lp06संस्कृतीच्या नावाखाली उन्मादाची बाजारपेठ (२ ऑक्टोबर) ही सुहास जोशी यांची कव्हरस्टोरी खरोखरच आजच्या सणांच्या बाबतीत विचार करायला लावणारी होती. आज घरगुती सणांना उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे. सण आणि उत्सव या दोघांमधील मूलभूत फरकच हरवले आहेत. भक्तीमधील भाव संपला की उरतो तो फक्त देखावा तसेच काही तरी सध्या आपल्या सणउत्सवांबाबत घडत चालले आहे. प्रदूषण हा विषय फक्त जल, वायू, ध्वनी यापुरताच मर्यादित राहिला नसून आता त्यात मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रदूषणाची भर पडली आहे. धर्माच्या नावाखाली जशी फसवणूक आणि पिळवणूक होते तशीच संस्कृतीच्या नावाखाली ही उन्मादाची बाजारपेठ फोफावत चालली आहे. सणउत्सव एकोप्याने साजरा करणे हे वाईट नाही त्याला काही सन्माननीय अपवाद आहेत याला दुमत नाही, पण खरा धोका आहे तो एकत्रितपणे साजऱ्या होणाऱ्या चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या उत्सवमूर्ती मंडळींचा कारण अशा सरमिसळ संस्कृतीला जोपासणे भविष्यात धोकादायक ठरणार आहे. कोणत्याही सणउत्सवांमध्ये त्या काळच्या सामाजिक परिस्थितीनुसार बदल घडून येण स्वाभाविक आहे, पण तो बदल चांगल्या पद्धतीने होणे अपेक्षित असते. पण आज दहीहंडी, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र, नववर्ष सणउत्सवांमधील बदल नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषण वाढविणारे ठरत आहे. घरगुती गणेशोत्सव सार्वजनिक झाल्यामुळे साहजिकच अगदी कुठल्याही जागेवर मंडप उभारले जाऊन गणपतीची पूजा केली जाते. गणेशमूर्तीच्या उंचीलाही मर्यादा नसते. मांगल्य आणि पावित्र्य यांना तिलांजली दिली जाते. प्रसारमाध्यमांमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्ती व सजावटीच्या स्पर्धा घेण्यात येतात. यामध्ये आपण गणेशाला सजावटीची वस्तू म्हणून बघतो आणि स्पर्धेत सहभागी होऊन साक्षात गणरायालाच स्पर्धेतील खेळाडू बनवतो. ज्या संस्कृतीत अशा पद्धतीने एखाद्या देवाची प्रतिमा, उत्सव याला स्पर्धेचे स्वरूप आणले जाते त्या संस्कृतीत देवाच्या भक्तीची अपेक्षा करणे चूक ठरते. याबाबतीत पूर्वजांचे नियम धाब्यावर बसवले जातात. संस्कृतिरक्षण करणारे तथाकथित रक्षक अशा वेळी मूग गिळून गप्प बसतात. गणेशाची पूजेची मूर्ती ठरावीक म्हणजे साधारण तीन फुटांपर्यंत असावी असा संकेत आहे, पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखाव्याची मूती दहा फुटांपेक्षा मोठी असते आणि पूजा करण्यासाठी लहान मूर्ती असते हा नियमही सोयीनुसार आला आहे. याला कुठल्याही शास्त्राची अथवा संस्कृतीची जोड नाही. इको फ्रेंडली गणपती म्हणजे शाडूच्या मातीपासून बनविलेला गणपती अशी संकल्पना बनत चालली आहे, पण शाडूची माती ही पूर्णपणे सागरी पर्यावरणासाठी अनुकूल नाही. शाडूची माती पाण्यात विरघळते म्हणजे समुद्रतळाशी अशा मातीचा थर साचतो तो समुद्रातील जलचरांसाठी अपायकारक ठरू शकतो. सजावटीचे लोण आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणावर पसरत चालले आहे. थर्माकोलच्या मखराशिवाय आणि चिनी उत्पादनांच्या सजावटीशिवाय गावातील घरगुती गणेशोत्सव साजरा होत नाही. जेवणासाठीही आता पत्रावळी, केळीच्या पानांऐवजी प्लास्टिकची ताटे यांनाच प्राधान्य दिले जाते. यामुळे पारंपरिक पद्धतीची गणेशोत्सवाची आरास दुर्मीळ बनत चालली आहे. गणेशाला वाहण्यासाठी पर्यावरणातून ओरबाडून आणलेल्या एकवीस पत्री या खरोखरच एकवीस प्रकारच्या पानांपासून तयार झालेल्या असतात का हे बघायची तसदी आपण घेतो का? दसऱ्याला सोने म्हणून आपटय़ांच्या पानांचा वापर करताना किती तरी सोन्यासारख्या आपटय़ांच्या झाडांचा बळी जातो याचा विचार आपण करतो का? गणेशोत्सवाच्या दरम्यान रानहळदीचे दुर्मीळ कंद तोडले जातात ही निसर्गाची हानी कधीही न भरून निघणारी आहे. कोणताही सणउत्सव निसर्गाला ओरबाडून साजरा करा अशी नोंद नाही, पण उन्मादाची झापड बांधलेला समाज अशा प्रकारची नोंद घेईल तो खरा सुदिन ठरेल.
सुहास बसणकर, दादर.

