मोबाइलमधील खेळ हे मुलांना गिळून टाकणारे कृष्णविवर तर बनत नाही ना? ब्लू व्हेलसारखे मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे खेळ पाहता या प्रश्नाचे उत्तर होकारार्थीच येत आहे. नव्या पिढीला ग्रासणारे संगणकीय खेळांचे व्यसन ही आजची एक गंभीर सामाजिक समस्या आहे. तिचा मुकाबला करायचा, तर मैदानातच उतरले पाहिजे.. तेही प्रामुख्याने पालकांनीच. संगणकीय खेळांच्या विश्वावर, त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांवर आणि त्याच्या कारणांवर एक कटाक्ष..

हेही व्यसन सुटू शकते..

Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत

इंटरनेट, मोबाइल, त्यावरील खेळांचे व्यसन लागलेली बहुतांश मुले ही मध्यम आणि उच्च मध्यम घरातली. त्या व्यसनातूनही ही मुले नक्की बाहेर येऊ शकतात.. पण त्या आधी समजावून घ्यावी लागतील ती हे व्यसन जडण्याची कारणे.. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्तीचे हे अनुभवाचे बोल..

मूल शांत बसावे, जेवताना एका जागी बसावे अशा अनेक वरकरणी किरकोळ कारणांनी मुलांच्या हाती अगदी बालपणीच मोबाइल येतो. पालकांची सोय म्हणून हाती आलेल्या मोबाइलवर सुरुवातीला गंमत म्हणून सुरू केलेले खेळ हा भविष्यात खूप मोठा प्रश्न होऊन समोर उभा ठाकतो. गेल्या काही वर्षांत इंटरनेट वापराचे व्यसन लागल्यामुळे समुपदेशनासाठी येणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढते आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे संगणकावरील खेळांचे व्यसन.

‘ब्लू व्हेल’ या खेळ म्हणवल्या जाणाऱ्या प्रकाराने मुलांमधील इंटरनेटचे आणि खेळाचे व्यसन गेले काही दिवस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ब्लू व्हेल आणि त्यातून जगभरात झालेल्या मुलांच्या आत्महत्या, भारतातील काही अशा घटनांमागील शक्यता हे या सर्व प्रकाराचे टोक असले तरी यापूर्वी आलेल्या ‘पोकेमॉन गो’सारख्या खेळासाठी वेडी झालेली मुले हा देखील व्यसनाधीनतेचाच भाग म्हणावा लागेल.

साधारणपणे पौगंडावस्थेतील मुले या खेळांकडे जास्त आकर्षित होतात. या वयातील मुले शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरी जात असतात. पौगंडावस्था ही बदलांची आणि तेवढय़ाच तणावाची म्हणूनच ओळखली जाते. सामाजिक अपेक्षा हे देखील या तणावाचे कारण असते. या काळात मुले पालकांपासून थोडी दुरावायला लागतात, त्यांचा संवाद कमी होतो. त्याच वेळी स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न मुले करत असतात. त्यांच्या ‘हिरो’च्या कल्पना तयार होत असतात आणि त्या हिरोसारखे होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एका अभ्यासात असे समोर आले आहे, की जवळपास ७४ टक्के पौगंडावस्थेतील मुला-मुलींना ते जसे आहेत, तसे आवडत नाहीत. मुलांमध्ये न्यूनगंड तयार होतो. हा या सगळ्यातला खरा धोक्याचा टप्पा म्हणता येईल.

समाजमाध्यमांवर मुले आपली एक प्रतिमा उभी करतात. समाजमाध्यमांवर असलेले मित्र-मैत्रिणी या प्रतिमेचे कौतुक करत असतात. त्यापैकी समोर कुणीच नसते. त्यामुळे छान, चांगले याबाबत मुलांमध्ये असलेल्या संकल्पनांनुसार मुले प्रतिमा तयार करत असतात. त्याचप्रमाणे जे खेळ मुले खेळत असतात त्यातही आपली ‘हिरो’ची प्रतिमा मुले शोधू पाहतात आणि त्यातून समाजमाध्यमाच्या किंवा खेळांच्या आहारी जातात. खेळांमध्ये आणखी एक मुद्दा असतो तो म्हणजे धाडसाचा किंवा ‘थ्रिल’चा. या वयात धाडसाचे आकर्षण असते. त्याच्या परिणामांच्या विचारापेक्षाही त्यातील मजा मुलांना खुणावत असते. संगणकावरचे हे खेळ मुलांची ही हौस भागवतात आणि त्याच्याच जोडीला जेव्हा मुले या खेळात पुढचा टप्पा गाठत असतात, त्यातून काहीतरी मिळवल्याचे, ‘स्व’ सुखावणारे समाधान त्यांना मिळत असते. पूर्वी जवळपास राहणारी मोठी मुले, भावंडे यांच्यात मुले आपले आदर्श किंवा हिरो शोधत होते. आता हे आदर्श त्यांना समाजमाध्यमातून मिळतात. नकारात्मक गोष्टींना मिळणारी प्रतिष्ठा हे देखील यामागचे कारण आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, पूर्वी चित्रपटातील खलनायक दारू पिताना दाखवला जायचा आणि आता नायकच दारू पिताना दाखवला जातो, जो प्रेक्षकांच्या किंवा मुलांच्या दृष्टीने आदर्श असतो. अशा अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टींचे परिणाम एखाद्या गोष्टीच्या अधीन जाण्यामागे असतात. वेड, धाडस हे देखील या नकारात्मकतेचे स्वरूप आहे. लहानपणापासून घरात अनेक गोष्टी शिकवलेल्या असतात. मारामारी करू नये, चोरी करू नये, मात्र तरीही मुले खेळांमध्ये बंदुका घेऊन मारामारी करतात. त्यामागे वयानुसार असलेली बंडखोरीही कारणीभूत असते. समाजाचे नियम, घरातले नियम आम्हाला मान्यच नाहीत अशी भावना मुलांची असते. नियम मोडण्यात मुलांना मजा वाटते. शाळेत जेव्हा मस्ती केली म्हणून या मुलांना शिक्षा केली जाते, तेव्हा या वयातील मुलांना त्याचे दु:ख वाटण्याऐवजी अनेकदा मजा वाटत असल्याचेच दिसते. याचे कारणही बंडखोरीची भावना. या पिढीचे एकटेपणही त्यांच्या व्यसनाधीनतेला कारणीभूत आहे.

