09 August 2020

News Flash

सुदाम्याचे ऑरगॅनिक पोहे : मोर्निग वॉक

प्रभातफेरी ऊर्फ मॉर्निग वॉक करणाऱ्या काही माणसांना गोळ्या घालून ठार करण्यात आले!

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे आधुनिक मराठी विनोदी साहित्यातले एक अग्रणी नाव. त्यांची विशिष्ट विनोदशैली आजही अभ्यासली जाते.
‘मु. पो. बोंबिलवाडी’सारखी वेगळ्या धर्तीची विनोदी नाटकं रंगभूमीवर सादर करणारे आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’सारखे संवेदनशील चित्रपट देणाऱ्या लेखक-दिग्दर्शकाचे कोल्हटकरी शैलीत वर्तमानावर टीकाटिप्पणी करणारे मासिक सदर..
माझ्यासारख्या आळशी गोळ्यालाही व्यायामशाळारूपी चाकावर आकार येऊ लागला तेव्हा लोकं चकित झाली आणि आमची ‘देशभक्त सहकारी गृहरचना संस्था मर्यादित’ अमर्याद प्रेरित झाली. आमची सोसायटी बऱ्यापैकी प्रेरित होणारी आहे. आम्ही प्रेरित झालो की लगेच प्रेरित करणाऱ्याचा पुतळा किंवा स्मारक उभारतो आणि एकदम प्रगती होऊन जाते सर्वाची. काही मित्रांनी माझा पुतळा उभारण्याची योजना आखली. माझ्या नकळत वजन उचलतानाची माझी प्रकाशचित्रे घेण्यात आली. पण त्यातील चेहरा बलसंवर्धनाचे तेज दाखवत नसून शेजारच्या तात्यांच्या मूळव्याधतेजाशी जुळणारा आहे असे मत पडल्याने तो बेत रद्द झाला. जिवंतपणीच पुतळा उभारला जाणारा पहिला मनुष्य हा माझा विश्वविक्रम त्यामुळे हुकला.
सांगत काय होतो की, आमचे सर्व सदस्य अंग घुसळू लागले, कष्ट घेऊ लागले. प्रथिने, कबरेदके, जीवनसत्त्वे इत्यादी शब्द लीलया ओष्ठद्वयातून बाहेर पडू लागले. सोसायटी सदृढ होऊ लागली. प्रत्येकजण किमान प्रभातफेरी ऊर्फ मॉर्निग वॉक चालताना दिसू लागला. ज्यांना सकाळी मॉर्निग वॉक जमत नसे ते संध्याकाळी मॉर्निग वॉक चालू लागले. एकच धुरळा उडाला देशभक्त स. गृ. सं. म. च्या जनतेत. आणि तेवढय़ात..
प्रभातफेरी ऊर्फ मॉर्निग वॉक करणाऱ्या काही माणसांना गोळ्या घालून ठार करण्यात आले! आणि आमचाही उत्साह मावळला. खूप काळ लोटला तरी मारेकरी सापडेनात तेव्हा ते मावळणे दहशतीत रूपांतरीत झाले आणि आम्ही थंडगार पडलो. इतके, की चालणे, धावणे सोडाच; ती क्रियापदे वाक्यात वापरायलाही घाबरू लागलो. पूर्वी कचेरीतही चालत जाण्याची चळवळ करणारे आम्ही- आता स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात येण्यासाठीही दोन चाकांची खेळण्यातील स्कूटर वापरू लागलो. भीतीच्या आवरणाखाली चरबीच्या थरांचे आवरण माजू लागले. पण समाज खूप काळ ढोला राहिला की क्रांतिकारी होतो, हेच खरे.
