जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने अखेर जागतिक दहशतवादी जाहीर केले. सुमारे दशकभरापासून भारताने केलेल्या प्रयत्नांची ही फलश्रुती. याआधी चार वेळा अशा प्रयत्नांमध्ये चीनने खोडा घातला होता. अखेर चीनने नरमाईची भूमिका घेतली आणि मसूद जागतिक दहशतवादी ठरला. पण, दहा वर्षे नकाराधिकाराच्या जोरावर या मुद्दय़ावर आडमुठी भूमिका घेणाऱ्या चीनने माघार का घेतली, याबाबतचे काही पैलू माध्यमे उलगडत आहेत.

‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’मध्ये ‘व्हाय चायना ड्रॉप्ड इट्स अपोजिशन टू यूएन ब्लॅकलिस्टिंग ऑफ पाकिस्तान-बेस्ड टेरर चीफ मसूद अझर’ या मथळ्याखालील लेखात चीनच्या नरमाईची कारणे देण्यात आली आहेत. अनेक देश जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात संघटितपणे कठोर भूमिका घेत असताना आपण एकटे पडण्याची चिंता चीनला होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याच्या मागणीला आणखी बळ मिळाले. याबाबत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या सुधारित प्रस्तावाने चीनचा आक्षेप दूर झाला. शिवाय, भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी नुकत्याच केलेल्या चीन दौऱ्यात मसूद अझरबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रांचा निर्णय हा आपल्या मुत्सद्देगिरीचा विजय आहे, असे भारताने म्हणणे साहजिकच. पण, विशेष म्हणजे मसूदबाबतच्या प्रस्तावात काश्मीरचा उल्लेख नसल्याने हा पाकिस्तानच्या मुत्सद्देगिरीचा विजय असल्याच्या पाकिस्तानचे विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी यांच्या दाव्याचा अनेक माध्यमांबरोबरच या लेखातही उल्लेख आहे. काश्मीरचा उल्लेख टाळून इच्छित बदल केल्याने चीनने माघारीचा निर्णय घेतल्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्र  विभागाचे माजी सल्लागार मुशर्रफ झैदी यांचेही मत या लेखात नोंदवण्यात आले आहे. मात्र, याआधी चीनने फक्त पाकिस्तानच्या भूमिकेचा विचार केला. आता चीनला संतुलन साधणे आवश्यक वाटले आहे, हे चीनचे भारतातील माजी राजनैतिक अधिकारी झांग जिओडॉंग यांनी नोंदवलेले मतही या लेखात आहे.

‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’च्याच दुसऱ्या एका लेखात या निर्णयामुळे भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकेचा दबाव, दहशतवादविरोधी लढय़ातील चीनच्या कटिबद्धतेबदद्दलची साशंकता आणि ‘बेल्ट अ‍ॅन्ड रोड इनिशिएटिव्ह’ अर्थात ‘बीआरआय’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमात भारताने सहभाग घेतल्यास होणारा फायदा लक्षात घेऊन चीनने हा निर्णय घेतल्याचे लेखात म्हटले आहे. बीजिंगमध्ये नुकत्याच झालेल्या ‘बीआरआय’ परिषदेत भारताने हजेरी लावलेली नाही. मात्र, मसूद अझरबाबत चीनच्या भूमिकेमुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच चीन दौरा करतील, असा आशावादही या लेखात व्यक्त करण्यात आला आहे.

अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी अमेरिकेने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तात आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर चीनवर दबाव टाकण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेला ब्रिटन आणि फ्रान्सने साथ दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर उक्ती आणि कृती यांतील विसंगती दूर करण्याची गरज चीनलाही वाटली असावी, असे मत एका अमेरिकी अधिकाऱ्याने त्यात व्यक्त केले आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दहशतवादाविरोधात किती कठोर भूमिका घेतात, हे पाहणे आवश्यक आहे, असे मतही अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत ‘डेली मेल’च्या वृत्तात मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा काश्मीरशी काही संबंध नसल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याचा उल्लेख आहे. ‘बीआरआय परिषदे’च्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात या मुद्दय़ावरही चर्चा झाल्याचा अंदाज त्यात व्यक्त करण्यात आला आहे. ‘डॉन’ वृत्तपत्रातील एका लेखात याच चर्चेचा उल्लेख करत मसूदबाबतच्या प्रस्तावात काश्मीर आणि पुलवामाचा उल्लेख असू नये, याबाबत त्यात मतैक्य झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या चीन आणि अमेरिकेसोबतच्या संबंधावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे मत पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत असद माजिद खान यांनी व्यक्त केल्याचे या लेखात म्हटले आहे.

संकलन : सुनील कांबळी