News Flash

झुंजार इस्रायली पत्रकार

गिडियन लेव्ही या जिगरबाज पत्रकाराविषयी..

झुंजार इस्रायली पत्रकार

इस्रायलमध्ये जिचा सगळ्यात जास्त तिरस्कार केला जातो अशी व्यक्ती कोण, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर बहुधा गिडियन लेव्ही असं तिथे मिळेल. गेली ३० वर्षे लेव्ही ‘हारेत्झ’ या तेथील प्रमुख वृत्तपत्रात लेखन करीत असून कसलीही प्रचारबाजी न करता समोर दिसणारी वस्तुस्थिती ते वाचकांसमोर ठेवतात. त्यांच्या धारदार लेखणीचे चाहते जगभरात आहेत. यासाठी त्यांना ‘ठोक  बक्षिसं’ मिळाली आहेत. इस्रायली सुरक्षा दलांनी त्यांच्या गाडीवर  अनेक वेळा गोळीबार केला. सर्पदंश वा अन्य मार्गाने त्यांना खतम करण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत. अशा या जिगरबाज पत्रकाराविषयी..

gideon-levy-01

जर पत्रकार प्रस्थापिताची री ओढत असतील; एखाद्या ताकदवान राजकीय नेत्याच्या वळचणीला राहून समाजातल्या कोणाला- विशेषत: अभिजनांना- दुखावत नसतील तर सगळी सुखं त्यांच्यासमोर हात जोडून उभी असतात. पण कटू सत्याची जाणीव करून देणाऱ्या पत्रकारांचं आयुष्य मोठं त्रासाचं असतं. आणि असे पत्रकार ‘इतरां’ची दु:खं सांगायला लागले आणि त्यामुळे ‘आपली’ माणसं दुखावली गेली तर त्यांची खैर नसते. असल्या मानसिक आणि कधी शारीरिक त्रासाचा आणि ट्रोलबाजीचा अनुभव आज आपले पत्रकार घेत आहेतच. गिडियन लेव्ही या इस्रायली पत्रकाराची गोष्ट याहून वेगळी नाही. एकाच वेळी लेव्ही जसे ज्यू बहुसंख्याकांच्या तिरस्काराचा विषय बनले आहेत तसेच कटू सत्य सांगणारे पत्रकार म्हणून त्यांची वाखाणणी करणारा एक वर्ग तिथे आणि जगात इतरत्र आहे.

इस्रायलमध्ये जिचा सगळ्यात जास्त तिरस्कार केला जातो अशी व्यक्ती कोण, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर बहुधा गिडियन लेव्ही असं तिथे मिळेल असं विधान लेव्हींबद्दल ‘द इंडिपेन्डन्ट’ या ऑनलाइन ब्रिटिश वृत्तपत्राने केलं होतं. हे विधान म्हणजे आपला सन्मान आहे, असं याबद्दल लेव्ही गमतीनं म्हणतात.

