News Flash

दिवस ‘डेटागिरी’चे..

दूरसंचार क्षेत्रात रिलायन्सने ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ असे सांगत २००० साली धडाक्यात प्रवेश केला.

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi
रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (संग्रहित छायाचित्र)

ऑगस्ट १९९५ मध्ये पश्चिम बंगालचे  तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी तत्कालीन केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना देशातील पहिला मोबाइल कॉल केला. त्याला आता २१ वर्षे झाली. या कालावधीत देशात एक अब्जहून अधिक मोबाइल ग्राहक झाले असून प्रति सेकंदाला कोटय़वधी मोबाइल कॉल होत असतात. दर सेकंदाला काहीशे जीबी डेटा वापरला जात असतो. ही देशातील सर्वात जलदगतीने झालेली क्रांती. या दूरसंचार क्रांतीनंतर आता देश डेटाक्रांतीच्या उंबरठय़ावर उभा आहे. यास निमित्त ठरले आहे ते रिलायन्सने बाजारात आणलेल्या जिओनामक स्वप्नाचे. त्यानिमित्ताने दूरसंचार बाजारातील सध्याच्या वास्तवाचा लेखाजोखा..

दूरसंचार क्षेत्रात रिलायन्सने ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ असे सांगत २००० साली धडाक्यात प्रवेश केला. त्यांच्या आकर्षक योजनांमुळे अनेक ग्राहक मोबाइलशी जोडले गेले. पण पुढे ही ग्राहकरूपी मालमत्ता टिकवणे जमले नाही आणि कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेली. रिलायन्सच्या विभागणीत मुकेश अंबानी यांना ही दूरसंचार कंपनी हवी होती. पण त्यांना ती मिळू शकली नाही. आता त्यांनी रिलायन्स जिओच्या माध्यमातून दूरसंचार बाजारात उडी घेतली. पण आतापावेतो या क्षेत्रात अनेक कंपन्यांनी स्थान कमावले होते. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्सने पुन्हा एकदा आपल्या हूलनीतीचा अवलंब केला. जिओ बाजारात दाखल करताना नाना ‘ऑफर’चा सुळसुळाट केला. व्हॉइस कॉलसाठी पैसे भरण्याची पद्धतही बंद केली. यापुढेही दूरसंचार व्यवस्थेत अनेक बदल करण्याचा या कंपनीचा मानस आहे. कंपनीने देऊ केलेल्या ऑफरमुळे आणि त्यांच्या छुप्या हेतूंमुळे दूरसंचार क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे.

रिलायन्स जिओ बाजारात दाखल होणार याची कल्पना आल्यापासून अनेक बडय़ा कंपन्यांनी सावध पवित्रा घेत अनेक सुविधांचे अगदी बाल्यावस्थेत अनावरण करण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ थ्रीजीच्या दरात फोरजी उपलब्ध करून दिले. याला काही महिने उलटून गेले असले तरी आजही सतत न तुटणारे फोरजी नेटवर्क मिळवण्यासाठी ग्राहकाला वाट पाहावी लागते. मात्र रिलायन्स जिओच्या ऑफर आणि त्यांनी वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान याच्यासमोर सध्याच्या कंपन्या तोकडय़ा ठरताना दिसत आहेत. त्याला तोंड देण्यासाठी या कंपन्यांना नक्कीच अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे. मात्र त्या सध्या ग्राहकांना टिकवण्यासाठी खास ऑफर बाजारात आणण्यात मग्न आहेत. रिलायन्स जिओमुळे इतर कंपन्यांना त्यांचे ग्राहक सोडून जाण्याची भीती फारशी नसली तरी ग्राहकांनी आपल्याकडेच राहावे यासाठी त्यांना विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. या सर्व गदारोळात मोठे नुकसान होणार आहे ते सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्यांच्या प्रत्येक वापरकर्त्यांमागील उत्पन्नाचे. ते घटणार आहे. याचे परिणाम एका महिन्यानंतर दिसू लागतील. दूरसंचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक बडय़ा कंपन्यांचा ७५ टक्के उत्पन्नाचा भाग हा पूर्णपणे व्हॉइस कॉलवर आधारित असतो. रिलायन्सने ‘पेड व्हॉइस कॉल’ ही संकल्पनाच बदलून थेट इंटरनेटधारित कॉल आणल्यामुळे कंपन्यांनाही व्हॉइस कॉलसाठी काही सवलती आणि अतिरिक्त  सुविधा द्याव्या लागतील.

परिणामांसाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

रिलायन्स जिओमुळे दूरसंचार बाजारात उडालेल्या खळबळीचा प्रत्यक्ष परिणाम दिसण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. तातडीने जे काही परिणाम दिसत आहेत, त्यानुसार ग्राहक रिलायन्स जिओकडे पर्यायी व्यवस्था म्हणून पाहात आहे. यामुळे रिलायन्स जिओला ग्राहकाची पहिली पसंती बनणे शक्य झालेले नाही. कंपनीने डिसेंबर अखेपर्यंत देऊ केलेल्या ऑफर्सचा फायदा घेत जिओच्या नेटवर्कचा अभ्यास करण्याची ग्राहकांची मानसिकता असल्याचे तज्ज्ञ सांगतात.  तोपर्यंत इतर कंपन्यांना रिलायन्सच्या दरांसोबत स्पर्धा करताना नुकसान सहन करावे लागणार आहे.

इतर कंपन्यांसोबत तणाव

दोन भिन्न मोबाइल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपन्यांच्या कॉलची जोडणी करण्यासाठी अ़ावश्यक असलेल्या इंटरकनेक्टिव्हिटी करारावरून रिलायन्स जिओ आणि मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांची शिखरसंस्था ‘सीओएआय’मध्ये तणाव निर्माण झाला आहे. रिलायन्सच्या म्हणण्यानुसार तो करारच रद्द करावा व थेट जोडणी करण्याचा अधिकार द्यावा. यासंदर्भात आता दूरसंचार नियामक मंडळा(ट्राय)कडे कंपनीने दाद मागितली आहे. या करारानुसार कंपनीला प्रति कॉल १४ पैसे दुसऱ्या कंपनीला द्यावे लागतात. सीओएआयसोबत वाद सुरू असतानाच शुक्रवारी एअरटेल कंपनीने मोफत इंटरनेट उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेट वापरण्यावर काही ताण पडू नये याची काळजी घेण्यासाठी ट्रायला पत्र लिहिले आहे. एकंदर कंपन्यांमधील डेटायुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.

भविष्यात उत्पन्न घटण्याची भीती

  • जिओ उभारण्यासाठी रिलायन्सने मोठा खर्च केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जाळे पसरविले. भविष्यात जेव्हा फाइव्ह-जी येईल तेव्हा इतर कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स आघाडीवर असू शकते. रिलायन्स दूरसंचार बाजारात खूप उशिरा आले.
  • एखादी कंपनी एवढय़ा उशिराने बाजारात येते तेव्हा त्यांना प्रलोभने, ऑफर ठेवणे आवश्यक असल्याचे ‘सॅम्को सिक्युरिटीज’चे संशोधन प्रमुख उमेश मेहता सांगतात. मात्र या ऑफरमुळे इतर कंपन्याही आपले दर कमी करू लागल्या आहेत. त्यामुळे दूरसंचार बाजारावर विपरीत परिणाम होणार आहे.
  • या क्षेत्रात दीड लाख कोटींची गुंतवणूक आहे. ती भरून काढण्यासाठी वर्षांला किमान ११.५ टक्के परतावा मिळणे आवश्यक आहे. यासाठी कंपन्यांना झटावे लागत आहे. कंपन्यांच्या दृष्टीने हे हलाखीचे दिवस असले तरी ग्राहकांना मात्र यात फायदाच होणार असल्याचेही मेहता सांगतात.
  • पुढील दोन तिमाही सध्या काम करत असलेल्या कंपन्यांसाठी खूप खडतर असतील अशी भीती ‘आयसीआयसीआय सिक्युरिटीज’च्या अहवालात व्यक्त झाली आहे. या कंपन्यांना त्यांचे वार्षिक उद्दिष्ट साध्य करणे अवघड होणार असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
  • येत्या काळात डेटा मुबलक उपलब्ध होणार असल्यामुळे लोकांची जगाशी असलेली जोडणी प्रभावीपणे होऊन त्या वापरातून कंपन्यांना उत्पन्न मिळणार आहे.
  • यामुळे भविष्यात पेड व्हॉइस कॉल्स कालबाह्य़ होणार असले तरी डेटाचा मुक्त संचार असणार आहे.

