News Flash

स्थलांतर.. : ने मजसी ने..

मोठ्ठय़ा युद्धातली ही एक छोटी गोष्ट आहे. तुमच्या-आमच्यासारख्या साध्या प्रवाशांची...

कुठल्याही युद्धाची गोष्ट काही सामान्य नसते. काही कथा ‘युद्धस्य कथा रम्य:’ या उक्तीचा प्रत्यय देतात.

मैत्रेयी कुलकर्णी

कुठल्याही युद्धाची गोष्ट काही सामान्य नसते. काही कथा ‘युद्धस्य कथा रम्य:’ या उक्तीचा प्रत्यय देतात. पण एखाद्या युद्धात सैनिकांबरोबरच जेव्हा सामान्य नागरिक आणि लहान लहान मुलंही ओढली जातात, तेव्हा ती गोष्ट केवळ रोमांचकपणाच्या पलीकडे जाऊन अंगावर काटा आणणारी ठरते. सीरियातलं युद्धही असंच आहे. आणि या मोठ्ठय़ा युद्धातली ही एक छोटी गोष्ट आहे. तुमच्या-आमच्यासारख्या साध्या प्रवाशांची…

टर्कीच्या त्या गजबजलेल्या विमानतळावर सहा-सात तास विमानाची वाट बघत बसल्यावर कळलं की, या विमानात मला जागाच मिळणार नव्हती. मी मुंबईला निघाले होते. पुढचं विमान चोवीस तासांनी होतं. यावेळच्या प्रवासात आधीच पुरेसे अडथळे आले होते. टर्कीपर्यंत यायला खरं तर नऊ-दहा तास लागतात, पण यावेळी मात्र संपूर्ण एक दिवस लागला होता. त्यामुळे माझी पुरेशी झोप झालेली नव्हती. बसून बसून अंग आखडलं होतं. आणि एकूणच सगळ्या अनिश्चिततेचा विलक्षण कंटाळा आला होता. त्यात या विमानाचा हा नवा घोळ! माझ्याकडे टर्कीचा व्हिसा नव्हता. आता चोवीस तास करायचं काय?  फोनकडे बघितलं. इंटरनेट नव्हतं. आई-बाबांना हे कळवायचं कसं? फोनची बॅटरीही संपत आली होती. आजूबाजूच्या दुकानांत वाय-फायची चौकशी केली. कुठे काही सापडेना. विमानतळावर थांबले तर कुणाला कॉन्टॅक्ट करणंही शक्य नव्हतं. परंतु बाहेर पडायला व्हिसा नव्हता.

पाणी प्यावं म्हणून हात पाण्याच्या बाटलीकडे गेला, तर  बाटलीतलं पाणीही संपलेलं. चार-पाच दुकानांमध्ये विचारल्यावर एक छोटा कॅफे सापडला. पाणी प्यायल्यावर थोडंसं बरं वाटेल म्हणून एक बाटली उचलली. पसे द्यायला काऊंटरपाशी गेले. तिथल्या मुलाला क्रेडिट कार्ड देऊन मी पाण्याची बाटली उघडणार, तेवढय़ात तो मुलगा म्हणाला, ‘‘कार्ड चालत नाही हे.’’ माझी जरा चिडचीडच झाली. मी त्याला दुसरं कार्ड देऊन बघितलं. तेही चालेना. पुरेशी कॅशही सापडेना. म्हटलं, जाऊ दे.. नको पाणी. पाण्याची बाटली तशीच काऊंटरवर ठेवून दुकानाबाहेर आले. कुठून मी हा दिवस निवडला प्रवासासाठी, असं मला झालं होतं. आता काय करावं, हा विचार करत मी नुसतीच इकडेतिकडे बघत होते.

तितक्यात मागून कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवलाय असं वाटल्यानं मी वळून बघितलं, तर मागे एक मुलगी उभी होती. अतिशय सुंदर, स्वच्छ, पांढरा पायघोळ कोट घातलेली. चेहरा झाकलेला नसला तरी डोक्यावर शुभ्र बुरखा होता. तिच्या एकदम प्रेमळ, शांत डोळ्यांनी ती माझ्याकडे बघून हसली. मी काही क्षणापुरतं सगळं विसरून गेले. काही न बोलताच तिनं तिच्या हातातली पाण्याची बाटली माझ्यासमोर केली. म्हणाली, ‘‘take it, for you.’’ मला काय बोलावं कळेना. मी पण फक्त हसून ‘thank you’ म्हणाले.  पाण्याचा एक घोट घेतला. त्या एका घोटामुळे म्हणा किंवा त्या मुलीच्या प्रेमळ हास्यामुळे म्हणा, मला जरा बरं वाटलं! ती बसली होती तिथे मी पण जाऊन बसले. तिच्याबरोबर एक छोटंसं बाळ होतं. आईसारखंच. टपोऱ्या डोळ्यांचं. पांढरा कोट घातलेलं. टकमक इकडेतिकडे बघणारं.

मी सहजच त्या मुलीला विचारलं, ‘‘कुठे चालली आहेस इथून तू?’’ तशी ती म्हणाली, ‘‘सीरियाला जाते आहे.. माझ्या आई-बाबांकडे.’’  तिनं तिच्या शहराचं नाव सांगितल्यावर माझ्या कपाळाला नकळत आठय़ा पडल्या. ऐन युद्धाच्या आगडोंबात होरपळत असलेल्या त्या शहरात का जात असावी ही? मुळात या अशा परिस्थितीत तिकडे असं सहज जाता येतं?

मला पडलेले प्रश्न माझ्या चेहऱ्यावर दिसले असावेत. ती लगेच म्हणाली, ‘‘आईची तब्येत बरी नाहीए. तिला थोडी मदत व्हावी म्हणून चालले आहे.’’ मी काही न विचारताच तिनं एवढं सांगितलं होतं, म्हणून मग मी अजून जरा बोलावं म्हटलं. ती सांगत होती.. तिथल्या आजूबाजूच्या शहरांत सतत हल्ले होत होते. अर्थातच दवाखाने, डॉक्टर वगरे न बघता.  त्यांचं शहर अजून तरी सुरक्षित होतं. पण डॉक्टरांकडे जाणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं. तिथले सगळेच लोक भीतीच्या प्रचंड सावटाखाली जगत होते. कधी कुठे काय घडेल, याची कुणालाच कल्पना नव्हती. आपलं घरदार सोडून देशाबाहेर जाणं कठीण होत चाललं होतं. अशा वेळी तिला आपल्या आई-बाबांबरोबर असावं असं वाटणं साहजिकच होतं.  म्हणूनच ती तिकडे चालली होती. अर्थातच इथून पुढचा प्रवास अशक्य नसला, तरी सोपाही नव्हता. विमानाचाच काय, साध्या टॅक्सी, बसचा प्रवासदेखील सुरक्षित नव्हता.

माझ्यासारख्या अनोळखी मुलीसमोर तिला हे सगळं बोलावंसं का वाटलं असेल, कुणास ठाऊक!  पण तिनं हे सांगितलं ते बरंच झालं. तिच्या त्या परिस्थितीपुढे इतका वेळ मला वाटणारी माझ्या पुढच्या विमानाची काळजी आता मुंगीएवढी वाटायला लागली. मला फार तर फार पुढच्या चोवीस तासांनी येणाऱ्या विमानाची वाट बघायची होती. पण एकदा का मुंबईला पोहोचले, की तिथे मला घ्यायला टॅक्सी येणार होती. मी येणार म्हणून बाबा दिवसभर घरी थांबणार होते. आई गरम गरम पोहे करून देणार होती. माझा प्रश्न होता फक्त चोवीस तासांचा.

पण ती..? तिच्याबरोबर तिची एवढीशी मुलगी होती. ती ऐन युद्धाच्या तोंडी चालली होती. घरी जाऊन तिला तिच्या आई-वडिलांची काळजी घ्यायची होती. आणि तरीही ती इतक्या शांतपणे माझ्याशी बोलत होती. माझं कार्ड चालत नाही हे बघून स्वत:हून माझ्यासाठी पाण्याची बाटली घेऊन आली होती.

परवा परत एकदा ‘त्या’ शहरावरच्या हल्ल्यांची बातमी इंटरनेटवर आली. पडकी घरं, जळणाऱ्या इमारतींचे फोटो बघितले. आता तर ते तिचं गावही सुरक्षित नव्हतं. मला त्या छोटय़ा मुलीचे टपोरे डोळे आठवले. मनात विचार आला : अशी कितीतरी छोटी मुलं असतील तिथे. कितीएक मुली असतील आपल्या आई-बाबांसाठी घरी गेलेल्या. त्याचबरोबर असे कितीतरी जण असतील, आई-वडिलांसाठी न जाऊ शकलेले..!

मी युद्ध इतक्या जवळून पहिल्यांदाच बघत होते. कुठल्याही युद्धाची गोष्ट असामान्यच असते, पण परवाची ती युद्धाची बातमी काळजाचा ठोका चुकवणारी होती.

