News Flash

मंत्रावेगळा!

एवढं सगळं छान छान असलं, तरी सुहास कॉलेजमधला ‘चॉकलेट हिरो’ नव्हता

मंत्रावेगळा!

प्रतिभा गोपुजकर

मराठी आणि संस्कृत भाषेचे ज्येष्ठ व व्यासंगी अभ्यासक सुहास लिमये यांचं अलीकडेच निधन झालं. त्यांच्या सुहृद प्रतिभा गोपुजकर यांनी रेखाटलेलं त्यांचं प्रांजळ शब्दचित्र..

एलफिन्स्टन कॉलेजमधला १९६०-७० या दशकामधला काळ आम्हा विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर आमचे प्राध्यापक- मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, विजयाबाई राजाध्यक्ष, म. वा. धोंड यांच्यासाठीही सौख्यानंदाचा होता. महाविद्यालयीन जीवनाचा काळ सर्वच विद्यार्थ्यांसाठी ‘रमणीय’ असला, तरी तो त्या त्या गटासाठी स्मरणीय असणं- विशेषत: ५० वर्षांनंतरही, हे विशेष म्हणावं लागेल.

एलफिन्स्टनमधला हा आमचा कालावधी आमच्या पुढे तीन-चार वर्षे किंवा मागे एक-दोन वर्षे असलेल्यांसाठी खूप म्हणजे खूपच आनंददायी होता. विद्यार्थ्यांची नाटके, ‘ज्योती’ भित्तिपत्रक, मराठी वाङ्मय मंडळाचे वाचनालय या साऱ्या धामधुमीत आमचा अभ्यासही जोरात सुरू असायचा. शंकरशेट स्कॉलरशिप मिळविणारा सुहास लिमये, गुजरातीत पहिली येऊन महाविद्यालयात मराठी कार्यक्रम गाजविणारी कुंदा गोडबोले, मंगला गोडबोले, भक्ती बर्वे, रेखा सबनीस, प्रतिभा गजेंद्रगडकर, सुनीती सोहोनी, मंगला राव, विवेक दाते, मनीषा दीक्षित, मीना गोखले, कांचन सोनटक्के.. आणि आणखी कितीतरी!

या साऱ्यांमध्ये आगळावेगळा होता तो सुहास लिमये. आकाशवाणीवरील स्पर्धा असो, नाटक असो, एकांकिका असो, मराठी-संस्कृत-इंग्रजी कोणत्याही भाषेतील कार्यक्रम असो, त्यात सुहास असायचाच. आकाशवाणीवरील प्रश्नोत्तर स्पर्धेत विचारलं गेलं, ‘कोणता मनोरा, पिसाचा की राजाबाई, अधिक उंच आहे?’ उत्तर बरोबर आलं नाही यापेक्षा, त्यामुळे मं. वि. राजाध्यक्ष सरांना वाईट वाटलं असेल याचं दु:ख सुहासला अधिक होतं. ‘ससा आणि कासव’, ‘दूरचे दिवे’ या नाटकांत तर तो होताच. या नाटकांचे प्रयोग छानच झाले. या विद्यार्थी कलाकारांकडून रमाकांत देशपांडे यांनी बसवून घेतलेलं ‘तुझं आहे तुजपाशी’ सुंदर सादरीकरणामुळे गाजलं. सुहासने ‘वासुअण्णा’ एवढे छान उभे केले होते, की नंतर प्रथितयश कलाकारांच्या चमूने केलेला त्याच नाटकाचा प्रयोग पाहताना सुहासची आठवण येत होती.

एवढं सगळं छान छान असलं, तरी सुहास कॉलेजमधला ‘चॉकलेट हिरो’ नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती हे एक कारण. त्याचे वडील बासरी उत्तम बनवीत असत. त्यांची ही ओळख देशातच नव्हे, तर परदेशातही होती. तरीही कला आणि व्यवहार यांची सांगड बहुधा जमली नाहीच. पण वाचन, विचार यांबाबत वडिलांनी दिलेल्या मोलाच्या सल्ल्यांविषयी सुहास अनेकदा अभिमानाने बोलत असे. आई पाळत असलेल्या पारंपरिक पद्धतींचाही तो उल्लेख करी. कोकणातले त्याचे आडे-पाडले हे गाव, तेथे काही मालमत्ता नसली तरी त्याविषयीचा आपलेपणा तो दिलखुलासपणे सांगे.

