18 January 2021

News Flash

अन्यायग्रस्त मुस्लीम स्त्री : एक मिथ्य

जे भारतीय संविधानाच्या विरोधी आहे. त्यासाठी जी कारणे पुढे केली जात आहेत, त्यांचा समाचार घेणारा लेख..

|| समीना दलवाई

कथित ‘लव्ह जिहाद’चे कारण पुढे करून भाजपशासित राज्यांतून हिंदू-मुस्लीम विवाह रोखण्यासाठी धर्मातरविरोधी कायदे बनवले जात आहेत.. जे भारतीय संविधानाच्या विरोधी आहे. त्यासाठी जी कारणे पुढे केली जात आहेत, त्यांचा समाचार घेणारा लेख..

भारताच्या इतिहासातील पहिल्यावहिल्या महिला डॉक्टरांच्या कथा आपल्याला प्रभावित करतात. या बुद्धिमान डॉक्टर स्त्रियांनी प्रसूतीदरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्या आपल्या असहाय भगिनींना वैद्यकीय सेवा मिळावी या आस्थेपोटी जिवाचे रान केले. याच ध्यासाने वयाच्या केवळ सतराव्या वर्षी कुणाच्याही सोबतीविना आनंदीबाई जोशी एकटय़ाच अमेरिकेत गेल्या. पेनिसिल्व्हानिया येथील वैद्यकीय महाविद्यालयातून १८८६ साली त्यांनी पदवी प्राप्त केली. परदेशी जाताना समाजाकडून झालेल्या प्रखर विरोधाला त्यांनी मोठय़ा अविचल धैर्याने तोंड दिले. परक्या भूमीवर प्रतिकूल वातावरणात त्यांनी हा कठीण अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. वयाच्या केवळ १२ व्या वर्षी त्यांना अत्यंत यातनामय प्रसूती आणि त्यानंतर आपल्या तान्ह्य मुलाचा मृत्यू सोसावा लागला होता. त्यामुळे आधीच त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. परदेशातील प्रतिकूल हवामान, पुरेशा पोषक अन्नाचा अभाव यामुळे त्यांना क्षयाची बाधा झाली. परतीच्या प्रवासात हा रोग अधिकच बळावला आणि २२ वे वर्ष लागण्यापूर्वीच त्यांचा अकाली मृत्यू झाला.

यानंतरच्या स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून आपल्याला डॉ. रखमाबाई राऊत यांचे नाव घ्यावे लागते. वैद्यकीय शिक्षण घेण्यापूर्वी त्यांना प्रसिद्धी लाभली होती ती वेगळ्याच कारणासाठी. आपली संमती न घेता बालपणी झालेला विवाह मान्य नसल्याने त्यांनी पतीबरोबर राहायला नकार दिला होता. सनातनी हिंदू आणि ब्रिटिश न्यायालय या दोन्ही शास्त्यांनी कन्यादान म्हणजे पित्याने आपल्या कुंवाऱ्या मुलीचे नवरदेवाला दिलेले दान असल्याने मुलीच्या संमतीचा यात काहीच प्रश्न येत नाही अशी भूमिका घेतली. या खटल्याला भारतभरच नव्हे, तर इंग्लंड-अमेरिकेतही प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पुढे १८९१ चा संमती वयाचा कायदा मंजूर होण्याला हा खटला कारणीभूत ठरला. मुंबईतल्या सुतार पंचायतीने दंड म्हणून नवऱ्याला मोठी रक्कम देण्याच्या अटीवर रखमाबाईंची सुटका केली म्हणूनच केवळ त्यांचा तुरुंगवास टळला. त्यानंतर त्या लंडन येथील रॉयल फ्री हॉस्पिटल येथे शिक्षणासाठी गेल्या आणि १८९४ मध्ये डॉक्टर होऊन परतल्या.