गिडियन लेव्हींचा जन्म १९५३ सालचा. इस्रायलमधल्या तेल अवीवचा. तिथे ते लहानाचे मोठे झाले. आपल्या जडणघडणीबद्दल लेव्ही म्हणतात : मी तेल अवीवचा ‘गुड बॉय’ होतो. इस्रायलमधली शिक्षणपद्धती, तिथली माध्यमं, तिथली विचार करण्याची सर्वमान्य पद्धत या सगळ्यांतून मी मोठा होत होतो. आपण इस्रायली नेहमीच बरोबर असतो; अरब हे कायम चुकीच्या मार्गाने चाललेले असतात असं मला इतरांप्रमाणे वाटायचं. धार्मिक राष्ट्रवादाचा उन्माद माझ्यामध्ये होता. लहान असताना अनेकदा पॅलेस्टिनींची उद्ध्वस्त झालेली घरं दिसायची. १९४८ च्या युद्धात इस्रायलींनी ती उद्ध्वस्त केली होती. पण त्या घरांत कोण राहायचं; ते सगळे आता कुठे असतील असे प्रश्न आम्हाला कधीच पडले नाहीत. जणू काही एखादी नदी, झाडं यांच्याप्रमाणे ही घरं निसर्गत:च तिथे होती! १९६७ च्या युद्धात बळकावलेल्या प्रदेशात ज्यू आपल्या नव्या वसाहती निर्माण करण्यासाठी जायचे; पॅलेस्टिनींना न जुमानता त्यांची ऑलिव्हची झाडं तोडायचे. या झाडांतून तेल काढणं हे तिथल्या शेतकऱ्यांचं उपजीविकेचं साधन होतं. पण त्याची या वसाहतवाल्यांना फिकीर नसायची. इस्रायली चेकपोस्टांवर स्त्रियांना वाईट वागणूक मिळत असे. पण हे सगळं अपवादात्मक आहे; सरकारी धोरण काही असं नसेल असं तेव्हा वाटायचं. १९६७ चं अरब-इस्रायल युद्ध झालं त्या वेळी मी चौदा वर्षांचा होतो. त्या युद्धात इस्रायलने बराच मोठा प्रदेश जिंकला होता. आपल्या आई-वडिलांबरोबर मी बेथेलहॅमला एक प्रसिद्ध कबर पाहायला गेलो होतो. आजूबाजूला पॅलेस्टिनी दिसायचे. पण आमचं त्यांच्याकडे लक्ष जायचं नाही. ते जणू असून नसल्यासारखे होते.

तरुणपणातली चार वर्षे लेव्हींनी इस्रायली लष्करात काढली. तिथल्या रेडिओ स्टेशनमध्ये ते कामाला होते. १९७८ ते १९८२ ही चार वर्षे शिमोन पेरेझ यांच्याबरोबर लेव्ही काम करीत. त्या काळात पेरेझ विरोधी पक्षनेते होते. १९८२ नंतर लेव्हींनी ‘हारेत्झ’ या प्रसिद्ध इस्रायली वृत्तपत्रासाठी लिहायला सुरुवात केली. तिथे त्यांना पत्रकार म्हणून पॅलेस्टिनी प्रदेशात जायची पहिली संधी मिळाली. ही गोष्ट लेव्हींच्या आयुष्याला नवं वळण देणारी ठरली. हे खरं तर योगायोगाने घडलं होतं. इस्रायलचं खरं नाटय़ त्याच्या मागच्या परसात घडत होतं असं तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात यायला लागलं. तिथे अंधार होता आणि त्या प्रदेशात काय चाललंय हे सांगणारे अगदी थोडे पत्रकार होते. इस्रायलमधल्या अनेक ठिकाणांहून पॅलेस्टिनी प्रदेशात रस्त्याच्या मार्गाने अध्र्या-एक तासात पोचता येतं. पण तिथे काय चाललंय याबद्दल इस्रायलींना काहीच माहिती नसायची. ते जाणून घेण्याची त्यांना  इच्छाच नव्हती. इस्रायली माणसं म्हणजे कोणी दुष्ट सैतान नव्हेत; कित्येकदा दुसऱ्यांना मदत करण्यात ही माणसं पुढे असत. पण इतक्या जवळ पॅलेस्टाइनसारखं असलेलं वास्तव ते नजरेआड का करीत होते, असे प्रश्न लेव्हींना पडायला लागले.

काही गोष्टी लेव्हींच्या हळूहळू लक्षात यायला लागल्या. त्यामुळे त्यांच्या मनाला टोचणी लागली. इस्रायलमधल्या शेख मुनीस नावाच्या ठिकाणी गिडियन लेव्हींचं घर आहे. त्यांच्या घराजवळ एक पोहण्याचा सार्वजनिक तलाव आहे. त्या तलावाच्या जागेवर १९४८ च्या पूर्वी एक पाणी भरण्यासाठी तळं होतं. ज्यू येण्यापूर्वी गावात पॅलेस्टिनी वस्ती होती. गावाची वस्ती सव्वादोन हजारांची. बहुतांशी गरीब शेतकऱ्यांची. त्या सर्वाना ज्यूंनी घेरलं; धमकावलं आणि हाकलून दिलं. जीव घेऊन सगळे पॅलेस्टिनी पळून गेले. त्यांना परत कधीच येता आलं नाही. त्यांची जमीन ज्यूंनी बळकावली. आपलं घर ज्या जागेवर उभं आहे तिथल्या शेतकऱ्याने काय केलं असेल; त्याने निर्वासितांच्या छावणीत, आत्यंतिक गरिबीत किंवा लष्कराच्या दहशतीखाली कुठे तरी दिवस काढले असतील का; त्याची मुलंबाळं काय करीत असतील, असे प्रश्न लेव्हींना पडायला लागले.