तसे तर एलफिन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सहज दोन गट ओळखता यायचे- श्रीमंत आणि गरीब. सुदैवाने आपापसात वागता-बोलताना या विद्यार्थ्यांना हा भेदभाव करण्याची गरज मात्र भासत नसे. इंग्रजी/मराठी माध्यमात झालेले आधीचे शिक्षण हा भेदभाव कदाचित जाणवण्याइतपत असला, तरी सुहाससारख्या ‘मल्टिलिन्ग्वल’ विद्यार्थ्यांच्या बाबतीत तो कोणाच्या खिजगणतीतही नसायचा.

सुहास ‘हिरो’ होण्यापासून वाचला तो आणखी एका कारणामुळे. त्याच्या अतिविक्षिप्त स्वभाव आणि बेफिकीर वृत्तीमुळे. यासाठी त्याने मित्रमैत्रिणींकडून कितीदा ओरडा खाल्ला असेल कोण जाणे! पण जे गुण बाळा ते जन्मकाळा! आयुष्यभर हा विक्षिप्तपणा कसोशीने जपला त्याने.

या विक्षिप्तपणाच्या बुरख्याआड त्याने त्याची संशोधक, ज्ञानपिपासू वृत्ती जोपासली, फुलविली. कोणत्याही ज्ञानकणाच्या मुळापर्यंत जाण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. मग ते शाळेत, मराठी वर्गात शिकविणे असो, जिज्ञासू प्रौढांना ‘मेघदूत’, ‘रघुवंश’ समजावून सांगणे असो किंवा आमिर खानच नव्हे तर शिकण्याची इच्छा प्रगट करणारा देशविदेशातील कोणताही विद्यार्थी असो. भाषाविषयक शंकेचे सर्वतोपरी समाधान झालेच पाहिजे, अशी या ‘सरां’ची धारणा होती. याच भावनेने मुंबई विद्यापीठातील जर्मन भाषा विभागाने परदेशी विद्यार्थ्यांना संभाषण पद्धतीने मराठी शिकविण्यासाठी तयार केलेल्या पुस्तकांसाठी सुहासने जीव तोडून मेहनत केली, प्रसंगी विख्यात मराठीकारांचा रोषही ओढवून घेतला; पण स्वत:चे समाधान होईपर्यंत मुद्दा सोडला नाही.

तरीही या मंत्रावेगळ्या माणसाची माणसांवरची प्रीती आणि भक्ती अफाट होती. लक्ष्मण लोंढे यांच्यावर मनस्वीपणे जीव जडवलेला, डॉ. विंझे म्हणतील ती पूर्वदिशा. क्वचित कधी कोणाच्या लेखन, वक्तृत्वाने भारावून गेला तर त्याला ‘दुसरी बाजू’ समजावून देताना महत्प्रयास करावे लागायचे. दीपक चौधरी तर सुहासचा ‘लक्ष्मण’च! आजतागायत सुहासच्या कोणत्याही मदतीसाठी पडद्याआडून दीपक धावला नाही असे झालेच नाही. ढोंग आणि खोटेपणा मात्र सुहासला कधीही खपला नाही. अशा माणसांच्या बाबतीत सुहासने एकदा त्यांचे नाव टाकले तर ते कायमचे.

अशा या स्वत:च्या मस्तीत जगणाऱ्या माणसाला सगळ्या बाजूने सांभाळले, सावरले ते त्याच्या पत्नीने- भारतीने; मुलगी श्रुती ही तर त्याचे आनंदनिधान होते.

सुहासच्या जाण्याने हे सारे संपले आहे, मनाने कितीही मानायचे नाही म्हटले तरी. तो आम्हाला मोरोपंतांची केकावली समजावून सांगणार होता. त्याला मराठी-मराठी प्रदीर्घ शब्दकोश तयार करायचा होता. हे तर आता होणारच नाही, पण आमच्या अडलेल्या शंकांना उत्तरे कोण देणार? त्याच्या हव्यासाने घेतलेल्या प्रचंड संदर्भग्रंथांच्या पोरकेपणावर कोण मायेने हात फिरवणार?

विंदांच्या शब्दांत सांगायचे तर, या ‘वेडय़ा मुशाफिराला सामील सर्व तारे’ आणि ‘बेसावधास कैसे डसणार हे निखारे’!

gopujkarpratibha@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 3:01 am

Web Title: marathi author pratibha gopujakar article on marathi teacher suhas limaye zws 70
Next Stories
1 चाँदनी चौकातून : प्रतीक्षा..
2 आरेचा लढा
3 संकटमोचक
Just Now!
X