राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला विदर्भ सध्या दुष्काळाच्या छायेत आहे. पावसाने मारलेली दडी, त्यामुळे करपलेल्या पेरण्या, दुबार आणि काही ठिकाणी तिबार पेरणीमुळे बसलेला आर्थिक फटका, शासनाकडून न मिळालेली मदत यामुळे शेतकऱ्यांना यंदाचे वर्ष जड जाणार हे निश्चित.

पावसाची तूट ४० टक्क्यांवर गेली आहे, तर दोन महिने झाल्यावरही ३० टक्के पेरण्या झाल्या नसल्याचे सरकारी आकडे सांगते. प्रत्यक्षात स्थिती याहीपेक्षा विदारक आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्य़ांत भरपूर वनक्षेत्र आहे. वैनगंगा, वर्धा, धाम, यांसारख्या मोठय़ा नद्या असून एकूण १८ मोठे सिंचन प्रकल्प आहेत. मात्र, जून ते जुलैच्याअखेर म्हणजे पेरण्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या काळातच यंदा पावसाने दगा दिला. त्यामुळे अद्यापही (हे प्रमाण सरकारी आकडेवारीनुसार ३० टक्के असले तरी प्रत्यक्षात ते ५० टक्के आहे.) पेरण्याच झाल्या नाहीत. विभागात १९ लाख १० हजार ३०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६७ टक्के म्हणजे १२ लाख ९२ हजार २५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. भात पट्टय़ात अजूनही रोवणीसाठी लागणारा पाऊस झाला नाही. चंद्रपुरात भात रोवणी खोळंबली आहे. वर्धा, नागपूर, भंडाऱ्यात जेथे रोवणी झाली तेथे भातावर कीड पडली आहे. स्थिती विदारक आहे.

पश्चिम विदर्भातही दाहक स्थिती

अपुऱ्या पावसामुळे अमरावती विभागातील खरीप लागवडीचे क्षेत्र तब्बल दोन लाख हेक्टरने घटले असून पिकांच्या वाढीवरही आता परिणाम जाणवू लागला आहे. विभागात सरासरीच्या तुलनेत ६० टक्केच पाऊस झाला आहे. कीड, रोगांच्या प्रादुर्भावाने दुष्काळाची छाया अधिकच गडद केली आहे.

जून महिन्यात अपुरा पाऊस झाल्याने मुगाची पेरणीच होऊ शकली नाही. लागवडीचे क्षेत्र ५६ टक्क्यांवरच स्थिरावले. ज्वारीचीही अशीच परिस्थिती झाली. केवळ ३३ टक्केच क्षेत्रात ज्वारीचा पेरा होऊ शकला. अनेक भागात दुबार-तिबार पेरणी करावी लागली. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी उलथापालथ मानली जात आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात कापसावर तर वाशीम, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्य़ांत सोयाबीनवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने उत्पादकता कमी होण्याची शक्यता आहे. सर्व पिकांचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.

कोणीच वाली नाही

पावसाने दगा दिला, बियाणे, कीटकनाशकांच्या किमती वाढल्या, बँका कर्ज देत नाही, करायचे काय? यंदा वेळेत आणि चांगला पाऊस येईल म्हणून म्हणून जवळच्या पुंजीतून बि-बियाणे घेतली, कापूस, तुरीची पेरणी केली, पण पाऊसच आला नाही, दुबार पेरणी करायची तर त्यासाठी पैसा नाही, नशिबाला दोष देत आणि आभाळाकडे डोळे लावून बसण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. – गणेश महल्ले, शेतकरी, तीनखेड (ता. नरखेड, जि. नागपूर)

सोयाबीनची उत्पादकता घटणार

यंदा कमी पावसामुळे शेतीवर मोठे संकट आहे. सोयाबीनची उत्पादकता घटणार हे स्पष्टपणे दिसत आहे. पिकांना वाढच नाही. गेल्या महिन्यात हलक्या सरी आल्या. या पावसाने पिकांची पाण्याची गरज पूर्ण केली नाही. दुष्काळ डोळ्यासमोर दिसत आहे.  – गजानन निंभोरकर, शेतकरी, मलकापूर, (ता. भातकुली, जि.अमरावती)