काही दिवसांपूर्वीच डॉ. चंद्रशेखर जहागीरदार आणि  डॉ. रवीन्द्र किंबहुने या दोन विचारशील व्यक्तींना मराठी साहित्यक्षेत्र पारखे झाले. तसे पाहिले तर ही दोन्ही नावे साहित्यक्षेत्रात तशी माहितीची असली तरी प्रसिद्धीच्या झोतात कधीच नव्हती. परंतु १९६० नंतरच्या काळातील मराठी साहित्याच्या संदर्भात या दोघांचेही कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे..
 १९६० नंतरचा काळ हा मराठी साहित्याच्या दृष्टीने साहित्य क्षेत्रात बदल घडविणारा काळ आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापासून मराठीत हळूहळू प्रतिष्ठित झालेला साहित्यविचार या काळात नव्याने लिहिणाऱ्या पिढीला अपुरा वाटू लागला. त्याचा परिणाम म्हणून ‘कलात्मकता’, ‘सौंदर्य’ याविषयी एका प्रकारची वादग्रस्तता तत्कालीन मराठी साहित्य क्षेत्रात मूळ धरू लागली. या साऱ्याचा पाश्चात्त्य जगातून येणाऱ्या नव्या विचारांशी संबंध होता. मराठीतील अनियतकालिकांची चळवळ हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. नव्याने लिहिणाऱ्यांच्या लेखनातून मराठी साहित्यात निर्माण होणारे नवे प्रवाह नवे नवे प्रश्न उपस्थित करू लागले. तोपर्यंत प्रस्थापित झालेल्या समीक्षेला त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणे कठीण होऊ लागले व त्यातून हळूहळू साहित्यविषयक नवा विचार आकार घेऊ लागला. या काळापासून मराठी साहित्यविचार कलावादी विचारापासून दूर जाऊन संस्कृतीलक्ष्मी होऊ लागला. मराठी समीक्षेने घेतलेले हे नवे वळण होते. या वळणाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. चंद्रशेखर जहागीरदार आणि डॉ. रवीन्द्र किंबहुने या दोघांकडे पाहता येते. दोघेही त्या काळातील अनियतकालिकांच्या चळवळीतील मंडळीशी मित्रत्वाचे संबंध ठेवून होते. नव्याने येणाऱ्या लेखनाकडे स्वागतशील वृत्तीने पाहून त्या लेखनाचे स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न करीत होते. ते स्वत: ललित लेखक नसल्यामुळे त्यांची नावे प्रसिद्ध होत नव्हती हे स्वाभाविकच आहे. परंतु त्या काळात लेखन करणाऱ्या भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, श्याम मनोहर, अरुण कोलटकर, ना. धों. महानोर, सतीश काळसेकर यांसारख्या आज प्रसिद्ध असणाऱ्या लेखकांशी त्यांचा जवळून संबंध होता. त्या सर्वाच्या परस्परांबाबत चर्चा होत असत. म्हणूनच मराठी साहित्य विचारात होणाऱ्या बदलाशी संबंधित असणारे समीक्षक हे दोघांचेही ऐतिहासिक महत्त्व नि:संशय आहे.
डॉ. चंद्रशेखर जहागीरदार हे मूळ हैदराबादचे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले आणि औरंगाबादकर झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर १९७९ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात काम केल्यानंतर पुढे शिवाजी विद्यापीठात २००५ पर्यंत त्यांनी कार्य केले. विद्यापीठात त्यांनी अनेक समित्यांवर महत्त्वाचे कार्य केले. त्यांचा विषय इंग्रजी. अमेरिकन साहित्य हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय. परंतु मूळ हैदराबाद आणि नंतर औरंगाबाद येथे केलेले वास्तव्य यामुळे उर्दू साहित्याशीही त्यांचा उत्तम संबंध होता. मराठी तर मातृभाषाच असे ते बहुभाषिक होते. याचा परिणाम त्यांच्या साहित्यविषयक अभिरुचीवर झाला होता. त्यामधून तौलनिक साहित्याभ्यासाची दृष्टी त्यांना प्राप्त झाली