मधे फिलाडेल्फियाला गेले होते, तेव्हा एअरपोर्टवर जायला मी उबेर बोलावली. उबेरच्या ड्रायव्हरचा फोन आला तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून ते दुसऱ्या देशातले असावेत हा अंदाज आला होता. गाडीत बसल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग त्यांनी विचारलं, ‘कुठून आलीस तू?’ माझ्याही बोलण्यावरून मी अमेरिकेतली नाही, हे कळलंच असणार त्यांना. मी म्हणाले, ‘मी भारतातून आले.’ हे उत्तर येणार हे माहिती असल्यासारखं मान हलवून, मी विचारायच्या आधीच त्यांनी सांगितलं, ‘मी अल्बानियाचा!’ मग बोलता बोलता असं कळलं, की ते वीस वर्षांपूर्वी इथे आले.. अमेरिका कशी असते बघू म्हणून. इथे पाच र्वष राहावं आणि परत जावं आपल्या देशात, असा विचार होता. पण मग मुलं झाली, त्यांच्या शाळा सुरू झाल्या आणि मग परत जाणं झालंच नाही. म्हटलं, मग तुम्ही जात असाल तुमच्या देशात बऱ्याचदा. ‘‘नाही जात खरं तर. माझी आई, भाऊ असतात तिथे, तेच येतात हिवाळ्यात इकडे. मला सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणं परवडतंय कुठलं? मुलांचं शिक्षण, शाळा वगरे असतात. ही नोकरी, पसे कमावणं मुलांसाठीच तर करतोय मी. अल्बानियामध्ये माझं घर मात्र ठेवलंय मी. ते नाही विकलं. वाटलं, कधी कुणाला परत जावंसं वाटलं, तर राहायला जागा हवी आपली.. हक्काची. आत्ता काही दिवसांपूर्वी माझा मुलगा जाऊन राहून आला दोन महिने तिकडे. आणि आवडलंही त्याला सगळं. त्याच्या आजी आणि काकाबरोबरसुद्धा राहिला काही दिवस. तुम्हा भारतीयांसारखं आम्हीपण सगळे एकत्र असतो, एकत्र राहतो. जे काही करायचं ते आपल्या कुटुंबासाठी.. नाही का!’’

ते बोलतच राहिले. आणि ते ऐकून मला काही वर्षांपूर्वी मी आई-बाबांना केलेला फोन आठवला. माझं पीएच. डी.चं आणि अमेरिकेतलं नुकतंच दुसरं र्वष सुरू झालं होतं. उन्हाळ्यातले दीड-दोन महिने पुण्यात राहून नुकतीच परत आले होते. पुण्याच्या आठवणी, घर, आई-बाबा, काका-काकू, मित्र-मत्रिणी, त्यांच्याबरोबर फिरायला जाणं, पुण्यात गाडी चालवणं या सगळ्या आणि बऱ्याच गोष्टी अजून ताज्या ताज्याच होत्या. पुण्यात अगदी एखादा महिना राहून आलं तरी परत येऊन इथे छोटय़ा छोटय़ा गोष्टी करताना माझा गोंधळ होतो. कपडे कधी धुवायचे, हे ठरवण्यापासून ते आज जेवायला काय करायचं, स्वयंपाक करायचा म्हणजे सुरुवात कुठून करतात, इथपर्यंत.

असाच गोंधळ सुरू असताना एके दिवशी माझ्या मत्रिणीने व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर तिचं लग्न ठरल्याचं सांगितलं. लग्नाची तारीख तीन-चार महिन्यांतच होती. हा आमच्या शाळेतल्या मत्रिणींचा सात जणींचा ग्रुप! आणि ग्रुपमधलं पहिलंच लग्न!! आम्ही सगळ्याच जणी प्रचंड एक्सायटेड होतो. खूप खूश होतो. सातपकी तिघीजणी अमेरिकेत होत्या. बाकी सगळ्या पुण्यात. आमच्यासाठी अर्थातच पहिला प्रश्न होता- कोणाकोणाला लग्नाला जाणं शक्य आहे? पहिलंच लग्न ग्रुपमधलं; त्याला आपण नाही जायचं म्हणजे काय? ‘हो-नाही’, ‘हो-नाही’ करता करता आम्ही तिघींनी पुण्याला जायचं ठरवलं. तिकडे पुण्यातल्या मत्रिणींची जोरात तयारी चालू होती. आम्हा सगळ्यांसाठी साधारण एकाच प्रकारच्या साडय़ा, त्यावर मॅचिंग दागिने, ब्लाऊज, जिचं लग्न होतं तिच्यासाठी छोटंसं गिफ्ट यावर चर्चा, फोटो पाठवणे, मग खरेदी, दुकानातून व्हिडीओ कॉल.. हे सगळं सुरू होतं.

माझं पुण्याला जायचं नक्की होईपर्यंत तिकीट काढायला तसा उशीरच झाला होता. त्यामुळे विमान तिकिटाला नेहमीपेक्षा जवळपास दुप्पट पसे लागणार होते. पण मत्रिणीचं लग्न.. नुकतेच पुण्यात घालवलेले दिवस.. यामुळे काहीही असो, डिसेंबरमध्ये घरी जायचं असं ठरवूनच टाकलं होतं. प्रत्यक्ष तिकीट काढायची वेळ आली तेव्हा मात्र माझं अवसान गळालं. इतके दिवस मनाने विचार करून घेतलेला पुण्याला जायचा निर्णय आता काहीसा चुकीचा वाटायला लागला. मनात गोंधळ उडाला. जराशी चिडचिडही झाली. वाटलं, मला माझ्याच घरी जाण्यासाठी इतका विचार का करायला लागावा? न राहवून मी आई-बाबांना फोन केला. इतक्या रात्री- झोपायच्या वेळेला मी त्यांना फोन करत नाही हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी काळजीनंच फोन घेतला. एक-दोन मिनिटं नेहमीचं बोलणं झाल्यावर मात्र मला राहवलं नाही आणि चक्क रडू फुटलं. बाबांना म्हटलं, ‘एवढं महाग तिकीट आहे, आत्ताच घरी येऊन गेले आहे, आणि मी तरीही परत यायचं म्हणते आहे. मी चूक तर करत नाहीए ना?’ इतका वेळ वाटणारी अस्वस्थता डोळ्यांतून घळाघळा वाहत होती. बाबा यापुढे जे म्हणाले ते मला नेहमीच लक्षात राहील. ते शांतपणे म्हणाले, ‘अगं, असं किती तिकीट आहे? दोन हजारच ना! हे बघ, यापुढे कधीही कुठूनही घरी यावंसं वाटलं की घरी यायचं. बाकी कशाचीही.. अगदी विमान तिकीट कितीही महाग असलं तरी त्याचीही थोडीसुद्धा चिंता न करता! आपण आता दुसऱ्या देशात राहतो म्हणजे अशा गोष्टी होतच राहणार. घरी येणं महत्त्वाचं की पसे?’

त्यांच्या एवढय़ाच बोलण्याने माझं मन एकदम स्वच्छ झालं. आमचं कुत्र्याचं पिल्लू- बाणेर- जशी लहान असताना माझ्या आई-बाबांच्या पायाशी उबेसाठी मुटकुळं करून बसायची, तशीच मी मनातल्या मनात आमच्या घरातल्या माझ्या आवडत्या सोफ्यावर आजीची गोधडी घेऊन मुटकुळी करून बसले होते. आत्तापर्यंत वाटणारी अस्वस्थता किती छोटय़ा कारणासाठी होती असंही वाटलं.

कधी खूप जवळचे मित्र, नातेवाईक काही काळाने दूरचे होतात, त्यांच्या जागी नवीन मित्र येतात, नवीन नाती तयार होतात. एखादी जागा रिकामी राहते. काही नाती जपता येतात, काही नाही जपली जात. कधी आपण बदलतो, कधी इतर लोक बदलतात. पण जगाच्या पाठीवर एक घर, त्या घरात राहणारी चार माणसं आणि एक कुत्रं हे नेहमी आपलेच आहेत, त्यांची माया आपल्यासाठी कधीही न आटणारी आहे, ही भावना किती सुखदायक आहे!  कदाचित अशीच एक जागा आपल्यासाठीही असावी, म्हणून त्या ड्रायव्हर काकांनीसुद्धा त्यांचं अल्बानियातलं घर अजून ठेवलं असावं.. हक्कानं परत जाण्यासाठी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 12:36 pm

Web Title: migration take me back to my nation loksatta diwali issue 2019 dd 70
टॅग : Diwali Issue
Next Stories
1 स्थलांतर.. : माझ्याच चक्रव्यूहातला मी अभिमन्यू!
2 स्थलांतर.. : पल्याड देशीचे…
3 स्थलांतर.. : परदेशस्थ, दूरस्थ की इथलाच?
Just Now!
X