गणेश विशेषांक आवडले
लोकप्रभा’ने दोन गणेश विशेषांक प्रसिद्ध करून वाचकांना, देशोदेशीच्या गणेशोत्सव सोहळ्याचे सचित्र दर्शन घडविले. विशेषत: अमेरिका, ह्य़ुस्टन, बोस्टन, फ्लोरिडा, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा देशोदेशांतून लेखिकेकडून आलेले गणेशोत्सवाचे सोहळे वाचताना, आपणही त्यात सामील आहोत असा भास होत होता. नीलिमा कुलकर्णी यांचा ‘आम्ही चालवतो टिळकांचा वारसा’ हा लेख उल्लेखनीय वाटला. मी स्वत: अमेरिकेत डेट्राइटटॉय या ठिकाणी १९८१ ते २००७ च्या दरम्यान जाऊन दोनदा तर येथून गणेशमूर्ती नेऊन मुलाकडे गणेशोत्सव साजरा केलेला आहे. देशोदेशीच्या गणेशोत्सवाचे फोटो पाहून एक आगळेवेगळे समाधान झाले. परदेशात राहूनही आपल्या परंपरा किती मनोभावे जपल्या आहेत, याची प्रचीती आली. इथे जेवढय़ा उत्साहाने, आनंदाने गणेशोत्सव साजरा होतो, त्याहूनही अधिक जोमाने परदेशात हा उत्सव साजरा करण्यात येतो. काही देशांत तर अमराठी भाषिकसुद्धा या जल्लोषात सामील होतात. तेव्हा देशोदेशीच्या गणेशोत्सव सोहळ्याचे सचित्र वर्णन प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
जयवंत कोरगांवकर, परळ.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

गणेशोत्सव विशेषांकाची मेजवानी
lp07दि. २५ सप्टें. २०१५च्या अंकात गणेशाबद्दल विपुल माहिती दिलीत. मलेशिया, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, इंग्लंड इत्यादी परदेशातील गणेशोत्सव व तेथे अनेक शहरांत राहणारी मंडळी, मराठीच नाही तर अमराठी विद्यार्थी, व्यावसायिकांनी हा पारंपरिक उत्सव वाजतगाजत साजरा करावा. ही माहिती देऊन आपण खरोखरच वाचकांना मेजवानीच दिली. चित्रात युवक, युवती, फोटो फेटय़ासोबत, सोबत ढोल, गणपतीच्या आकृत्या, मांडणी, आरास असा सर्व आनंदच ह्य़ा अंकात वाचकांना दिल्याबद्दल धन्यवाद! भारतातील, महाराष्ट्रातील गणेशाबद्दल माहिती मिळाली, यात इंडोनेशियाचा गणेश दाखविला गेला नाही. तो दरवर्षी असतो. ह्य़ा अंकात गौरी बोरकर यांचे पर्यटन या सदरात स्पेनचा इतिहास, मार्दीद राजधानीबद्दल सचित्र संपूर्ण लेख वाचनीय होता. त्यांचे पर्यटनाबद्दल लेख अतिशय सुरेख असतात.
प्रभाकर अमृतराव, नागपूर२४.

आयुर्वेदाचा विचार करा
lp08डॉ. गजानन रत्नपारखी यांचा लेख वाचला. एका उद्योजकांना बायपासचा उपयोग झाला नाही, पण योगोपचाराचा झाला असे वाचल्याचे स्मरते.

थोडे परखड शब्दात सांगायचे म्हटले तर हृदयावर उपचार करताना आधुनिक शैली बायपासपर्यंत नेऊन सोडते. लोक हल्ली अधिक चौकस बनल्याने काहीजण सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन घेताना दिसतात व अनेक व्याधींत त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून वेगवेगळे सल्ले पण दिले जातात व उपचार सौम्य व आवाक्यातील असल्याचे आढळते. खरे म्हणजे जर शास्त्र परिपूर्ण आहे, तर तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता का? आणि मग कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी नातेवाईकांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र का घेतले जाते? किंवा प्रत्येक प्रिस्क्रिप्शनवर कोपऱ्यात फ७ का लिहिलेले असते? स्वत:चे निदान व उपचारांबाबत खात्री तर असायलाच हवी ना? जसे आर्किटेक्टचे डिझाइन व बिल्डरच्या कामाची गुणवत्ता याबद्दलही खात्री मागितली जातेच ना?

अनेकांच्या उदाहराणातून आयुर्वेद हा निश्चितच उत्तम उपाय व खात्रीशीर पर्याय आहे, हे मला व अनेकांना वाटत आहे. मात्र आयुर्वेदिक, काष्ठौषधी फारच महाग असतात, याचे कारण कदाचित गेली काही शतके आयुर्वेद उपचार पद्धतीची फारच हेळसांड व उपेक्षा झाली आहे, अन्यथा निसर्गाला अधिक जवळ असणारी, प्राचीन ज्ञानावर आधारित आयुर्वेदिक उपचार पद्धती अधिक लोकप्रिय होणे सोपे होईल! शिवाय आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड, त्यांची चूर्णे, भस्मे करणे हा अनेकजणांना एक उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतो; यासाठी काही शासकीय योजनाही असतीलच! येथे कोणत्याही उपचारांचे उणे अधिक करणे, हा हेतू नसून जनतेच्या आरोग्याचा विषय अधिक डोळसपणे व नि:पक्षपातीपणे पाहिला जावा एवढाच आहे.
श्यामसुंदर गंधे
, पुणे.

मला झाला उपयोग!
दि. ११२०१५ च्या लोकप्रभामधील ‘चिलेशन थेरपीएक भ्रम’ हा आपला लेख वाचण्यात आला. सर्वप्रथम सांगू इच्छितो chelation या ग्रीक शब्दास चिलेशन म्हणत नाहीत. याचा उच्चार ‘किलेशन’ असा आहे. (ke-lay-shun).

किलेशनची प्रॅक्टिस करणारे अनेक डॉक्टर्स एम.बी.बी.एस. आणि एम.डी. झालेले आहेत आणि तेही चांगल्या कॉलेजेसमधून. डॉ. रत्नपारखी यांनी तर त्यांना भोंदूबाबा करून टाकले. अनेक चौकांत आणि एस.टी. स्टॅण्डच्या बाहेर अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी, संबंधित रेटसहित, होर्डिग्ज लावलेली आढळतात. काय अशा जाहिराती लोकांची दिशाभूल करणाऱ्या नसतात? मुख्य म्हणजे बायपास स्टेंट वगैरे सगळे करून मला उपयोग झाला नाही, पण किलेशन थेरपीचा उपयोग मला स्वत:ला झाला.
सु. . मर्दे, पुणे.

