हरी ओम्.. बम् बम् भोले..माल चांगला आहे..जय साईनाथ..ए दम दे, थांब जरा आज कडक माल आहे यार..जोरात दम मारत सुजाता म्हणाली. आणखी एकदा होऊ दे.. मग चिलीम रिकामी करून साफी धुण्यात आली. पुन्हा साफी लावून माल भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. वीस वर्षांचा अमोल यात पक्का तयार असल्याने गोळी जाळण्याचे काम त्याच्याकडे आपोआप आले. काडय़ापेटीच्या काडीला अमोलने चरसची गोळी लावली आणि एक काडी पेटवून जाळण्यास सुरुवात केली. माल पक्का तयार झाल्याची खात्री जळण्याच्या वासावरून घेतली आणि मग सुरू झाली चिलीम चढाई..म्हणजे, गोळी आणि सिगारेटमधील तंबाखू एकत्र करून हातावर बोटाने व्यवस्थित मळण्याचे काम.. आता फक्कड तयार झालेला माल अमोलने चिलमीत ठासून भरला..राजेशने चिलीम पेटवली आणि ‘जयसाईनाथ’ म्हणत एक जोराचा झुरका मारला. चिलीम सुजाताकडे गेली, तिनेही दोन दम मारून अमोलकडे सरकवली.. कॉलेजच्या मागे असलेल्या मैदानातील एका कोपऱ्यात कॉलेजमधील या तरुण गांजाकोस लोकांची मैफल चांगलीच रंगली होती.
ठाणे-मुंबई-पुण्यातील महाविद्यालयांमधील श्रीमंत बापांची मुले-मुली मोठय़ा प्रमाणात चरसच्या व्यसनात गुरफटलेली दिसतात. कधीतरी रेव्ह पाटर्य़ावर धाडी टाकून स्वत:चे फोटो काढून प्रसिद्धी घेणाऱ्या पोलिसांना महाविद्यालयांच्या नाक्या-नाक्यावरील ही चरसी टोळकी का दिसत नाहीत, हे एक कोडेच आहे. या साऱ्यांना चरस, गांजा आणि कोकेन हवे तेवढे व हवे तेव्हा उपलब्ध होत असते..पोलिसांना याची माहिती का होत नाही ते कळत नाही..त्यांचेही हप्ते बांधलेले असतात.. ते कशाला लफडय़ात पडतील, एका महाविद्यालयीन चरस ओढणाऱ्या तरुणाची ही प्रतिक्रिया खूपच बोलकी होती.
तुम्ही कधी ‘जॉइंट’ मारला आहे का, काका त्याने सहज मला विचारले तेव्हा माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून हा अगदीच बावळट असल्याचे त्याच्या लक्षात आले. जॉइंट म्हणजे चरसने भरलेली सिगारेट.. तो समजावून सांगत होता. पूर्वी सिगारेटमधील तंबाखू काढून चरस व तंबाखू मिक्स करून पुन्हा सिगारेटमध्ये भरावा लागायचा, आता वेगवेगळ्या प्रकारचे स्मोकिंग पेपर मिळतात.. महाविद्यालयातील प्राध्यापकही एवढे प्रेमाने कधी विद्यार्थ्यांना समाजावून सांगत नसतील तेवढय़ा प्रेमाने तो ‘चरसज्ञान’ मला शिकवत होता..पारदर्शक पेपर, ब्राउन पेपर, वेगवेगळ्या फ्लेअरचे पेपर मिळतात, अगदी कोणत्याही पानपट्टीवर तुम्हाला मिळतील.त्यात ‘माल’ भरला की एक वगेवळीच नशा येते. या चरसचा हॅश, स्टफ आणि दवा या नावाने कॉलेजमधील तरुण-तरुणी सहज उल्लेख करताना दिसतात.
ही तरुणाई नशेच्या पूर्णपणे आहारी गेली नसली तरी ‘फन’ किंवा थ्रिल म्हणून स्वत:च्या आयुष्याची सहज नासाडी करत असतात. अर्थात त्यांना याच्याशी काही घेणे-देणे नसते. बहुतेकांचे आई-वडील दोघेही चांगल्या ठिकाणी नोकरी करणारे असल्यामुळे घरात वेळ कमी देतात व मुलांना पॉकेटमनी भरपूर देतात. बीकॉमच्या दुसऱ्या वर्षांला असलेल्या राजेशच्या म्हणण्यानुसार तो काहीच चुकीचे करीत नव्हता. राजकारणी कोटय़वधी रुपये खातात..पोलीस पैसे खातात..सर्वत्र भ्रष्टाचार ठासून भरला आहे..आम्ही आमचे जीवन आमच्या पद्धतीने जगतो..थोडीशी मजा केली तर काय चुकले हा त्याचा सवाल अस्वस्थ करणारा..तेवढय़ात डॉली येऊन त्याला संध्याकाळच्या पार्टीचे आमंत्रण देते. अमोलच्या घरी आज कोणी नाही..संध्याकाळी नक्की ये, असे बजावते. या पार्टीत काय असणार, असे विचारले तेव्हा चरसची नशा अनेकदा कमी पडते त्यामुळे व्होडको अथवा स्कॉच असेल. आजचा मेनू तेथे गेल्यावर कळेलच..डान्स, गप्पा आणि मग प्रत्येकजण आपापल्या घरी जातो.. फिल्म इंडस्ट्रीतील बहुतेक जण ड्रग्ज घेतात. इंडस्ट्रीतील लोक ‘मनाली’ चरस घेतात. हा ‘मनाली’ चरस जॉइंटमधून घेतला जातो. मनाली चरसचा भाव तोळ्याला म्हणजे दहा ग्रॅमसाठी साडेतीन ते चार हजार रुपये आहे तर काश्मिरी चरसची किंमत सोळाशे ते अडीच हजार एवढी असते. एक जॉइंटसाठी सव्वाशे ते दीडशे रुपये मोजावे लागतात. तो मला ‘ज्ञाना’मृत पाजत होता.
या साऱ्यात चाळिशीच्या घरातील मुन्ना या मुरलेल्या चरशीची व्यथा काही वेगळीच होती. ही हायफाय घरातील कॉलेजमधील पोरं, कॉल सेंटरमध्ये काम करणारे आणि कॅटरिंग कॉलेजवाल्यांनी साहेब पुरती वाट लावली आमच्यासारख्यांची.. तो सात्त्विक संतापाने सांगत होता. न समजून मी विचारले म्हणजे, काय सांगू? चरसचा रेट यांच्यामुळे एवढा वाढला की सांगता येत नाही. १९९० साली हाच ‘पव्वा’ (चरस) चारशे ते सहाशे रुपये तोळा मिळायचा. २००० साली हजार ते बाराशे रुपयांना मिळू लागला आणि आता चांगला ‘माल’ अडीच हजार रुपयांना मिळतो, कसा परवडणार? महागाई आकाशाला भिडली आहे. भाज्यांचे भाव वाढले आहेत. डॉलरचे भाव रुपयाला रडवत आहेत आणि याला चरसच्या भावाचीच चिंता पडली होती. ही कॉलेजची पोरं-पोरी, तुम्हाला सांगतो साहेब केवळ चरसची एकी ठेवत नाहीत तर दारूही घेतात. एकाच वेळी दोन नशा, राजकारण्यांप्रमाणे यांची ‘लॉयल्टी’ नाही. चरस पिऊन गोड खाणार आणि दारू पिऊन चायनीज व चिकन हाणणार, या पिढीचे काही खरे नाही, साहेब..राजेशचे या तत्त्वज्ञानापुढे काय बोलणार?