अखेर काल आम्ही सर्व सभासद भीतीच्या शृंखला तोडून, कोणी पाहत नाही ना, याची खात्री करून गुपचूप सभागृहात जमलो. मारेकरी लोकांचा जहाल शब्दात निषेध करणारा ठराव पास केला आणि नव्याण्णव टक्के लढाई तिथेच जिंकली. आता फक्त मारेकरी सापडणे, गुन्हा सिद्ध होणे, शिक्षा होणे, ही अगदी किरकोळ कामे राहिली. पण आम्ही तत्काळ चर्चा करून त्यांचाही फडशा पाडला! धर्माभिमानी कार्यकर्त्यांवर झालेले आरोप आम्हाला रुचले नाहीत म्हणून त्या आरोपांचाही आम्ही निषेध केला. व्यायाम करणाऱ्यांना नि:शस्त्र असताना मारणे ही आमची संस्कृती नाही; मग तो शत्रू का असेना. अफझुलखानसुद्धा जावळीच्या खोऱ्यात मॉर्निग वॉकला जात असे. महाराजांनी त्याला एखाद्या करवंदीआड सहजी वाकवला असता व त्याच्या सैन्याला मोर्निग वॉक घडवले असते. पण नाही. त्यांनी समोरासमोर, त्याच्याच मिठीत जाऊन त्याची मृत्यूशी भेट घडवली! यावरूनच सिद्ध होते की धार्मिक लोकांनी हे कृत्य केले नाही.
हो, देश-धर्मभक्तांनी त्या मारल्या गेलेल्यांना विरोध केला होता. कोण अमान्य करत आहे? आपल्यातील काही चांगल्या प्रथा ते मोडायला निघाले होते. काही पुरोगामी कुत्सितपणे म्हणतात की, ‘भानामती, जादूटोणा, बळी अशा गोष्टीच म्हणजे तुमचा धर्म का..?’ तर आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, होय, तो आमचा धर्म आहे, कुणीही त्या गोष्टी बदलू नयेत. त्या प्रत्येक गोष्टीमागे काही लोककल्याणकारी तत्त्वं आहेत. ती जरा अभ्यासा. कुणालाही ती स्पष्ट दिसतील.

भानामतीने अन्नात घाण पडली की माणूस जेवत नाही, वजन आटोक्यात राहते. पैसा हा सतत हस्तांतरित होत राहिला पाहिजे, खेळता राहिला पाहिजे, हे केंद्रीय धनसंचयिनीचे संचालक अर्थात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नरसुद्धा म्हणतात ना? जादूटोणा ही कला नेमके हेच तर करते. शिवाय गुप्त राहिलेले धन अगुप्त करण्यात या कलेचा हातखंडा असतो. काळे धन परत मिळवण्यासाठी मंत्री काही करू शकणार नाहीत, पण मांत्रिक नक्की यशस्वी होतील. काळे, पिवळे- कोणत्याही रंगाचे धन असो, चटदिशी तुकारामाच्या गाथेप्रमाणे वर तरंगू लागेल. राहता राहिले बळी, नरबळी. लोकसंख्या नियंत्रणास आलेले अपयश पाहता अंधश्रद्धा निर्मूलनाऐवजी प्रत्यक्ष लोकसंख्या निर्मूलन महत्त्वाचे आहे, हे कुणीही मान्य करेल. इतकी देशोपयोगी तत्त्वे त्या प्रथांमध्ये आहेत म्हणून कदाचित धार्मिक लोकांच्या भावना दुखावल्या जात असतील- त्या प्रथा मोडीत निघाल्यावर. पण लक्षात कोण घेतो?
आणि असेही पाहा, की त्यावेळच्या सुधारकांच्या चळवळी स्वार्थी होत्या; आणि आजच्याही आहेत. फक्त हिंदू धर्मातच सुधारणा व्हावी, तो अधिक चांगला व्हावा असे त्यांच्या कार्याचे म्हणणे. पण नेमके हेच आम्हाला अमान्य! फक्त आम्हीच चांगले म्हणून प्रसिद्ध झालो तर तो अप्पलपोटेपणा ठरला असता. हा स्वार्थीपणाचा दोष लागू नये म्हणून.. आणि म्हणूनच केवळ तो विरोध होता. श्यामच्या आईने श्यामला गैरकृत्यांपासून परावृत्त करण्याकरता केला होता, तसा.
