untitled-27

आधुनिक भारतीय कलेत मीरा मुखर्जी यांचं योगदान एक शिल्पकार म्हणून लक्षणीय आहे. त्यांचा ‘शोध’ घेणं आणि ते तंत्र शिकणं आणि त्या ‘वापरून’ घेणं यातली सीमारेषा धूसर आहे.  त्यामुळेच कदाचित प्रारंभी बस्तरचे कारागीर त्यांना तंत्र शिकवायला उत्सुक नव्हते. पण नंतर ती प्रक्रिया मुखर्जी यांनी शिकून घेतली..

स्वातंत्र्योत्तर काळात तोपर्यंत दुर्लक्षल्या गेलेल्या आदिवासी आणि लोककलाप्रकारांकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात झाली. १९६०च्या दशकात पुपुल जयकर आणि कमलादेवी चटोपाध्याय यांनी त्यावर मांडणी केली. त्याचबरोबर, त्या कलाप्रकारांना राष्ट्र उभारणीच्या कामाचा भाग म्हणूनही पाहिलं गेलं. त्यांना सामावून घेण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. या कला टिकून राहाण्याकरिता आर्थिक पाठबळ दिलं गेलं. काही कलाप्रकारांचं पुनरुज्जीवनही केलं गेलं. यात मग क्राफ्ट म्युझिअम उभारण्यापासून लोककलाकारांची प्रदर्शन भरवण्यापर्यंत आणि व्यावसायिक मार्गदर्शनापर्यंत अनेक गोष्टींना प्रोत्साहन दिलं गेलं. त्या कलाप्रकारांबद्दल संशोधन आणि लेखनालाही चालना मिळाली. त्यातली मेख अशी होती की ब्रिटिश काळात आलेल्या आधुनिक कला शिक्षण पद्धतीत कला आणि हस्तकला ही विभागणी अधिकच घट्ट झाली. मुख्य कलाप्रवाह आणि डिजाइन तंत्र यातून कारागिरी, हस्तकला या नावाखाली हे कलाप्रकार बाहेर ठेवले गेले. स्वातंत्र्योत्तर काळात त्याच धर्तीवर त्यांचा विचार आणि आकलन केलं जाऊ लागलं.

याच काळात आधुनिक पद्धतीचं कला शिक्षण घेतलेले कलाकार या कलाप्रकारांकडे वळले. त्यातून काही नवी भाषा, नवा विचार मांडता येतो का याचे प्रयत्न झाले. १९६६ मध्ये मद्रासजवळ उभा राहिलेला ‘चोलमंडलम्’ हा असाच एक प्रयत्न. भारताच्या संदर्भात आधुनिक कलेचं आकलन कसं करायचं, त्यात कला आणि कारागिरी याचा मेळ कसा साधायचा, याचा पायाभूत विचार मांडणारा हा प्रयोग होता. आदिवासी आणि लोककलाकारांच्या सहयोगानं कला विचार मांडण्याचेदेखील प्रयत्न झाले. कला विरुद्ध हस्तकला ही आधुनिक काळात आकाराला आलेली मांडणी मोडून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्यांपैकी एक म्हणजे मीरा मुखर्जी. त्यांच्या कला व्यवहारातून ‘लोककला’ किंवा ‘कारागिरी’ समजल्या गेलेल्या कलाप्रकारांचा आधुनिक कलाक्षेत्रात पुन्हा एकदा शिरकाव झाला.

