मेधा पाटकर

पुष्पा भावे यांच्याशी विद्यार्थिनी ते परिवर्तनवादी चळवळीतील सहकारी अशी नाती जोडणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी ‘लोकसत्ता’साठी लिहिलेले हे छोटेखानी टिपण, पुष्पाबाईंनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना सखोल संस्कारही दिले, हे सांगणारे..

पुष्पाताई भावे गेल्या. प्रखर पुरोगामी विचार आणि कृतिशील भूमिकेस विराम मिळाला, जनआंदोलनांच्या समर्थकांतील अद्वितीय तारा निखळला. त्यांच्या प्रदीर्घ आजारपणातून त्या सुटल्या असल्या तरी आम्हाला सोडून जाण्याने एक पोकळी निर्माण झाल्याची भावना आमच्यासारख्या असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनात दाटून येणारच. पुष्पाताईंची वैचारिक प्रगल्भता, त्यांचे गांधी आणि आंबेडकरवादाला जोडून देशातील सद्य:स्थितीवरील प्रखर वक्तव्य आणि राजकारण आणि समाजकारणाचीही समीक्षा, आजपर्यंत आठवणींमध्ये रुजलेली आहे.

पुष्पाताईंनी महाराष्ट्रातील जनजनांचे पुरोगामित्वावर प्रबोधन सतत, समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांवर केले तेव्हा प्रत्येक मंचावरून प्रखर आणि स्पष्ट भूमिका मांडताना कधीही मागेपुढे पाहिले नाही. रमेश किणी प्रकरणात राजकीय विरोध सहन करूनही त्यांचे ठाम राहणे असो वा नामांतर चळवळीतील योगदान, पुष्पाताई प्रत्येक लढय़ाला एक व्यापक आणि सखोल अर्थ देत असत. त्यांची साहित्य-समीक्षा हीसुद्धा आम्हा सर्वासाठी एक पर्वणीच असे. त्यांची ओघवती भाषा, प्रवाही विचार फार फार प्रभावी म्हणूनच त्यांच्या संपूर्ण कार्यकालाचा प्रभावही अद्भुत!

मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर आणि इतर स्त्री संघटनांच्या चळवळीत जशा त्या उतरल्या होत्या तशाच नर्मदा आंदोलनाच्या प्रत्येकच टप्प्यावर त्या भक्कमपणे समर्थक म्हणून उभ्या असत. मुंबईतील उपोषण असो की धरणे- मोर्चा आणि शासनाशी आव्हानात्मक संवाद.. पुष्पाताई अन्य समर्थकांमध्ये उठून दिसायच्या, त्यांच्या उच्च पातळीवरील विचारांशी आदिवासींनाही जोडून घ्यायच्या!

आज आठवतात ती, पुष्पाताईंच्या रुईया कॉलेजमधील प्राध्यापकतेची सारी वैशिष्टय़े. मराठी शिकवतानाही त्यांची प्रत्येक सामाजिक प्रश्नावरची एकेक पाकळी उमलावी, तशी प्रबोधनात्मक मांडणी ही आम्हाला फार भावत असे. विज्ञान (सायन्स) शाखेची विद्यार्थिनी असूनही मी त्यांच्या वर्गात जाऊन बसत होते, ते त्यासाठीच! परंतु नंतर त्या आमच्या वरिष्ठ सहयोगी झाल्यावर मैत्रीचेच नाते जडले. पुष्पाताईंची गंभीर पाठीराखी मैत्री आणि अनंतरावांची खळखळती, हसरी साथ दोन्हींचा अनुभव आम्ही रुईयातील कविता-नाटय़प्रेमी विद्यार्थिनींनी घेतला आहे.

आठवतात त्यांच्या सरदार घराण्याच्या, रुईया कॉलेजला लागूनच असलेल्या वाडय़ातील बैठका. एकदा कवी ग्रेस यांच्या उपस्थितीत झालेले कविता वाचन- आम्हा सर्वाचे! त्यानंतर अनेकदा, आणीबाणीतही, ते घर सतत उपलब्ध असायचे, समाजकार्याविषयी सल्ला- मसलतीसाठीही.. कॉलेजविश्वाच्या पलीकडे जाणाऱ्यांसाठी!

महाराष्ट्रातील अनेक परिषदा, सभा गाजवणाऱ्या पुष्पाताईंच्या वाणीला आज विराम मिळाला असला तरी त्यांची प्रेरणा आणि योगदान महाराष्ट्राच्या साहित्यसृष्टीत तसेच समाजाभिमुख बिरादरीत जागतीच राहील, यात शंका नाही.

आज अनंतरावही बिछान्याला खिळले असताना, त्यांना आश्वस्त ते काय, कोण, कसे करणार? पुष्पाताईंच्या मोठय़ा परिवारातर्फे मनस्वी श्रद्धांजली!