‘जलनीतीचे मधुकोश’ या लेखमालेतील हा शेवटचा लेख! या लेखमालेतून ‘भूजल’ हा सगळ्यात दुर्लक्षिलेला विषय, त्याची ढासळत जाणारी पातळी आणि त्याबद्दलची जागरूकता, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असलेले ‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ ही माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले. तज्ज्ञ लोकांचे असे म्हणणे आहे की, सर्वानी एकत्रित येऊन भूजलासाठी प्रयत्न नाही केले तर काही दिवसांनी समन्यायी पाणीवाटप करण्याची वेळ येऊन ठेपेल. एकूणच, पाण्याची गरज आणि त्याची उपलब्धता याचं कमालीचं व्यस्त प्रमाण बघता ही समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करेल. पाणी हा सगळ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे, त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.

गेल्या २२ वर्षांत, सरकारने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी सहा लाख पन्नास हजार कोटी रुपये खर्ची घातले आहेत. तरीसुद्धा ही परिस्थिती का बरे बदलली नसेल? भारताची लोकसंख्या जसजशी वाढली तसतशी पाण्याची मागणी वाढायला लागली, त्यामुळे आतापर्यंत जे काम झाले, ते झाले जशी गरज आहे ते पाहूनच. गरज वाढली की कसेही करून वाढवा पाणीपुरवठा, पण केवळ पुरवठा वाढवून प्रश्न सुटणार असते तर ते केव्हाच सुटले असते. पुरवठा वाढल्यामुळे जर उपशामध्येसुद्धा पुन्हा वाढच होत राहिली तर मूळ प्रश्न कुत्र्याच्या शेपटीसारखा तसाच अनुत्तरित राहतो. त्यामुळे एकीकडे पुरवठा वाढवत असताना दुसऱ्या बाजूला मागणीवर नियंत्रण आणणे जरुरी होते. मागणीचे नियंत्रण सुनियोजित पद्धतीने करणे, इथून पुढे पाणी हे एक सामुदायिक संसाधन आहे हे लक्षात ठेवून मितव्यय, बचत आणि जास्तीत जास्त भूजलसाठे अबाधित ठेवण्याच्या कार्यक्रमात सर्वानी सहभागी होणे अतिआवश्यक आहे.

प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन गाव आणि शहर या दोन्ही पातळ्यांवर आपण सर्वानी कार्यरत होण्याची आवश्यकता आहे. हा लोकसहभाग म्हणजे नेमके काय? आपण कोणकोणत्या मार्गाने यात सामील होऊ शकता? गावपातळीवर जर आपण विचार केला तर :

  • ’भूजल हे सामुदायिक संसाधन आहे. जमिनीवर जरी वेगवेगळ्या मालकांच्या जमिनीच्या वेगवेगळ्या हद्दी दिसत असल्या तरी जमिनीखाली सर्व भूजलस्तर एकमेकाला जोडलेले असल्याने एकाने केलेल्या उपशाचा परिणाम इतरांना उपलब्ध राहणाऱ्या पाण्यावर होतो. तेव्हा सर्वानी एकमताने व आपसातील समजुतीने प्रत्येकाने किती पाणी उचलायचे हे जर ठरवून घेतले तरच एकंदर उपशावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
  • ’स्वत:च्या मालकीच्या जमिनीत विहीर/बोअर खोदून त्याच्याखाली मिळणाऱ्या भूजलावर त्या त्या मालकाचा पूर्ण हक्क समजला जातो. पाहिजे तेवढे पाणी उचलण्यावर कुणाचेच कसलेही बंधन नाही. ही प्रस्थापित व्यवस्था बदलण्यासाठी, योग्य कायदेशीर व्यवस्था मंजूर केली पाहिजे. यासाठी खूप मोठय़ा राजकीय शक्तीची गरज आहे. ग्रामीण जनता हा सर्वच राजकीय पक्षांचा मुख्य जनाधार असल्यामुळे ते करणे अवघड जाते.
  • ’शास्त्रोक्त पद्धतीने अंतर्गत भूजल पुनर्भरण करण्यायोग्य जागा शोधून त्या ठिकाणी समतल चर, पाझर तलाव, बंधारा यांसारखी कामे करता येऊ शकतात. सरसकट नाला खोलीकरण करण्यापेक्षा पुनर्भरण करण्यायोग्य भागात जर गाळ काढण्याची कामे लोकसहभागातून झाली, तर ते काम पर्यावरणपूरक होऊन त्याचा अधिक फायदा होऊ शकेल.
  • ’गावात लोकांच्या मदतीने विहिरींचा सुनियोजित वापर, भूजलाच्या पुनर्भरण क्षेत्राचे संरक्षण, सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर मर्यादा, पीक पद्धतीतील बदल, सामूहिक विहिरीद्वारे सिंचन अशा काही नियमावली बनवून त्या राबवण्यात येऊ शकतात.

