भारतीय क्रांतिकारकांनी देशाच्या विविध भागांत ब्रिटिशांच्या विरोधातील बंड करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे हालचाली चालू होत्या. या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढय़ात कोल्हापूरच्या तत्कालीन संस्थानातील लोकांनीदेखील ५ डिसेंबर १८५७ रोजी म्हणजे १६० वर्षांपूर्वी बंड करून सहभाग घेतला होता. तत्कालीन चिमासाहेब महाराजांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी वेढलेला जुना राजवाडा आणि भवानी मंडप यांचे राष्ट्रीय चळवळीतील कोल्हापूरचे योगदान या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचे आहे.

क्रांतिकारकांनी ५ डिसेंबर या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास भवानी मंडपाला वेढा घातला आणि हा रणसंग्राम तीन दिवस चालू राहिला. इंग्रजांना या बंडाची त्यांच्या गुप्त यंत्रणेकडून माहिती मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवशी इंग्रज सैन्याने गोळीबार केला. त्यात काही क्रांतिकारक मारले गेले व काही फरारी झाले. तिसऱ्या दिवशी बंडाचे नेते चिमासाहेब महाराज यांना अटक करून कराची येथे नेले व नजरकैदेत ठेवले. सुमारे बारा वर्षांनंतर त्यांचा तेथेच मृत्यू झाला.

The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण

तत्कालीन कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती बाबासाहेब महाराजांनी आपल्या भावाच्या म्हणजे चिमासाहेब यांच्या नेतृत्वाखाली बंड करण्याची योजना केली होती. जेणेकरून ब्रिटिशांना त्यांच्या विरोधी योजनेत आपण सामील असल्याबद्दल काहीही कल्पना नसावी. चिमासाहेब एक स्वाभिमानी, धाडसी आणि निष्ठावान राष्ट्रवादी होते आणि त्यांनी आसपासच्या ग्रामीण भागातून क्रांतिकारकांची एक लढाऊ  ‘टीम’ तयार केली होती. यापूर्वीचे ब्रिटिशविरोधी आंदोलन ३१ जुलै रोजी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागांत झाले. परंतु इंग्रजांनी ते उधळून लावले. मग पुण्यातील नानासाहेब पेशवे यांनी पाच महिन्यांनंतर दुसरा उठाव करण्याबद्दल चिमासाहेबांशी गुप्त बोलणी करून त्याप्रमाणे ५ डिसेंबरला रात्री उशिरा चाल करावयाची योजना आखली.

बंड मोडून काढताना ब्रिटिश सैनिकांनी गिरगावचे फिरंगोजी शिंदे आणि अन्य क्रांतिकारकांवर गोळीबार करून ठार केले. पण दऱ्याचे वडगाव येथील रामचंद्र कुलकर्णी हे क्रांतिकारक परागंदा झाले. इंग्रजांनी त्यांना फरार घोषित केले. गिरगाव आणि दऱ्याचे वडगाव ही दोन गावे कोल्हापूर शहराच्या जवळ आहेत आणि एकमेकांपासून दोन-तीन फर्लागांवर आहेत. या भागाला नंतरच्या विविध विकासकार्यासाठी वैभवशाली ऐतिहासिक पाश्र्वभूमीमुळे एकप्रकारे स्फूर्ती मिळाली आहे. त्या वेळी हा परिसर छोटय़ा खेडय़ांचा होता. आता सिंचनव्यवस्था आणि अन्य विकसनशील सुविधांसह विकसित होत आहे. क्रांतिकारक रामचंद्र कुलकर्णी यांच्या मालकीची जमीन ब्रिटिशांनी खालसा करून जप्त केली होती. त्यांना पकडून देणाऱ्यास बक्षीस घोषित केले होते. परंतु नंतर त्यांचे नातेवाईक न्यायालयात गेले आणि तत्कालीन न्यायाधीशांना जमीन सोडण्याची मागणी केली  व जमीन मुक्त झाली. आता त्यांच्या क्रांतिकारक कार्याची स्मृती कायम ठेवण्यासाठी ‘ट्रस्ट’ निर्माण करण्याची आणि सामाजिक आणि धर्मादाय उपक्रमांसाठी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांचा विचार आहे.