लेव्ही म्हणतात : एखाद्या देशाने इतरांचे प्रदेश बळकावण्याच्या घटना इतिहासात अनेक आहेत, याहूनही अधिक काळ आणि अधिक क्रूर दडपणूक झाल्याचे इतिहासात दाखले आहेत; पण एका बाबतीत इस्रायलची कृती वेगळी आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझीनी ज्यूंचं जे हत्याकांड केलं त्यामुळे आपण एकमेव आणि सर्वोच्च बळी आहोत आणि त्यामुळे आपण काहीही करायला मोकळे आहोत; आपण बळी असल्यामुळे आपल्याला आपसूकपणे तो अधिकार प्राप्त होतो अशी एक भावना इस्रायलींच्या मनात कुठे तरी खोलवर रुजली आहे. आणि ही मानसिकता घेऊनच इस्रायली वागत असतात. आंतरराष्ट्रीय कायदा जरी दुसऱ्या महायुद्धानंतर जन्माला आला असला तरी आपण ‘बळी असल्यामुळे’ आपल्याला काही वेगळा अधिकार आहे, त्यामुळे तो कायदा आपल्याला लागू होत नाही अशा तऱ्हेचा समज त्यांच्या मनात दृढ झालेला आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपण जणू काही निवडक कोणी तरी आहोत; (आपल्याकडच्या भाषेत सांगायचं तर परमेश्वराचे लाडके आहोत.) आम्हाला इतरांपेक्षा चांगलं कळतं; इतरांपेक्षा आपण दोन अंगुळं वर आहोत; त्यामुळे इतरांनी आम्हाला काही शिकवू नये, असा एक अहंभाव त्यांच्यात आढळतो.

इस्रायलने बळकावलेल्या प्रदेशात – जिथे पॅलेस्टिनींचं वास्तव्य असतं – या अहंभावाचा, क्रूरतेचा आविष्कार वारंवार होत असतो. या वस्त्यांत इस्रायली घुसतात; तिथे जमिनीवर असलेली घरं, झाडं बुलडोझरने जमीनदोस्त करतात; पॅलेस्टिनींना हर प्रकारचा त्रास देतात आणि त्यावर आपल्या वस्त्या बनवायला सुरुवात करतात. ही घरं आणि वस्त्या अशा तऱ्हेने बनतात की पॅलेस्टिनींना आपल्याच प्रदेशांत अडसर निर्माण होतात. मग तिथे चेकपोस्ट तयार होतात. आपल्याच दैनंदिन कामासाठी पॅलेस्टिनींना ते पार करून जावं लागतं. त्याला इलाज नसतो. पण या चौक्यांवर किती वेळ ताटकळत थांबावं लागेल; सैनिक कसं वागवतील याचा कसलाच भरवसा नसतो. तिथे हिंसाचारही होऊ  शकतो. इस्रायलने बळकावलेल्या प्रदेशात जाऊन वस्त्या बनवायला इस्रायली शासनाकडून उत्तेजन दिलं जातं. अशा तऱ्हेने वस्त्या बनवणं हे बेकायदेशीर आहे हे साऱ्या जगाने म्हटलं तरी इस्रायली शासन ही गोष्ट बिनदिक्कत करत असतं. अशा तऱ्हेने वस्त्या आणि रस्ते यांचं जाळं बनवून पॅलेस्टिनींचं जीवन अवघड करणं हा सरळसरळ हेतू त्यामागे असतो. या ज्यूंच्या वस्त्यांत मुक्तपणे वावरायला पॅलेस्टिनींना मज्जाव आहे. तिथे अमुक रस्ते फक्त इस्रायली वाहनांसाठी असतात. अर्थातच हे रस्ते आणि वस्त्या आधुनिक आणि सुविधांनी सज्ज असतात. याउलट पॅलेस्टिनींचे रस्ते ओबडधोबड असतात. त्यांची घरंही त्यामानाने गरिबीची असतात.