होती. त्याचबरोबर संगीत, चित्रपट यांसारख्या कलांमध्येही त्यांना आस्था होती. आपण काही तबला वाजविण्याचे शिक्षण घेतल्याचेही त्यांच्या बोलण्यात आले होते. या साऱ्यामुळे त्यांची अभिरुची संस्कारित झाली होती. म्हणूनच तल्लख बुद्धिमत्ता व अभिजात रसिकता याचा सुंदर मेळ त्यांच्या लिहिण्या-बोलण्यातून जाणवण्यासारखा असे. विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख, चर्चासत्रातील त्यांचे शोधनिबंध वा भाषणे यांमधून जहागीरदारांच्या विचारशीलतेचा प्रत्यय येत असे. हे सर्व करीत असताना पाश्चात्त्य विद्वानांची वा ग्रंथांशी नाते यांच्या साहाय्याने वाचकांच्या वा श्रोत्यांच्या मनात आपल्या ज्ञानाची दहशत निर्माण करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. विचार समजावून घेणे व सांगणे, आपल्या समाजाच्या संदर्भात त्या विचाराची उकल करणे हे त्यांना महत्त्वाचे वाटत असे. त्यामुळे त्यांच्या लेखनातून, भाषणातून काहीतरी नवे मिळाल्याचे, आपल्या आकलनात भर पडल्याचे समाधान वाचकांना/ श्रोत्यांना लाभत असे. या संदर्भात एक साधे उदाहरण येथे सांगण्यासारखे आहे. १९६० नंतरच्या काळात ‘स्वामी’ कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर ऐतिहासिक विषयावरील कादंबऱ्यांची एक लाटच मराठी साहित्य क्षेत्रात आली. तेव्हा त्या निमित्ताने इतिहास आणि ऐतिहासिक कादंबरी यांमधील भेद या विषयावर बरीच चर्चा झाली होती. परंतु त्यामधून फारसे नवीन काही निष्पन्न होत नव्हते. जहागीरदारांनी या विषयावर एक टिपण वाङ्मयीन नियतकालिकात लिहिले होते. या छोटय़ा टिपणात या भेदाविषयी एक सुंदर स्पष्टीकरण आले होते. त्याचा निष्कर्ष इतिहासात भूतकाळ असतो, तर  ऐतिहासिक कादंबरीतील अनुभव हा कादंबरीकार ज्या काळातील असेल त्या काळातून घेतलेला भूतकाळाचा म्हणजे इतिहासाचा अनुभव असतो असा होता. जहागीरदारांच्या या स्पष्टीकरणाने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासारखी होती. जहागीरदारांच्या लिहिण्या – बोलण्यात नेहमीच काहीतरी असे नवे मिळण्यासारखे असे.
१९६० नंतरच्या मराठी साहित्यिकांविषयी जहागीरदारांनी जे लिहिले आहे ते म्हणून पाहण्यासारखे आहे उदा. भालचंद्र नेमाडे यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांची उत्तम अनुकूल समीक्षा जहागीरदारांनीच केली आहे. दिलीप चित्रे यांच्या कवितेवरील जहागीरदारांचा लेख त्यांची कवितेविषयीची जाण किती प्रगल्भ आहे हे दर्शविणारा आहे. मराठीतील ललितगद्याविषयीची त्यांची परखड निरीक्षणे व त्यातून त्यांनी काढलेले निष्कर्ष मराठी वाचकांच्या अभिरुचीच्या मर्यादा दाखविणारे आहेत. जहागीरदारांच्या अशा लेखनातून त्यांच्या साहित्यविषयक भूमिकेचा प्रत्यय येण्यासारखा आहे. ही भूमिका कलात्मकतेने योग्य ते भान राखत समाजमनस्कतेचा पुरस्कार करणारी आहे.
जहागीरदारांच्या अशा वैशिष्टय़ांमुळेच रूढ अर्थाने ते प्रसिद्ध नसले तरी वेगवेगळ्या विद्यापीठांतून, साहित्यसंस्थांतून त्यांना भारतभर निमंत्रणे येत असत. त्यांच्या बुद्धिमत्तेची व व्यासंगाची जाणीव असल्यामुळेच साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट अशा राष्ट्रीय पातळीवरील संस्थाही त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी निमंत्रित करीत असत. निवृत्तीनंतरच्या काळातही साहित्य अकादमीच्या एका मोठय़ा प्रकल्पावर ते काम करीत होते.
जहागीरदारांशी बोलताना त्यांना अनेक विषयांवर काम करायचे आहे असे ते म्हणत. कुमार आनंदस्वामींच्या कलाविचारांवर काम करण्याचे त्यांच्या बोलण्यात असे. मुंबईत असताना मराठी समीक्षेचा इतिहास नीट, पद्धतशीर लिहिण्याची कल्पना त्यांनी मला सांगितली होती. अलीकडे येणाऱ्या नव्या नव्या पाश्चात्त्य साहित्यसिद्धांची नीट माहिती मराठीत आली पाहिजे, अलीकडे येथे जे काही चालले आहे ते सगळे अर्धवट आहे असंही एकदा ते म्हणाले होते. एका समीक्षा ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने केलेल्या एका भाषणातही त्यांनी परखडपणे आपली मते मांडली होती. अलीकडच्या मराठी साहित्याविषयीही त्यांची जाणकार मते होती. परंतु आज त्यातील काहीच प्रत्यक्षात आलेले नाही. ‘तौलनिक साहित्याभ्यास’ या  प्रा. हातकणंगलेकर गौरवग्रंथाचे संपादन एवढेच आज त्यांच्या नावावर प्रकाशित साहित्य आहे. जहागीरदारांवर एक गौरवग्रंथ इंग्रजीत प्रसिद्ध झाला आहे. परंतु जहागीरदारांच्या विचारांना आता मराठी जिज्ञासू वाचक पारखा झाला आहे, ही खेदजनक वस्तुस्थिती आहे. त्यांचे इतस्तत: विखुरलेले लेख, त्यांची भाषणे परिश्रमपूर्वक एकत्र करून कोणी नीट प्रसिद्ध केली तर ते मराठी साहित्यक्षेत्राला उपकारक होईल. असे परिश्रम घ्यावेत एवढे महत्त्व डॉ. चंद्रशेखर जहागीरदार यांचे आहे हे नि:संशय.
डॉ. रवीन्द्र किंबहुने हेही असेच महत्त्वाचे नाव आहे. तेही इंग्रजीचेच प्राध्यापक, अतिशय बुद्धिमान आणि व्यासंगी. तेही डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातच अखेपर्यंत कार्यरत होते. जहागीरदार आणि किंबहुने दोघेही समवयस्क. त्यांचीही परिस्थिती जहागीरदारांसारखीच. जहागीरदारांचा वावर व्यापक परिसरात, त्यामानाने किंबहुन्यांचा कमी एवढेच. साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट अशा राष्ट्रीय पातळीवरील साहित्य संस्थांसाठी त्यांनीही काम केले. शेवटपर्यंत औरंगाबाद येथेच स्थायिक असल्यामुळे ‘मराठवाडा साहित्य परिषदे’च्या कामातही त्यांनी मनापासून रस घेतला. तेथे ते काही काळ पदाधिकारीही राहिले. बुद्धिमान आणि व्यासंगी असह्य़ामुळे पाश्चात्त्य साहित्याचा इतिहास, त्या समाजातील घडामोडी, वेगवेगळ्या अभ्यासपद्धती या सर्व बाबींचे उत्तम ज्ञान त्यांना होते. पण याचा अनुवाद करून त्याचा मोठेपणा सांगण्यापेक्षा या सर्वाचा आपल्या समाजाच्या संदर्भात विचार करण्याची त्यांची पद्धती होती. म्हणून त्यांचे लिहिणे, बोलणे केवळ विद्वत्तादर्शक होत नसे. ते आपल्या समाजाला आपल्या परीने मार्गदर्शन करणारे होत असे. वेगवेगळ्या चर्चासत्रांमधून सादर केलेले शोधनिबंध, अशा परिसंवादांच्या निमित्ताने केलेली भाषणे, वाङ्मयीन नियतकालिकांमधून लिहिलेले लेख हेच त्यांच्या विचारांचे दर्शक सुदैवाने त्यांच्या अशा लेखनाचा एक संग्रह ‘किंबहुना’ या वैशिष्टय़पूर्ण नावाने प्रसिद्ध झाला आहे. (त्या शीर्षकाचा अर्थ काय ते पुस्तकातच पाहण्यासारखे आहे. त्यावरूनही किंबहुने यांच्या व्यासंग व त्यांच्या स्वभावातील मिश्कीलपणा याची साक्ष पटण्यासारखी आहे.)