तत्कालीन क्रांतिकारकांच्या नातेवाईकांनी अशा महत्त्वाकांक्षा बाळगल्या तर त्यांना उत्तेजन दिले पाहिजे. पण जिथे क्रांतिकारकांनी लढा दिला त्या ठिकाणी स्मारक विकसित करून स्मृती ताजी ठेवली पाहिजे जेणेकरून राष्ट्रीय संघर्षांचे ठिकाण प्रेरणा देणारे व जागतिक पर्यटकांचे आकर्षण ठरेल. हे आता आवश्यक आहे, कारण भवानी मंडप आणि जुना राजवाडा हा परिसर आता विक्रेते व फेरीवाले यांनी वेढलेला दिसतो. राजवाडा येथील काही भाग कार्यालयासाठी भाडय़ाने दिलेला आहे. क्रांतिकारक बंडाचे स्मरण म्हणून हा परिसर योग्य प्रकारे विकसित करणे आवश्यक आहे. आíकटेक्ट प्रताप आचरेकर आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक घेवडे यांनी पूर्वीच्या मंत्रिमंडळातील सांस्कृतिकमंत्री रामकृष्ण मोरे यांच्याकडे संपर्क साधला होता. शिवाय माजी आमदार आणि आताचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते संपतबापू पाटील यांनी या प्रस्तावासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. पण यासाठी राज्य व केंद्र सरकारनेही पुढाकार घेणे आवश्यक आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने ब्रिटिशांविरोधातील लढा आणि राष्ट्रनिष्ठ क्रांतिकारकांच्या हौतात्म्याचे योग्य स्मारक तयार करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. चिमासाहेब महाराज यांच्या नेतृत्वाखाली माजी कोल्हापूर संस्थानाचा सहभाग ही महत्त्वाची घटना आहे. ब्रिटिश आणि पूर्वीचे संस्थानिक यांच्यासंबंधी अयोग्य टीका आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांशी त्यांच्या संबंधाचा प्रवाद लक्षात घेतला तर वरील संघर्षांची गाथा लक्षणीय आहे. शहरातील टाऊन हॉलमध्ये चिमासाहेबांचा एक पुतळा बसवण्यात आला आहे. पण राष्ट्रीय महत्त्व व एक क्रांतिकारी घटना याला हा प्रतिसाद फारच अल्प आहे.

ऐतिहासिक स्मारकांचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारांनी आपली निष्क्रियता दूर करावी आणि इतिहास संशोधकांकरिता अशी स्मारके विकसित करून व अशी वैश्विक पर्यटनाची स्थळे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जर सरकारने पुणे येथील पेशवेकालीन शनिवारवाडय़ाच्या विकासासाठी आणि संरक्षण करण्यासाठी ५० लाख रुपये निधी दिला आहे, तर कोल्हापूरला अशाच प्रकारच्या कार्यासाठीही अर्थसाहाय्य्य दिले पाहिजे.  परंतु ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सर्व राष्ट्रीय स्मारकांचे विकसन आणि संरक्षण करणे हे कार्य केंद्र सरकारच्या ‘भारतीय पुरातत्त्व कार्यालयाकडे’ सोपविले आहे. या विभागाचा राज्य सरकारांशी संबंध नाही आणि तरीही राज्या राज्यातील ऐतिहासिक स्थळांचे नियंत्रण व संरक्षण या विभागाकडे दिले आहे. राष्ट्रीय स्मारकांची देखरेख करण्यासाठी या विभागाची प्रशासकीय ताकद मर्यादित आहे आणि प्रादेशिक कार्यालये इतकी दूर आहेत की संपर्कासाठी संशोधक व्यक्ती त्यांच्याशी योग्य संवाद साधू शकत नाहीत. ही विसंगती दूर करण्यासाठी राज्य सरकारने ‘ऐतिहासिक स्मारक प्राधिकरण’ अशी एक निमसरकारी संस्था स्थापना करावी की ज्यामुळे केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाशी संबंध प्रस्थापित करता येईल  आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांचा शोध घेऊन व त्यांच्या वारस-परिवाराशी संपर्क साधून विकासाची योजना तयार करता येईल. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार व विविध अर्थसंस्था यांच्याकडून निधी जमवून ऐतिहासिक स्मारकांचे जतन व जागतिक पर्यटनाचे आकर्षण चिरंतन राहील अशी व्यवस्था निर्माण करणे शक्य होईल.

– प्रभाकर कुळकर्णी

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक आहेत.)