संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन ऊर्फ नाना याला इंडोनेशियात अटक झाली आणि त्याला भारताच्या हवाली करण्यात आले. या छोटा राजनने मुंबई पोलिसांत दाऊदला मदत करणारे अनेक अधिकारी असल्याचा आरोप करून खळबळ माजवून दिली आहे. वस्तुत: या आरोपांत नवीन काहीच नाही. याआधीही अनेकदा पोलीस आणि संघटित गुन्हेगारी टोळी यांच्यातील ‘भाईचाऱ्या’बद्दल आरोप झाले आहेत..
‘‘सदर अधिकाऱ्याच्या फक्त सचोटीचा प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती; परंतु त्याचे थेट दाऊदशीच संबंध आहेत. एवढेच नव्हे तर तो दाऊदचाच माणूस आहे..’’ माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी एका अधिकाऱ्याबाबत दिलेला हा अहवाल. तो अधिकारी रीतसर सेवानिवृत्त झाला आहे. त्याला बडतर्फच करायला हवे, असे इनामदार यांचे म्हणणे होते; परंतु त्याच्यावर तशी कारवाई झाली नाही.
इनामदार केवळ हा अहवाल देऊन गप्प बसले नव्हते. पोलीस दलातील ही कीड नष्ट करण्यासाठी त्यांनी पुराव्यानिशी १७ ते १८ अधिकाऱ्यांची यादीच तयार केली. त्यांची मुंबईबाहेर बदली केली. खरे तर त्यांना घरीच पाठवायचे होते; परंतु तेवढा सबळ पुरावा हाती नव्हता. पुढे कदाचित न्यायालयीन लढाईत हे अधिकारी जिंकलेही असते; परंतु त्यांना शिक्षा होणे गरजेचे होते. त्या वेळी मुंबईबाहेर बदली ही पोलिसांसाठी शिक्षाच होती. या अधिकाऱ्यांना ती देण्यात आली. त्यामुळे त्या वेळी तरी पोलिसांमध्ये वचक निर्माण झाला होता.
अरुण गवळीच्या दगडी चाळीच्या कथित दहशतीलाच त्यांनी थेट सुरुंग लावला. गवळीला अटक करून गुंड-पोलीस यांच्यातील अभद्र युतीला छेद दिला. त्यानंतर त्याच्या वेतनावर असलेल्या अनेक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली. यापैकी काही अधिकाऱ्यांच्या अर्थात मुंबईबाहेर बदल्या झाल्या.
दाऊदच्या वेतनावर काही अधिकारी असल्याची चर्चा नेहमीच रंगते. छोटा राजनने तसा आरोपही केला आहे; परंतु छोटा राजनच्या पेरोलवर असलेलेही अनेक अधिकारी आहेत. दाऊद पकडला जाईल तेव्हा त्याने तसा आरोप केला तर आश्चर्य वाटायला नको. एखादा गुंड मोठा होण्यात स्थानिक पोलिसांचे योगदान असतेच. सुरुवातीला भुरटय़ा चोऱ्या करणारे अनेक चोर कुख्यात गुंड आणि नंतर राजकीय पक्षांचे लेबल लावून कसे वावरतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा अनेक गुंडांचे पुनर्वसन झाले होते.
राष्ट्रवादीचा खेळ संपल्यानंतर आता सत्ताधारी भाजपमध्ये अशा गुंडांची चलती आहे. छोटा राजनचा साथीदार असलेला नीलेश पराडकर (जो खंडणीच्या गुन्हय़ात पकडला गेला) हा भाजपप्रणीत कामगार संघटनेचा पदाधिकारी आहे. आणखीही अनेक जण त्या मार्गावर आहेत. या गुंडांना राजकीय आश्रय हवा आहे. तो मिळाला की पोलीसही साथ देतात याची त्यांना कल्पना आहे.
खंडणीच्या प्रकरणात तडजोड करून मलिदा कमावणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही. मुंबईत खंडणीखोरी जोरात होती तेव्हा दाऊद, छोटा शकील, छोटा राजन, सुरेश मंचेकर, गुरू साटम या गुंडांशी तडजोडी करून देणारे पोलीस अधिकारी होते. आज ती जागा रवी पुजारीने घेतली आहे. रवी पुजारीशीही थेट बोलणारे अधिकारी आहेत. मात्र ते प्रमाण कमी आहे. गुंडांशी संबंध ठेवणे हा आमच्या गुप्तहेरीचा भाग झाला, असे समर्थन द्यायलाही हे अधिकारी कचरत नाहीत. गोपनीय अहवालात या अधिकाऱ्यांची नावे येतात आणि नागपूरला वा अन्यत्र दूर कुठे तरी बदली झाली, की समजायचे काही तरी काळेबेरे आहे. गुंडांशी संबंध ठेवणाऱ्या पोलिसांवर भारतीय गुप्तचर यंत्रणेची करडी नजर असते. ही माहिती वेळोवेळी राज्याच्या गृहखात्याकडे पोहोचत असते; परंतु संबंधित अधिकारी किती प्रभावशील आहे यावर त्याच्यावरील कारवाई अवलंबून असते.
पोलीस-गुंड साटेलोटय़ाची चर्चा ८०-९० च्या दशकात जोरात होती. ज्या मन्या सुर्वेवर पुढे चित्रपट निघाला त्याची चकमक तेव्हा याच संबंधांमुळे गाजली होती. दादर येथे राहणाऱ्या प्रेयसीला घेऊन वाशीला निघालेल्या मन्याची टिप पोलिसांना कुणी दिली, याची चर्चा तेव्हा जोरात रंगली होती; परंतु पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मन्या ठार झाला हे नोंदले गेले. रमा नाईक याची चकमक तर वादग्रस्त ठरली. त्याचे नक्की काय झाले, तो कसा ठार झाला, हे कायम गुलदस्त्यात राहिले. पोलीस अधिकारी राजन काटदरे यांच्या नावावर मात्र चकमकीची नोंद झाली. मुळात पोलीस अधिकाऱ्याने गुंडांशी संबंध ठेवावेत का? ते ठेवावे लागतात. प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडाची माहिती काढण्यासाठी ते आवश्यकही असतात. प्रश्न त्या संबंधांच्या स्वरूपाचा असतो. काही पोलीस अधिकारी तर गुंडांशी संबंध ठेवता ठेवता स्वत:च गुंडासारखे वागू लागल्याची उदाहरणे आहेत. काल्या अँथनीच्या चकमकीशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याची आज झालेली अवस्था पाहिल्यावर गुंडांशी संबंध ठेवून हे पोलीसच कसे गुंडांसारखे वागू लागले, याची प्रचीती येते.
मुंबईत खंडणीसाठी बिल्डर, व्यावसायिकांच्या हत्या होऊ लागल्यानंतर पोलिसांत चकमकफेम अधिकारी उदयाला आले. त्यांनी तब्बल चारशे ते पाचशे गुंडांना ठार करून संघटित गुन्हेगारीचा कणा मोडला; परंतु याच अधिकाऱ्यांची (सर्वच नव्हे!) मजल ‘सुपारी चकमकी’पर्यंत गेली आणि त्यानंतर त्यांचे काय झाले हा इतिहास आहे. यापैकी एका चकमकफेम अधिकाऱ्याचे सुरुवातीला छोटा राजनबरोबर घनिष्ठ संबंध होते.
ओ. पी. सिंग या राजनच्या गुंडाचा वावर अनेकदा गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट कार्यालयात पाहायला मिळत होता; परंतु छोटा राजनबरोबर बिनसले आणि नंतर हा अधिकारी दाऊदच्या संपर्कात गेला. त्यामुळे छोटा राजन चिडला आणि त्याने पोलीस दलातील आपले संबंध वापरून या अधिकाऱ्याला देशोधडीला लावले. खोटय़ा चकमकीत हा अधिकारी अशा पद्धतीने अडकला की त्याला तुरुंगवारी करणे भाग पडले. त्यातून तो निर्दोष सुटला असला तरी त्याच्यासोबत जन्मठेपेची सजा भोगणारे अधिकारी खासगीत मात्र वेगळेच बोलतात. मुंबई पोलिसांत दाऊदचे हस्तक असल्याचा जो आरोप छोटा राजनने केला आहे त्याचा वार झेलताना तो हादरून गेला आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणेतही गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध ठेवणारे अनेक जण आहेत; परंतु संबंध ठेवायचे म्हणजे नेमके काय करायचे, याची त्यांना कल्पना असते. तसे प्रशिक्षणच त्यांना दिलेले असते. छोटा राजनसारखा संघटित गुन्हेगारीचा म्होरक्या जेव्हा आरोप करतो तेव्हा त्यात निश्चितच तथ्य असू शकते. या पोलीस अधिकाऱ्यांची नावे द्यायलाही तो तयार आहे. त्याने दिलेली नावे खरी नसतीलही; परंतु त्यात तथ्य नसेल असेही म्हणता येणार नाही.

