प्रथितयश नाटककार तसेच चित्रपट, दूरदर्शन मालिका,  एकांकिका अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणारे  लेखक अशोक पाटोळे यांचे नुकतेच निधन झाले. नाटय़सृष्टीत तीन दशकांहून अधिक काळापासून त्यांच्या सहवासात असलेल्या  मित्राने त्यांच्या जागवलेल्या आठवणी..

१९७८च्या आसपासचा काळ असेल, राज्यनाटय़ स्पर्धा तेव्हा अत्यंत महत्त्वाची पायरी होती ती लेखक, दिग्दर्शक व हौशी संस्थांना आपली कुवत दाखवण्याची. मी लिहिलेला ‘अलवरा डाकू’ मतकरींचे लोककथा ७८ ही नाटके त्यावर्षी गाजली. आम्हाला, म्हणजे ‘या मंडळी सादर करूया’ या आमच्या हौशी नाटय़ संस्थेबद्दल बऱ्याच अपेक्षा निर्माण झाल्या. पुढील वर्षी आम्ही पुन्हा ‘देवस्की’ हे नाटक केले. आणि त्याच्याच आसपास ‘डाऊन विथ द फेस्टिव्हल’ हे अशोक पाटोळेंचे नाटकही गाजले. तिथे या लेखकाचे नाव मी प्रथमच ऐकले. ओझरती ओळख झाली. ‘या मंडळी सादर करूया’ या आमच्या संस्थेतली मुले म्हणजे केस वाढवलेली, चित्रविचित्र कपडे घालणारी २५ – ३०च्या ग्रुपने फिरणारी अशी; त्यामुळे अनेकांचे आकर्षण अथवा मत्सरास कारणीभूत ठरणारी. अशोक पाटोळे तसे एकांडे शिलेदार, वेगवेगळ्या संस्थांसाठी त्यांनी लिखाण केले. आमच्याबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची अढीच होती. कधी भेटला तर ‘दुर्लक्ष’च करीत असे. पुढे १२, १३ वर्षांनी राकेश चौधरी यांच्या ‘संवाद’ या मालिका निर्मिती संस्थेसाठी दिग्दर्शनाकरिता मला बोलावले आणि अशोक पाटोळे यांनी लिहिलेले दोन एपिसोड माझ्या हातात पडले. मी वाचले आणि खूश झालो. कारण अत्यंत बंदिस्त आणि मजेशीर असे ते एपिसोड होते. राकेशच्या ऑफिसमध्ये पाटोळेंबरोबर मीटिंग झाली आणि ते इतके तुटक का वागतात हे मला कळेनासे झाले. मला एपिसोड्स आवडल्याचे कळताच ते रिलॅक्स झाले. चर्चा झाली आणि मग त्यांच्या लक्षात आले की ‘या मंडळी’चा आगाऊपणा माझ्यात त्याला कुठे दिसत नाही. vv07पाटोळे यांच्या अखेरच्या ‘आई, तुला मी कुठे ठेवू?’ या नाटकातील एक दृश्य.