खा, पण कामे करा
अलीकडेच काही मित्रांच्या आणि पाहुण्यांच्या सोबत गप्पागोष्टी करायचा प्रसंग आला. चर्चेमध्ये ज्या वेळी रस्त्याची दुरवस्था, अशुद्ध पाणी, रस्त्यावरील दिवे इ.बाबत चर्चा निघाली, त्या वेळी कामे तर होत नाहीत परंतु प्रचंड प्रमाणात पैसा मात्र हडप केला जातो, याबाबतीत सर्वाचे एकमत झाले.

मागच्या वर्षी मी साऊथ आफ्रिका आणि केनियाच्या दौऱ्यावर गेलो होतो. तेथील रस्ते मजबूत आणि चकचकीत होते. नळाचे पाणीदेखील पिण्यालायक होते. तसेच रस्त्यावरील दिव्यांचा व्यवस्थित झगमगाट होता. भ्रष्टाचाराबाबतीत तेथील मित्रांशी चर्चा झाली असता असे कळले की, भारतासारखा तेथेदेखील भ्रष्टाचार आहे, परंतु गुणवत्तेमध्ये कशातही तडजोड केली जात नाही. म्हणजेच २५ कोटी रु.च्या रस्त्याच्या कामासाठी भले ५० कोटी खर्च दाखविला जातो, परंतु काम मात्र उत्तम गुणवत्तेचेच केले जाते.

अनुभवावरून असे लक्षात येते की, आपल्या देशातील ग्राहक, मग तो कोणत्याही वर्गाचा असो, आवश्यकेतपेक्षा जादा पैसे देण्यास तयार आहे. जर सोयी आणि सुखसोयी या योग्य दर्जाच्या मिळाल्या तर तो होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करण्यास तयार आहे. याबाबतीत काही उदाहरणे सांगता येतील

शुद्ध पाण्याकरिता १५ रु. प्रति लिटरप्रमाणे बाटलीबंद पाणी सहजरीत्या विकत घेतले जाते.

रेस्टॉरंट अगर उपाहारगृह स्वच्छ आणि टापटीप असेल तर तो खाद्यपदार्थासाठी जास्त पैसे आनंदाने मोजतो.

चांगल्या प्रतीच्या थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी प्रत्येकजण तिप्पट पैसे खर्च करण्यास सदैव तयार आहे.

) सरकार, शासन, ग्रामपंचायत किंवा कोणतीही महामंडळे यांच्याकडून अपेक्षित असलेली कामे ते करीत नसल्यामुळे अनेक सेवाभावी संस्था स्वखर्चाने तसेच समाजाकडून पैसा गोळा करून ही कामे करीत आहेत.

या सगळ्यांचा मथितार्थ असा निघतो की, लोकांची धारणा अशी झाली आहे– ‘खा, पण कामे करा’. ही धारणा तत्त्वत: नक्की चुकीची आहे, परंतु ती सद्य:स्थिती आहे हे नक्की. याबाबतीत चिंतन, विचारमंथन करण्याची गरज आहे.
अ‍ॅड. किशोर लुल्ला, सांगली.

पावसाबद्दलची मतं आवडली
lp09लोकप्रभा’च्या ११ सप्टेंबरच्या अंकातील ‘पाऊस वेळा’ हा विभाग फार आवडला. यात वेगवेगळ्या लेखकांनी मांडलेल्या त्यांच्या आठवणी आणि पावसाबद्दलची मतं आवडली. सध्या पावसाच्या वेळेचं गणित बिघडलंय. पण तरीही या विभागातील लेखांमुळे पावसाचा आनंद घेता आला. काही काळ का होईना पण श्रावणातील पावसाने मन सुखावून गेलं.
पंकज पाटील, पुणे.