12 December 2017

News Flash

गंगे सरल बहो..

अभिजात संगीतातील ध्रुपद हा कलाप्रकार जिवंत ठेवणारे

डॉ. घन:श्याम बोरकर | Updated: August 6, 2017 1:33 AM

अभिजात संगीतातील ध्रुपद हा कलाप्रकार जिवंत ठेवणारे, त्यामध्ये नावीन्याची भर घालणारे उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे नुकतेच निधन झाले. . स्वत: मैफली करण्यापेक्षा पुढील पिढीला आपले ज्ञान देण्यात त्यांनी धन्यता मानली. अशा या असामान्य गायकाच्या त्यांच्याच एका शिष्याने जागवलेल्या आठवणी..

‘डागर गुरुजी गेले.’ २३ तारखेला पुण्यातील माझ्या गुरुभगिनीकडून निरोप आला. मन सुन्न झाले. खिन्न झाले. जाणवले, स्वरांवर आणि ध्रुपदावर प्राणापलीकडे प्रेम करणारा, सुरांचा एक सच्चा प्रेमी हरपला. गेली साडेचारशे वर्षे ध्रुपद गायकीची अभिजात संस्कृती जतन करणाऱ्या, डागर घराण्यातील १९व्या पिढीतील अखेरचा ‘ध्रुपदिया’ चिरंतनातील ध्रुवपदाच्या प्रवासाला निघाला. माझ्यासारख्या अनेक शिष्यांच्या आणि श्रोत्यांच्याही प्राणांना विलक्षण चैतन्यदायी स्वरश्रुतींचे दर्शन घडविणारा हा ‘स्वरसिद्धयोगी’ अनंतात विलीन झाला.

गुरुजी तसे गेले वर्षभर आजारीच होते. वयही ८०च्या पलीकडे. वास्तविक डॉक्टरांनी प्रवासासाठी परवानगी नाकारली. परंतु अशाही स्थितीत गुरुजी नोव्हेंबर- डिसेंबरच्या थंडीत युरोपमध्ये राहिले. पुन्हा एप्रिल, मे, जून असा युरोपचा दौरा केला. तिथल्या युरोपियन शिष्यांना शिकविण्यासाठी आणि चरितार्थ चालवण्यासाठी! ध्रुपदच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारा हा थोर कलाकार. वयाच्या ८१व्या वर्षी व्याधींनी ग्रस्त झालेले शरीर घेऊन या थोर कलाकाराला फक्त जगण्यासाठी ही धडपड करावी लागते हे विदारक सत्य होते. मन व्याकूळ झाले. पहाटेपर्यंत गुरुजींना आठवत राहिलो मी. त्यांचे गाणे मनात जागवत राहिलो. डागर गुरुजींच्या स्मरणाचा ‘अमृतघन’ मनातून आणि डोळ्यातूनही बरसत राहिला.

१९९८ साली मी पाल्र्याला राहात होतो. रात्री दीड वाजता माझ्या मेव्हण्याचा फोन आला, डागर गुरुजी पॅरिसहून मुंबई एअरपोर्टवर आले आहेत. त्यांना ‘अद्रक की चाय’ प्यायची आहे. तुझ्या घरी घेऊन येऊ का? त्या रात्री गुरुजी आमच्या घरी पहिल्यांदा आले. चहापान झाले. मी गुरुजींना गाण्याची विनंती केली. गुरुजींनी तात्काळ होकार दिला. तानपुरा नाही, साथीदार नाहीत तरी गुरुजींनी सुरू केला सूरमल्हार.  ‘‘गंगे सरल बहो.. तुम तो राखो लाज हमारी’’. रात्री आमच्या घरात, आमच्या मनात स्वरगंगा वाहत होती. ती पहाट, सूरमल्हारच्या स्वरांनी उमलली होती, बहरली होती. माझी आणि गुरुजींची पहिली भेट झाली ती अशा मंतरलेल्या पहाटे! त्यानंतर गेल्या २० वर्षांत गुरुजींचा खूप सहवास घडला.

सामवेदाची परंपरा सांगणाऱ्या ध्रुपद गायकीतील ‘डागर घराणे’ हे सर्वात लोकप्रिय ध्रुपद घराणे. असे सांगितले जाते की, मियाँ तानसेनचे गुरू हरिदास डागर यांची ही गायकी. स्वामी हरिदासजींच्या जन्माबद्दल दोन प्रसिद्ध विचारप्रवाह आहेत. एकाच्या मते त्यांचा जन्म वृंदावनजवळच्या राजपूर गावात झाला. आणि दुसऱ्यांच्या मते त्यांचे वडील जे सारस्वत ब्राह्मण होते ते मुलतानमधून उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरित झाले. डागर हे मूळचे पांडे. डागरांचे पूर्वज बाबा गोपालदास पांडे. बाबा गोपालदास हे स्वामी हरिदासांचे पुत्र. त्यांनी राजगायकपद स्वीकारल्यावर त्यांना मुस्लीम धर्म स्वीकारावा लागला. ‘उस्ताद सईदुद्दीन डागर’ हे याच डागर घराण्यातल्या १९व्या पिढीतील प्रतिनिधी. म्हणूनच आमचे गुरुजी अनेकदा भावुक होऊन सांगत की, आमचे डागर घराणे हे ओम नादाचे उपासक आहे. हिंदू देवदेवतांची आराधना तब्बल १९ पिढय़ा आम्ही केली असून भारतीय संस्कृतीशी आमचे जन्मोजन्मीचे नाते आहे. मी मुस्लीम धर्माचा असलो तरीही पाकिस्तानात जाणे पसंत केले नाही. ‘‘ध्रुपद के लिये जिएंगे और ध्रुपद के लिये मरेंगे’’ असे म्हणणाऱ्या आणि तसेच जगणाऱ्या आमच्या डागर गुरुजींना नशिबाने तशी साथ दिली नाही.

१९व्या वर्षांपर्यंत आयुष्य कलकत्त्यात गेले. दुसऱ्या- तिसऱ्या वर्षीच मातृवियोग झाला. लहानपणी बग्गीतून जाण्याइतकी आर्थिक सुबत्ता होती. वडील बाकाजींकडून (हुसेनुद्दीन डागर) वयाच्या ५व्या वर्षांपासून १८ वर्षे तालीम घेतली. २३व्या वर्षी वडील गेले आणि गुरुजी एकटे पडले.

तीन रुपये पगारात कारखान्यात ड्रिलिंग मशीनवर वर्षभर काम केले. नंतर कलकत्ता सोडून लखनऊमध्ये रेल्वेच्या डब्यात टपालाच्या गोण्या भरण्याचे काम केले. मग दिल्लीला काकांकडे पुन्हा ध्रुपदचे शिक्षण सुरू झाले. १९७० ते १९८० या दशकात जयपूरला संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली. तीही कंत्राटी पद्धतीने. ८० साली पगार होता फक्त ३०० रुपये. नंतर पुन्हा दिल्लीला गेले व ध्रुपद शिकवू लागले. आशाताई गाडगीळांनी १९८५ साली त्यांच्या बंगल्यात ध्रुपदचे शिबीर आयोजित केले होते. गुरुजी व त्यांचे चुलतबंधू हे शिबीर व कार्यशाळा घेण्यासाठी आले होते.  ३०-४० शिष्यांनी ध्रुपद शिकायची इच्छा व्यक्त केली. पुण्यात ध्रुपदाचा प्रसार व्हावा म्हणून वडीलबंधूंनी सईदुद्दीनला म्हणजे आमच्या गुरुजींना पुण्यात स्थायिक होण्यास सांगितले आणि मग त्यानंतर गुरुजी पुण्याचेच झाले.

गुरुजींकडे गाणे शिकणे म्हणजे एक आनंद सोहळा होता. आमच्या कुठल्याच शिष्याचे गुरुजींशी नाते हे औपचारिक नव्हते. आम्ही पाच-सहा शिष्य व त्यांची मुले एकत्र रियाजाला बसायचो. सुरुवातीला १५ मि. हुंकार (हमिंग) षड्जापासून मंद्र सप्तकातल्या पंचमापर्यंत. मग खर्ज साधना. त्यानंतर रागाचे वरच्या षड्जापर्यंत स्वर लावणे. वेळेचे बंधन नसायचे. सकाळी ३-४ तास आणि संध्याकाळी ३-४ तास असा रियाज चालायचा. दुपारी गुरुजींकडेच जेवण. मधल्या वेळात गाण्यावरती गप्पा किंवा एखादे रेकॉर्डिग ऐकणे. खऱ्या  अर्थाने गुरुकुल पद्धतीने शिक्षण चालायचे. भैरव, तोडी, यमन आणि मुलतानी या चार रागांतच रियाज चालायचा. प्रत्येक शिष्याला वेगळा पलटा देऊनही त्यातला कुणी चुकला तर गुरुजी बरोबर सांगायचे. आरोहात भैरव व अवरोहात यमन किंवा आरोहात यमन व अवरोहात भैरव असाही रियाज करून घ्यायचे. तोडी, हिंडोल, गुणकली, यमन, केदार, बागेश्री अशा विविध रागांतील तान प्रत्येकाला वेगवेगळी गायला लावायचे. शिष्यांना नेमके स्वरज्ञान व्हावे म्हणून निरनिराळ्या पद्धतीने तयारी करून घेत.

कधीतरी खूप खुशीत असले तर गाण्यातील इतर प्रकार ख्याल, ठुमरी, गझल, कव्वाली किंवा रागदारीवर आधारित फिल्मी गीतसुद्धा ऐकवत. यमनमधील ‘मोरी गगरवाँ भरन देत’ ही बंदिश उपज व तानांसहित गात, पहाडी, देस मधील ठुमरी गात. कधी कधी ‘इलाहे आँसुभरी जिंदगी किसी को न दे’ किंवा ‘दिल को हर वक्त तस्सली का गुमा होता है’ अशा गझला गात तर कधी अभिषेकीबुवांचे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ हळुवारपणे गाऊन दाखवत. आणि मग हसत हसत म्हणत, ‘‘आम्हाला गाण्याचे विविध प्रकार व शैली आमच्या गुरूने शिकवल्या एवढय़ाचसाठी की ध्रुपदच्या आमच्या शैलीत, शिस्तीत  या शैलींचा परिणाम होऊ नये यासाठीच!

गुरुजी शिष्याचा आवाज तयार करण्यावर जास्त भर देत असत. पाया मजबूत असला तर कितीही बुलंद इमारत त्यावर उभी राहू शकते. तसेच तुमचा आवाज तयार असला तर कुठल्याही प्रकारचे गाणे तुम्ही सहज गाऊ शकाल, असे गुरुजी आम्हाला सांगायचे. आवाज, सूर लावायची स्वत:ची अशी स्वतंत्र पद्धत त्यांनी विकसित केली होती.

१० वर्षांपूर्वी माझ्या घरी मी डागर गुरुजींची एक कार्यशाळा आणि मैफील आयोजित केली होती. पं. नारायण बोडस, पंडिता आशा खाडिलकर, डॉ. विद्याधर ओक, पं. राम देशपांडे, पं. यशवंतबुवा जोशी, पं. डी. के. दातार असे दिग्गज कलाकार या कार्यशाळेला उपस्थित होते. चेहऱ्याची, गळ्याची, मानेची कुठलीही हालचाल व ओढाताण न करता, सहजतेने होणारा गुरुजींचा स्वराविष्कार पाहून पं. राम देशपांडे यांनी त्यांना विचारले की तुम्ही हा आवाज कसा लावता? तेव्हा गुरुजींनी नाभीचक्रापासून- सहस्रारचक्रापर्यंत हा स्वर कसा जातो त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले होते.

