुबळी झाली. ‘नॅशनल फ्रंट’च्या मारिन ल पेन यांचे आततायी आणि द्वेषमूलक विचार मतांचं ध्रुवीकरण करणार आणि राष्ट्राध्यक्षपदाची माळ अखेर त्यांच्या गळ्यात पडणार, अशीही शक्यता मग चर्चिली जाऊ लागली. मॅक्रॉन राजकारणात नवखे असल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या नव्या पक्षाची हेटाळणी केली जात होती. त्यांची चळवळ केवळ इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या बळावर उभी आहे आणि त्यामुळे आभासीच राहील अशी भाकितं वर्तवली जात होती. या प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी कशी मात केली, हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे.

त्याची सुरुवात चक्क एक पुस्तक लिहून झाली असं म्हणता येतं. स्वत: मॅक्रॉन त्याचे लेखक होते आणि त्याचं नावच ‘क्रांती’ होतं. या पुस्तकात मॅक्रॉन यांनी आपलं राजकीय तत्त्वज्ञान विशद केलं होतं. राजकारणाचा फारसा अनुभव नसणं हे मॅक्रॉन यांच्या पथ्यावर पडलं, कारण त्यांची राजकीय विचारसरणी प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात एक नवा पर्याय म्हणून त्यामुळेच उभी राहू शकली. ‘सध्याच्या राजकारण्यांच्या नैतिकतेचा ऱ्हास झालेला दिसतो; त्यांना फ्रान्सच्या इतिहासाचं भान उरलेलं नाही आणि सर्वात मुख्य म्हणजे ते आपला मानवी चेहराच हरवून बसलेले आहेत,’ हा मॅक्रॉन यांच्या मांडणीचा पाया होता. राजकारणात एक प्रकारची व्यावसायिकता रुळलेली आहे आणि सामान्य जनतेशी राजकारण्यांचा संबंधच उरलेला नाही, असंही मत त्यांनी पुस्तकात मांडलं होतं. ‘एन मार्श’ची त्यांनी जेव्हा स्थापना केली तेव्हा ती राजकीय पक्ष म्हणून न करता चळवळ म्हणून केली होती. राजकारण करण्याऐवजी आपल्या विचारांविषयी समाजात जागरूकता वाढवणं असा त्यामागचा विचार होता. त्यांचे बरेचसे कार्यकर्तेही कसलाही राजकीय अनुभव नसलेले उत्साही लोक होते. आपल्या चळवळीला पुरेसा जनाधार मिळाला आहे हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला आणि इतिहास घडवला. हे सगळं अतिशय पद्धतशीरपणे आणि विचारपूर्वक घडलं.

मॅक्रॉन यांची विचारसरणी खास फ्रेंच वैचारिक परंपरेतून आलेली आहे आणि त्यांच्या या कार्यपद्धतीत त्याचंच प्रतिबिंब पडलं (आणि कदाचित हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.). त्यांनी तत्त्वज्ञानाचा आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला आहे. मानव्य शाखांतल्या संशोधनासाठी प्रख्यात असलेल्या आणि ‘सायन्सेस पो’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमधल्या संस्थेत त्यांनी शिक्षण घेतलं. अनेक फ्रेंच उच्चपदस्थ ज्या मातृसंस्थेत घडतात त्या ईएनएमध्ये त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यानंतर एका व्यापारी बँकेमध्ये (र्मचट बँक) ते काम करत होते. तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थकारण यांची ही तिहेरी पाश्र्वभूमी त्यांच्या धोरणांचा पाया ठरली. त्याचा सामना करणं त्यांच्या विरोधकांना जड गेलं.

