जेनेटिकली मॉडिफाइड- जीएम- बियाणे ‘घातक’ असते हा प्रचार मुळातच कसा चुकीचा आहे, याचे स्पष्टीकरण देणारा आणि ‘जीएम नकोच’ ही भूमिका वैज्ञानिक संशोधन व चाचण्या यांनंतर का चुकीची ठरते, हे सांगणारा लेख..
कलात्मक स्वातंत्र्यवीर (सेन्सॉर नकोच मानणारे) दिग्दर्शक महेश भट्ट यांनी वैज्ञानिक-संशोधन-स्वातंत्र्य नाकारणारी व बेधडकपणे हिरोशिमा, पूर, भूकंप, महायुद्ध, ९/११ यांचा जीएम- जेनेटिकली मॉडिफाइड- बियाण्याशी बादरायण संबंध जोडत प्रलय-घबराट पसरवणारी, ‘थाली में जहर’ नावाची फिल्म बनविली आहे. त्यात उल्लेखिलेल्या जीएम खाऊन उंदरांना कॅन्सर झाल्याच्या ‘संशोधनात’ मुद्दाम अगोदरच कॅन्सरप्रवण असलेले उंदीर वापरल्याचे उघडकीस आले आहे. जनुक अभियांत्रिकीचे वास्तव लोक समजून घेत नाहीत, तोवर असे प्रचारपट येतात व जातात.
      जनुक अभियांत्रिकीचे वास्तव समजून घेण्यासाठी आपण प्रथम कृषिजिवाणू (अॅग्रोबॅक्टेरियम)ची ओळख करून घेऊ. कृषिजिवाणू म्हणजे, कसदार शेतजमिनीतला ‘कस’ समृद्ध करणारा जिवाणू! कीटकनाशकांच्या अतिवापराने, शत्रूकीटकांबरोबर मित्रकीटक व मित्रजिवाणूसुद्धा नष्ट होतात. शत्रूकीटक/ जिवाणू मात्र हळूहळू त्यांना दाद देईनासे होतात. कीटकनाशके ही चक्क विषेच असतात. असे असूनही पर्यावरणवाद्यांना ती सुखेनव चालतात!
जिवाणू हा उत्क्रांतीच्या आदिम टप्प्यावर अस्तित्वात आलेला आणि आजही प्रचंड प्रमाणात यशस्वीपणे जगणारा जीवप्रकार आहे. आपली त्याच्याशी पहिली ओळख होते ती रोगजंतू म्हणून. अँटिबायोटिक घेतल्यानंतर ‘मित्रजिवाणूंचे’ पुनर्भरण करण्यासाठी जास्त दही-ताक किंवा मित्रजिवाणूंच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. विरजण किंवा ब्रेड वा अल्कोहोल बनवतानाचे यीस्ट-जिवाणू हे उपयोगी साधन म्हणूनही आपल्याला माहीत असतात. निरोगी शरीरातसुद्धा ‘आपल्या’ पेशींपेक्षा जास्त जिवाणू असतात. आपले मोठे आतडे हा तर एक पर्यावरणीय अधिवासच असतो. पण हे काहीच नाही तर आपल्या पेशींच्या आत, आपले गुलाम बनलेले मायटोकाँड्रिया नामक जिवाणू, चक्क ‘आपली’ कामे करीत असतात. शुक्राणूमध्ये (किंवा शुक्रजंतू) वळवळती गतिमानता कोठून येते? चक्क मायटोकाँड्रियाचे इंजिन बसवले जाते. म्हणजे जननपेशी पुरुषाची पण तिचा वाहक वेगळा जंतूच असतो! आपले स्नायू यांत्रिक ऊर्जा बनवू शकतात तीही मायटोकाँड्रियांच्याच ‘जीवा’वर! वरील कारणांमुळे जिवाणू हा जीवप्रकार मित्रही ठरतो हे तर झालेच. पण शरीराच्या किंवा खाद्यपेयांच्या बाहेरही मित्रजिवाणू अस्तित्वात आहेत. जैव-खते (सेंद्रिय म्हणू नये! कारण मूळ शब्द इंद्रिय-ऑर्गन हा नसून जीव-ऑर्गॅनिझम हा आहे) बनविताना त्यांचे हे कार्य सहजच दिसून येते. विष्ठेची विधायक विल्हेवाट लावणाऱ्या टाकीला सेप्टिक-टँक म्हणतात ते यामुळेच.
