सुलभा तेरणीकर

काही वर्षांपूर्वी चंदेरी आठवणी या मालिकेच्या निमित्ताने खय्याम साहेबांशी भेट झाली. त्यावेळी मी त्यांच्याकडे चार-पाच वेळा गेले. आमचा तेव्हा जुळलेला स्नेह कायम होता. अतिशय मोठे आणि दिलदार असे व्यक्तिमत्त्व होते. चित्रपट संगीताच्या निमित्ताने ते विविध प्रकारचं संगीत ते ऐकायचे. अगदी शास्त्रीय संगीताच्या मैफलींनाही  आवर्जून जायचे. त्यामुळे त्यांच्या संगीतावर शास्त्रीय संगीताचा प्रभावही दिसतो. त्यांनी पहाडी संगीताचाही खुबीनं वापर केला. खय्याम साहेबांच्या जाण्याने चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील शेवटचा शिलेदार आपण गमावला आहे. त्यांच्या संगीतात काव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. त्यांच्या अनेक आठवणी आहेत.. खय्याम साहेब आणि त्यांच्या पीचे गायिका जगजित कौर यांचे नाते अतिशय खेळकर होते. एकदा ते गाण्याची चाल करत होते. चाल केल्यावर त्यांनी जगजितजींना हाक मारली आणि म्हणाले,  ऐक, चाल कशी झाली आहे ते सांग.. त्यांनी रचना ऐकवली.  जगजितजी म्हणाल्या, जरा अवघड वाटते.. त्यावर खय्याम साहेब म्हणाले, जाऊ दे, तुला काहीच कळत नाही गाण्यातलं.. खय्याम साहेब एकदा पुण्यात माझ्या घरीही आले होते. मला म्हणाले, मला फिल्म इन्स्टिटय़ूटला जायचंय.. फिल्म इन्स्टिटय़ूट म्हणजे पूर्वीचा प्रभात स्टुडिओ. माझ्या गुरुंनी, संगीतकार हुस्नलाल भगतराम यांनी १९४४ मध्ये प्रभातमध्ये चाँद चित्रपटापासून सुरुवात केली. म्हणून मला त्या जागी जायचंय, तिथली माती कपाळाला लावायची आहे. खय्याम साहेब म्हणजे अतिशय मनस्वी होते. त्यांनी कायम त्यांच्या पद्धतीने काम केले. कोणतीही तडजोड केली नाही. तडजोड करण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी चित्रपट सोडले, आर्थिक नुकसान सहन केलं. पण संगीताच्या बाबतीत तडजोड स्वीकारली नाही. एकदा एका चित्रपटासाठी ते संगीत करत होते. एका चालीवर काम करत असताना त्या काळाचे मोठं नाव असलेले वली साहेब खय्याम साहेबांना म्हणाले, खय्याम तुम्ही नौशाद सारखी चाल करा. खय्याम साहेबांनी काम थांबवलं आणि तो चित्रपट सोडून दिला. पुढे त्यांनी ती चाल दुसऱ्या चित्रपटात वापरली. शाम ए गम की कसम हे ते गाणं.. खय्याम साहेबांच्या खूप आठवणी आहेत. त्यांच्या जाण्यानं चित्रपट संगीताचं खूप नुकसान झालं आहेच, पण माझंही वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना आहे. खय्याम साहेब त्यांच्या संगीत रचनांमधून अजरामर आहेत. त्यांना भावपूर्व आदरांजली..

काव्याला न्याय देणारा संगीतोपासक – इनॉक डॅनियल्स

कोणतेही गीत स्वरबद्ध करताना त्याच्या काव्याला न्याय देणारी स्वररचना हे खय्यामजी यांचे वैशिष्टय़ होते. संगीत हे काव्यावर मात करत आहे, हे ध्यानात येताच खय्याम यांनी उत्तम स्वरबद्ध झालेले गीत रद्द करून ते नव्याने ध्वनिमुद्रित केले होते, अशा शब्दांत ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स यांनी खय्याम यांच्या आठवणी जागविल्या. कैफी आझमी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या काव्याची ध्वनिमुद्रिका निघाली होती. त्यातील एका गीताचे ध्वनिमुद्रण झाल्यानंतर वादक कलाकारांनी संगीताचे कौतुक केले होते. माझ्या संगीतापेक्षा कैफी आझमी यांचे काव्य महत्त्वाचे आहे, या भावनेतून खय्याम यांनी हे गीत नव्याने ध्वनिमुद्रित केले होते, असे डॅनियल्स यांनी सांगितले.

‘कभी कभी’ चित्रपटापासून मी खय्यामजी यांच्याकडे संगीत संयोजक म्हणून होतो. गाण्याचा प्रसंग, काव्याचा भाव ध्यानात घेऊन ते स्वररचना करायचे. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे आणि पूर्ण विश्वास टाकणारे खय्यामजी माझ्या सदैव स्मरणात राहतील, असे डॅनियल्स यांनी सांगितले.