आधुनिक भारतीय कलेत मुखर्जी यांचं योगदान एक शिल्पकार म्हणून लक्षणीय आहे. पण त्यातला पेच असा आहे की त्यांना त्या काळातली कुठलीही ठराविक कला चळवळ किंवा गट याच्यात बसवता येत नाही. सुरुवातीला अबनिंद्रनाथ टागोरांनी सुरू केलेल्या ‘इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट’ मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं पण ते फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर त्यांनी कलकत्त्यात ‘भारतीय’ तर दिल्लीमध्ये ‘पाश्चत्त्य’ पद्धतीचं कलाशिक्षण घेतलं. त्यांनी सुरुवात चित्रकलेपासूनच केली असली तरी नंतर शिष्यवृत्तीवर काही काळ म्युनिकच्या कला अकादमीत असताना त्या शिल्पकलेकडे वळल्या. तिथंच त्यांना पहिल्यांदा इतर पाश्चात्त्य कलाकारांपेक्षा असलेलं त्यांचं वेगळेपण जाणवलं. ते वेगळेपण कलाविष्कारातही का उमटू नये, या विचारानी त्यांना पछाडलं. याच प्रश्नांनी स्वत:च्या कलेबद्दल वेगळा विचार करायला भाग पाडलं. यातून त्यांच्या स्वत:च्या शैलीबरोबरच स्वत्वाचा शोधही सुरू झाला. अकादमीक शैलीत लाइफ-स्टडी करता करता त्यांनी ब्रॉन्झमध्ये लहान आकारची शिल्पं घडवण्याचे प्रयोग सुरू केले. तिथं त्या धातूकामाची आधुनिक तंत्र आणि पद्धती शिकल्या. पण त्यांचा ओढा मात्र कायम भारताकडेच होता. युरोपातल्या संग्रहालयातून पुरातन वस्तू पाहाताना त्यांना भारतातल्या ‘जिवंत’ असलेल्या कला सांस्कृतिक जीवनाची प्रकर्षांने जाणीव झाली.

१९६० च्या दशकात कलकत्त्याची नोकरी सोडून त्यांनी बस्तरमध्ये राहून काम करण्याचा निर्णय घेतला. छत्तीसगढमधल्या बस्तर भागात जाऊन मीरा मुखर्जी तिथलं धातूशिल्पाचं तंत्र शिकल्या. पुढं मानववंशशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या अभ्यासवृत्तीवर त्यांनी भारत आणि नेपाळमधल्या धातूशिल्पावर संशोधनही केलं. पण सुरुवातीला टागोरांच्या शाळेत त्या जी ‘भारतीय शैली’तील चित्रकला आणि पारंपरिक कारागीरांकडून शिल्पकला शिकल्या होत्या, तीच पुढं त्यांची ‘दिशा’ ठरली.

पारंपारिक कलातंत्र, भाषा आणि आधुनिक जाणिवा यांचा मेळ मुखर्जी यांनी त्यांच्या शिल्पांमधून साधलेला दिसतो. कला आणि हस्तकला यातलं नातं कायमच तणावाचं होतं. त्यातल्या असमतोलामुळे तयार होणारा हा तणाव मुखर्जींच्या कलाकृती, संशोधन, लिखाण यात नेहमीच उमटत राहिला. त्यांचा ‘शोध’ घेणं आणि ते तंत्र शिकणं आणि त्या ‘वापरून’ घेणं यातली सीमारेषा धूसर आहे.  त्यामुळेच असेल पण सुरुवातीला बस्तरचे कारागीर त्यांना तंत्र शिकवायला फारसे उत्सुक नव्हते. पण तिथे राहून त्यांच्याकडून हळूहळू ती प्रक्रिया मुखर्जी यांनी शिकून घेतली. ‘सिअर पर्द्यु’ किंवा वितळ ओतकाम नावानी ओळखलं जाणारं तंत्र त्यांनी या हस्तकारागिरांकडून अवगत केलं. जगभरात बऱ्याच आदिवासी आणि लोककलांमध्ये हे तंत्र वापरलेलं दिसतं. यात आधी मेणाचा आकार घडवून त्यावर मातीचं लिंपन केलं जातं. ते भट्टीत भाजताना आतलं मेण वितळून बाहेरचा मातीचा ढाचा शिल्लक राहतो. त्या ढाच्याच्या आतल्या पोकळीत धातूचे ओतीवकाम केलं जातं. आतला धातू घट्ट झाल्यावर वरचा मातीचा ढाचा फोडून शिल्पाच्या बारकाव्यांवर काम केलं जातं.

हे तंत्र वापरून पितळ आणि ब्रॉन्झसारख्या धातूंबरोबर त्या सहजपणे खेळताना दिसतात. हिरोशिमाचं भीषण वास्तव दाखवताना त्या अणुबॉम्बचे ढग दाखवतात. त्यात सर्वव्यापी लवलवणाऱ्या ज्वाळा मृत्यूचं तांडव दर्शवितात. शिल्पाला आकार देताना त्या अकादमीक शैलीच्या पुढे जात निराळेच आकार तयार करतात. त्यात साधेपणा आहे, ओबडधोबडपणा आहे. तितकेच ते ऊर्जेने भारलेले आहेत. झाडावरून फळं तोडणारी मुलं, कथक नृत्यांगनेच्या हस्तमुद्रा, पाण्यात पोहणारी,  खेळणारी मुलं, प्रवाशांनी गच्च भरून वाहणारी बस, देवासमोर नवऱ्याचा मृतदेह ठेवून नाचणारी बेहुला अशा अनेक प्रतिमा त्यांच्या कामात दिसतात. ‘कलिंगामध्ये अशोक’ हे त्यांचं नावाजलेलं शिल्प. १९६०-७०च्या दशकातला हिंसाचार, नक्षलवादी चळवळ, तिचे उमटलेले पडसाद यावर भाष्य करणारं हे शिल्प. सम्राट अशोकाच्या आयुष्याला आणि विचारांना कलाटणी देणारा हा क्षण.  ब्रॉन्झमध्ये घडवलेल्या भव्य आकाराच्या या शिल्पात त्या क्षणाला अशोकाच्या मनात उमटणाऱ्या भावना यातून दिसतात. इतकंच नव्हे तर त्यातून येऊ घातलेल्या काळाची नांदीही देतात. त्या शिल्पातलं अशोकाचं अवाढव्य शरीर पण तितकाच क्लांत चेहरा. या शिल्पात त्यांनी अनेक गोष्टी एकत्र आणल्या : प्राचीन भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना, तिच्या आधारे समकालीन भारतातल्या एकूण राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणं, त्याकरिता मूर्ती बनवायचं आदिवासी तंत्र वापरणं, ते शिल्प बनवताना आदिवासी आणि आधुनिक कलाभाषेचा मिलाफ करणं आणि त्यातून त्याची भावनिक ताकद दाखवून देणं.

मीरा मुखर्जींनी बरंच लिखाणही केलं. लघुकथा, संशोधनपर लिखाण, मौखिक इतिहास असे अनेक पैलू त्यांच्या लिखाणात दिसतात. ‘भारतातले धातू कारागीर’ या प्रकल्पावर काम करताना त्या अनेक कारागीर समुदायांच्या संपर्कात आल्या. या धातूशिल्पकारांच्या जाती, त्यांचं रोजचं जगणं, कामाचं तंत्र, साधनं आणि त्यांचा व्यक्तिगत वृत्तान्त याची माहिती त्यात येते. मुखर्जींचे अनुभव, त्या भागात राहून काम करण्यासाठी त्यांना करावी लागलेली खटपट, तिथल्या लोकांबरोबर जोडून घेणं, त्यातले ताण-तणाव याच्याविषयीही त्या लिहितात. अनेक वर्षे त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या ‘विश्वकर्मा’ समुदायाचा अभ्यास केला. ‘विश्वकर्माच्या शोधात’ हे त्यांचं पुस्तक हा या शोधाचा प्रवास आहे. त्यांचे अनुभव, गावं, लेणी, तिथले कारागीर यांना दिलेल्या भेटी, त्यांच्याबद्दलची मिथकं, मौखिक इतिहास, प्रचलित चालीरीती, गोष्टी, गाणी याच्या संकलनातून हे पुस्तक लिहिलं. यात विश्वकम्र्याचं केवळ शंकर आणि बुद्धासंदर्भातील नव्हे तर अरबस्तानातल्या  ख्वाजा मोइनुद्दीनबरोबरच्या कथाही गोळा केल्या आहेत!

साधा, सुटसुटीत विचार असणारी, भाबडी अशी  आदिवासी कला अशी मांडणी एका बाजूला होत आली आहे. लिखाणातून असो वा शिल्पातून, मुखर्जी अशा चौकटीत अडकत नाहीत. तर तिथल्या वास्तव्यातून आणि खडतर जगण्यातून आलेल्या अनुभवातून जणू काही त्यांची कैफियत मांडतात. या कलाप्रकाराला कुठल्याही प्रकारच्या आदर्शवादात न बसवता त्यांची कला काळाच्या त्रिज्या ओलांडते.

 

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत.