डॉ. अमोल देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. आता काही खरे नाही, पुढे कसं होणार, माझं परिस्थितीवर काहीच नियंत्रण नाही, परिस्थिती असहाय आहे, माझं काहीच चांगलं होणार नाही, मला आजार झाला तर.. अशा वैचारिक घालमेलीमुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होत आहे. आपण अशा परिस्थितीत मनात भीती, उदासीनता, राग, चिडचिड, रडू येणे, झोप न लागणे, मनात सतत तेचतेच विचार येणे साहजिकच आहे. आपल्या भावनांना आपण कशा प्रकारे हाताळतो, हे महत्त्वाचे आहे. या भावनांना समजावून घेऊन त्याचा स्वीकार करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा स्थितीत आशेचा किरण नक्की असतो. तो शोधणं, त्याबाबत सकारात्मक विचार करणं महत्त्वाचं आहे. परिस्थिती कितीही न पटणारी, अत्यवस्थ करणारी असली तरीही ती परिस्थिती आपण सहन करू शकतो, परिस्थितीचा स्वीकार करून पुढे मार्ग काढणे योग्य ठरते. करोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे काळजी, चिंता वाटणे साहजिकच आहे. चिंता आणि काळजी या भावनांमध्ये फरक आहे.

चिंतेमध्ये आपण परिस्थितिविषयी महाभयंकरीकरण करतो, स्वनियंत्रणाबाहेरील घटकांना महत्त्व देतो,पर्यायी विचारसरणी टाळतो, दोषारोप करतो, अशा विचारसरणीने समस्या सोडवण्याचे कौशल्य कमी होऊन परिस्थितीशी सामना करण्याच्या उद्धिष्टांपासून दुरावतो. काळजी ही भावना संरक्षक आहे, ज्यात आपण नियंत्रणातील घटकांवर लक्ष देतो, पर्यायी विचारसारणी वापरतो. जेणेकरून समस्या उकल करण्याचा विचार करून परिस्थितीचा सामना करण्याची मानसिक क्षमता वाढते. हात वारंवार धुणे, मास्क वापरणे, विनाकारण बाहेर न जाणे, लहान-थोरांची काळजी घेणे, एकमेकांत अंतर ठेवणे हे नियंत्रणातील घटक आहेत. जेणेकरून आपण स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. दिवसभर फक्त टीव्ही, न्यूज न पाहता दिवसातून फक्त दोन ते तीन वेळा रूपरेषा बघावी.

घरामध्ये वादविवाद तंटे यांचे प्रमाण वाढले आहे, असे लक्षात आले असेल तर या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. वादविवादामध्ये आपण सहसा प्रतिक्रिया (Reaction) देतो, प्रतिसाद (Response) नाही. मनात प्रतिक्रिया लगेच येते. स्वत:ला विचार करायला वेळ द्या, प्रतिसाद विचाराने येतो. कारण प्रतिक्रियेवर कृती करू नका, विचार करा त्यावर प्रतिसाद अवलंबून आहे.

घरात राहताना एकमेकांशी संवाद साधताना जुनाट, वादग्रस्त विषय बोलण्याचे टाळावे, करोनाविषयी अतिरिक्त चर्चा टाळा, जेणेकरून घरातील वातावरण प्रसन्न राहील. लहान मुलं आपल्याकडे लक्ष ठेवून असतात. घरातल्या मोठय़ांचे बोलणे, वागणे, भावना व्यक्त करणे यांवर त्यांचे बारकाईने निरीक्षण असते. त्यामुळे आलेल्या संकटास योग्य

प्रकारे तोंड दिल्यास आपण लहानांसमोर एक आदर्श तयार करतोय. ताण असहाय झाला असेल तर नजीकच्या मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

भ्रमात राहाणेही चुकीचे

मी कशाचीच काळजी करत नाही, मी आजारी पडणारच नाही, मला काहीच होत नाही अशा प्रकारचे मनात परिस्थितीबद्दल क्षुल्लकीकरण करून, भ्रमात राहणंही चुकीचं ठरेल. या परिस्थितीला आव्हान समजून, स्वत:ची काळजी घेऊ या; जेणेकरून आपण कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या आरोग्यासाठी पुढाकार घेत आहोत. आपण आपल्या डॉक्टरांच्या, प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करू या आणि याही संकटातून एकजुटीने लवकर बाहेर येऊ या.