मुंबई ही जशी चाकरमान्यांची, कॉर्पोरेटवाल्यांची, धनदांडग्यांची, डबेवाल्यांची तशीच ती टॅक्सीचालकांचीही.. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी टॅक्सीतून प्रवास केलेला असतो. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी कुटुंबीयांना मुंबापुरीचे दर्शन घडवण्याच्या निमित्ताने. प्रत्येकाच्या मनात ही टॅक्सी घर करून असते. अशी ही टॅक्सी आता १ ऑगस्टपासून मुंबईच्या रस्त्यांना अलविदा करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून न कुरकुरता मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे करणाऱ्या या टॅक्सीला-पद्मिनीला अखेरचा सलाम..मुंबईतली.. नव्हे आशिया खंडातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीत, धारावीत राहणारा राजकरन यादव रोज सकाळी त्याची कालीपिली अर्थात टॅक्सी धारावीच्या गल्ल्यांमधून शिताफीने बाहेर काढत रस्त्यावर आणतो आणि सुरू होतो दिवसभराचा प्रवास.. उत्तर प्रदेशातल्या कुठल्याशा छोटय़ा गावातून आलेल्या राजकरनचं स्वप्न आहे श्रीमंत होऊन गावी जमीनजुमला घेण्याचं.. धारावीत खोली आणि स्वत:ची टॅक्सी एवढय़ा भांडवलावर आपले स्वप्न पूर्ण होणार नाही याची खात्रीच असते त्याला..श्रीमंत होण्याच्या नादात धारावीतील दोन झोपडपट्टीदादांच्या वादात तो भरडला जातो.. अखेरीस त्याची टॅक्सीही जाते आणि रोजगारही..
हे ढोबळ कथानक आहे धारावी या चित्रपटाचं.. १९९१ मध्ये झळकला होता हा चित्रपट.. बरोब्बर याच वर्षी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचं (लायसन्स-परमिट राज) जोखड झुगारून देत जगाला आपली बाजारपेठ खुली करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. तेव्हा या निर्णयावर खूप टीका झाली. परदेशी कंपन्यांपुढे देशांतर्गत बाजारपेठेचा टिकाव लागणार नाही वगरे आवया उठल्या होत्या त्या वेळी. मात्र, तरीही तत्कालीन सरकारने आपल्या निर्णयावर ठाम राहून खुल्या अर्थव्यवस्थेचं घोडं दामटलंच. त्याचे बरेवाईट (खरंतर बरेच) परिणाम आता २०-२२ वर्षांनी आपल्याला बघायला मिळताहेत.. अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांत हे बदलाचे वारे घुमू लागले होते. प्रस्थापितांना त्याची झळ पोहोचत होती.. त्यातलेच एक क्षेत्र म्हणजे वाहन निर्मिती क्षेत्र (ऑटो सेक्टर) प्रीमियर, अ‍ॅम्बॅसिडर, मारुती या गाडय़ांच्या चलतीच्या काळात आलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेने या बाजारपेठेत तीव्र स्पर्धा निर्माण करत प्रस्थापितांना धक्का दिला. त्याचा पहिला बळी ठरला. प्रीमियर पद्मिनी..
१९६४ ते २००० या तब्बल साडेतीन दशकाच्या प्रवासात प्रीमियर कंपनीने भारतीयांवर अक्षरश: राज्य केले. वालचंद समूहातील प्रीमियर ऑटोमोबाइल्स लिमिटेड या विभागाचं अपत्य असलेल्या प्रीमियर पद्मिनीचं मूळचं लायसन्स मात्र इटलीचं. पद्मिनी म्हणजे कमळावर बसलेली लक्ष्मी.. ही लक्ष्मी आपल्या दारात असावी असं त्या काळच्या अनेकांचं स्वप्न असायचं. ताशी ११५ किमीचा वेग, प्रशस्त अंतर्गत व्यवस्था, चार गीअर्स अशा या सेडान प्रकारातील लक्ष्मीने मोठमोठे उद्योगपती, राजकारणी, अभिनेते, अभिनेत्री व तत्सम सेलिब्रिटींना भुरळ घातली. आपल्याकडे पद्मिनी असणं हा त्या वेळचा स्टेटस सिम्बॉल! मरीन ड्राइव्हवर (राणीचा हार) सुळकन वळणे घेत दिमाखात धावणारी पद्मिनी पाहणं हा त्या काळच्या मुंबईकरांचा खासा विरंगुळा. १९६० ते १९८० हा पद्मिनीचा सर्वोच्च लोकप्रियतेचा काळ. या काळातही तिला स्पर्धक नव्हती असे नाही. िहदुस्तान अ‍ॅम्बॅसिडर गाडीनं पद्मिनीपुढे भलंमोठ्ठं आव्हान उभं केलं होतं. मात्र, अ‍ॅम्बॅसिडरला सर्वसामान्यांची गाडी म्हणून मान्यता त्या वेळी तरी मिळाली नव्हती. ती कायमच राजभवन, मंत्रालयातील मंत्री-संत्री वगरे हाय प्रोफाइल लोकांच्या गराडय़ातच राहिली. आकर्षक दिसणं, चालवायला सोप्पी आणि कमी पेट्रोलमध्ये जास्त मायलेज या गुणवैशिष्टय़ांमुळे अ‍ॅम्बॅसिडरच्या आव्हानानं पद्मिनीच्या लोकप्रियतेत फारसा फरक पडला नाहीच. उलट उत्तरोत्तर तो वाढतच गेला. ८०च्या मध्यात तर प्रीमियर कंपनीने पद्मिनीचे एअर कंडिशन्ड मॉडेल उपलब्ध करून देत जनमानसावरील पकड आणखी घट्ट कशी होईल याची काळजी घेतली. शिवाय इंजिनात गुणात्मक फरक केल्यामुळे तिच्या वेगातही फरक पडला आणि ती आणखीनच आकर्षक झाली. त्यामुळे पद्मिनीची लोकप्रियता एवढी शिगेला पोहोचली की तिच्या बुकिंगसाठी कित्येक महिने वाट पाहावी लागायची.
८०च्या उत्तरार्धात मात्र पद्मिनीला तगडं आव्हान देणारा प्रतिस्पर्धी बाजारात उतरला. अधिक आधुनिक, स्वस्त आणि इंधनस्नेही असलेल्या मारुती सुझुकीने छोटय़ा कार्सच्या सेगमेंटमध्ये मारुती ८०० लाँच केली आणि अख्ख्या बाजारपेठेचा नूरच पालटून गेला. आकर्षक रंगात आणि ढंगात आलेल्या मारुतीने लोकांना वेड लावलं. मारुती रस्त्यांवर धावू लागताच पद्मिनीच्या लोकप्रियतेला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. व्यावहारिक किंवा मग कॉर्पोरेटी भाषेत बोलायचं झाल्यास मारुतीने पद्मिनीचं मार्केट अक्षरश: खाऊन टाकलं. इतकं की पद्मिनीच्या खपात प्रचंड घसरण झाली. त्यात १९९१च्या खुल्या अर्थव्यवस्थेनं तीव्र स्पर्धा निर्माण केली ज्यात पद्मिनी टिकाव धरू शकली नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून १९९६ मध्ये पद्मिनीचं डीझेल व्हर्जनही बाजारात उतरवण्यात आलं. तिच्या इंजिनात बदल करून ती अधिकाधिक गतिमान करण्यात आली. मात्र, तरीही तिला काही उठाव मिळेनाच. अखेरीस २००० मध्ये पद्मिनीचे उत्पादनच बंद झालं.
पद्मिनीचं उत्पादन बंद झालं तरी तिची ओळख खऱ्या अर्थाने टिकवली मुंबईने. टॅक्सीच्या रूपाने ती मुंबईकरांच्या कायमच स्मरणात राहिली. बॉलिवूड आणि टॅक्सी यांचे तर विशेष सख्य. अनेक चित्रपटांतून टॅक्सी आपल्याला दिसली. टॅक्सीचालकाच्या पुढय़ात तर एका बाजूला देवदेवतांचे फोटो तर दुसऱ्या बाजूला अमिताभ, आमिर, श्रीदेवी, कतरिना यांचे फोटो हमखास लागलेले दिसतात. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी टॅक्सीत बसून, गेला बाजार मंत्रालयापर्यंत प्रवास केलेलाच असतो. कालीपिली आणि पद्मिनी टॅक्सी हे समीकरणच होतं. पद्मिनीने आतापर्यंत अनेक मुंबईकरांना प्रवास घडवला आहे. शहरात सुमारे दहा हजार पद्मिनी टॅक्सी आहेत. १ ऑगस्टपासून त्या शहरातील रस्त्यांवरून नाहीशा होणार आहेत. मुंबईची आणखी एक ओळख काळाच्या पडद्यावरून नाहीशी होईल. कालीपिलीच्या जागा आता व्हॅन, मारुती वगरेसारख्या गाडय़ांनी घेतली असली तरी टॅक्सी म्हटले की डोळ्यासमोर प्रथम तरळतं ते प्रीमियर पद्मिनीचं रूपडं. ते काही कोणी हिरावून घेणार नाही, हे नक्की.
पद्मिनीच्या बिदाईने अनेकांच्या पोटावर पाय येणार असला तरी नाइलाज आहे. १९९५च्या आधीच्या, २००० नंतरच्या वगरे अनेक झोपडय़ावजा छोटय़ा घरांमधील अनेक टॅक्सीचालकांचे रोजगाराचे साधनच हरपणार आहे. धारावी चित्रपटातील राजकरन यादवसारखे.. याच चित्रपटाच्या अखेरीस एक छानसं वाक्य आहे, ‘समंदर में हरएक के नाम की लहर आती है.. सही वक्त पे जो पकड ले वो निकल गया..’ राजकरन त्याची वाट पुन्हा शोधतो आणि मार्गाला लागतो. तसंच आताही टॅक्सीचालकांचे होईल. तेही त्यांचा मार्ग शोधतीलच. चालायचंच, कालाय तस्म नम:.. अलविदा पद्मिनी! यापुढे मुंबापुरीची ठळक वैशिष्टय़ं दर्शवणाऱ्या चित्र किंवा छायाचित्र प्रदर्शनांतच पद्मिनी दिसेल कदाचित..
टॅक्सीला ग्लॅमर
मिळवून देणारे कलाकार
देव आनंद, अमिताभ बच्चन, धर्मेद्र, शशी कपूर,
ओम पुरी, नाना पाटेकर.
टॅक्सीवरील चित्रपट
१९५४ – टॅक्सी ड्रायव्हर
१९५८ – टॅक्सी ५५५
१९७३ – टॅक्सी ड्रायव्हर
१९८२ – खुद्दार
२००६ – टॅक्सी नंबर ९२११