15 December 2017

News Flash

पोलीस विभागाचा बुरूज ढासळला

सचोटीने काम करणारे पोलीस अधिकारी

अरविंद इनामदार | Updated: May 14, 2017 3:10 AM

जागतिक कीर्तीचे क्रीडा मानसतज्ज्ञ व सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी भीष्मराज बाम आणि सचिन तेंडूलकर

भीष्मराज बाम हे प्रामाणिक व सचोटीने काम करणारे पोलीस अधिकारी होते. ते नेहमीच सज्जनांचा पुरस्कार करत आणि सज्जन माणसांच्या पाठीशी कायम उभे राहत असत. चांगल्या माणसांची त्यांना उपजतच जाण होती.  पोलीस खात्यात फारच कमी माणसे अशी असतात की, जी शेवटपर्यंत चांगली राहतात.. बाम हे त्यापैकी एक होते..

भीष्मराज बाम आणि माझी ओळख १९७० मध्ये झाली. तेव्हा आम्हाला दोघांनाही पोलीस सेवेत दाखल होऊन पाच-सहा वर्षे झाली होती. त्यांचा हसरा चेहरा, पारदर्शक वृत्ती, प्रामाणिकपणा, दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा या गुणांमुळेच पहिल्या भेटीतच आमची गट्टी जमली. कुठलाही कठीण प्रसंग आला तरी ते कधीही डगमगत नसत.

मला एका घटनेचा उल्लेख करावासा वाटतो. १९७२-७३च्या दरम्यान ते यवतमाळचे पोलीस अधीक्षक होते. वणी येथील एका पोलीस अधिकाऱ्याची प्रतिमा डागाळलेली असल्याने नागरिकांनी त्याच्यावर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात गोळीबार केला. पोलीस अधीक्षक या नात्याने ते तिथे उपस्थित होते. मी गुन्हे प्रकटीकरण विभागाचा पोलीस अधीक्षक असल्याने चौकशीसाठी घटनास्थळी पोहोचलो. तणावाचे वातावरण असतानाही ते अत्यंत संयमाने सर्व परिस्थिती हाताळत होते.

त्यानंतर पुढचे काही दिवस मी तिथेच मुक्कामाला असल्याने त्यांच्या सहवासात मला राहण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना ओळखू लागलो. दिवसभरातील चौकशी, पंचनामा आदी कामे झाली की आम्ही संध्याकाळी निवांतपणे भेटत असू. तिथे ते एकदम वेगळे असायचे. कामाचा ताणतणाव ते गप्पागोष्टींमध्ये कधीही जाणवू देत नसत. रामदास स्वामी, संत तुकाराम, ज्ञानेश्वरी याविषयीची आध्यात्मिक आवड त्यांना असल्याचे मला समजले. या सगळ्या गुणवैशिष्टय़ांमुळे मी त्यांना ‘पितामह भीष्म यांच्यासारखेच भीष्मराजांचे गुण आहेत’ असे म्हणत असे.

ते प्रामाणिक व सचोटीने काम करणारे असल्याने आमची मैत्री टिकली आणि ती वाढत गेली. ते तळमळीचे आणि हाडाचे पोलीस अधिकारी होते. ते नेहमीच सज्जनांचा पुरस्कार करत आणि सज्जन माणसांच्या पाठीशी कायम उभे राहत असत. चांगल्या माणसांची त्यांना उपजतच जाण होती. आमच्या पोलीस खात्यात फारच कमी माणसे अशी असतात की, जी शेवटपर्यंत चांगली राहतात. उत्तम संस्कार, चारित्र्य, प्रामाणिकता आदींमुळे ते शेवटपर्यंत या चांगल्या माणसांच्या यादीतच राहिले.

बाबा आमटे यांच्याविषयी त्यांच्या मनात आदराची, आपुलकीची भावना होती. एकदा बाबा आमटे मुंबईला आले होते तेव्हा अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्या वेळी बाम यांनी बाबा आमटे यांची काळजी घेतली. ते स्वत: स्वयंपाक करून त्यांना जेवण घेऊन जात असत. स्वत:च्या वडिलांप्रमाणे त्यांनी बाबा आमटे यांची सेवा केली.

बदलीच्या कारणामुळे मतभेद होऊन मी नोकरी सोडली होती, तेव्हा त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि कोणत्याही दबावाला बळी पडता नोकरी सोडल्याबद्दल माझे कौतुक केले. आपल्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये म्हणून अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलणे सोडले होते; पण बाम सरांनी पुष्पगुच्छ देऊन माझे कौतुक केले. माझ्यासाठी ही मोठीच गोष्ट होती.

१९९७ मध्ये घडलेली एक गंमत सांगतो. त्यांचा बंदुकीचा नेम चांगला होता. एके दिवशी ते आम्हाला वरळीच्या शूटिंग रेंजमध्ये घेऊन गेले. मी बंदूक उचलली आणि नेम धरला, पण सवयीची बंदूक नसल्याने नेम चुकला. त्या वेळेस ते मिश्कीलपणे म्हणाले, ‘‘तुम्ही खूप मोठे पोलीस अधिकारी होणार. तुम्ही लावलेल्या निशाण्यांत एकही जण मारला जाणार नाही.’’

लेखन, वाचन आणि भाषण हे त्यांच्या आवडीचे विषय होते. शुक्रवारी नाशिक येथे व्याख्यान देत असतानाच त्यांना मृत्यू आला. एका अर्थी कर्तव्यावर असताना ते धारातीर्थी पडले. सोलापूरमध्ये पोलीस अधीक्षक असताना पंढरपूर येथे झालेल्या दंगलीत मी लाठीहल्ल्याचा आदेश दिला होता. त्यामुळे मी नंतर अडचणीतही आलो. बामसाहेब तेव्हा गुन्हे प्रकटीकरण विभागात पोलीस अधीक्षक होते. दंगलीचा अहवाल मी त्यांना दिला तेव्हा अहवाल चांगला झाल्याचे सांगून त्यांनी माझे अभिनंदन केल्याचे आठवते.  तीन आठवडय़ांपूर्वी ते माझ्याकडे आले होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो, आपण वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांना आत्मपरीक्षण करण्याची सवय लावली; पण पोलीस खात्यात मात्र आपण हा बदल करू शकलो नाही. तेव्हा ते मिश्कीलपणे हसले. बामसाहेबांच्या जाण्याने केवळ पोलीस विभागातला एक बुरूज ढासळला नसून समाजातील एक चांगली व्यक्ती आपण गमावली आहे.

शेवटी त्यांच्यासाठी एक शेर-

‘किनारों पे सागर के खजाने नहीं आते, जीवन में फिर पुराने दोस्त नहीं आते’!

– अरविंद इनामदार

(शब्दांकन – अक्षय मांडवकर)

 

First Published on May 14, 2017 3:10 am

Web Title: marathi articles on bhishmaraj bam