चिरंतन, निरंतर अशा ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थी जेव्हा पहिलं पाऊल टाकतो, तेव्हा त्याला धरून चालवणारी, पडलं तर सावरणारी ती माउलीच असते. हे गुरुमाउलीचं मोठेपण! ती शिकवते. शिकवत राहाते. पुढे शिष्य त्याच मार्गानं जाईल की नाही, हे कुणाला सांगता येत नाही. मुलगा आईच्याच मार्गानं जातो असं कुठे आहे? गुरू रस्ता दाखवतो, हे खरं आहे. पण शिष्य वेगळा रस्ता शोधू शकतोच ना! घराण्याच्या गायकीचा, ती गायकी जपण्याचा किंवा गुरूचं गाणं जतन करण्याचा प्रश्न विचारता तुम्ही, तेव्हा हे सारं समजून घ्यावं लागेल आधी. गुरू ध्येय दाखवतो. ध्येय एक असलं तरी शिष्यांचे रस्ते निरनिराळे असणारच. फार तर गुरू सांगेल की बाबा या अमुक इथल्या रस्त्यानं जाऊ  नको, तिथं काटेकुटे आहेत, खड्डे आहेत. चालणं, बोलणं जसं अमर्याद शक्यतांचं असतं, तसंच गाण्याचं आहे. जसं चित्रकलेचंही असेल.. चित्रकलेत गुरू शिष्याला रेषा कशी काढ हे शिकवू शकेल. पण पुढे त्या रेषेचं काय करायचं हे शिष्यालाच ठरवावं लागतं. संध्याकाळचं दृश्य दोन चित्रकारांनी रंगवलेलं निरनिराळं असतं, कारण त्यांनी अनुभवलेला क्षण आणि त्या क्षणाची त्यांना झालेली जाणीव निरनिराळी असते. हे लक्षात घेतलं ना की मग तुम्ही ठरावीक शिक्के मारत सुटणार नाही. हिनं स्वत: प्रयोग केले, तिनं घराण्याचं गाणं जपलं.. अरे! इतकं सोपं असतं का रे हे?

प्रत्येकाचा आवाज निरनिराळा, वेगळा. एकमेव. त्या आवाजातून पुढे गाण्याकडे जायचं आहे. स्वरच नव्हे तर श्रुती अनुभवायच्या आहेत. कलेचं एक दुसरं स्वरूप असतं, बुद्धी आणि मन यांच्याही पलीकडलं. या अनुभूतीमधूनच अभिजात संगीत जपायचं आहे. अभिजात म्हणजे साधा अर्थ सांगते.. ज्याच्या पुढे- पलीकडे काही असू शकत नाही, ते! होय, अभिजात संगीतात घराणी आहेत, पण ती कशी? शूद्र, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे चार वर्ण पूर्वीचे लोक मानत होते. ती विभागणी कामापुरती करण्यात आली, असंही काही जण म्हणतात. पण त्याही वेळी, स्वत:च्या घरचा केर ब्राह्मण काढतच असतील की नाही? आणि या वर्णानाच धरून बसलात, तर मानवधर्म विसरून कसं चालेल? या उदाहरणातला ‘मानवधर्म’ हा जसा त्या कामापुरत्या- त्याही एकेकाळच्या- विभागणीपेक्षा महत्त्वाचा, तसं संगीताचं अभिजातपण टिकवणं हे निव्वळ घराणंच टिकवून धरण्यापेक्षा महत्त्वाचं. हे अभिजातपण एखाद्यानं टिकवलं की नाही, हे समजायचं तर मग तुम्हाला पुन्हा परंपरा माहीत असाव्या लागतात, तुमच्या आधीचा जो संगीताचा अव्याहत काल आहे, त्या कालपटाचा आवाका तुम्हाला माहीत असावा लागतो.  हा आवाका देण्याचं काम गुरू करतो. हे लक्षात घेतलं की मग, केसरबाईंचा आवाज काळी तीनचा होता आणि माईचा (मोगुबाई कुर्डीकर) काळी पाचचा होता, या फरकाच्या पलीकडे जाऊन गाण्याकडे पोहोचता येतं. त्या गाण्यातलं सांगीतिक विधान ऐकू येतं आणि उमगतं. माईचा आवाज उंच होता, शिकवण्याची तिची पद्धत ठाम आणि ठाशीव होती. देवगिरी बिलावलमधली ‘केरो धर्मराज’ ही अस्ताई शिकवताना माई एकदा म्हणाली- या अक्षरापासनं त्या अक्षरापर्यंत दम तोडायचा नाही. मी विचारलं का नाही तोडायचा दम? तर माई म्हणाली तुला जे यातून सांगायचंय, ते तू मध्येच थांबलीस तर सांगताच येणार नाही! हे तिच्या पद्धतीनं तिनं शिकवलं.. विचार देण्याची पद्धत तिनं दिली. केसरबाईंचा आवाज निराळा. कदाचित शिकवणंही निराळं असेल. तरीही माईच एकदा मला म्हणाली होती की, तू केसरबाईंकडे शिक. त्या वेळच्या काही कारणांमुळे ते राहिलं. या दरम्यान मी कॉलेजात होते, अगदी स्पोर्ट्सपासून सर्व अ‍ॅक्टिव्हिटींमध्ये भाग घेत होते आणि माईकडे शिकतही होते. त्या वेळी मी केसरबाईंना भेटायला थेट नव्हते गेले. आमचे सीताराममामा फातरपेकर निरोप नेण्या-आणण्याचंही काम करीत. पण माईच्या शिकवण्यातून मला घराणं उमगत गेलं. परंपरा म्हणजे काय, ते समजत गेलं.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

मग पुढे कधी तरी मी केसरबाईंच्या मागे (बैठकीत, तंबोरा घेऊन) बसलेही आहे! काय पाहिलं मी त्या गाण्यात? हिरव्यागार गवताचं माळरान वाऱ्याच्या झुळकीनं जसं लाटांसारखं डोलतं ना? – तसा तो केसरबाईंचा मंद्र मध्यम! आमच्या घराण्यात (जयपूर-अत्रौली) ही श्रीमंती आहे.. मन्सूरांचं गाणं आणखी निराळं.. आणि एका अर्थानं गजाननबुवा जोशीही आमचेच. खरं आहे. पण हे सारे एकत्र नाही आले, त्यांच्या वाटाच निरनिराळ्या होत्या, याला तुम्ही महत्त्व देणार आहात की त्यांच्या एकंदर परंपरेला?

ही श्रीमंती माझ्यापर्यंत पोहोचवली ती माझ्या माईनं. म्हणजे ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात थोडा बदल करायचा झाला तर, ‘आमचे गुरू श्रीमंत म्हणून आम्ही श्रीमंत!’ त्यानंतर मी एकदा मन्सूरांच्याही मागे त्यांच्यासह तंबोरा धरायला कुणी नव्हतं की ऐन वेळी त्यांच्या शिष्याला काही समस्या आली, अशा वेळी बसले आहे.. अगदी शोभाताईंच्या (शोभा गुर्टू) सुद्धा मागे बसलेय मी. पण हे केव्हा? माईनं आमच्या श्रीमंतीची उंची दाखवल्यावर.

इथं पुन्हा जयपूर घराणं समजून घेतलं पाहिजे. आमच्या घराण्याबद्दल माझी समज आहे ती अशी की, जितकं स्वराला महत्त्व आहे, तितकंच तालामधल्या मात्रेला महत्त्व आहे. आमच्या घराण्याच्या गायकीत बंदिश मांडलीत, ताल सिद्ध केलात की तुम्हाला तानबाजी करायची म्हणून ताल वाढवायचा नाही, तुम्हाला तान वाढवायची ना? मग चार पटीने गा, आठ पटीने गा, सोळा पटीने गा! इतकी बौद्धिक शिस्त या गाण्यामध्ये असूनही ते मनाला भावतं, म्हणून हे घराणं वाढलं. साहजिकच आमच्या घराण्यात रागांची रेलचेल आहे.. यमनापासून, भैरवापासून ते मिश्रराग, संकीर्ण राग.. सगळे आमच्या घराण्यात चालत आलेलं आहे. मी विश्वसंगीताकडे निघाले ती या घराण्याच्या वाटेवरून. बंदिश मांडल्यानंतर – ताल सिद्ध केल्यावर आलापी, बोलआलाप, गमक, बोलतान, तानेमधली गमक, मग फास्ट तान, सुपरफास्ट तान. आमच्या घराण्यात ‘द्रुत’ नाही. त्याची गरजच नाही. तरीही (या घराण्यातले बहुतेक जण) विलंबित, मध्य, द्रुत अशा निरनिराळ्या बंदिशी गातात, म्हणून घराणं बुडालं का?

आमचं घराणं स्वामी हरिदासांपासूनचं आहे. तेच अल्लादिया खाँसाहेब गात होते का? तेच केसरबाई गात होत्या का?  गुरू आणि शिष्याच्या वाटा वेगळ्या असू शकतात, प्रत्येक शिष्य वेगळ्या वाटेनं जाऊ शकतो, असं सांगण्यातून मला काय म्हणायचंय हे या संदर्भात लक्षात घ्या.

(किशोरी आमोणकर यांनी धोंडूताईंच्या संदर्भात..’ (लोकरंग, २२ जून २०१४) या लेखासाठी केलेल्या चिंतनातील पुर्नसपादित भाग.)