नवउद्यमींना फायदा

मोफत इंटरनेटच्या आमिषामुळे मोबाइल सेवा वापरू लागलेली व्यक्ती पुढे काही काळाने ती सेवा पैसे देऊनही वापरते. ग्राहकांच्या या मानसिकतेचा अचूक वेध घेणाऱ्या अंबानी यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत इंटरनेट कसे पोहचेल हे आपल्या भाषणात स्पष्ट केले. नागरीकरणात डेटा हा तेलाइतकाच महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळेच कंपनीने मोबाइलच्या मूलभूत सेवांबरोबरच मूल्यवर्धित सेवांना (व्हॅस) महत्त्व दिले आहे. कंपनीने जिओअ‍ॅप्स नावाचा वेगळा विभाग तयार केला असून त्यामध्ये सहा हजारांहून अधिक चित्रपट, लाखो गाणी, ६० हजारांहून अधिक गाण्यांच्या चित्रफिती, दहा भाषांमधील लोकप्रिय मालिकांचे एक लाखांहून अधिक भाग आदी यामध्ये उपलब्ध आहे. यासाठी १५ हजार रुपयांची वार्षिक वर्गणी असणार आहे. याच विभागात अनेक अ‍ॅप्स आणि इंटरनेट आधारित सेवांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यात नवउद्यमींना चांगली संधी आहे. कंपनीने देऊ केलेल्या मोफत सेवेमुळे तसेच कंपनीच्या स्पध्रेमुळे इतर कंपन्यांच्या घटणाऱ्या दरामुळे येत्या काळात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या कमालीची वाढणार आहे. यातच फोरजी आल्यामुळे जास्त जलद आणि जास्त डेटा वापर होणार आहे. परिणामी याचा फायदा इंटरनेट आधारित नवउद्यमींना होणार आहे.

दाव्यांचा अर्थ

रिलायन्स जिओचे फोरजी नेटवर्क अवघ्या ५० रुपयांत एक जीबी या दराने उपलब्ध होईल अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. विविध स्तरांवर त्याचे स्वागत झाले. अगदी नरेंद्र मोदी यांचे डिजिटल भारताचे स्वप्न निव्वळ रिलायन्स जिओमुळेच साकारणार असल्याच्या टिमक्या वाजवण्यासही सुरुवात झाली. प्रत्यक्षात चित्र फारच वेगळे आहे. खालील तक्त्यावरून त्याचा अंदाज येऊ शकेल.

 

  • रिलायन्स जिओचे दर सुरुवातीच्या म्हणजे लोकप्रिय प्लॅनसाठी खूप जास्त आहेत. जिओचा सर्वाधिक किमतीच्या पाच हजार रुपयांच्या प्लॅनमध्येही ६७ रुपयांत एक जीबी डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. मग ५० रुपये प्रति जीबी डेटा मिळतो कुठे? तर प्लॅनमध्ये देण्यात आलेल्या डेटाचा वापर संपल्यानंतर आपण जो अतिरिक्त डेटा वापरतो त्याची किंमत ५० रुपये प्रति जीबी ठेवण्यात आली आहे. मात्र ही अट केवळ वाय-फाय हॉटस्पॉटलाच असणार आहे.
  • १० जीबीहून अधिक सुविधा देणाऱ्या प्लॅनमध्ये जिओचे दर इतरांच्या तुलनेत कमी आहेत. यामुळे एअरटेल आणि आयडियासारख्या कंपन्यांनी त्यांच्या मूळ प्लॅनमध्ये काही बदल करण्यास सुरुवात केली आहे.
  • यामुळे अन्य कंपन्यांकडूनही आपल्याला आणखी स्वस्त दरात प्रति जीबी डेटा मिळू शकणार आहे. एअरटेलने यापूर्वी प्रीपेड ग्राहकांसाठी ५० रुपये प्रति जीबीचा सुपरसेव्हर प्लॅन बाजारात दाखल केला आहे. आताही काही प्लॅनमध्ये बदल करण्याचे काम सुरू आहे.

Untitled-17

Untitled-18

Untitled-19

Untitled-20

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 3:16 am

Web Title: mukesh ambani launches the next gen with reliance jio
Next Stories
1 ‘लिमोआ’ करार म्हणजे.. आ बैल मुझे मार!
2 शील घडविणारी शाळा
3 आमच्या कामाला ‘शुभेच्छा’ नको!
Just Now!
X