कोटय़वधी रुपयांच्या तेलगी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या कोठडीत असताना मुंबई सेंट्रल येथील टोपाझ बारमध्ये दोन कोटी रुपये उडविण्यात आले. त्या वेळी तेलगीसमवेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनीही यथेच्छ दारू पिऊन धिंगाणा घातला.

nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस निरीक्षक असलेल्या अस्लम मोमीन यांना दाऊद टोळीशी संबंध ठेवल्याबद्दल बडतर्फ व्हावे लागले. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर तसेच छोटा शकीलशी केलेले संभाषण त्यांच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरले गेले. वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर बाबर यांनाही बडतर्फीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. चकमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, रवींद्रनाथ आंग्रे यांनाही बडतर्फी सहन करावी लागली. गुंडांशी संबंध असल्याचे थेट आरोप मात्र त्यांच्यावर झाले नाहीत.

गुंड टोळ्यांमध्ये ‘हंडी’ प्रसिद्ध आहे. हंडी म्हणजे गुंड टोळ्याच्या म्होरक्यांकडून साथीदारांसाठी मद्याची पार्टी आयोजित केली जाते. छोटा शकील, छोटा राजन, अरुण गवळी, अमर नाईक टोळीकडून अशी हंडी हमखास असायची आणि त्या हंडीला पोलिसांची उपस्थिती असायचीच.

जेव्हा चकमकी जोरात होत्या तेव्हा दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी, अमर नाईक टोळीचे गुंड ठार मारले जात होते. पोलीस दलातही विशिष्ट टोळ्या होत्या. विशिष्ट टोळीच्या गुंडांना मारण्यातच त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून नको असलेल्या गुंडांच्या टिप पोहोचविल्या जात होत्या, असे एका चकमकफेम अधिकाऱ्यानेच मान्य केले.

ख्रिसमसचे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोसेफ पोलसन याने चेंबूर जिमखान्यात पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत त्या वेळी तुरुंगातून सुटलेला डी. के. राव तसेच फरीद तनाशा या छोटा राजनच्या गुंडांसोबत नृत्यात सहभागी झालेले विशेष शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त विश्वास साळवे, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक आयुक्त प्रकाश
वाणी, चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश खाकले, खंडणीविरोधी कक्षातील सहायक निरीक्षक एन. कोल्हटकर, शिपाई राजेंद्र घोरपडे यांना निलंबित व्हावे लागले. या नृत्याची ध्वनिचित्रफीत झळकली आणि पोलीस-गुंड यांच्यातील मधुर संबंधांची चर्चा रंगली.

छोटा राजनचे गुंड विकी मल्होत्रा आणि फरीद तनाशा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने नवी दिल्लीत अटक केली तेव्हा त्या वेळी त्यांच्यासोबत भारतीय गुप्तचर यंत्रणेचा एक बडा अधिकारी सापडला होता.