मी त्यांच्याशी मनापासून बोलतोय. लिखाणाची उगाचच खिल्ली उडवत नाही याचा त्यांना आनंद आणि आश्चर्य वाटले.. आमच्या संस्थेबद्दलचा त्यांचा गैरसमज उगाचच झाला होता. अनेक दिग्गज कलावंतांनी उगाचच ‘लाडावलेली प्रायोगिक नाटय़ संस्था’, असे त्यांचे आमच्याबद्दलचे मत हळूहळू बदलत गेले. आणि ते अधिकच मनमोकळे होत गेले. मग आणखी पुढे भेटी वाढल्या तसे  दिलखुलास होत गेले. आणि आमच्या घट्ट मैत्रीला सुरुवात झाली. उदय धुरत यांच्या ‘माऊली प्रॉडक्शन’चे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हे नाटक ९७ साली माझ्याकडे वाचायला आणि दिग्दर्शित करायला आले. मी वाचले. त्यात काही त्रुटी दिसल्या.. मला जरा टेन्शनच आले.. हे सर्व पुनर्लिखित करणार का असा मला प्रश्न पडला. लेखकाचा एक ‘ईगो’ असतो.. लिहिलेले बदलण्यासाठी त्याची तयारी नसते.. पुन्हा गैरसमज होणार की काय? असा मला प्रश्न पडला. कारण ‘ऐसा भी होता है’ या मालिकेमुळे आमचे बऱ्यापैकी टय़ुनिंग झाले होते. आता या नाटकातल्या काही गोष्टींवर मी आक्षेप घेतला.. (निर्मिती सावंतने हे नाटक मीच दिग्दर्शित करावे असा आग्रह धरला होता.) त्या गोष्टी बदलून मिळणार असतील तरच मी करेन असे उदय धुरतना मी सांगितले. मला वाटले अशोक पाटोळे आता चिडतील आणि वाद घालून नाटक घेऊन निघून जातील. पण आश्चर्य.. भेटता क्षणीच मला ते म्हणाले.. ‘तुला हवे तसे बदल करून देतो.. तू दिग्दर्शक आहेस, तुला नाटक बसवताना ते मनापासून आवडले पाहिजे. तेवढे मी करून देईन..’ आणि खरच.. सर्व बदल करून दिले आणि रिहर्सल सुरू होऊन नाटक रंगभूमीवर आलेसुद्धा. या नाटकाचे दिग्दर्शन आणि पाश्र्वसंगीत मी केले होते. अशोकना दोन्ही गोष्टी खूप आवडल्या आणि आम्ही अधिक जवळ आलो.
‘जाऊ बाई जोरात’ नंतर ‘अष्टविनायक’च्या दिलीप जाधवांना नवीन नाटक हवे होते. (मी लेखक नसल्यामुळे नियमितपणे लिखाण करत बसणे मला जमत नाही) निर्मिती, मी, दिलीप आणि अशोक आम्ही एक मीटिंग केली. त्यात नवीन काही लिहिण्याबद्दल पाटोळेंना विनंती केली. त्यातून आई आणि विद्यार्थी मुलं.. आणि मुलांवरचे परीक्षेचे आणि अभ्यासाचे ओझे.. त्यातून त्यांचे करपणारे बालपण हा विषय पुढे आला आणि अशोक पाटोळेंनी एका महिन्यात नाटक लिहून देतो असे आश्वासन दिले.  ‘टेलर’च्या आणि ‘लेखका’च्या आश्वासनात साधारणपणे साम्यच असते. उद्या देतो, परवा देतो करून दोघेही ‘डिलीव्हरी’ लांबणीवर टाकतात. पण अशोक तोपर्यंत अनेक मालिकांचे यशस्वी लेखक म्हणून नावारूपाला आले होते. ‘श्रीमान श्रीमती’ तर प्रचंड गाजत होती.. इतर अनेक हिंदी मालिका ते झपाटय़ाने लिहीत होते. कापसाच्या ‘गड्डी’कडे नुसते पाहिले तर कापूसच दिसतो.. पण त्यात ‘सुता’पासून ‘सुटा’पर्यंत सर्व प्रकारचे कपडे दडलेले असतात.. तसे अशोक यांचे होते. त्यांच्यात एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट असे अनेक प्रकारचे लिखाण ठासून भरलेले होते. अगदी कथा-कादंबऱ्यांसकट..
लिहायला बसले की ‘झरझर’ अगदी म्हणाल त्या ‘फॉर्म’मध्ये त्यांचे लिखाण पेपरवर उतरत असे.
‘श्यामची मम्मी’ हे नाटक सांगितलेल्या तारखेप्रमाणे हातात पडले आणि उडालोच.. अशोकने हे कसं काय जमवलं कळलंच नाही.. नाटक वाचनाची त्याची शैलीही धमाल होती.. अनेक प्रसंगांना स्वत: हसत हसत अथवा भावविवश होत  ते वाचत असे. नाटय़ वाचन हा त्याचा आवडता आविष्कार होता.
प्रत्येक कलाकृतिगणिक आमची मैत्री वाढत होती. तरी अशा परिस्थितीत आपले चौफेर लिखाण त्यांनी सुरूच ठेवले होते. मालिकांमध्ये ‘अधिकारी ब्रदर्स’ यांना पाटोळेंचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच अजय कर्णिक, राकेश चौधरी या हिंदी निर्मात्यांबरोबरही त्यांची खास लेखकमैत्री होती. नाटकांमधे कमलाकर सारंग, दिलीप कोल्हटकर, प्रकाश बुद्धिसागर, कुमार सोहनी आणि विजय केंकरे यांच्याशीही त्यांचे छान टय़ुनिंग दिसून येते. या प्रत्येकाच्या नावावर अशोक पाटोळेंचे एक तरी सुपरहिट नाटक आहेच.
मालिकेचे २०००च्या आसपास एपिसोड्स लिहिण्याचा विक्रम अशोकच्या नावावर आहे. इतका भन्नाट स्पीड आणि दर्जा राखण्याचे कडक काम अशोकने अव्याहतपणे पार पाडले. हे सर्व करण्यात त्यांच्या डोक्याचा भुगा कसा होत नाही असा मला प्रश्न पडे. लिहीत बसण्यात वेळ न घालवता नंतर नंतर त्यांनी एक लेखनिक  ठेवला व छोटय़ा टेपरेकॉर्डरवर अख्खा एपिसोड तो संवाद बोलून ‘रेकॉर्ड’ करीत असे व लेखनिक ते पेपरवर उतरून घेत असत. अशी मालिकांची फॅक्टरीच अशोकने उघडली. आणि विशेष म्हणजे ती यशस्वीही झाली.
तांदूळ निवडता निवडता (कमलाकर सारंग), बोलबोल म्हणता (दिलीप कोल्हटकर), देखणी बायको दुसऱ्याची (कुमार सोहनी), हीच तर प्रेमाची गंमत आहे (विजय केंकरे), श्यामची मम्मी (पुरुषोत्तम बेर्डे), आई रिटायर होतेय (दिलीप कोल्हटकर) ही नाटकांची हिटलिस्ट..
सचिन पिळगांवकरांबरोबर ‘माझा पती करोड पती’ या चित्रपटाची पटकथा आणि संवादामार्फत पाटोळेंनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘चौकट राजा’ या स्मिता तळवलकर निर्मित संजय सूरकर दिग्दर्शित चित्रपटाची कथा- पटकथाही अशोक पाटोळेंची. ‘माझा छकुला’, ‘झपाटलेला’, ‘झपाटलेला २’ हे महेश कोठारेंचे सिनेमेही अशोकनेच लिहिले. ‘बागबान’ या अमिताभ बच्चन, रवी चोप्रा यांच्या सिनेमातील परेश रावलचे जेवढे सिन्स आहेत ते सर्व लिहिण्यासाठी अशोक पाटोळेंना बोलावण्यात आले. नाटकाप्रमाणे चित्रपटातही अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले.