कृषिजिवाणूचे (अॅग्रोबॅक्टेरियम) माहात्म्य
जीवनसंघर्षांत आतून हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना परोपजीवी (पॅरासाइट) म्हणतात. या चोरांना आत शिरण्यासाठी यजमान जीवाचे कुलूप फोडावे लागते. एकाच नंबराचे कुलूप फोडायला एकदा शिकले की झाले. पण दर व्यक्तीगणिक मोठा आणि अनन्य नंबर असला की घरफोडी कठीण. जे जिवाणू एकमेकांशी बोगदा जोडून व जनुकांची देवाणघेवाण करून अनेकानेक नंबरांची कुलपे बनवू शकले ते जिंकले. यातून त्यांना यजमानपेशीतून जनुक-तुकडाही पळवून आणायचा/ टाकून द्यायचा अशी सवय लागली. असले धंदे करणारा व्रात्य जिवाणू म्हणजे कृषिजिवाणू होय. हे भरपूर प्रकारचे असतात. ते जे उद्योग करून ठेवतात त्यात मनुष्याला उपकारक की मारक असा विवेक करण्याची कोणतीही सोय नसते. ज्या जाती नत्रवायूचे ग्रहण चांगले करतात त्यांच्या मुळांवर, म्हटले तर एक, रोगच जडलेला असतो, हे आपण शाळेतही शिकतो. हा कृषिजिवाणू जनुकीय बदल घडवून काही वनस्पतींचा नाश तर काहींचा बेलगाम प्रसारही करू शकतो. अमेरिकन गव्हाबरोबर भारतात आलेले काँग्रेस गवत आठवत असेल.
कृषिजिवाणूंनी चालवलेल्या आंधळ्या जनुकांतर-धुमाकुळाच्या (जीन ट्रान्सफर केऑस) सर्व भल्याबुऱ्या परिणामांतून काय होते? उत्तर आहे उत्क्रांती! छोटय़ा जनुक-माला मोठय़ा होऊन उच्चतर बहुपेशीय जीव बनत गेले आहेत. पत्ते खेळताना पालथ्याच पानांवर बोली लावण्याला शुद्ध जुगार म्हणता येईल. पण बोली लावून पाने व्यक्त करणाऱ्या आणि पार्टनरची पाने उलथी करणाऱ्या ब्रिजला जवळजवळ बुद्धिबळाचा दर्जा दिला जातो. तद्वतच जनुकांतर-धुमाकूळ ते काटेकोर जनुक अभियांत्रिकी, असा आंधळेपणाकडून डोळसपणाकडे जाणारा सलगपट कल्पिता येतो.
शेतीचा शोध लागल्यापासून आजपावेतो आपण निवडक लागवड (तण काढणे) आणि संकर या मार्गाने अप्रत्यक्षपणे जनुक-अभियांत्रिकीच करीत आलेलो आहोत. वनस्पतीतील ‘वधू-वरां’च्या जोडय़ा जमवून लाभप्रद संतती होईपर्यंत आपण प्रयोग करीत असू व करीत आहोतही. कोणत्याही एका पेशीपासून संपूर्ण जीव निर्मिणे म्हणजेच टिश्यूकल्चर हे नवे असले तरी त्याबाबत कोणी ‘जी.एम.’ म्हणून धसका घेत नाही. संकरात आणि टिश्यूकल्चरमध्ये आपणही पालथ्या पानांचा जुगारच खेळत होतो व आहोत. त्यात झालेली जनुकांतरे, वाया जाणारी आणि धोक्याचीही असत, कारण डाव आंधळा असे. आज कळीचा फरक असा पडला आहे की, आता आपण पाने उलथी करून वाचू शकतो आहोत. कारण जनुकांचे कूट रेणू-रेणूपर्यंत उकललेले आहे. असे असूनही आंधळ्या जुगाराला, मग तो नसíगक असो वा मानवी, निर्धोक समजणे आणि डोळसपणे उलथी पाने बघून लावून घेण्याला मात्र प्रलयकारी समजणे, हा उफराटा धसका का पसरला आहे?
मुख्य कारण एवढेच आहे की, कृषिजिवाणूचा प्लाज्मॉइड नामक भाग आपल्या हाती लागला आहे. हा प्लाज्मॉइड कृषिजिवाणूतून बाहेर पडून भक्ष्य-वनस्पतीच्या यजमान पेशीत घुसतो. तेथील जनुक-मालेतला लचका तोडू शकतो व दुसऱ्याच जनुक-मालेतील मोकळ्या जागी जोडूही शकतो. वनस्पतींच्या जनुक-मालेत ‘दोरा’ (निर्थक रेणू) भरपूर लांब पण माळलेली फुले (जनुके) मात्र विरळाच अशी स्थिती असते. प्लाज्मॉइड आता मानवी देखरेखीखाली व नियंत्रणानिशी या कामी जुंपला गेला आहे व यालाच विशेषत्वाने जनुक-अभियांत्रिकी म्हणतात. भय इतकेच आहे की, त्यातील ‘तोडणारा घटक’ जर सुधारित बियाणात व त्याच्या अन्नवापरातून मानवी शरीरात शिरला तर तो मानवी जनुक-मालेची मोडतोड करणार नाही कशावरून?