आपल्या पत्रकारितेबद्दल लेव्ही म्हणतात-  इस्रायली माध्यमांनी पॅलेस्टिनींचं अमानुष चित्र उभं केलं आहे. त्यामुळे पॅलेस्टिनी व्यक्ती या इतरांप्रमाणे माणसंच आहेत हे दाखवून देणं हे माझ्यासमोरचं मोठं आव्हान आहे. हा देश म्हणजे सोव्हिएत रशिया किंवा रुमानिया नव्हे. इथली माध्यमं स्वतंत्र आहेत. इस्रायली माध्यमांच्या सहकार्याशिवाय इस्रायलला असा प्रदेश वर्षांनुर्वष बळकावून राहणं शक्य नव्हतं. पॅलेस्टिनी जणू काही दैत्य आहेत अशा तऱ्हेने त्यांचं चित्रण करण्याचं काम इस्रायली माध्यमं करत आली आहेत. आणि हे सगळं एकांगी आहे, प्रचारकी आहे; खोटेपणा आणि अडाणीपणा या दोहोंनी ओतप्रोत भरलेलं आहे.

स्वत: वृत्तपत्रांच्या विश्वात असल्यामुळे माहितीतला असमतोल लेव्हींना खटकतो. इस्रायलमध्ये माध्यमांवर कायद्याने जवळजवळ कोणते र्निबध घातलेले नाहीत, पण त्याहूनही अधिक त्रासदायक असा प्रकार तिथे अस्तित्वात आहे. माध्यमांत काम करणाऱ्यांनी स्वत:हून आपल्यावर असे र्निबध घालून घेतले आहेत. हा प्रकार अधिक अवघड आहे; आणि याविरुद्ध आपण काहीच करू शकत नाही. पॅलेस्टिनी प्रदेश बळकावण्याच्या इस्रायलच्या कृतीशी सुसंगत आणि त्याचं छुपं किंवा उघड समर्थन होईल अशा तऱ्हेने माध्यमं आपल्या बातम्या वा मतं प्रसारित करतात.

कसलीही प्रचारबाजी न करता समोर दिसणारी वस्तुस्थिती लेव्ही वाचकांसमोर ठेवतायत.  यासाठी त्यांना ‘ठोक बक्षिसं’ मिळाली आहेत. इस्रायली सुरक्षा दलांनी त्यांच्या गाडीवर एकाहून अधिक वेळा गोळीबार केले आहेत. इस्रायलच्या रस्त्यांवर ‘तुमचा पिट्टा पाडू’ अशा धमक्या त्यांना मिळाल्या आहेत. लेव्हींमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येते आहे अशी विधानं काही इस्रायली मंत्रिगणांनी केली आहेत.

आपल्या कामासाठी लेव्हींना अनेकदा पॅलेस्टिनी प्रदेशात जावं लागे. हे करताना तुम्हाला पॅलेस्टिनींच्या रोषाला कधी तोंड द्यावं लागलं का, असा प्रश्न जेव्हा लेव्हींना विचारला तेव्हा त्यांचं उत्तर होतं : तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही; पण मला असं कधीच जाणवलं नाही. गेली पंचवीस-तीस र्वष मी तिथे जातोय. ‘तुम्ही इतर सगळ्या इस्रायलींइतकेच दोषी आहात’ किंवा ‘आम्हाला कोणत्याही इस्रायली माणसाबरोबर बोलायचं नाही; तुम्ही निमूटपणे निघून जा,’ असं त्यांनी आम्हाला वैतागून म्हटलं असतं तरी आम्ही ते शांतपणे ऐकून घेतलं असतं. तिथे परिस्थिती वाईट असायची. अनेकदा मोठय़ा दुर्घटना घडल्यानंतर मी तिथे जात असे. तिथले लोक घडलेल्या घटनांबद्दल आमच्याशी मोकळेपणाने बोलत असत. २००३ मध्ये आमच्या गाडीवर गोळीबार केला तो इस्रायली सैनिकांनी. आमची गाडी बुलेटप्रूफ होती. तिच्या प्लेटवर इस्रायली नंबर होता. तरी केला. आम्ही त्यांना सगळी कागदपत्रं दाखवली होती; सगळी पूर्तता झाली तरी केला. आणि एक नव्हे; तर अनेक गोळ्या त्यांनी आमच्या गाडीवर झाडल्या. सिगारेटचा एखादा झुरका घ्यावा इतक्या सहजतेने या सैनिकांनी आमच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. अशा तऱ्हेने गोळ्या झाडण्याने त्यांना आसुरी आनंद मिळत असला पाहिजे. ती गाडी बुलेटप्रूफ होती म्हणून आम्ही वाचलो. नाही तर मी जिवंत राहिलो नसतो.

इस्रायलने बळकावलेल्या प्रदेशात लेव्ही गेली तीन दशकं जा-ये करून तिथे काय घडतंय याचं वार्ताकन करताहेत. जवळजवळ आठवडय़ातून एकदा ते तिथे जातात. त्यामुळे तिथल्या परिस्थितीबद्दल ते काय म्हणतात ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. लेव्ही म्हणतात : माझं काम साधं आहे; मला तिथली परिस्थिती इस्रायली जनतेला समजावून सांगायचीय. ‘मला हे माहीत नव्हतं’ असं म्हणायची वेळ इस्रायलींवर नंतर येऊ  नये एवढंच मला पाहायचंय.

पॅलेस्टिनी प्रदेशातली एखादी घटना लेव्ही वाचकांसमोर ठेवतात आणि एक साधा प्रश्न आपल्या लेखनातून इस्रायली बांधवांना विचारतात : समजा, बलाढय़ लष्करी ताकद असलेल्या एखाद्या शासनाने तुमच्या बाबतीत असं केलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं? पॅलेस्टिनी प्रदेशात जागोजागी सुरक्षा चेकपोस्ट असतात. पॅलेस्टिनी नागरिकांना तिथे तासन्तास खोळंबून राहावं लागतं. हा अनुभव नित्याचा आहे. एकदा अशाच एका चेकपोस्टवर त्यांच्या गाडीच्या पुढे एक रुग्णवाहिका तासभर खोळंबलेली त्यांना दिसली. आत एक आजारी बाई होती. रुग्णवाहिकेच्या चालकाला विचारल्यावर हे नेहमीचंच आहे असं त्याने सांगितलं. यावर रागावून लेव्हींनी तिथल्या सैनिकांना प्रश्न केला : तुमची आई जर अशा अवस्थेत गाडीत असती तर तुम्हाला कसं वाटलं असतं? यावर त्या सैनिकांनी संतापून लेव्हींच्या दिशेने बंदूक रोखली आणि गप्प बसायला सांगितलं.