‘आचार्य अत्रे’ यांच्याबरोबर तासभर बोलण्याची संधी ऐन तारुण्यात पाटोळेंना मिळाली होती. तिथून त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. रिझव्‍‌र्ह बँकेतल्या नोकरीवरून लक्ष उडालं. ‘अत्र्यांच्या’ प्रभावाखाली अशोक झपाटून गेले. ‘आचार्य अत्रें’बद्दल प्रचंड आदर.. त्यांच्यासारखं चौफेर लिहावं असं त्यांना नेहमी वाटत आलं. नाटक बांधण्याची कला मी अत्रेंच्या नाटकांचा अभ्यास करून शिकलो हे ते नेहमी म्हणायचे. ‘आई रिटायर होतेय’ या नाटकासंबंधी ‘पुलं’नी नाटक आवडल्याचे पत्र अशोकला पाठवले आणि अत्र्यांसोबत पुलंनीही त्यांच्या हृदयात घर केले. अलीकडच्या काळात त्यांनी लिहिलेले व सादर केलेले ‘एक चावट संध्याकाळ..’  हे नाटक त्यांनी अत्र्यांच्या प्रभावाखालीच लिहिले व सादर केले असा छुपा अभिनिवेश त्यांच्यात होता. त्यामुळे त्यांनी पत्रकारांचा रोषही ओढवून घेतला. टीका सहन केली. पण अत्र्यांप्रमाणे बेधडक व आक्रमक असा प्रतिकारही केला.
एखाद्याचा नुसता आदर्श ठेवून काय उपयोग? तसे वागलेही पाहिजे हे त्यांचे म्हणणे होते. मात्र इतके प्रचंड लेखन करूनही कुठे योग्य ती नोंद घेतली जात नाही याची ‘खंत’ अशोकला कायम होती. ‘आई रिटायर होतेय’ हे नाटक अनेक भाषांमध्ये भारतभर सादर झाले. पण कुठेही म्हणावा तसा उल्लेख होत नाही याचीही त्यांना टोचणी होती. ‘माझे नाटक आले की समीक्षकांना लेखणी कसायासारखी फिरवायची मस्त संधी मिळते’ असेही ते म्हणायचे.. समीक्षकांनी डोक्यावर घेतलेले त्यांचे एकही नाटक कुठे दिसत नाही. तरी रसिकांनी मात्र प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल ते खूश असायचे. आपल्या चमकदार डोळ्यांनी आणि स्वच्छ व प्रभावी वाणीने ते म्हणायचे. ‘जाऊ देरे त्यांचं काम त्यांना करू दे, आपण आपले काम करू.’
खरे तर त्यांना हे सर्व मनावर घ्यायला वेळच नव्हता इतके ते ‘ओव्हर कमिटेड’ होते.
मात्र या लेखनाच्या झपाटय़ाने, वेगाने आणि प्रेशरने त्यांना पैसा, प्रसिद्धी दिली; त्याचबरोबर ‘डायबेटीस’, ‘हृदयविकार’ यांसारखे ‘लाइफ टाइम’ पुरस्कारही दिले. त्यांनी शेवटपर्यंत त्याची साथ ठेवली.
मी माझ्या स्वलिखित नाटकांव्यतिरिक्त एक नाटक जयवंत दळवींचे केले. इतर कुठल्याही प्रथितयश नाटककाराचे मी नाटक  केले नाही. फक्त एक अशोक पाटोळे हे एकच  नाटककार असे आहेत ज्यांची ‘चार’ नाटके मी केली. त्यात ‘चारचौघांच्या साक्षीने’ आणि अलीकडे ‘आई, तुला मी कुठे ठेवू?’ हे चौथे.
गेल्या महिन्यात अशोक प्रचंड आजारी होते.. तशाही परिस्थितीत मला त्यांनी फोनवर नवीन ‘थीम’ ऐकवली.. आणि म्हणाले.. बरा झालो तर १५ दिवसांत तुला नाटक देतो..
माझ्याव्यतिरिक्त हक्काने मला नाटक लिहून देणाऱ्या या लेखकाने त्या आधीच ‘एग्झिट’ घेतली. हे माझे वैयक्तिक नुकसान आहे.
चारचौघांसाठी लेखन करणाऱ्या या अस्वस्थ, पण यशस्वी लेखकाने चारचौघांसाठी मृत्यूनंतर ‘देहदान’ केले आणि जाताना सांगून गेले.. माझ्यासाठी रडत बसू नका.. ‘शो मस्ट गो ऑन..’

-पुरुषोत्तम बेर्डे