अशा सर्व वैचारिक, साहित्यिक आणि प्रासंगिक पुराव्यांच्या साक्षीने आम्ही सुचवू इच्छितो की, काही नवे सिद्धान्त तपासावेत. ते आपल्याला न सुचता एका देश-धर्मभक्ताला सुचले म्हणून हेवा न करता ते पाहावेत. एक घटना बालगंधर्व पुलावर घडली. दुचाकीस्वार आले, मारून गेले. कुणी तो पूल वापरू नये म्हणून तर ती हत्या झाली नसावी? त्या पुलावरून बालगंधर्व नाटय़गृहात जाता येते. म्हणजे लोकांना दहशत बसून बालगंधर्वमधील नाटय़प्रयोग पाहण्यास त्यांनी जाऊ नये व नाटके आपटावीत, म्हणून कोण्या नाटय़कलेच्या शत्रूने तर असे केले नसावे? किती साधी, सरळ, सोपी गोष्ट आहे! नाटके सोडून चित्रपट करू लागलेल्या काही लोकांनी चित्रपटाचा गल्ला वाढावा म्हणून केलेला हा कट असू शकतो. अन्यथा हीच घटना अलका सिनेमाच्या पुलावर घडवली असती, तर हाच सिद्धान्त उलटा लागू झाला असता. अशी न्यारीच गंमत आहे या मांडणीची. सरकारने याकडे लक्ष द्यावे.
दुसऱ्यास कोल्हापुरास मारीला. कोल्हापूरच का? तर खुनानंतर बातम्यांमध्ये वारंवार त्या गावाचे नाव डोळ्यासमोर येऊन आपले लक्ष अत्यंत मोठय़ा प्रश्नाकडे वळावे म्हणून तर नव्हे? कोल्हापूर म्हटले की कोल्हा.. आणि कोल्हा म्हटले की उसाला लागलेले अनेक कोल्हे आठवतील व सरकार त्या प्राण्यांचा काही बंदोबस्त करायला उद्युक्त होईल, या नि:स्वार्थी विचारानेही ते कृत्य घडवले असेल! कारण या कोल्ह्यांच्या मोठय़ा टोळ्या असतात- लांडग्यांसारख्या. ऊस हे त्यांचे आवडते खाद्य. ते मिळवण्यासाठी ते वाट्टेल त्या कोल्हेकुई आळवतात. त्यापैकी काही कोल्हे सरकारनेही पाळले आहेत असे म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. शिवाय कोल्हापूर म्हटले की काय आठवते? आंबाबाई. आंबाबाई म्हटले की आंबा हे फळ. घाट उतरल्यावर कोकणात येणारे हे नगदी पीक कोल्हापुरास का नाही, याकडे लक्ष वळावे म्हणून केलेला तो खून होता, याबद्दल शंका नाही! कोल्हा हा फक्त उसावर जगायचा. पण आता त्याला तो अपुरा पडू लागला आहे. त्यास आता नवीन पीक हवे आहे. या दोनही गोष्टी संशयाची सुई कोल्ह्याकडेच फिरवीत आहेत. त्या कोल्ह्य़ांच्या टोळीची वेळीच चौकशी व्हावी.
ते एक माहिती अधिकार कार्यकर्ते. तळेगावचे. असेच गेले. मॉर्निग वॉकच्या शेवटी त्यांचाही शेवट करण्यात आला. प्रभातफेरी खून-मालिकेतील हा पहिला खून होता! या खुनानंतर लोकांनी सावध होऊन मॉर्निग वॉक थांबवणे आवश्यक होते. पण कुणाच्या ते लक्षात आले नाही. काय झाले पहा. काही कनवाळू लोक तळेगावात एकत्र येऊन गोरगरीबांना रोजगार मिळावा म्हणून काही बांधकाम करणार होते. इमारत तयार झाली की लगेच ती पाडून त्या जागी परत नवीन बांधकाम अशी तहहयात रोजगार हमी योजना राबवण्याचा त्यांचा इरादा होता. आता ही योजना कुणाला का नावडावी? पण ठीक आहे; लोकशाही आहे, नावडू शकते. जशी त्या कार्यकर्त्यांला नावडली व त्याने विरोध केला. पण म्हणून त्या कार्यकर्त्यांचा खून कोण करील उगीच? साने गुरुजी कधी कुणाचा खून करतील? हाच तो बिनतोड पुरावा! जर साने गुरुजी खून करणार नाहीत, तर महाराष्ट्रातील एकही माणूस खून करू शकत नाही. पुढील तपासातूनही तेच सिद्ध झाले की, त्यांचा खून कुणीच केला नाही. वरीलपैकी कुणाचाच खून झालेला नाही; अन्यथा खुनी केव्हाच सापडले असते. पहा, किती गैरसमज पसरवले जातात काही माणसांविरुद्ध. आमचे असे म्हणणे आहे की, उलट त्या कार्यकर्त्यांलाच पश्चात्ताप झाला व त्याने स्वत:लाच भोसकून घेतले!