शहर पातळीवर विचार केला तर, पाण्याची उधळमाधळ थांबवून काटकसरीने वापर करणे हा इलाज सर्वानाच करण्यायोग्य आहे. पुनर्वापर हा एक दुसरा पर्याय उपलब्ध आहे. घरच्या घरी स्वयंपाकघराचे आणि बाथरूमचे पाणी बागेसाठी वापरता येऊ शकते. छोटे वेगळे फ्लश टँक बसविणे किंवा त्याची क्षमता कमी करणे, असे उपाय आपण व्यक्तिगत पातळीवर करू शकतो. शहरातले सर्व सांडपाणी पुढे नदी-नाल्यात सोडण्यापूर्वी योग्य तेवढी स्वच्छता करून शेतीसाठी वापरता येऊ शकते किंवा तेच पाणी प्रक्रिया करून (Sewage Water Treatment) बाथरूमसाठी पुन्हा वापरात येऊ शकते.

‘आनंदवन समाजभान अभियान’ या आनंदवनाच्या उपक्रमांतर्गत व्यक्तिगत आणि स्थानिक पातळीवर ‘भूजल व्यवस्थापन आणि जलसाक्षरता’ लोकसहभागातून पोहोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. ‘भूजल व्यवस्थापन आणि जलसाक्षरता’ या उपक्रमाचे काही महत्त्वाचे टप्पे आम्ही ठरविले आहेत. पुण्यातील ‘अ‍ॅक्वाडॅम’ या संस्थेच्या मदतीने भूजल व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त पद्धतीने ग्रामस्थांना प्रशिक्षण देऊन लोकसहभागाचा प्रयत्न करणे, सहावी ते नववीमधील शाळेतील मुलांना मराठी विज्ञान परिषदेमार्फत जलसाक्षर करण्याचा प्रयत्न (आनंदवन वॉटर आर्मी) करणे, पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या निरनिराळ्या संस्थांना एकत्रित करून भूजलाचे काम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे, हा आमचा मानस आहे. महाराष्ट्रातील खेडय़ांची संख्या आणि तिथे असणारी कामाची गरज ओळखून प्रत्येक खेडेगावातील किमान चार युवक-युवतींनी शास्त्रोक्त पद्धतीने जलसाक्षर होऊन या अभियानाचा ‘जलरक्षक’ म्हणून काम करावे हा आमचा प्रयत्न असेल; तरच या क्षेत्रात होणारे ‘पाणीदार’ बदल आपल्याला दिसू शकतील.

सारांश रूपाने असे म्हणता येईल, इथून पुढे पाणी व्यवस्थापनामध्ये पृष्ठजल, भूजल, मोठी धरणे, छोटी धरणे अशा तऱ्हेचे विवाद टाळून, सर्वच पाण्याचा एकत्रित विचार करून त्याचा जास्तीत जास्त प्रत्येक पाणलोट क्षेत्रात त्या त्या ठिकाणची विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन कसा वापर करता येईल, असा प्रयत्न सर्वानी करणे आवश्यक आहे. जल व्यवस्थापन हा केवळ तज्ज्ञांनी, संबंधित विभागातील अभियंत्यांनी किंवा शासनाने हाताळण्याचा विषय आहे, अशा तऱ्हेची मानसिकता सोडून द्यावी लागेल. लोकसहभाग जितका जास्त, तितके पाण्याचे व्यवस्थापन आणि न्याय्य वितरण चांगले होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून आपापल्या गावाचे जलरक्षक होऊन आपण या चळवळीत सहभागी व्हावे, असे आनंदवनाच्या वतीने आम्ही आपल्याला आवाहन करतो.

अमृता कुलकर्णी-गुरव

ई-मेल : amruta.gurav@gmail.com

संपर्क: ७४४७४ ३९९०१, ९९२२५५०००६