‘‘नरेंद्र मोदी यांना कशा प्रकारचा नेता व्हायचे आहे.. आधुनिक युगात शांतता प्रस्थापित करणारा की आपल्या राष्ट्रवादी सहानुभूतीदारांच्या संशयास्पद महत्त्वाकांक्षेपायी प्रादेशिक अशांततेची जोखीम पत्करणारा?’’

जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारा अनुच्छेद-३७० रद्द करून त्या राज्याचे दोन तुकडे केल्यानंतर लंडनच्या ‘द टाइम्स’ने संपादकीयामध्ये विचारलेला हा प्रश्न. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर जगभर गंभीर चर्चा सुरू आहे. पाकिस्तानी माध्यमांनी कोल्हेकुई करणे स्वाभाविक; पण युरोपातल्या अनेक वर्तमानपत्रांनी या निर्णयावर अग्रलेख लिहिले. त्यात भाजपचा हिंदू राष्ट्रवाद आणि कथित मुस्लीमद्वेष केंद्रस्थानी आहे.

‘ल मॉन्द’ (द वर्ल्ड) या फ्रेन्च वृत्तपत्राने संपादकीयामध्ये ‘बीवेअर ऑफ इंडियन नॅशनालिस्ट’ असा इशाराच दिला आहे. ‘इस्लाम हा एक प्रकारचा वाढता धोका आहे, अशा मानसिकतेतून आपण हिंदू एकतेचा रक्षणकर्ता आहोत अशा भूमिकेत मोदी स्वत:ला पाहतात. भारतातील एकमेव मुस्लीमबहुल राज्य ही काश्मीरची ओळख पुसून त्याला अन्य राज्यांप्रमाणे सामान्य ओळख देण्याच्या त्यांच्या कार्यक्रमाचा हा एक भाग आहे,’ अशी टिप्पणीही त्यात आहे. मोदींकडे २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे येण्याआधी ते १४ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. ‘या काळात तेथील मुस्लीम आणि ख्रिस्ती अल्पसंख्याकांना अत्याचार सोसावे लागले. भारतातील हा उजवा राष्ट्रवाद पाश्चात्त्य राष्ट्रवादाएवढाच विषारी असल्याने जगाने सावध असले पाहिजे,’ असा इशाराही ‘ल मॉन्द’चे संपादकीय देते.

तर- ‘गरिबांचे जगणे सुसह्य़ करण्यास सात टक्के विकासदरही अपुरा आहे, याची पंतप्रधान मोदींना कल्पना आहे. पाकिस्तानविरुद्ध देशभक्तीला साद घालून आणि धार्मिक भावना भडकावून स्वत:कडे सत्तेचे केंद्रीकरण करणे हा मोदी यांचा ‘लोकप्रिय प्रकल्प’. त्यांचे काश्मीरच्या विकासाबाबतचे भाषण त्यांचा हा प्रकल्प लपवणारे होते,’ अशी टीका ‘ला स्टॅम्पा’ (द प्रेस) या इटलीतील वर्तमानपत्राने संपादकीयामध्ये केली आहे. ‘मोदींना ‘सामथ्र्यवान माणूस’ व्हायचे आहे. त्यासाठी त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे.. ते आता मागे घेतले जाऊ शकत नाही,’ अशी टिप्पणीही हे संपादकीय करते.

चीनच्या ‘पीपल्स डेली’चे भावंड असलेल्या आणि जागतिक घडामोडी टिपणाऱ्या आणि त्यावर टिप्पणी करणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने ‘काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेणे घातक ठरू शकते,’ असे भाकीत लेखाद्वारे केले आहे. ‘काश्मीरबाबतच्या निर्णयाला देशभक्तीची जोड दिल्यामुळे भाजपची सत्ता आणखी मजबूत होईल, परंतु काश्मीरमध्ये गरिबीबरोबरच नागरिकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना आणखी वाढेल. नरेंद्र मोदी यांचे प्रशासन परराष्ट्र संबंधांबाबत चुकीच्या मार्गावर आहे आणि ते काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानशी असलेल्या वैराचा बळी ठरवत आहे,’ असे निरीक्षणही या लेखात नोंदवले आहे. ‘त्रिदेशीय सहकार्यातून काश्मीरची अर्थव्यवस्था विकसित करण्यास मदत करण्याची चीनची इच्छा होती, परंतु भारताच्या काश्मीरकृतीने त्या शक्यतेवर वरवंटा फिरवला आहे,’ अशी टिप्पणीही लेखात आहे.

ब्रिटनच्या ‘द टाइम्स’ने मात्र मोदी आणि इम्रान खान यांना सबुरी-संयमाचा सल्ला दिला आहे. ‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजाऱ्यांनी बंदुकांच्या ट्रिगरवरील बोट काढले पाहिजे. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याचे वचन इम्रान यांनी द्यायला हवे आणि आपल्याला कोणत्या प्रकारची ओळख घेऊन इतिहासात अजरामर व्हायचे, हे मोदी यांनी ठरवले पाहिजे. म्हणजे आधुनिक युगातला शांतता प्रस्थापित करणारा नेता की आपल्या राष्ट्रवादी सहानुभूतीदारांच्या संशयास्पद महत्त्वाकांक्षेपायी प्रादेशिक अशांततेची जोखीम पत्करणारा नेता?’ असा प्रश्न हे संपादकीय उपस्थित करते.

पाकिस्तानातील ‘द डॉन’ने नचिकेत जोशी या सध्या फ्रान्समध्ये पीएच.डी. करणाऱ्या मुंबईकर विद्यार्थ्यांचा लेख पुनप्र्रसिद्ध केला आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणारा भारत कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे त्याने अरुण कोलटकर यांच्या ‘सर्पसत्र’ या कवितेचा संदर्भ देऊन स्पष्ट केले आहे. बाबरी मशिदीचा विध्वंस आणि गुजरात दंगलीच्या पाश्र्वभूमीवर कोलटकरांनी ती रचली होती. सर्पसत्र ही महाभारतातील त्याग व संहार याची कथा आहे.

ब्रिटनच्या ‘फायनान्शियल टाइम्स’ला मात्र काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय नावडला. ‘काश्मिरी नागरिकांचे मत विचारात घ्यायला हवे होते,’ असे या वृत्तपत्राने संपादकीयात म्हटले आहे. ‘मोदी सरकारला खरोखर काश्मीरचे भले करायचे असेल तर तेथील नागरिकांमध्ये तसा विश्वास निर्माण करावा. त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करणे आवश्यक आहे. हा निर्णय त्यांच्या विकासासाठी आहे, हे त्यांना विश्वासात घेऊन पटवून दिले पाहिजे,’ असे हे संपादकीय सुचवते.

(संकलन: सिद्धार्थ ताराबाई)