खरेतर वरील तीनही हत्या या आत्महत्या असू शकतात, इकडे तज्ज्ञांनी लक्ष द्यावे. मात्र, तरीही ते खूनच होते असे म्हणायचे असल्यास त्याबद्दलचीही निर्विवाद जिंकू शकेल अशी मांडणी आम्ही तयार केली आहे- जी अजून कुणालाच सुचली नव्हती. ते खून पाकीय..आपलं.. परकीय शक्तींनी केले असणार हे अगदी उघड आहे. व्यायाम करणाऱ्या भारतीय लोकांना मारीले की भारतीय लोक व्यायाम करण्यास घाबरणार, म्हणून ते अशक्त राहणार.. आणि शत्रू अचानक हल्ला करून आम्हा फोफश्या भारतीयांचा नि:पात करणार! अशी ही साखळी आहे. या झाल्या उघड उघड सिद्ध होतील, कुणालाही पटतील अशा गोष्टी! आम्ही एक छुपे कारस्थानही उघडकीला आणू इच्छितो- म्हणजे आमच्या वेगवान मेंदूविषयी समाज हेवाच करू लागेल.
आठवा, कोण बरे प्रभातफेऱ्यांच्या विरोधात होते? कुणाविरुद्ध आपण प्रभातफेऱ्यांचा वापर केला आहे? अहो, इंग्रज! त्याचा सूड म्हणून त्यांनी ही दहशत नव्याने निर्माण केली आहे. परत एकदा भारत बळकावण्याचा हेतू दिसतो लबाडांचा! पंतप्रधानांनी त्यांच्या पुढच्या भारतदौऱ्याच्या आधीच इंग्रजांना चांगले खडसावून घ्यावे, ही विनंती. हे कारस्थान उघडकीला आणणारा देशभक्त- म्हणजे मी- तिकडे जाऊन इंग्रजांशी चर्चा करायला तयार आहे. चांगली महिनाभर चर्चा चालू द्या, काही हरकत नाही; पण देश सुरक्षित होईपर्यंत मी लंडनचे ते पंचतारांकित हॉटेल सोडणार नाही याची ग्वाही देतो! तथाकथित पुरोगामी जळू नयेत म्हणून त्यांच्या एका प्रतिनिधीला बरोबर घेऊन जाण्यास हरकत नाही. परदेशी पंचतारांकित हॉटेल्सविषयी अधिक तपशील त्यांच्याकडेच आहेत व विमानाचे दोन्ही वेळचे भाडे मिळवण्यात ते वाकबगार असतात, हेही आपणांस माहीत आहेच. किंवा दरवर्षी आपले आमदार-खासदार वेगवेगळ्या विषयांत ‘पीएचडी’ (‘परदेशभ्रमण हीच देशभक्ती’ अशी कोटी करणारे मूर्ख असतात.) करण्यासाठी जात असतातच. मीही त्यांच्याबरोबर जाईन. एका कोपऱ्यात पडून राहीन बापडा त्या रिसॉर्टामधे. उगीच अजून खर्च नको देशाला. आमच्या हिंदू संघटनांना तसेच त्यांच्या विरोधकांना हा इंग्रज मुद्दा सुचू नये याचे आश्चर्य व्यक्त करतो व तातडीने गजर लावतो.
उद्यापासून पुन्हा व्यायाम, देश बलवान आणि शत्रूच्या योजनेचा फज्जा!
lokrang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2016 1:01 am

Web Title: morning walk
टॅग Morning Walk
Next Stories
1 समीक्षा  : श्रद्धा, मानवी मूल्ये आणि व्यवहारवादातील संघर्ष
2 बावनकशी : उत्तमाचा ध्यास..
3 मैफिलीत माझ्या.. : संगीतातले इंटीरिअर डेकोरेटर्स
Just Now!
X