रने देकार्तसारख्या तत्त्वज्ञांनी रुजवलेली फ्रान्सची शेकडो वर्षांची तर्कशुद्ध वैचारिक परंपरा आणि वैश्विकता यांची कास धरून मॅक्रॉन यांनी समकालीन वास्तवाचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते डावे आणि उजवे ही परंपरागत मांडणी आता कालबाह्य़ झाली आहे, पण राज्यक्रांतीतल्या समतेच्या तत्त्वाचं महत्त्व मात्र आजच्या असमान जगात कायम आहे. आजच्या फ्रान्समध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना जी आर्थिक सुरक्षा आणि स्थैर्य आहे ते खासगी क्षेत्रातल्या फ्रेंच कामगारांना नाही. निवडक प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या उच्चभ्रू वर्गाला शिक्षणाच्या आणि करिअरच्या ज्या संधी उपलब्ध होतात त्यांना इतर विद्यापीठांतून बाहेर पडणारे बहुसंख्य विद्यार्थी पारखे होतात. पॅरिससारखी मोठी शहरं आणि छोटी गावं किंवा महानगर आणि गरीब वस्तीची उपनगरं अशा अनेक पातळ्यांवर ही विषमता आहे. जागतिकीकरणाच्या खऱ्या फायद्यांपासून फ्रेंच जनतेला ती वंचित ठेवते. या विषमतेमुळे ‘नॅशनल फ्रंट’सारखा पक्ष मतांचं ध्रुवीकरण करू शकतो; वर्णभेदी आणि वंशभेदी धोरणांचा पुरस्कार करून लोकांची मतं खेचू शकतो. कडव्या देशाभिमानाचा हा विखार निष्प्रभ करायचा, तर युरोपिअन उदारमतवाद आणि राज्यक्रांतीतून आलेला विश्वबंधुत्वाचा विचारच उपयोगी पडेल अशी मॅक्रॉन यांची धारणा आहे. दहशतवादावर उपाय म्हणून फ्रान्समधल्या सगळ्या मुसलमानांना दुष्ट ठरवणं आणि देशात सतत आणीबाणीसदृश कठोर उपायांची अंमलबजावणी करत राहणं योग्य नाही असंही मॅक्रॉन म्हणतात.

खरं तर यात नवीन विचार असा काहीच नाही. किंचित डावीकडे झुकलेल्या उदारमतवादी विचारांचं फ्रेंच राजकारण गेली कित्येक र्वष यासारख्याच धोरणात्मक पायावर आधारलेलं आहे. मग सर्व प्रस्थापितांचा नि:पात करणं मॅक्रॉन यांना कशाच्या बळावर आणि कसं काय साधलं हे समजून घ्यायला त्यांची पाश्र्वभूमी लक्षात घ्यायला हवी.

मॅक्रॉन यांचा जन्म एका सुशिक्षित मध्यमवर्गीय घरात झाला. त्यांचं बालपण एका लहान शहरात गेलं. नामवंत आणि प्रस्थापित घराण्याची पाश्र्वभूमी नसतानादेखील लहान गावातून आलेला एक युवक केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि प्रयत्नांच्या बळावर एवढं यश मिळवू शकतो हे दाखवणारी त्यांची कहाणी आधुनिक आणि प्रगतिशील फ्रान्सच्या प्रतिमेला साजेशी आहे. त्याचा त्यांना फायदा झाला. इतर राजकारण्यांच्या तुलनेत तरुण असणं हासुद्धा त्यांच्या बाजूचा एक महत्त्वाचा घटक आहे. ते आयफोन वापरतात. ते बिनदिक्कत आणि अजिबात न अवघडता आपलं फ्रेंच वळणाचं इंग्रजी बोलतात. एकविसाव्या शतकातल्या फ्रेंचांना ते त्यामुळे जवळचे वाटतात. हे निव्वळ वरवरचं नाही हे त्यांच्या अनेक धोरणांवरून लक्षात येतं. खालच्या आर्थिक-सामाजिक स्तरातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणं, लहान गावांतल्या शिक्षणाची पातळी शहरांतल्या शाळांइतकी चांगली करणं, त्यासाठी देशभर शिक्षकांची वाढीव भरती करणं अशांसारख्या त्यांच्या धोरणांमागे ही त्यांची पाश्र्वभूमी आहे. तात्पुरत्या अस्थिर नोकऱ्यांपेक्षा कायमस्वरूपी नोकऱ्यांचं प्रमाण वाढवणं हा त्यांच्या जाहीरनाम्यातला तरुणांना आकर्षक वाटणारा भाग आहे. सध्याची करप्रणाली, किचकट नियम आणि अवाढव्य नोकरशाही व्यवसायांना जाचक आणि बोजड वाटते याची जाणीव मॅक्रॉन यांना आपल्या कार्यानुभवामुळे आहे. त्यात बदल करून ती अधिक लवचीक आणि व्यवसायाभिमुख करण्याचा त्यांचा मानस आहे. मॅक्रॉन यांना त्यामुळे उद्योगजगताचाही पाठिंबा मिळाला. अर्थात राजकारणी म्हणून ते नवखे असले तरीही त्यांचा उद्योजकस्नेह मात्र आजचा नाही. रिपब्लिकन पक्षाच्या सार्कोझी सरकारच्या काळात एका महत्त्वाच्या आर्थिक धोरणविषयक समितीत त्यांचा सहभाग होता. २०१२ ते २०१५ या काळात तर ते सोशालिस्ट पक्षाच्या सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी होते. २०१४ मध्ये फ्रान्सचे अर्थमंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्या काळातही त्यांनी व्यवसायाभिमुख धोरणं राबवली आणि त्यासाठी कायद्यात बदलही केले. आजचे प्रस्थापित पक्ष देशाला पुढे नेण्यासाठी स्वत:मध्ये बदल घडवून आणायला सक्षम नाहीत असा निष्कर्ष मॅक्रॉन यांनी याच काळात काढला. एका नव्या पक्षाची स्थापना करावीशी वाटण्यामागे त्यांचा हा पूर्वानुभव कारणीभूत ठरला. हा निर्णय अर्थात धाडसी होता, पण त्यामुळे मॅक्रॉन फ्रेंचांना अधिक भावले हे नाकारता येत नाही.

मारिन ल पेन यांच्या एकारलेल्या विचारांना विरोध असल्यामुळे अनेकांनी मॅक्रॉन यांना मत दिलं. म्हणजे त्यांच्या यशात नशिबाचा भागही महत्त्वाचा होता. उदाहरणार्थ, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत डाव्या विचारांचे विख्यात फ्रेंच अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी यांचा पाठिंबा मॅक्रॉन यांना नव्हता, पण दुसऱ्या फेरीत मॅक्रॉन व ल पेन अशी लढत होणार असं दिसल्यावर त्यांनी मॅक्रॉन यांची बाजू घेतली. हे करताना त्यांनी मॅक्रॉन यांची जबाबदारी स्पष्ट केली – जेव्हा डाव्या किंवा समाजवादी विचारांचे मतदार ल पेन यांना विरोध म्हणून मॅक्रॉन यांना मत देतात, तेव्हा सर्वसामान्यांच्या व्यापक हितासाठी धोरणं राबवणं हे मॅक्रॉन यांचं कर्तव्य आहे असं पिकेटी मानतात. मात्र, कडव्या डाव्या विचारांना फ्रेंच जनतेचा कौल मिळू शकला नाही, हे वास्तवही ते मान्य करतात.

शहरी मतदार जितक्या प्रमाणात मॅक्रॉन यांच्याकडे वळला तितका ग्रामीण मतदार वळला नाही. पॅरिसवासीयांची ९० टक्के मतं मॅक्रॉन यांना मिळाली, पण उद्योगीकरण कमी असलेल्या भागांतले आणि दक्षिणेतले मतदार ल पेन यांच्यापाशी राहिले. डाव्या आणि उजव्या बाजूच्या मध्यममार्गी मतदारांना आपल्याकडे वळवण्यात मॅक्रॉन यांना यश मिळालं असलं तरीही मतांचं असं ध्रुवीकरण झालेलं आहे हे नाकारता येत नाही. शिवाय, १८ ते २४ वर्षांचे मतदार कडव्या डाव्या विचारांच्या आणि तंत्रनिपुण मेलाँशों यांच्या प्रभावाखाली आले आणि दुसऱ्या फेरीत मॅक्रॉन यांच्याकडे वळले. हे पिकेटी यांच्या विश्लेषणाशी सुसंगत आहे आणि मॅक्रॉन यांच्यापुढची आव्हानं काय असू शकतील याचं निदर्शक आहे. तर, निव्वळ कडवेपणाला फ्रेंच जनता भुलत नाही हे तिच्या मध्यममार्गी विचारांचं द्योतक आहे.

सध्याच्या गुंतागुंतीच्या वास्तवाचं आकलन होण्यासाठी तत्त्वज्ञानाचा अभ्यास मॅक्रॉन यांना उपयोगी पडतो. सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोपीच असतात आणि ती आपल्याकडे आहेत असा त्यांचा दावा नाही, पण एखाद्या विषयाचा अनेक बाजूंनी विचार करण्यासाठी तत्त्वज्ञानाची मदत होते असं ते मानतात. तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असताना त्यांनी दोन र्वष पोल रिकर या समकालीन तत्त्वज्ञासोबत काम केलं. रिकर यांनी कायदा, सौंदर्यशास्त्र, नीतिशास्त्र, भाषा, मानसशास्त्र अशा अनेक विषयांवर तत्त्वचिंतन आणि लिखाण केलेलं आहे. दोन परस्परविरोधी तत्त्वं एकत्र आणताना आपली कल्पनाशक्ती वापरून आणि वास्तवाचं भान राखत व्यावहारिक उपयोगाची मध्यममार्गी मांडणी करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. उद्योगांना प्रोत्साहन देताना त्याच वेळी गरिबांचं शोषण होऊ  न देणं अशा प्रकारची धोरणं मांडण्याचा प्रयत्न मॅक्रॉन जेव्हा करतात तेव्हा त्यांच्यावरचा रिकर यांचा प्रभाव दिसतो.

तत्त्वज्ञानाच्या पाश्र्वभूमीमुळे त्यांचं बोलणं समजायला अवघड जातं अशी टीकाही त्यांच्यावर होते. १४ जुलैला फ्रान्सचा राष्ट्रीय दिन असतो. त्या दिवशी राष्ट्राध्यक्षांनी वार्ताहर परिषद घ्यायचा शिरस्ता आहे. पण आपले विचार वार्ताहरांना जड जातात म्हणून मॅक्रॉन या वर्षी वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला उत्सुक नाहीत अशी कुजबुज आहे. अशा घटनांमुळे काही वर्तुळांत त्यांची प्रतिमा अतिबुद्धिमान आणि शिष्ट अशी होते आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी आपली प्रतिमा अत्यंत काळजीपूर्वक घडवलेली आहे असंही दिसतं. आपल्या मंत्र्यांकडून प्रसारमाध्यमांना काय संदेश जातात याविषयी ते अतिशय जागरूक आहेत. प्रत्येक राष्ट्राध्यक्षाचं एक अधिकृत छायाचित्र काढलं जातं. फ्रान्सभर सरकारी कार्यालयांत ते लावलं जातं. मॅक्रॉन यांच्या छायाचित्रात त्यांचे दोन आयफोन आणि एक पुस्तक दिसतं. छायाचित्राची पाश्र्वभूमी बागेतल्या गर्द वनराजीची आहे. त्यांच्या एका बाजूला राष्ट्रीय ध्वज आहे, तर दुसऱ्या बाजूला युरोपचा ध्वज आहे. तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि पर्यावरण यांचा स्नेही असलेला, एकविसाव्या शतकातल्या फ्रान्सला (आणि युरोपला) साजेशा सर्वसमावेशक आणि आधुनिक विचारांचा राष्ट्रप्रमुख म्हणून आपली प्रतिमा त्यांनी उभी केली आहे. ही प्रतिमा केवळ आभासी मात्र नाही. उदाहरणार्थ, त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक तरुण चेहरे आहेत, निम्म्या स्त्रिया आहेत आणि फ्रान्सच्या बहुवांशिक चेहऱ्याचंही प्रतिबिंब त्यात पडेल याची काळजी त्यांनी घेतली आहे.

त्यांचा पक्ष राजकारणात नवखा आहे ही जाणीव त्यांना आहे. सरकारमधली अनेक महत्त्वाची पदं रिपब्लिकन आणि सोशालिस्ट पक्षातल्या अनुभवी लोकांना देऊन त्यांनी एकीकडे आपल्या मध्यममार्गी कारभाराची चाहूल दिली आहे; आणि त्याच वेळी दोन्ही पक्षांतल्या त्यांच्या विरोधकांची बोलतीही बंद केली आहे. नव्या व्यवसायांसाठी (स्टार्ट-अप) पॅरिसच्या तेराव्या प्रभागामध्ये तब्बल ३४,००० चौरस मीटरची जागा (‘स्टेशन एफ’) उपलब्ध करून देणं आणि कुशल विदेशी तंत्रज्ञांना सुलभ व्हिसा उपलब्ध करून देणं अशी त्यांच्या विचारांशी सुसंगत धोरणं मे २०१७ मध्ये सत्तेवर आल्या आल्या त्यांनी प्रत्यक्षातही आणली आहेत. ब्रेग्झिटनंतरचं ब्रिटन आणि ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणानंतरची अमेरिका परकीयांकडे संशयास्पद नजरेनं पाहत असताना फ्रान्समध्ये ही नवी व्यवस्था आणणं एक बोलकं आणि महत्त्वाचं पाऊल आहे.

तरुणांना आपलंसं करतील अशा अनेक गोष्टी त्यांच्या कारभाराप्रमाणे वर्तणुकीतही दिसतात. विद्यार्थीदशेतच ते आपल्यापेक्षा २४ वर्षांनी मोठय़ा आपल्या एका शिक्षिकेच्या प्रेमात पडले. पुढे घरच्यांचा विरोध डावलून दोघं विवाहबद्ध झाले. त्यांची प्रेमकहाणी त्यांनी लोकांपासून लपवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. किंबहुना, आपल्या व्यक्तिगत आयुष्याविषयी ते अतिशय पारदर्शी आणि मोकळेढाकळे आहेत. सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातल्या छोटय़ामोठय़ा गोष्टी शेअर करण्याची सवय असलेल्या आजच्या तरुणांना त्यामुळे मॅक्रॉन आपलेसे वाटतात. यापूर्वी सार्कोझी यांनीही तरुणाईला साजेशी वर्तणूक केली होती, पण त्यांच्यात पुरेसं गांभीर्यच नसल्यामुळे त्यांची प्रतिमा पोरकट झाली. याउलट, लोकांना गंभीर विचार करायला लावणं आणि हसवणं अशा दोन्ही गोष्टी मॅक्रॉन यांना लीलया जमतात (याबाबतीत त्यांनी ओबामांपासून प्रेरणा घेतली असावी.). उदाहरणार्थ, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लोकांना भेटतात तेव्हा आपल्या राक्षसी हस्तांदोलनाने समोरच्याला बेजार करतात अशी त्यांची ख्याती आहे. मॅक्रॉन जेव्हा त्यांना भेटले तेव्हा मात्र उलट ट्रम्प यांनाच मॅक्रॉन यांच्या हाताचा विळखा भारी पडला. समाजमाध्यमांत त्यांच्या या हस्तांदोलनाचा व्हिडीओ प्रसारित झाला. प्रदीर्घ वाटाघाटींनंतर हवामान बदलाच्या पॅरिस समझोत्याचा मसुदा अनेक देशांसह तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी मान्य केला होता. पण ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषवाक्याच्या जोरावर राष्ट्राध्यक्षपदी पोचलेल्या ट्रम्प यांनी तो राष्ट्रविरोधी निर्णय होता असं म्हणत एका रात्रीत अमान्य केला. त्यावर टीका म्हणून मॅक्रॉन यांनी ‘मेक अवर प्लॅनेट ग्रेट अगेन’ असं ट्वीट केलं. तेसुद्धा प्रचंड लोकप्रिय झालं.

एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि तरुणांना आवडेल अशी प्रागतिक विचारसरणी, पण त्याच वेळी उद्योजकांना आश्वासक वाटणारी धोरणं राबवण्याची इच्छाशक्ती आणि ज्येष्ठांना आवडेलसा आपल्या देशाच्या भवितव्याविषयी किंचित आध्यात्मिकतेकडे  झुकणारा दुर्दम्य आशावाद यांचं मिश्रण हा कदाचित मॅक्रॉन यांना व्यापक जनाधार मिळण्यामागचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे डावीकडचे आणि उजवीकडचे अगदी कडवे लोक सोडले तर उरलेला मध्यममार्गी फ्रान्स आज मोठय़ा आशेनं मॅक्रॉन यांच्याकडे पाहतो आहे. भांडवलवादाचा एक नवा चेहरा त्या निमित्तानं फ्रान्सला मिळतो आहे. उद्योजकांना आकर्षित करणारी उजवी आर्थिक धोरणं आणि सर्वसामान्यांचाही विकास होऊ  शकेल अशी डावीकडे झुकलेली सामाजिक धोरणं अशी कसरत मॅक्रॉन करू पाहताहेत. युरोपशी सहकार्य आणि पर्यावरणस्नेही धोरणं यांसारखे पैलू त्यांना एकविसाव्या शतकाचे प्रातिनिधिक ठरवतात. ही कसरत सोपी नाही. गेली कित्येक र्वष फ्रान्समध्ये आर्थिक मंदीसदृश वातावरण आणि बेरोजगारी आहे. नव्या राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांमुळे आणि कारभारामुळे नोकऱ्या वाढल्या नाहीत तर श्रमिक वर्गाचा रोष वाढून ते पुन्हा ल पेन यांच्याकडे वळण्याची दाट शक्यता आहे.

मॅक्रॉन यांच्या कारकीर्दीचं प्रत्यक्ष फलित काय असेल ते काळच ठरवेल, पण अनेक वर्षांच्या नैराश्यातून फ्रान्सला बाहेर काढून त्याला भविष्याकडे आशेनं पाहायला उद्युक्त करण्यात सध्या तरी मॅक्रॉन यांना नेत्रदीपक यश मिळालेलं आहे.

अभिजित रणदिवे

rabhijeet@gmail.com