आपल्या देशाच्या सध्याच्या व्यवस्थेबद्दल लेव्ही म्हणतात : इथे लोकशाही आहे अशी एक वदंता इस्रायली प्रचारामुळे सगळीकडे पसरली आहे. पण खरी गोष्ट अशी की, इस्रायलमध्ये तीन प्रकारचे लोक राहतात. पहिले म्हणजे इस्रायली ज्यू. त्यांच्यासाठी सगळं काही आहे. लोकशाही आहे; मानवाधिकार आहेत. दुसरे म्हणजे इस्रायलमध्ये राहणारे अरब. एकूण लोकसंख्येच्या ते वीस टक्के आहेत. ते इस्रायली नागरिक आहेत; त्यांना मतदान करता येतं; आपले प्रतिनिधी ते संसदेत पाठवू शकतात. पण ते आणि ज्यू यांच्यात अनेक प्रकारचे भेद केले जातात. तिसरे म्हणजे इस्रायलने बळकावलेल्या प्रदेशात राहणारे लोक. यांना कोणतेच मानवाधिकार/ नागरी अधिकार नाहीत. आता याला लोकशाही कसं म्हणायचं? १९६७ चं अरब-इस्रायली युद्ध होऊनही पन्नास र्वष होत आली. या काळात ज्यूंची नवी गावं आणि शहरं वसली; पण एक नवं खेडेगावसुद्धा पॅलेस्टिनी प्रदेशात निर्माण झालं नाही. शहर तर सोडाच. एकाच गुन्ह्य़ासाठी ज्यूला वेगळी शिक्षा आणि अरबाला वेगळी शिक्षा कशी मिळते यावर आपल्याकडे बरंच संशोधन झालं आहे. असं असेल तर याला आपण लोकशाही कसं म्हणायचं? जर एखादा पॅलेस्टिनी जेरुसलेममध्ये आला तर निव्वळ त्याचे पॅलेस्टिनी धर्तीचे उच्चार ऐकले की त्याला कोणी भाडय़ाने जागा देत नाही. पश्चिम जेरुसलेममध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांमागे जी रक्कम इस्रायली शासन खर्च करतं त्याच्या फक्त एकचतुर्थाश रक्कम पूर्व जेरुसलेममधल्या (जे पॅलेस्टिनी आहेत)  विद्यार्थ्यांवर खर्च करतं याला लोकशाही कसं म्हणायचं? कुठल्याही बाजूने विचार केला  तरी इस्रायली समाज वंशभेदी आहे असंच म्हणावं लागतं. गिडियन लेव्हींनी केलेलं वर्णन वाचल्यावर खरं तर एखाद्या प्रगत लोकशाही देशाची आठवण होण्यापेक्षा आपल्याकडच्या जातिव्यवस्थेची आठवण होते. याला काहीशी समांतर अशी भेदाभेद करणारी व्यवस्था  इस्रायलमध्ये अस्तित्वात आहे.

२००८ साली इस्रायलने गाझा पट्टीत जे भीषण हल्ले केले त्याला ‘ऑपरेशन कास्ट लेड’ या नावानं ओळखलं जातं. ते ‘युद्ध’ होतं असंही इस्रायली समजतात. त्याबद्दल लेव्ही म्हणतात : याला युद्ध किंवा तत्सम कुठलंही नाव देणं हे अयोग्य आहे. खरं सांगायचं तर ते यातलं काहीच नव्हतं. कोंडल्या गेलेल्या आणि असाहाय्य जनतेवर केलेला तो क्रूर हल्ला होता.

लेव्हींच्या मते इस्रायलचे तुम्ही जर खरे मित्र असाल आणि त्याच्या सुरक्षेबद्दल तुम्हाला कळकळ असेल तर तुम्ही इस्रायलला वस्तुस्थिती स्पष्ट शब्दांत सांगितली पाहिजे. उदाहरणार्थ, तुमचा एखादा मित्र जर ड्रग्जच्या व्यसनात सापडला असेल तर त्याला ड्रग्जसाठी पैसे देऊन तुम्ही त्याचं भलं करू शकत नाही. तसं केलं तर तुम्ही त्याचे खरे मित्र नव्हे. तुम्ही जर त्याला उपचार केंद्रात पाठवायला मदत केलीत तरच तुम्ही त्याचे खरे मित्र. जे कोणी इस्रायलच्या आजच्या धोरणांना विरोध करत असतील; त्याच्या प्रदेश बळकावण्याचा, पॅलेस्टिनी प्रदेशांची कोंडी करण्याचा आणि हिंसाचाराचा निषेध करत असतील ते इस्रायलचे खरे मित्र आहेत. उलट जे कोणी इस्रायलच्या आताच्या धोरणांना पाठिंबा देत आहेत ते इस्रायलला विनाशाच्या रस्त्याकडे नेत आहेत, त्याचा घात करत आहेत.