आवाज साधना शास्त्रासारखाच, तंबोरे जुळवणे हा गुरुजींचा एक खास प्रांत होता. त्यांनी जुळवलेले तानपुरे हे नुसते बोलतच नसत तर त्यांच्याबरोबर ते चक्क गात असत. त्यांच्या मनासारखे तानपुरे जुळले नाहीत तर मैफलच नव्हे, पण आमचा रियाजही सुरू होत नसे. ते नेहमी म्हणत, ‘‘ये तानपुरा २२ श्रुतियोंका मालिक है!’’  तानपुरा हा आपला गाणाऱ्यांचा साथीदार नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वराचे रूप आहे. तानपुराच गाणाऱ्याला गाण्याची वाट दाखवतो. स्वरज्ञान प्राप्त करण्यास किमान १२ वर्षे लागतात. ते झाल्यावरच तंबोरा लावता येतो.

गुरुजींनी आम्हा शिष्यांच्या मनात सुरांचे प्रेम रुजवले. तानपुरा लावायला, छेडायला आणि ऐकायला शिकवले. स्वरांचा लगाव शिकवला. त्या त्या रागातील स्वरांच्या नेमक्या आणि अचूक श्रुतींचे दर्शन त्यांनी आम्हाला घडविले. रागाचा पिंड, त्याची प्रकृती, त्याचा स्वभाव, त्याचे चलन ह्य़ाच्याशी आमचा परिचय घडवून आणला. बंदिशीतील काव्य, रागातला रस, शब्दांचे रंग आणि भाव आणि बंदिशीची लय या सगळ्यांचा समतोल कसा साधायचा याचे प्रात्यक्षिक दाखवले. आमच्या गळ्यात त्या श्रुती कदाचित आल्या नसतील, पण तुमच्यामुळे त्या श्रुती आम्हाला दिसल्या, असे आम्ही निश्चित सांगू शकतो. गुरुजी आमच्या जीवनात तुम्ही आम्हाला सुरांची सोबत दिलीत. आम्ही कृतज्ञ आहोत.

पाच वर्षांपूर्वी गुरुजींबरोबर बनारसच्या ध्रुपद मेळ्यात गेलो होतो. संध्याकाळी ७ ते पहाटे ६ पर्यंत असा पाच  दिवस हा ध्रुपद उत्सव चालतो. ध्रुपद गाणारे, रुद्रवीणा आणि पखवाज वाजविणारे असे जवळजवळ ८० ते १०० कलाकार देशभरातून इथे हजेरी लावतात. गंगेच्या काठावर भरणाऱ्या ध्रुपद मेळ्यात ४००-५०० रसिक श्रोत्यांची रात्रभर उपस्थिती असते. आणि आश्चर्य म्हणजे ५० टक्क्यांहून अधिक विदेशी नागरिक ध्रुपद ऐकताना पाहायला मिळतात. गुरुजींचा इथे खूप मान राखला जात असे आणि समारोप नेहमी गुरुजींच्या गाण्यानेच होत असे.

गुरुजींनी रात्री ३ वाजता कनकांगिनी राग गायला सुरुवात केली. ७२ मेलांपैकी ‘कनकांबरी’ ह्य़ा पहिल्या मेलातील हा राग. गायला अत्यंत कठीण. गुरुजींचा स्वरविलास सुरू झाला, श्रोते मंत्रमुग्ध होत होते. बंदिश सुरू झाली. ‘‘तू है सुमिरन योग मेरे दाता’’ ‘‘कृपा करो तुम  दिजे  स्वरज्ञान हे  विधाता’’  कनकांगिनीच्या स्वरातून आणि बंदिशीच्या काव्यातून विधात्याची आळवणी सुरू होती. स्वरांसाठी विनवणी सुरू होती आणि मग अंतऱ्यातून आरती सुरू झाली.

‘सप्त सुरन को ज्ञान बडो कठिन।

नाद समुद्र अपरंपार, हे विधाता॥

पहाट होत होती. गंगेच्या पात्राच्या पलीकडे क्षितिजावर सूर्याची तांबूस किरणे उमटत होती.  कनकांगिनीच्या स्वरांच्या अभिषेकात श्रोते चिंब भिजत होते आणि सभामंडपाला लागून वाहणारी गंगा जणू स्वत:च कनकांगिनी झाली होती. गुरुजींच्या अशा अनेक अपूर्व मैफिली ऐकण्याचे भाग्य मला लाभले. डागर घराण्यातील अनेक अनवट, वेगळ्या शैलींचे राग गुरुजींकडून श्रोत्यांना ऐकायला मिळाले. खमाज आणि दुर्गा या रागांचे मिश्रण असलेला रूपेश्री, यमनमधील मध्यम- पंचम वज्र्य करून गायलेला ‘अद्रभुद कल्याण’, देस अंगाचा जयजयवंती, तीव्र ऋ षभाचा चंद्रकौंस, जैतश्री, ललितागौरी, कांबोजी असे अनेक राग गुरुजींकडून आम्हाला ऐकायला मिळाले.

रागातले स्वर, त्या स्वरांच्या श्रुती, त्या श्रुतींचे भेद व पोटभेद हे गुरुजींकडून शिकायला मिळाले. श्रुतींचे ज्ञान हे अतिशय सूक्ष्म आहे. ‘‘सूक्ष्म विषयत्त्वं च अलिंग पर्यवसानं’’ म्हणूनच सूक्ष्म श्रुतींचे चिन्ह किंवा प्रतीक दाखवता येत नाही. परंतु गुरुजींची विशेषत: ही की त्या त्या रागातील विशिष्ट श्रुती स्थानांकडे ते दृष्टांताने निर्देष करीत. प्रात:सूर्याला अघ्र्य देणारे ‘भैरवाचे’ स्वर, सांध्यकाली क्षितिजावरील सूर्याला वंदन करणारा ‘श्री’ रागाचा पंचम किंवा आरतीच्या वेळी घंटानादासारखा निनादणारा अनुनासिकेतून आणि निरंनासिकेतून प्रवाहित होणारा ‘निषाद’ अशा अनेक  दृष्टांतातून  आणि प्रात्यक्षिकांतून डागर गुरुजींनी आम्हाला श्रुतींचे दर्शन घडविले. आपले अभिजात भारतीय संगीत ही मौखिक परंपरा आहे. ही श्रवणविद्या आहे. ही अध्यात्मसाधना आहे. गाणे ही सीना-बसीना तालीम आहे. परंतु ही परंपरा आता खंडित होत चालली आहे.

आज कुठल्याही अभिजात कलेची खोली, अथांगता आणि अनंतता यात अवगाहन करायला माणसाला वेळ आणि सवडही नाही आणि दुर्दम्य इच्छाही नाही. अर्थार्जन हेच जीवनाचे अंतिम मूल्य आणि ध्येय होऊन राहिले आहे. ‘संस्कृत’सारखी भाषा आणि ‘ध्रुपद’सारखी कला यांचा अर्थार्जनाच्या दृष्टीने फारसा उपयोग राहिला नाही आणि पुढे राहील असे वाटत नाही. ‘कालाय तस्मै नम:’

भारतीय संस्कृती गेल्या हजारो वर्षांपासून गंगा-यमुना यांसारख्या नद्यांच्या तीरावर रुजली आहे, फुलली आहे, बहरली आहे. भारतीय राग संगीतातून हीच अनादी संस्कृती अनेक अंगांनी प्रवाहित होत राहिली आहे. समाजमनाच्या पात्राची खोली कमी झाली की संस्कृतीची गंगाही उथळ होऊ लागते. आणि या उथळतेला सवंगपणाची आणि उन्मादाची साथ मिळाली तर गंगेला जसा महापूर येतो आणि तीरावरील वैभव, समृद्धी नष्ट होऊन हाहाकार माजतो तसेच संस्कृतीच्या अध:पतनाने समाजाचाही ऱ्हास होतो. म्हणूनच कदाचित स्वामी हरिदास म्हणाले असतील-

‘‘गंगे सरल बहो, तुम तो राखो लाज हमारी’’

या आपल्या भारतीय अभिजात संस्कृतीचे, संगीताचे आणि ध्रुपदाचे जतन करण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्या थोर कलाकाराची जीवन गंगाही मृत्यूच्या महासागरात विलीन झाली आहे, विलीन होता होताही डागर गुरुजी जणू गात होते-

गंगे सरल बहो..

डॉ. घन:श्याम बोरकर

drgrborkar@gmailcom

First Published on August 6, 2017 1:33 am

Web Title: marathi articles on sayeeduddin dagar