डॉ. जितेंद्र आव्हाड (आमदार, कळवा-मुंब्रा)

पवारांनी मनात आणले तर सत्ताबदल

जुने सहकारी, सैन्यातील सरदार एकापाठोपाठ एक सोडून गेल्यानंतरही सर्वसामान्य सैन्यावर विश्वास दाखवत रणांगणावर झोकून देणाऱ्या सेनापतीची नोंद इतिहासात होते.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत हीच भूमिका पार पाडली. या निवडणुकीचा खरे सामनावीर शरद पवार हेच आहेत.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण पक्ष सोडून गेले. काँग्रेस पक्षालाही मोठी गळती लागली. आता जणू काही सगळे संपलेच, असे काहीसे चित्र उभे करण्यात आले. विरोधक आहेतच कुठे, अशा वल्गना राज्यभर होत होत्या. जे गेले त्यापैकी बहुतेक जण पराभूत झाले आहेत. राजकारणात गद्दारीला स्थान नसते, हे पुन्हा महाराष्ट्राने यानिमित्ताने दाखवून दिले आहे.

महाराष्ट्राला समृद्ध अशी वैचारिक परंपरा लाभली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्थानिक मुद्दय़ांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. अनुच्छेद ३७०, पाकिस्तान अशा मुद्दय़ांवर भाजप नेते निवडणुकीचा प्रचार करत होते. रस्त्यात खड्डे नाहीत, असे राज्यात एकही शहर नव्हते. ग्रामीण भागात प्रश्नांची मोठी मालिका होती. निवडणुकांच्या तोंडावर खरे तर सत्ताधारी पक्ष अधिकाधिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात. वरवर मलमपट्टी का होईना किमान रस्ते गुळगुळीत मिळतील, असा तरी अनेकांचा प्रयत्न असतो. या आघाडीवरही या सरकारचे वर्तन चीड आणणारे होते. सत्ताधारी पक्षाचे नेते काश्मीरच्या पलीकडे काही बोलण्यास तयारच नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने काश्मीर, हिंदू-मुस्लीम तेढ आणि पाकिस्तान या विषयांना केराची टोपली दाखवली, हेच निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. राज्यातील स्थानिक प्रश्न घेतले नाहीत म्हणून भाजपला मोठा फटका बसला आहे. देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. त्याचाही फटका भाजपला मोठय़ा प्रमाणात बसला आहे.

शेतकरी आत्महत्या आणि इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, या मुद्यांकडे दुर्लक्ष करत इतर मुद्दे चर्चेत आणण्याचा प्रयत्न भाजपने केला. त्यामुळेच त्यांना मोठे मोठे धक्के बसले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आघाडी केली नव्हती. ठाणे शहर मतदारसंघामध्ये हा आघाडीचा प्रयोग करण्यात आला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघामधील ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून आम्ही शिवसेना-भाजपपेक्षा ८० हजारांनी मागे होतो. मनसेसोबत केलेल्या आघाडीमुळे ही मतांची आघाडी २० हजारांवर आणण्यात यश आले आहे. त्यामुळे महापालिकेत मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र आली तर त्याचा निश्चितच फायदा होईल. यापुढील निवडणुकांना सामोरे जाताना अशा वेगळ्या आघाडय़ांचा विचारही आम्हाला करावा लागेल.

भाजपचे नेते सातत्याने सांगत होते की, राज्यात विरोधकच नाहीत. परंतु राज्याच्या निकालाची आकडेवारी पाहाता २०१४ पेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची परिस्थिती चांगली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात विरोधकांची ताकद आणखी वाढल्याचे निकालावरून दिसून येते.

निवडणुकीच्या निकालावरून राज्यात शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता येणार असल्याचे दिसून येत असले तरी हा दावा वाटतो तितका सोपा नाही. राज्याच्या राजकारणातील गणिते आताच नक्की करता येणार नाहीत. निवडणूक निकालातील पक्षीय संख्याबळ पाहता शिवसेनेने आपला निर्णय घेतला तर सत्तेचा माज दाखविण्याच्या भाजपच्या पद्धतीला लगाम बसू शकेल. असे करायचे झाले तर सर्व पक्षांना एकत्र यावे लागेल. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे गर्वहरण केले. निकालातील पक्षीय संख्याबळ पाहता शरद पवारांनी मनात आणले तर राज्यात २०० टक्के सत्ताबदल होऊ शकतो. यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांनी प्रचंड मेहनत घेतली.

राज्यातील जनतेने त्यांची मेहनत पाहिली आणि पक्षाला मते देऊन जनतेने त्यांचे एकप्रकारे कौतुक केले. शरद पवार यांनी वयाच्या ८०व्या वर्षी शारीरिक यातना सहन करत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. या वयातही त्यांचे काम पाहून मतदारांनी निश्चितच त्यांचे कौतुक केले आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत ‘मॅन ऑफ द मॅच शरद पवार’ असेच म्हणावे लागेल.