इस्रायलच्या आजच्या धोरणांना पाठिंबा देणाऱ्या मित्रदेशांबद्दल लेव्ही म्हणतात : आज जे कोणी स्वत:ला ‘इस्रायलचे मित्र’ म्हणवतात ते खरं तर मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांचे मित्र आहेत. त्यातून मूलतत्त्ववाद्यांना नवनव्या सबबी, नवा त्वेष, नव्या संधी निर्माण होत आहेत; त्यांना नवे रिक्रूट मिळत असतात. गाझा पट्टीचं उदाहरण घ्या. काही वर्षांपूर्वी हा प्रदेश सेक्युलर होता. आता तिथे मूलतत्त्ववादाचा प्रभाव वाढला आहे. जर बाकी सर्व उपाय थकले तर माणसं शेवटी धार्मिक मूलतत्त्ववादाकडे वळतात. आज गाझा जर मुक्त असता तर असं झालं नसतं. या सर्व विधानांमधून लेव्हींचा मुख्य रोख अमेरिकेवर आहे असं जाणवल्याशिवाय राहत नाही.

तुम्ही झायनवादी आहात काय, असा प्रश्न जेव्हा लेव्हींना विचारला तेव्हा त्यांचं म्हणणं असं : झायनवादाचे अनेक अर्थ आहेत. पॅलेस्टाइनमध्ये ज्यूंना इतरांपेक्षा जास्त अधिकार असतील, असा एक अर्थ त्यात अभिप्रेत आहे. ज्यू ही कोणी तरी (देवाने) निवडलेली आणि विशेषाधिकार असलेली जमात आहे; तिची बरोबरी अरब वा पॅलेस्टिनींशी होऊ  शकत नाही, असं अभिप्रेत असेल तर मी झायनवादाचा विरोधक आहे. दुसरीकडे पॅलेस्टाइनमध्ये राहण्याचा ज्यूंनासुद्धा अधिकार आहे; तसंच १९४८ साली ज्या संकटांचा सामना पॅलेस्टिनींना करावा लागला त्याबद्दल त्यांना शक्य तितकी भरपाई आपण दिली पाहिजे हे मान्य करणं यालासुद्धा झायनवाद म्हणता येईल. या अर्थाने मी झायनवादी आहे.

लेव्हींच्या नावावर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार असले आणि त्यांच्या शौर्याची कितीही वाहवा होत असली तरी इस्रायलमधल्या त्यांच्या विरोधकांना त्याचं सोयरसुतक नाही. लेव्ही हे हमासचे एजंट आहेत, राष्ट्रद्रोहाबद्दल त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं, अशा तऱ्हेची मतं तिकडे मांडली गेली आहेत.

जानेवारी २०१५ मध्ये ‘हारेत्झ’च्या कार्यालयात एक पत्र आलं. गिडियन लेव्हींनी ‘नाझी प्रचारा’चं जे काम केलं त्याबद्दल विष, सर्पदंश, अपघात, विषाणू वा अन्य कोणत्याही मार्गाने त्यांना खतम करण्यात यावं अशी ‘शिक्षा’ त्यात लेव्हींना सुनावण्यात आली. हे पत्र उद्धृत करून लेव्हींनी आपलं मत नोंदवणारा लेख ‘हारेत्झ’मध्ये दिला..

इस्रायली पत्रकाराची ही गोष्ट वाचल्यानंतर जर कोणाला इथल्या आजच्या वातावरणाची आठवण येत राहिली तर तो योगायोग नक्कीच नव्हे.

अशोक राजवाडे

ashokrajwade@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2017 3:01 am

Web Title: marathi articles on journalist gideon levy
Next Stories
1 शेतकरी एकजुटीचा विजय
2 बिकट बस्तर!
3 सकारात्मकतेची पेरणी हवी!
Just Now!
X