15 December 2018

News Flash

घर में है छह ही लोग..

नाना पाटेकर यांचे हे वेगळे रूप..

‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’ची महाअंतिम फेरी शनिवार, १७ फेब्रुवारी  रोजी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिर येथे पार पडली. या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर उपस्थित होते. नाना यांच्या भाषणानंतर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी नानांशी अनौपचारिक संवाद साधला आणि त्या संवादातून त्यांच्यातील कवी मनाचे, हळुवार भावना जपणाऱ्या माणसाचे अनोखे दर्शन  श्रोत्यांना घडले. मराठीतील कवींची वैशिष्टय़े उलगडत त्यांनी मराठीतील काही ज्येष्ठ कवींनी लिहिलेल्या कवितांच्या निवडक ओळी सादर केल्याच, पण त्यांच्यात दडलेल्या प्रतिभावान कवीची चुणूकही अनुभवायला मिळाली. नाना पाटेकर यांचे हे वेगळे रूप..

माझी सगळ्यात आवडती कविता कुठली? तर ती माझ्या लहानपणची आहे..

वाटते सानुली

मंद झुळूक

मी व्हावे

घेईल ओढ

मन तिकडे

स्वैर झुकावे

कधी बाजारी

तर कधी

नदीच्या काठी

वेळूत कधी

वा पडक्या वाडय़ापाठी..

साहित्यिकांत ना. सी. फडके वाचाल, तर ते पूर्णपणे वेगळे. वि. स. खांडेकर वेगळे. चिं. त्र्यं. खानोलकरही वेगळे –

दु:खाचा डोंगर रचणाऱ्या

पापण्या उचलून पाहतेस

त्या वेळी सूर्योदयावरील

मेघखंडालाही मिळतात..

सापडतात विचित्र आकार

लहरी हवेला आणि

निर्झरांच्या सोनसाखळ्या

उस्कटून पडतात रानोमाळ मग..

आरती प्रभू. शब्दप्रभूच ते.

काढ सखे गळ्यातले

तुझे चांदण्यांचे हात

क्षितिजांच्या पलीकडे

उभे दिवसांचे दूत

तात्यांची कविता बघा. कशी काळानुरूप बदलत गेली. ‘पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा’  ही तात्यांची कविता आणि ‘विशाखा’मधल्या कविता. मला असं वाटतं की हे सगळं पाहिजे. प्रेक्षक, श्रोत्यांना ‘मेस्मराईज’ तर करायलाच पाहिजे. प्रेक्षक हा राक्षस असतो, त्यामुळं पहिल्यांदा त्यांना कह्य़ात घ्यायचं बरं का आणि मग विचार मांडायचे..

मी सामान्य असल्याचा मला फायदा आहे. मी दिसायला गोंडस नाही आणि ओबडधोबड असल्याने मला कदाचित डोंगर जास्त आवडतात. कळलं ना!

मी जाणीवपूर्वक तसाच राहिलो. माझ्या गरजा मी वाढू दिल्या नाहीत. माझे छंदही काहीतरी वेगळेच आहेत. मग ते छंद आणि तसे मित्रही मला भेटले. त्यामुळं एखादी ‘नाम’ सारखी गोष्ट सुरू होते. माझ्या वक्तृत्वाचा पंथ कोणता विचाराल तर मला नागडं बोलायला आवडतं. परिणामांची क्षिती ठेवायची नाही, मरायचं एकदाच. नाहीतर आरशामध्ये गेल्यानंतर एक दिवस अगदीच – अरे बापरे, माझं हे माकड कधी झालं, कळलंच नाही, असं व्हायचं.. मला कायम अशी

एक भीती वाटायची..

हमेशा मैं सोचता रहा की

लोग सिर्फ मिलते हैं

और चले जाते हैं

कोई मेरे साथ क्यों नहीं रहता

अक्सर आते हैं वक्त, बेवक्त

और फिर चले जाते हैं

मैं हमेशा उनकी राह देखता रहा

एक दिन काफी बारिश हो गयी

पानी जम गया

और अंजाने में मालूम नहीं कैसे

मैंने उस पानी में अपना चेहरा देखा

और फिर मुझे पता चला

मैं तो एक स्टेशन हूं घर नहीं

यहाँ कोई क्यों रुके

अब मैं सबके चले

जाने की राह देखता हूं..

तर ती गंमत आहे. आपण नेमके कोण आहोत हे आपल्या एकदा का लक्षात आले ना की मग आपल्या ज्या अवास्तव इच्छा असतात, मागण्या असतात त्या संपतात. आपण स्टेशन आहोत. त्यामुळे आपल्या इथं कोणी काही राहणार नाही वस्तीला. गाडी आली की ते निघून जाणार. त्यामुळे ते तेवढंच थांबणार आहेत हे मान्य करायचं. आपले राजकीय पक्षही सगळे तसेच आहेत की. त्यांच्या गाडय़ा आल्या की निघून जातात..

आत्ता हे जे काही बोललो ते मी माझ्या मनातलंच बोललो. उसनं मी फार कमी बोलतो आणि त्याचे पैसे मिळतात मला नाटकात आणि सिनेमात..

व्यक्त होण्यासाठी कविता हा माध्यम प्रकार निवडला. भवताल बदलला की माध्यम बदलतं. नेमकं कोण आहे बाजूला त्यावर अवलंबून असतं. कधीतरी मी गातोसुद्धा. काळजी घेतो की कुणी बाजूला नाही. म्हणजे काही आक्षेप नसावा रे कोणाचा. कविता ही त्यातून आली.

कोण आहे रे घरी? एकटा असतोस का?.. एकटा कुठे असतो?

चार दीवारें, छत और मैं

रात सावली, एक सहेली, गोरा चिट्टा

दिन हो दोस्त

घर में है बस छह ही लोग

चार दीवारें,  छत और मैं..

मस्त, मजा वाटते.. उगाच काहीतरी रडत बसायचं, काहीतरी करायचं. इतके आहात की तुम्ही सगळे माझे. अजून काय लागतं? माझ्या नावावर जमिनी नाहीयेत पण माझ्या ‘सातबारा’वर माणसं खूप आहेत असं मी नेहमी म्हणतो. बरं त्याला जकात नाही की त्याला काही पैसे भरावे लागत नाहीत आणि ती तशीच राहणार आहेत. जमिनीचं काय? आज याची आहे, उद्या त्याची होईल, परवा त्याच्या नावावर जाईल.. पण इथं सगळंच माझं आहे!

First Published on February 25, 2018 3:30 am

Web Title: nana patekar speech in loksatta oratory competition