लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय पंडितांचे आडाखे चुकवत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले. या यशाचे भारतीय माध्यमांबरोबरच परदेशी माध्यमेही विश्लेषण करत आहेत. दुसऱ्या मोदीपर्वाची संधी देणाऱ्या या निकालाच्या परदेशी माध्यमांतील विश्लेषणात संमिश्र सूर उमटले आहेत.

चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’,  ‘साउथ चायना मॉर्निग पोस्ट’, इस्रायलच्या ‘द जेरुसलेम पोस्ट’मधील बातम्या आणि लेखांमध्ये मोदींच्या स्वागताचा सूर उमटला आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी फेरनिवडीबद्दल मोदींचे अभिनंदन केले, याकडे लक्ष वेधत ‘ग्लोबल टाइम्स’च्या एका लेखात भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध दृढ होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. भारत व चीन यांच्यातील व्यापारात वाढ होते आहे. चीन-अमेरिका व्यापारयुद्धाचा भारत-चीन व्यापारी संबंधांवर अनुकूल परिणाम होईल. चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘बीआरआय’ प्रकल्पात भारत सहभागी होऊ शकेल, अशी आशाही या लेखात व्यक्त करण्यात आली आहे. ‘मोदींनी प्रतिकूल मुद्दे बाजूला सारण्यात यश मिळवले. कणखर नेतृत्व आणि जनतेला चांगले दिवस आणण्याची क्षमता आपल्यात आहे, हे पटवून देण्यात मोदी यशस्वी ठरले’, असे निरीक्षण ‘साउथ चायना मॉर्निग पोस्ट’मधील एका लेखात आहे.

निवडणूक निकाल जाहीर होताच इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्याचे वृत्त सर्व इस्रायली माध्यमांत आहे. मात्र, आपण निवडणूक जिंकलो असलो तरी तुम्हाला घटकपक्षांची गरज नाही, आम्हाला आहे, असे नेतान्याहू यांनी मोदींना उद्देशून केलेले विधान आणि दोन्ही देशांतील सत्तास्थापनेनंतर लवकरच भेटण्याची त्यांनी व्यक्त केलेली इच्छा याबाबतचे सविस्तर वृत्त ‘द जेरुसलेम पोस्ट’ने प्रसिद्ध केले आहे. इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंध मोदींच्या २०१४च्या विजयानंतर दृढ झाले. जुलै २०१७ मध्ये इस्रायल दौऱ्यावर आलेले मोदी हे इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले, याकडे लक्ष वेधत मोदींच्या फेरनिवडीने उभयपक्षी संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास ‘द जेरुसलेम पोस्ट’मधील एका लेखात व्यक्त करण्यात आला आहे.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये ‘इंडियाज डेंजरस लॅन्डस्लाइड्स’ या शीर्षकाचा लेख आहे. या मोठय़ा विजयामुळे देशासाठी आवश्यक आर्थिक सुधारणांऐवजी मोदी हे हिंदू राष्ट्रवादाची भूमिका दुपटीने पुढे दामटण्याची भीती या लेखात व्यक्त करण्यात आली आहे. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने भारतीयांचे लेख प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी ‘मोदी वन पॉवर, नॉट द बॅटल ऑफ आयडियाज’ या डॉ. अमर्त्य सेन यांच्या लेखातही चिंतेचा सूर आहे. पत्रकार व लेखक पंकज मिश्रा यांनी याच वृत्तपत्रातील लेखात ‘भारतीय मतदारांनी दु:स्वप्न वाढू दिले आहे’, अशी टिप्पणी केली आहे. याउलट, ‘मोदींभोवती अनेक वाद निर्माण झाले. पण त्याचा त्यांच्यावर प्रतिकूल नव्हे, तर अनुकूल परिणामच झाला,’ असे निरीक्षण बरखा दत्त यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील ‘धिस इज मोदीज इंडिया नाऊ’ या लेखात नोंदवले आहे.

ब्रिटनच्या ‘द गार्डियन’च्या अग्रलेखात मोदींच्या विजयामुळे चिंतेचा सूर उमटला आहे. ‘स्वतंत्र भारताचा सर्वात मौल्यवान पैलू असलेली कार्यरत बहुपक्षीय लोकशाही मोदींनी धोक्यात आणली. हिंदू राष्ट्रवादाच्या चळवळीने भारताचा प्रवास अवनत केला आहे. कथित उच्चवर्णीय हिंदूंचे सामाजिक वर्चस्व, उद्योगपतीधार्जिणा आर्थिक विकास, सांस्कृतिक संरक्षणात्मकता, सरकारी संस्थांवर मजबूत पकड ही त्याची ठळक लक्षणे दिसू लागली आहेत. मुस्लिमांकडे दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून पाहिले जात आहे’, असे या अग्रलेखात म्हटले आहे. मोदींना पराभूत कसे करावे, याचा गांभीर्याने फेरविचार काँग्रेस आणि नेहरू-गांधी कुटुंबाला करावा लागेल, असेही त्यात म्हटले आहे.

हा धार्मिक राजकारणाचा विजय आहे, असे पाकिस्तानातील ‘डॉन’ या इंग्रजी वृत्तपत्राने अग्रलेखात म्हटले आहे. ‘धार्मिक द्वेष, सांप्रदायिक राजकारणाद्वारे मतदारांना भुलवता येते, हे या विजयातून स्पष्ट झाले. आता मोदींनी भारतीय उपखंडात शाश्वत शांततेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून, त्यासाठी पाकिस्तानशी शांतता चर्चा करावी’, असे मत त्यात नोंदवण्यात आले आहे. तर ‘अनेक आघाडय़ांवर अपयशी ठरलेल्या मोदींना विजयाची संधी काँग्रेसनेच दिली’, असे निरीक्षण पाकिस्तानच्याच ‘द न्यूज इंटरनॅशनल’मधील एका लेखात नोंदवण्यात आले आहे.

(संकलन : सुनील कांबळी)