खरंतर या मुलांना मोबाइल्स, खेळ या सगळ्याची ओळख करून देण्यासाठी पालकही जबाबदार आहेत. गेल्या काही दिवसांत आमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे व्यसनाधीन असणारी बहुतांश मुले ही मध्यम आणि उच्च मध्यम घरातली असतात. आपल्या मुलांनी स्मार्ट व्हावे, जगाशी जोडले जावे, शाळा-महाविद्यालयातले प्रकल्प करणे सोपे जावे म्हणून पालकांनीच त्यांना घरी हौशीने इंटरनेट घेऊ न दिलेले असते. मोबाइलवरही इंटरनेटचे पॅक उपलब्ध करून दिलेले असतात. आपली मुलं या साधनांचं नेमकं काय करतात हे पाहायला पालकांना वेळ नसतोच आणि मुलांशी बोलायला तर नसतोच नसतो. मग ही मुलं त्या जगात स्वत:हून वाहवत जातात.

आता या सगळ्यातून मुलांना बाहेर कसे काढायचे किंवा रोखायचे? तर पालकांचा संवाद हाच खरे तर प्रभावी उपाय म्हणता येईल. आता पालकांकडे वेळ नसतो. मुलांना अधिक वेळ देण्यापेक्षा, मिळणारा वेळ त्यांच्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे वापरण्यावर पालकांनी भर देणे गरजेचे आहे. संध्याकाळी मुलांना खेळायला जा सांगून पालक घरात मालिका पाहात असतील, तर मुले त्यांचे ऐकणारही नाहीत. आपले वर्तन आणि संवाद याकडे पालकांनी लक्ष दिले तर मुलांना व्यसनांपासून रोखता येईल. मुलांना घरातील छोटय़ा छोटय़ा कामांमध्ये सहभागी करून घेणे, त्यांना फक्त मॉलमध्ये फिरायला न नेता मोकळ्या हवेत घेऊन जाणे यातून मुलांशी असलेले नाते सशक्त करता येईल. ‘ब्लू व्हेल’चे उदाहरण घ्यायचे झाले तर मुलांशी संवाद असेल तर मुले हा खेळ खेळत असल्याचे पालकांना लक्षात येऊ शकते. मुलांशी संवाद असेल तर त्यांना इंटरनेटचे व्यसन आहे का, हे देखील पालकांच्या सहज लक्षात येऊ शकते. इंटरनेट बंद झाले की मुले चिडचिडी होतात, आक्रमक होतात. त्यांच्या अभ्यासावर, आरोग्यावरही काही वेळा परिणाम झालेला दिसतो.

हे सगळे करूनही मुलांना या संगणकीय खेळांचे व्यसन लागले तर काय, तर या व्यसनातूनही मूल नक्की बाहेर येऊ शकते. मात्र इतर व्यसनांमधून बाहेर येण्यासाठी जे असते, तेच वर्तनात्मक व्यसनाबाबत असते. आपल्याला व्यसन आहे हे मान्य करणे ही प्राथमिक पायरी असते. त्यांना समुपदेशन करणे हा उपाय आहेच, पण त्याचबरोबर व्यसनाधीन असलेल्या मुलांना पालकांनी प्राधान्याने वेळ द्यावा. एखाद्या गोष्टीचा वापर आणि गैरवापर यातील फरक मुलांना समजला पाहिजे. मुलांना या खेळांमागचे ‘थ्रिल’ इतर अनेक उपक्रमांतून मिळवून देता येते. पालकांनी त्यासाठी वेळ द्यावा, मुले एकटी पडणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. व्यसन आहे आणि त्यातून बाहेर येणे गरजेचे आहे, हे पटले तर कोणीही व्यसनांमधून बाहेर पडू शकतो, मुलेही त्याला अपवाद नाहीतच.

मुक्ता पुणतांबेकर

(लेखिका पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक आहेत.)