या संग्रहातील केशवसुत, मुक्तिबोध, सुर्वे, अरुण कोलटकर, ना. धों. महानोर, अनुराधा पाटील, प्रफुल्ल शिलेदार यांसारख्यांच्या कवितेवरील लेख पाहिले तरी किंबहुने यांची काव्यविषयक जाण किती प्रगल्भ आहे आणि तिला एतद्देशीय भान कसे आहे ते जाणवल्यावाचून राहत नाही. किंबहुने यांनाही हिंदी, उर्दू साहित्याचे चांगले ज्ञान होते. त्यामुळे भारतीय साहित्यातील वास्तवाचे भान त्यांना आले होते. त्यामधूनच त्यांची अभिरुची उदार व स्वागतशील झाली होती. ‘किंबहुना’ या संग्रहातील इतर लेखातून किंबहुने ही काय चीज आहे हे स्पष्ट होण्यासारखे आहे. उदाहरणार्थ अलीकडे मराठी साहित्य क्षेत्रात वाचन, वाचन संस्कृती याविषयी भलताच उत्साह आला आहे. ‘वाचाल तर वाचाल’ अशा घोषणाही येथे दिल्या गेल्या आहेत. या संदर्भात वाचन म्हणजे काय व त्याचे महत्त्व काय हे कळण्यासाठी किंबहुने यांच्या लेखसंग्रहातील ‘वाचन संस्कृती : मला प्रभावित करणारी पुस्तके’ हा लेख पाहावा. किंबहुने यांची साहित्यविषयक जडणघडण कशी झाली याचेही या लेखात प्रत्यंतर येण्यासारखे आहे. तसेच अलीकडे मराठी साहित्य क्षेत्रात साहित्य सिद्धांतांची जी लाट पाश्चात्त्यांकडून येत आहे, त्याविषयी किंबहुने यांचे काय मत आहे हे पाहण्यासाठी ‘संरचनावाद’, ‘उत्तर आधुनिकता’ हे लेख पाहावेत. डॉ. किंबहुने हे इंग्रजीचेच व्यासंगी प्राध्यापक असल्यामुळे या सिद्धांतांचे व पाश्चात्त्य जगातील त्याविषयीच्या चर्चेचे उत्तम ज्ञान त्यांना होतेच, पण त्याचबरोबर आपल्या समाजाविषयीचे त्यांचे भानही तेवढेच उत्कट होते. म्हणूनच ‘पाश्चात्त्यांनी उत्साहात मांडलेले अत्याधुनिक सिद्धांत आपल्यासाठी सापळा ठरण्याची शक्यताच अधिक दिसते’ असे म्हणून ‘अत्यंत सावधगिरीने त्यांचे उपयोजन करणे श्रेयस्कर ठरेल’ असा सल्ला किंबहुने देतात. एवढेच नव्हे तर ‘ह्य़ा नव्या सत्ताकारणात आपले अस्तित्वच नाकारून त्यावर सैद्धांतिक नांगर फिरविण्याचा राक्षसी कट शिताफीने लपविला जात आहे. तुम्ही कितीही मौलिक, मूलगामी आणि आशयघन साहित्य निर्माण केले तरी त्याचे मूल्यमापन करणारे निकष पाश्चात्त्य सिद्धांतच ठरविणार. अशा विध्वंसक दुराग्रहासमोर आपण शरणागती पत्करणार आहोत काय?’ असा आक्रमक प्रश्नही ते विचारतात. किंबहुने यांचे हे प्रश्न आजच्या परिस्थितीत विचार करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत.
याच संग्रहातील ‘साहित्यिक नेहरू’ हा लेख वेगळ्या कारणासाठी पाहण्यासारखा आहे. ‘जगाकडे पाहण्याची स्वच्छंदतावादी दृष्टी आणि राजकारणातील अटळ कठोर वास्तववाद यातला संघर्ष नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात जाणवतो. त्यामुळे जीवनातील निसर्गातील सौंदर्यबोध घेणारी काव्यवृत्ती आणि वास्तवाचे भान यातला ताण त्यांच्या लेखनशैलीचा मूलस्रोत म्हणता येईल. हे नेहरूंच्या लेखनशैलीविषयीचे विधान वाचकांना नेहरूंचे साहित्यच नव्हे तर नेहरूंकडे पाहण्याचीही एक वेगळी दृष्टी देऊन जाते. अशी कितीतरी उदाहरणे किंबहुने यांच्या लेखसंग्रहात मिळण्यासारखी आहेत. अनेक सांस्कृतिक प्रश्नांचे, मराठी समाजाच्या अभिरुचीचे प्रश्न त्यांच्या लेखनातून अधोरेखित झाले आहेत. पाश्चात्त्य साहित्य व साहित्यसिद्धांत, त्याचबरोबर मराठी, हिंदी, उर्दू साहित्य यांच्या संस्कारातून प्राप्त झालेला साहित्याकडे पाहण्याचा एक स्वतंत्र, एतद्देशीय दृष्टिकोन हे किंबहुने यांचे वैशिष्टय़ आहे. म्हणूनच १९६० नंतरच्या मराठी साहित्य क्षेत्राची नव्या दृष्टीने समीक्षा करणारे समीक्षक असे त्यांचे वर्णन करता येते.
डॉ. जहागीरदार आणि डॉ. किंबहुने यांच्या निधनाने स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्याचे सुजाण भाष्यकारच हरपल्याचा धक्का मराठी साहित्यक्षेत्राला आज जाणवत आहे.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला