18 January 2021

News Flash

मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्थान कहते हैं..

करोनाच्या या अनपेक्षित आघाताने जीवनाचे अन् जगण्याचे सगळे संदर्भच अंतर्बाह्य़ बदलून गेले

शफी पठाण, नागपूर

आज समाजात नि:स्वार्थी, सज्जन, परोपकारी अशी कितीशी माणसे उरलीत, असा प्रश्न उपस्थित करणारा काळ वेगाने हात-पाय पसरत असतानाच साऱ्या जगालाच घरात बंदिवासी करणारे करोनाचे महाभयंकर संकट आले. करोनाच्या या अनपेक्षित आघाताने जीवनाचे अन् जगण्याचे सगळे संदर्भच अंतर्बाह्य़ बदलून गेले. या बदलांच्या झळांनी जसे जगाला वेढले तसेच त्यांनी विदर्भालाही होरपळले. बेभान नागरिक, बेजार आरोग्यव्यवस्था आणि धडकी भरवणारे मृत्यूचे आकडे बघून जगण्याची आसच जणू आक्रसून जाईल की काय, अशी भीती वाटायला लागली. त्यात पुन्हा अशा संकटात माणसाबाबतचा अपार कळवळा प्राणपणाने जपणे गरजेचे असतानाच जाती-धर्माच्या भिंती अकारण आणखी उंच उंच व्हायला लागल्या. त्यात प्रामुख्याने मुस्लिमांच्या विश्वासार्हतेला नव्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. याला कारण ठरले दिल्लीत तबलिगी जमातीच्या लोकांचे एकत्र येणे. तिथे काही जण करोनाबाधित आढळले अन् जणू देशभरातील सगळे मुस्लीम करोनाचे हे जहाल विष समाजाच्या धमन्यांमध्ये जाणीवपूर्वक भिनवत असल्याचे चित्र उभे करण्यात आले. अशात नागपूर आणि विदर्भातील काही मुस्लीम वस्त्यांमध्ये करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य पथकावर दगडफेक झाल्याच्या भीतिदायक बातम्या येऊ लागल्या. परंतु केवळ काल्पनिकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील अंतिम सत्य दिसत नाही. इथेही हेच घडले! करोनाकाळात मुस्लिमांच्या रूपात दिसणाऱ्या या दु:स्वप्नाच्या पल्याड याच मुस्लीम समाजातील काही तरुणांच्या डोळ्यांत मंगल स्वप्ने आकार घेऊ लागली. ही स्वप्ने होती.. जाती-धर्मातील वैर संपावे, प्रेम व सलोख्याचा नवा इतिहास लिहिला जावा यासाठीची! संवेदनशील मनाच्या या मुस्लीम तरुणांनी याकरता चक्क अंत्यसंस्कारांचा मार्ग निवडला. ज्या आपल्या हिंदू बांधवांचे आयुष्य करोनाने हिरावले अशांचे अंत्यसंस्कार या तरुणांनी अगदी त्यांच्या धर्मशास्त्रानुसार केले. एकाच धर्मात अशी टोकाची विसंगती का दिसावी? या विसंगतीला नेमक्या कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, याचा हा परामर्श..

तबलिगी हा मुस्लीमधर्मीयांचा एक पंथ आहे. विदर्भात- विशेषत: पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्य़ांत तबलिगींची संख्या जास्त आहे. आपला व्यवसाय-नोकरी सांभाळून धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी भ्रमंती करणं ही तबलिगींसाठी नित्याचीच गोष्ट. यासाठीच त्यांचे एक अधिवेशन दिल्लीच्या प्रसिद्ध मरकजमध्ये आयोजिले गेले होते. नेमका त्याच दरम्यान करोना देशात आला आणि त्याने मरकजमधील काही लोक बाधित झाल्याचे आढळून आले. अर्थात यातल्या कुणीही स्वत:हून बाधित होण्यासाठी पुढाकार घेतलेला नव्हता. परंतु या आजाराची लक्षणे स्पष्टपणे दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक काही तबलिगींनी केली; आणि ही चूकच त्यांना ‘राष्ट्रद्रोही’ वैगेरे ठरवण्यास कारणीभूत ठरली. दूरचित्रवाहिन्यांनी तर जणू तबलिगींविरुद्ध अघोषित युद्धच पुकारले. ‘करोना बॉम्ब’, ‘करोना जिहादी’ अशी शेलकी विशेषणे त्यांच्यासाठी वापरली गेली. विदर्भातील कुणाचा मुलगा, कुणाचा पती, तर कुणाचा भाऊ या मरकजमध्ये धर्मशिक्षणासाठी गेलेले होते. आपल्या या आप्तस्वकीयांना ‘करोना बॉम्ब’ ठरवले गेल्याने नातेवाईकांच्या मनात धडकी भरली. पाच वेळचा नमाज विनम्रतेने अदा करणाऱ्या आपल्या कोवळ्या मुलाला, ताटातले अन्न ‘हलाल आहे की हराम’ हे पडताळल्याशिवाय एक घासही न घेणाऱ्या आपल्या व्रतस्थ पतीला ‘करोना बॉम्ब’ ठरवलं जातंय, हे बघून त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड वेदना झाल्या. विदर्भातून लगोलग त्यांना फोन गेले. मिळेल त्या वाहनाने त्यांना परत बोलावण्यात आले. पण घरी परतूनही त्यांच्या मागे लागलेले किटाळ संपले नाही. त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकला गेला. लोकांकडून असह्य़ उपेक्षा सहन करावी लागली. जे मरकजमधून परतले ते व त्यांचे कुटुंबीयच नाही, तर संपूर्ण मुस्लीम समाजालाच तबलिगींच्या रूपाने त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला हा तिरस्कार गपगुमान सोसावा लागला. ‘करोना बॉम्ब’च्या या संज्ञेने त्यांना जेवढय़ा वेदना दिल्या, त्यापेक्षा जास्त संताप जन्माला घातला गेला. हा संताप मुस्लिमांच्या वस्त्या-वस्त्यांमधून खदखदू लागला आणि संधी मिळताच व्यक्तही होऊ लागला..

या संतापाने दगडफेकीचे रूप घेतले. करोनाग्रस्तांवर उपचार करायला गेलेल्या आरोग्य पथकांवर मुस्लीम वस्त्यांमधून दगडफेक होऊ लागली. तबलिगींना ‘करोना बॉम्ब’ संबोधणारी माणसे आता त्याच करोनाद्वारे आपले प्राण घेण्याचे बेत रचत आहेत असा संशय या वस्त्यांमध्ये बळावू लागला. नागपुरातील सतरंजीपुरा, मोमीनपुरा या मुस्लीमबहुल भागांसह शहराशेजारच्या कामठीतही आरोग्य पथकांना विरोध होऊ लागला. या विरोधाच्या मग ‘बातम्या’ झाल्या. त्या ठळकपणे प्रसिद्ध व्हायला लागल्या, तसे हे लोण विदर्भातील इतर शहरांमध्येही पसरले. अर्थात सगळ्याच मुस्लिमांनी दगड हातात घेतले नव्हते. परंतु अनेक ठिकाणी विरोधाचे स्वर तीव्र होत गेले. आपल्या शायरीतून गंगा-जमनी संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या प्रसिद्ध शायर राहत इंदोरींच्या इंदूर शहरात तर डॉक्टरांच्या अंगावर थुंकण्यात आले. स्वत: राहत इंदोरींनी पुढाकार घेऊन आपल्या समाजबांधवांना असे विकृत कृत्य करण्यापासून रोखले. तरीही दगडफेकीद्वारे होणाऱ्या विरोधाच्या बातम्या काही थांबल्या नाहीत.

या बातम्या व त्यांना जन्म देणारी माणसे इस्लामच्या मूळ उदार संकल्पनेलाच बदनाम करताहेत, हे जाणवू लागल्यावर मुस्लीम समाजातील पुरोगामी विचारांच्या लोकांनी हे विकृत चित्र बदलण्याचा संकल्प केला. या संकल्पास निमित्त पुरवले ते करोनाग्रस्तांच्या मृतदेहांच्या अवहेलनेने! नागपुरातील करोना प्रकोपात सुरुवातीला सतरंजीपुरा, मोमीनपुरा या भागातील अनेकांचे प्राण या आजाराने हिरावले. भीतीपोटी कुणीच करोनाग्रस्तांच्या मृतदेहांजवळ जात नव्हते. महापालिकेचे पथक यायचे आणि कुठलेही धार्मिक विधी न करता मृतदेह पुरून टाकायचे. ही बाब सतरंजीपुरा, मोमीनपुऱ्यातील मुस्लीम बांधवांना  जिव्हारी लागली. प्रवास अंतिम असला म्हणून काय झाले, तो सन्मानाने आणि विधीपूर्वकच व्हायला हवा, यासाठी या लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. महापालिका पथकाच्या मदतीनेच, परंतु धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार केले जाऊ लागले. मृतदेहांची अवहेलना थांबली. पण ती केवळ कब्रस्थानापुरतीच! स्मशानघाटांवर मात्र अद्यापि भीतीग्रस्ततेचे तेच चित्र कायम होते. ते बदलले पाहिजे या विचाराने ‘करोना बॉम्ब’ म्हणून समाजाकडून हिणवले गेलेले हेच मुस्लीम बांधव तिथल्या मृतदेहांवरसुद्धा विधीवत अंत्यसंस्कार व्हावेत यास्तव धावून गेले. मोमीनपुरातील जमिअत-ए-उलमा या संघटनेने महापालिकेकडून रीतसर परवानगी मिळवून नागपुरातील घाटांवर १५ मृत हिंदू बांधवांना हिंदूंच्या धार्मिक विधीनुसार सन्मानाने अखेरचा निरोप दिला. असेच सेवाकार्य त्यांनी ख्रिश्चनांच्या बाबतीतही केले. तिकडे अकोल्यातही ‘कच्छी मेमन जमात’ या मुस्लीम संघटनेने प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून शहरातील हिंदू करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले. संघटनेतर्फे सर्वाना नि:शुल्क रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.

तबलिगींचा तिरस्कार.. त्यावर दगडफेकीची तीव्र प्रतिक्रिया.. आणि शेवटी सलोख्याची साद.. असे परस्परविरोधी चित्र या करोनाकाळात विदर्भातील मुस्लीम वस्त्यांमध्ये दिसले. मात्र, जेव्हा केव्हा करोनाचा इतिहास लिहिला जाईल व त्यात मुस्लिमांच्या कृतीचा उल्लेख होईल तेव्हा फक्त सलोख्याची सादच तेवढी लक्षात ठेवली जाईल. कारण काळ कोणताही असो; ही साद घालणारे मुस्लीम इतर धर्मीयांप्रमाणेच या देशाचे बलस्थान आहेत आणि आपल्या विधायक वर्तणुकीतून ते- ‘हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को तो हिंदुस्थान कहते हैं..’ हाच संदेश देत आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 4:02 am

Web Title: muslim youth performed the last rites of hindu brothers in nagpur during covid 19 crisis zws 70
Next Stories
1 करोनाकाळातील असाही ‘मोह’!
2 चाँदनी चौकातून : तडजोड?
3 शिक्षण-आव्हानांचा ‘अर्थ’..
Just Now!
X