31 October 2020

News Flash

कसे फुटतात पेपर?

मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवायला देऊन त्या बदल्यात हजारो रुपये उकळण्याच्या घोटाळ्याचा पोलिसांनी भांडाफोड केला.

मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवायला देऊन त्या बदल्यात हजारो रुपये उकळण्याच्या घोटाळ्याचा पोलिसांनी भांडाफोड केला. गेल्या किमान दशकभरापासून वादाचा केंद्रिबदू ठरलेला परीक्षा विभाग किमान एक वर्षांआड कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चच्रेत राहतो. पण ना मुंबई विद्यापीठ यावर कायमस्वरूपी तोडगा काढते, ना उच्च व तंत्रशिक्षण विभाग. एकीकडे विद्यापीठाचा दर्जा जागतिक स्तरावर घसरत असताना, कर्मचारीच या घसरगुंडीला हातभार लावत आहेत. तर दुसरीकडे प्रशासन नोकरभरतीसाठी सरकारकडून परवानगी मिळत नसल्याचे सांगते. परीक्षा विभागातील गैरप्रकार रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण का झाली नाही, याचे उत्तर विद्यापीठाकडे नाही.. या घोटाळ्याच्या निमित्ताने विविध मुद्दय़ांचा परामर्श घेणारे हे लेख..
सन २०११. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातून उत्तरपत्रिका बाहेर घेऊन जाताना काही कंत्राटी कामगारांना सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. उत्तरपत्रिका मोजे, पँट याच्यात लपवून विद्यापीठातील कंत्राटी कामगार बाहेर नेत होते.
एप्रिल २०१४. विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या पदवीच्या तिसऱ्या वर्षांची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या आधी ४५ मिनिटे व्हॉट्सअ‍ॅपवर वितरित होऊ लागली. विद्यापीठाने तातडीने हालचाल करत प्रश्नपत्रिका बदलली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास करत कल्याणच्या महाविद्यालयातील दोन कर्मचारी आणि दोन विद्यार्थ्यांना अटक केली. हा सौदा तीन हजार रुपयांत झाला होता. जून २०१५. पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिका दिल्यानंतर हमखास उत्तीर्ण करून देणाऱ्या घोटाळ्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला. कालिना विद्यानगरीच्या बाहेर बसणाऱ्या पानवाल्याला अटक, पण चौकशीपलीकडे कर्मचाऱ्यांवर काहीच कारवाई नाही.
एप्रिल २०१६. बीएमएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षांची प्रश्नपत्रिका भाईंदरच्या महाविद्यालयातून फुटली. विद्यापीठाच्या प्राथमिक चौकशीत हाती काहीच न लागल्याने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
दर एक वर्षांआड विद्यापीठात होत असलेले हे घोटाळे काही नवीन नाहीत. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व घोटाळे संबंधित आहेत ते परीक्षा विभागाशीच. इतर वेळी वेळेवर निकाल न लावल्याने परीक्षा विभागाच्या नावाने विद्यार्थी बोटं मोडत असताना, याच विभागात सुरू असलेल्या या घोटाळ्यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकताना अचंबित तर व्हायला होतेच, तर कमालीची चीडही येते. सांताक्रूझमधील कालिना कॅम्पसमध्ये विद्यापीठाचे परीक्षा भवन आहे. इमारतीच्या आसपास रेंगाळत असलेले विद्यार्थी, दोन-तीनच्या संख्येने गप्पा ठोकत बसलेले कर्मचारी, हातभर लांबी-रुंदीच्या काचेच्या खिडकीतून विद्यार्थ्यांना माहिती देणारे कर्मचारी असे या इमारतीचे बारूप. इमारतीत प्रवेश करतानाच अंधारलेल्या या इमारतीत नेमके काय होते, हे कळणे कर्मकठीण.आत प्रवेश करताक्षणीच विशी-पंचविशीतले तरुण हातात मोबाइल नाचवत, गप्पा मारताना दिसतात. अधिक माहिती घेतल्यावर हे तरुण परीक्षा भवनातील कर्मचारी असल्याचे कळते. पाच ते सात हजार रुपयांवर कंत्राटी पद्धतीवर कामाला असलेले हे कर्मचारी या परीक्षा विभागाची दुखरी नस. इमारतीच्या पहिल्या मजल्यापासून सुरुवात केल्यानंतर जिकडेतिकडे पडलेले कागदपत्रांचे ढिगारे आणि फायलींचे गठ्ठे नजरेस पडतात. येथील कर्मचारीही एका वेगळ्याच गतीने आणि शैलीने काम करणारे. गेल्या काही वर्षांत झालेल्या विविध गुन्हय़ांचे मूळ याच इमारतीतले.
परीक्षा भवनातील कर्मचारी १५ ते २० हजार रुपयांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी देऊन त्या पुन्हा परीक्षा विभागात नेऊन ठेवत असल्याची माहिती भांडुप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सलग आठवडाभर या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवले. मग २० मे रोजी भांडुप रेल्वे स्थानकावर मनोज िशगाडे या विद्यार्थ्यांला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अभियांत्रिकी शाखेची एक उत्तरपत्रिका मिळाली. चौकशीत विद्यापीठातील इतर सात कर्मचाऱ्यांचा या उत्तरपत्रिका बाहेर घेऊन जाण्यात हात असल्याचे स्पष्ट झाले. भांडुप पोलिसांनी लगोलग या सातही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एकूण ९६ उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यात आल्या. आरोपींच्या चौकशीत उत्तरपत्रिकांच्या घोटाळ्याची एक वेगळीच कहाणी समोर आली.
२०१५ मध्ये उघडकीस आलेला पुनर्मूल्यांकनाचा घोटाळाही असाच. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर हॉलतिकीट क्रमांक मिळवून थेट प्राध्यापक, पर्यवेक्षकांपर्यंत पसे पोहोचवून या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून देण्याचे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणले होते. यात कालिना संकुलाबाहेर बसणाऱ्या एका पानवाल्याला अटकही झाली. अटक करताना त्याच्या पानाच्या गादीतूनच काही हॉलतिकिटे पोलिसांनी जप्त केली. तेव्हा विद्यापीठाने तातडीने काही कर्मचाऱ्यांना निलंबित केले खरे, पण कालांतराने पुन्हा त्यांना सेवेत घेतले. विद्यापीठाकडून काहीच सहकार्य होत नसल्याने पोलिसांनीही या पानवाल्यावर आरोपपत्र दाखल करून उघड होऊ पाहणारा घोटाळा फायलीत बंद करून टाकला. मग त्यानंतर ना पोलिसांनी यावर प्रश्न विचारला, ना विद्यापीठाने त्याकडे लक्ष दिले. पोलिसांच्या चौकशीत पुनर्मूल्यांकनाचा हा घोटाळा इतका मोठा होता की, त्यात सर्व शाखांचा समावेश असल्याचे स्पष्ट होत होते. उत्तरपत्रिकांमध्ये वाट्टेल ते लिहून त्या भरायच्या आणि दलालांना पसे दिल्यानंतर ते पर्यवेक्षकांपर्यंत पोहोचवून किमान काठावर पास होण्याइतपत गुणांची या उत्तरपत्रिकांवर नोंद करायची, हा प्रकार सर्रास सुरू होता.

पालकांना कल्पनाही नाही..
एकीकडे विद्यापीठातील कर्मचारी यात सहभागी होत असल्याचे स्पष्ट होत असताना, त्याला साथ देणारे विद्यार्थी कोणत्या वर्गातील, स्तरातील आहेत, याचीही उत्सुकता लागून राहते. आताच्याच घोटाळ्याकडे पाहिले तर ८० विद्यार्थ्यांपकी बहुतांश विद्यार्थी मराठी आणि मध्यमवर्गीय असल्याचे स्पष्ट होत आहे. महाविद्यालयाने नोट्स किंवा अन्य शुल्क म्हणून १५ ते २० हजार रुपये मागितल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी या घोटाळ्यात पसे गुंतवले होते. काहीही झाले तरी आपला मुलगा अभियंता झालाच पाहिजे या हट्टातून वाट्टेल ते करण्यासाठी उत्सुक असलेल्या पालकांमुळे हे प्रकार वारंवार घडत असल्याचे पोलीस सांगतात. सध्या पोलीस ज्या विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलावत आहेत त्यांच्या पालकांना आपला मुलगा असल्या काही भानगडीत आहे, याची सुतरामही कल्पना नाही. कर्मचारी-विद्यार्थी आपापल्या फायद्यासाठी असे गुन्हे करण्यास सरसावत असताना विद्यापीठ प्रशासन किंवा मंत्रालय या घोटाळ्यांकडे कसे पाहते हेही महत्त्वाचे ठरते. परीक्षा विभाग हा सर्वस्वी वेगळा आणि स्वायत्त करा, ही मागणी वर्षांनुवष्रे शिक्षणतज्ज्ञांकडून होऊनही त्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. काहीच नाही तर परीक्षा भवनातील पेपर तपासणी, साठवणूक हा विभाग वेगळा करून त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष ठेवले तरी सर्व प्रकारचे गरप्रकार थांबविणे शक्य आहे. पण प्रशासनाचीच इच्छा नसेल तर आणखी काही महिन्यांनी नव्या घोटाळ्याविषयी आपण वाचत असू.

घोटाळ्याचे चक्र
* फारसा अभ्यास न झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पसे पुरविले तर घरबसल्या उत्तरपत्रिकेचा जुगाड होतो हे थेट महाविद्यालयापर्यंत पोहोचले होते. याची खातरजमा करण्यासाठी कालिना विद्यानगरीतील परीक्षा विभागाच्या आसपास रेंगाळणारे कर्मचारी तुम्हाला हेरून ही सर्व माहिती देतात.
* उत्तरपत्रिका मिळवून देण्यासाठी किती पसे लागतील, ते कधी द्यायचे याविषयी आधीच सौदा झाल्यानंतर विद्यार्थ्यांने केवळ परीक्षेला हजेरी लावायची, शक्य तितके प्रश्न सोडवून उत्तरपत्रिका कोरी सोडून द्यायची. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना आपला हॉलतिकीट क्रमांक देऊन ही उत्तरपत्रिका परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांनी मिळवून ती पुन्हा घरबसल्या लिहायची आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा जाऊन द्यायची..
* अशा प्रकारे हे उत्तरपत्रिका घोटाळ्याचे चक्र सुरू होते. त्यातही नवी मुंबईच्या २० कॉलेजांतील ८० विद्यार्थ्यांचा सहभाग यात असल्याचे उघड झाले असून त्यांना चौकशीसाठी सामोरे जावे लागणार आहे.

– अनुराग कांबळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 2:47 am

Web Title: mumbai university employees arrested for stealing answer sheets
Next Stories
1 विद्यापीठातच घोटाळ्याची बिळे!
2 ज्ञान आणि संस्कारनिर्मितीचा राजमार्ग
3 एकला आवाज!
Just Now!
X