रशीद जहाँ याही डॉक्टर होत्या, कम्युनिस्ट होत्या आणि लेखिकाही होत्या. १९०५ साली अलिगढला त्यांचा जन्म झाला. अलिगढ, लखनौ व दिल्लीत त्यांचे शिक्षण झाले. पुरोगामी लेखक संघटनेत आणि ‘इप्टा’ नाटय़चळवळीत त्या अग्रभागी होत्या. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत असताना स्त्रियांच्या आरोग्याची भीषण परिस्थिती त्यांनी अनुभवली आणि तिला त्यांनी कथारूप दिले. त्यांच्या कथांतील स्त्रिया एकामागोमाग एक सोसाव्या लागणाऱ्या दु:सह प्रसूतीचे, आपली इच्छा असो-नसो, नवऱ्याची लैंगिक भूक भागवावीच लागण्याच्या सक्तीचे दु:ख आपल्यापुढे मांडतात. सआदत हसन मंटो यांच्याही अगोदर रशीद जहाँ यांनी वेश्यांना आपल्या मर्मभेदी लघुकथांच्या नायिका बनवले.

या साऱ्याच स्त्रियांना समाजाच्या विरोधाला, अवहेलनेला तोंड द्यावे लागले. एक पती सोडला तर आनंदीबाईंना भारतात कुणाचा भावनिक आधार उरला नव्हता. परदेशी जाऊन शिक्षण घेण्याच्या निर्णयामुळे त्यांचे सगळे नातेवाईक आणि हितचिंतक त्यांच्यापासून दुरावले होते. रखमाबाई डॉक्टर बनून महाराष्ट्रात परतल्या खऱ्या, परंतु त्यांचे येथे मुळीच स्वागत झाले नाही. त्यांना प्रथम सुरतेत व नंतर राजकोटला डॉक्टर म्हणून सेवा करावी लागली. रशीद जहाँ यांना तर लोक ‘अंगारेवाली’ म्हणत. १९३२ साली ‘अंगारे’ हा त्यांचा स्फोटक कथासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर ‘तुमचे नाक कापून टाकू’ अशा धमक्याही त्यांना मिळाल्या होत्या. त्यांच्या वडिलांनी मुलींसाठी शाळा सुरू केली होती. लोक त्या शाळेला ‘वेश्यागृह’ म्हणत. मात्र, या तिघींच्या जीवनातील साम्य इथेच संपते.

रशीद जहाँनी आपले सगळे आयुष्य मित्रपरिवार, सहकारी आणि चाहत्यांच्या गराडय़ात मोठय़ा आनंदाने व्यतीत केले. महमूदउझ झफर या साम्यवादी साथीशी त्यांनी विवाह केला. त्यांचे घर म्हणजे शायरी, नाटय़ व कथावाचनाच्या मैफिली झडण्याचे लाडके स्थळ बनले. फैझ महंमद फैझ यांच्यासारख्या श्रेष्ठ कवींच्या दृष्टीने त्या आणि त्यांचे घर हे साम्यवादी चर्चाचे, विसाव्याचे ठिकाण बनले. इस्मत चुगताईंना त्यांच्याबद्दल अतीव प्रेमादर वाटे. त्या म्हणतात, ‘रशीदआपा सगळ्या गोष्टी निर्भीडपणे आणि जोरदारपणे मांडत. मला तर केवळ त्यांचे अनुसरण करायचे होते.’

याउलट, आमच्या महाराष्ट्रीय हिंदू नायिका एकाकी जीवन जगल्या. पंडिता रमाबाई हे एक अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्या संस्कृत पंडित होत्या. ‘उच्चवर्णीय हिंदू स्त्रिया’ या पुस्तकाच्या या लेखिकेला एक महात्मा फुले वगळता दुसरा कुणी मित्र उरला नव्हता. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारताच त्यांच्या वर्तुळातील अन्य समाजसुधारकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांनी पुण्याजवळ मुक्ती मिशन आणि शारदा सदनची स्थापना केली. आपले सारे आयुष्य अनाथ मुले, निराधार स्त्रिया आणि तरुण विधवांच्या सहवासात त्यांनी व्यतीत केले.

आपल्या निवडीची आणि स्वतंत्र निर्णयाची कठोर किंमत स्त्रियांना नेहमीच चुकवावी लागते. एकतर समाजाच्या निर्देशानुसार ‘शालीन स्त्री’ बना, नाहीतर मग समाजाच्या परिघाबाहेरचे एकाकी जीवन जगा. पण रशीद जहाँना मात्र असे एकाकी जगावे लागले नाही. पुराणमतवादी मुस्लीम समाज आणि उर्दू पत्रकारितेने त्यांची हेटाळणी व तिरस्कार केला खरा; परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्याभोवती प्रेमाची व हास्यविनोदाची उबदार शाल लपेटली. यात साम्यवादी मूल्यांप्रमाणेच प्रागतिक इस्लामचाही वाटा होता. त्यांचे किंवा उर्दूतील अन्य लेखिकांची चरित्रे मी वाचली तेव्हा अन्यायग्रस्त मुस्लीम स्त्रीचे मिथ्य आले कुठून, असा प्रश्न मला पडला. प्रत्येक समाजसमूहात जसा जुनाट, रूढीप्रिय गट असतो तसाच पुरोगामी, उदारमतवादी प्रवाहही असतो. महत्त्व कोणाला द्यायचे, हे आपणच ठरवतो.

‘मुस्लीम मुली का नाही करत हिंदू मुलांशी लग्न?’ असा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. वस्तुत: मुस्लीम पुरुषांशी लग्न केलेल्या हिंदू स्त्रियांची संख्या हिंदू पुरुषांशी विवाह करणाऱ्या मुस्लीम स्त्रियांपेक्षा कमी वा जास्त असल्याचा कोणताच संख्याशास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. या प्रश्नामागचे कारण असे की, मुस्लीम स्त्री म्हटले की कोणतीही चर्चा लग्न आणि घटस्फोट- म्हणजेच तिहेरी तलाक आणि हिजाब वा बुरखा यापलीकडे जातच नाही. पण स्त्रियांना विवाह आणि वस्त्रे यापलीकडचेही काही हवे असेलच ना? त्यांच्या शिक्षणाचे काय? आरोग्याचे काय? मुक्त संचाराचे काय? सच्चर कमिटीच्या अहवालातून आपल्याला दिसते की, विकासाच्या सर्व निर्देशांकांत १९४७ पासून मुसलमानांची घसरण झालेली आहे. त्यांच्या रोजगाराची टक्केवारी अत्यंत भयावह वाटावी इतकी कमी आहे. शिक्षणाची उपलब्धताही अपुरी. एकेकाळी भरभराटीच्या उद्योग-व्यवसायातील कुशल कलाकार असलेले अजलफ- म्हणजे कथित हलक्या जातीचे मुस्लीम आज भिकेला लागले आहेत. १९४७ साली अत्यंत शोषित व विपन्नावस्थेत असलेल्या हिंदू दलित समाजापेक्षाही आज अजलफ मुस्लिमांची अवस्था अधिक खालच्या पातळीला पोहोचली आहे. राजकारण व सामाजिक जीवनाच्या वेगाने होत असलेल्या जातीयीकरणामुळे ते अधिकाधिक उपेक्षित आणि दहशतग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत मुस्लीम स्त्रियांना स्वत:ची निवड स्वत: करण्याचे धैर्य आणि आवश्यक ते संचार स्वातंत्र्य मिळणार तरी कसे?

स्त्रियांना मालमत्तेत हक्क देणारे आणि घटस्फोटाची मुभा देणारे हिंदू कोड बिल आणण्याचा डॉ. आंबेडकरांनी खूप प्रयत्न केला. हे हक्क मिळाल्यामुळे आपला जीवनसाथी आपणच निवडण्याचा आत्मविश्वास स्त्रियांमध्ये येईल; परिणामी आंतरजातीय विवाह होऊन कालांतराने जातिव्यवस्था ढासळून पडेल असे त्यांना वाटे. म्हणूनच घटना समितीतील ब्राह्मणी पुराणमतवाद्यांनी हे विधेयक रोखून धरले. ‘आमची संपत्ती आमच्या मुलींना आम्ही वाटून दिली तर मग आमच्या मुलांचे काय होईल?’ असा प्रश्न ते संतापून विचारत. याच मुद्दय़ावर पुढे डॉ. आंबेडकरांनी राजीनामा दिला आणि लवकरच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पंडित नेहरूंनी हे विधेयक मग हिंदू विवाह कायदा, हिंदू दत्तकविधान कायदा आणि पोटगी कायदा अशा तुकडय़ा-तुकडय़ांत मंजूर करून घेतले. हा कायदा आणि शिक्षण व रोजगाराच्या उपलब्धतेचा हिंदू स्त्रियांना मोठा फायदा झाला. पुढे जाऊन काही स्त्रिया लग्नच न करण्याचा, किंवा केले तरी मूल न होऊ न देण्याचाही निर्णय घेऊ शकल्या.

सनातनी व्यवस्था आजही स्त्रीला लगाम घालू इच्छिते. म्हणून मग मद्य पिणाऱ्या किंवा पाश्चिमात्य पेहराव करणाऱ्या स्त्रियांवर हल्ले होतात. मुस्लीम तरुणांशी लग्न करणाऱ्या हिंदू स्त्रियांवर म्हणूनच तर एवढा राग असतो. आपली निवड आपणच करण्याचे धाडस या स्त्रिया करतातच कशा? आणि तेही तेवढय़ाच मुस्लीम मुली हिंदू घरांत येत नसताना? हे सारे मला भारत-पाकिस्तानने १९५० साली स्त्रियांची देवाणघेवाण केली तसल्या विचित्र कोटीचे वाटते. फाळणीत सर्वात जास्त अत्याचार महिलांनाच सोसावे लागले. त्यांना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले आणि ताबेदारांच्या घरातच त्यांना डांबून ठेवण्यात आले. अमृता प्रीतम यांच्या ‘पिंजर’मध्ये आपण पाहतो त्याप्रमाणे त्यांच्यापैकी काहींनी आपल्याला पळवून आणणाऱ्यांशीच विवाह केला आणि त्यांना मुलेही झाली. काही त्यापूर्वीच आपल्या प्रियकराबरोबर पळूनही गेल्या. आपण आपल्या कुटुंबीयांच्या दृष्टीने ‘नासवलेल्या’ आहोत आणि आपण कुटुंबाची बेअब्रूच करणार अशी यापैकी बहुतेकींची पक्की धारणा होती. रितू मेनन आणि कमला भसीन यांनी लिहिल्याप्रमाणे, कथित ‘सुटका’ करून घेण्याची मुळीच इच्छा नसलेल्या स्त्रियांना त्यांच्या छोटय़ा मुलांपासून बळजबरीने ओढून काढून सीमेवरच्या छावण्यांत आणले गेले होते. आपण शेजारी देशाला दिलेल्या आणि त्यांच्याकडून घेतलेल्या स्त्रियांचा हिशेब बरोबरीचा होणे महत्त्वाचे! पीडितांच्या इच्छेची मातब्बरी ती काय?

तर मग उजवे हिंदुत्ववादी ज्यांचे रक्षण करू इच्छितात त्या मुस्लीमधर्मीय अन्यायग्रस्त स्त्रिया आहेत तरी कोण? २०१७ साली मुस्लीम महिलांच्या संघटनांनी तिहेरी तलाकसंबंधीच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयातून एक ऐतिहासिक निर्णय मिळवला. आपला बचाव आपणच करायचा असे त्यांनी ठरवले. त्यांनी आता भारतीय लोकशाही वाचवण्याचा निर्धारही केला आहे. शाहीन बाग व इतरही अनेक आंदोलने आठवून पाहा. त्यांत मुस्लीम स्त्रिया अग्रभागी दिसल्या आणि सर्व वयाचे मुस्लीम पुरुष त्यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेत दिसले. निरपराध साथींवर पडणाऱ्या पोलिसांच्या लाठय़ा झेलण्यासाठी आपल्या छातीची ढाल करणाऱ्या, हिजाब घातलेल्या तरुण मुली दिल्लीच्या दंगलीच्या वेळी आपण पाहिल्या. अमीर अझीझ आपल्या कवितेत म्हणतात त्याप्रमाणे..

‘चुल्हों से बाँध दी गयी चिनगारियां मशाल बन जाती हैं
गुलाम की बेडियों की आवाजें आजादी की झंकार बन जाती हैं
इशारों से इन्किलाब करती हैं, जामिया की लडकियां..’

(लेखिका जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीत कायद्याचे अध्यापन करतात.)
sdalwai@jgu.edu.in
अनुवाद : अनंत घोटगाळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 12:57 am

Web Title: muslim woman a myth love jihad mppg 94
Next Stories
1 प्रचार विरुद्ध विचार
2 मुखवटा
3 अद्वयबोध : खेळतो कौतुके..
Just Now!
X