तोडणारा तुटतो, जोडणारा जुळतो
मुळात प्लाज्मॉइड कृषिजिवाणूच्या ‘आज्ञेनुसार’ काम करीत असतो. प्लाज्मॉइडचे यशापयश आणि भक्ष्यजीवावर होणारे शुभाशुभ परिणाम यादृच्छिक असतात. जनुक-अभियांत्रिकीद्वारे एन्झाइम्स व औषधे वापरून मनुष्य निवडकपणे, अपेक्षित सद्गुणाचे जनुक वेगळ्याच प्रजातीच्या पेशीतून तोडून आणायला प्लाज्मॉइडला भाग पाडतो. नंतर तोडण्याचा घटक निकामी करून, उरलेला अर्धवट प्लाज्मॉइड, जे बियाणे सुधारित करावयाचे असेल त्याच्या पेशीत ढकलून देतो. आता या प्लाज्मॉइडकडे तोडण्याची शक्तीच उरलेली नसते, पण कोणत्याही जनुक-मालेत जाऊन चिकटण्याची शक्ती मात्र असते. मोकळ्या जागेत चिकटून तो नव्या यजमान पेशीला नवे जनुक प्रदान करतो. यात मानवाचे ईप्सित साध्य होते. उदाहरणार्थ- कापसाला बोंडअळीशी प्रतिकारशक्ती प्राप्त होते, केळ्याला स्वत:त लोह धारण करण्याची क्षमता प्राप्त होते, तर सोयाबीनला तांबेरा या रोगापासून बचाव करता येऊ लागतो, इत्यादी.
सुधारित बियाणाच्या जनुक-मालेत चिकटलेला, अर्धा प्लाज्मॉइड आता ‘कृषिजिवाणूतला स्वतंत्र प्लाज्मॉइड’ उरलेलाच नसतो. त्याला इतस्तत: भटकण्याची मुभा आता नव्या यजमान पेशीत उरलेलीच नसते. तो आता ‘प्लाज्मॉइड’च नसतो. मग तो यानंतर कोणाच्याच म्हणजे पिकाच्या किंवा माणसाच्या जनुक-मालेवर आक्रमण कसे करणार?
तरीही आता मुद्दाम एक भयंकर शक्यता पाहू. समजा, ‘तोडणारा घटक’ उरलाच तर काय होईल? सुधारित करावयाच्या नव्या यजमान पेशीत तो धुमाकूळ घालेल व तिचे मूळ गुणधर्मसुद्धा ध्वस्त करेल. अशी विकृतिग्रस्त पेशी बनल्याचे, बियाणे बनविण्यापूर्वीच ध्यानात येऊन, तिचा पुढील वापर टाळता येतो. याशिवाय साखळी प्रक्रिया घडू नये यासाठीच, पीक हेच बियाणे म्हणून वापरता येणार नाही असा, टर्मिनेटर जोडलेला असतो. अशा सर्व सेफगार्डसमुळे मानवी जनुक-मालेवर आक्रमण करेल असा घटक अन्नातून आत जाणे अशक्य आहे. टर्मिनेटरविषयी, पुन:पुन्हा रॉयल्टी मिळावी या आíथक लोभापायी तो टाकतात हा गरसमज आहे. उत्पादन खर्चात रॉयल्टी नगण्य असते. तसेच ‘टर्मिनेटरचे वंध्यत्व’ अनुवांशिकरीत्या पसरेल (!) हे हास्यास्पद आहे.
तरीसुद्धा पुरेशा चाचण्या घेतल्याशिवाय व सरकारी तज्ज्ञ समितीने पास केल्याशिवाय कोणतेही बियाणे विक्रीसाठी खुले करता कामा नयेच. येथेच तर मोठाच दैवदुर्वलिास भारताच्या पदरी आला आहे. निसर्ग हा जणू अिहसकच असतो (तो तसा अजिबातच नसतो), मानवच काय तो िहसक असतो अशी कविकल्पना मानणाऱ्यांनी व पश्चिमद्वेष्टय़ा प्रतिगाम्यांनी चाचण्यांवर (फील्ड ट्रायल्स) बंदी आणवली आहे. प्रत्यक्ष वापरावर मात्र बंदी नाही! कापसाबाबत अटलजींनी अधिकृत परवानगी दिली व ती लागूही आहे. सर्व कापूस बीटीच आहे. आत्महत्या बीटीमुळे नव्हे तर एकाधिकार खरेदी योजनेमुळे झाल्या. आता महाराष्ट्रातली एकाधिकार खरेदीही रद्द झाली आहे आणि कापूस क्षेत्रात विक्रमी वाढ झालेली आहे.
जनुक-अभियांत्रिकीमध्ये क्रांतिकारक शक्ती दडलेली आहे. रोगप्रतिकाराखेरीज कमी पाण्यानिशी तगणाऱ्या, खार जमिनीत तगणाऱ्या जाती, जास्त उत्पादकता आणि जास्त पोषणमूल्य देणाऱ्या जाती भारतीय कृषी विद्यापीठांनी शोधलेल्या आहेत, पण त्यांना त्या वापरता येत नाहीत. शेतकऱ्यांना नुसत्या भरपाया देत राहायचे की कायमस्वरूपी आíथक सक्षमता द्यायची, हा खरा प्रश्न आहे. शेतकरी, ग्राहक आणि संशोधक या तिघांचे स्वातंत्र्य हे खोटय़ा भयापायी कुचंबविणे हा हट्ट ‘विकास’वादी सरकारला अजिबात शोभत नाही.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान