आणीबाणी ही नरेंद्रची खरी गुरू. मॅनेजमेंटचे त्या दोन वर्षांत त्याने खरे शिक्षण मिळविले. सत्ता मिळविणे हे नवे वेड तेव्हापासून सुरू झाले. पहिल्यांदा अहमदाबाद कॉर्पोरेशनसाठी, मग गुजरातच्या जनसंघासाठी, नंतर भाजपसाठी व आता देशासाठी!
बडोदे म्हणजे गुजरातचे पुणे. सांस्कृतिक राजधानी. शिक्षणाचे माहेरघर. ही सारी सयाजीराव महाराजांची कृपा. गुजरातमधील इतर संस्थाने (सौ+राष्ट्रे) बडोद्याला आदर्श मानून आपल्या राज्याचा विकास साधू पाहत होती. जुनागडचा नवाब त्यास अपवाद. तो कुत्राकुत्रींची लग्ने लावण्यात मशगूल झाला होता.
हे सत्य डॉ. हेडगेवारांनी बरोबर हेरले. जेथे शिक्षणास महत्त्व दिले जाते तेथे आपोआप तरुण मंडळी ‘आम्ही अजून गुलाम का?’ याचा विचार करू लागतात. त्यातून राष्ट्रवाद जन्मास येतो व पसरू लागतो. म्हणून डॉ. हेडगेवारांनी ब्रिटिश इंडियापेक्षा हिंदू संस्थानांत संघाचे प्रचारक धाडले तर ते तेथे संघाचा विचार जास्त जोमाने व उत्साहाने रुजवू शकतील असे गणित मनाशी मांडले होते, ते गणित खरे ठरले.
विश्वास ठेवा किंवा ठेवू नका; पण त्यासाठी एक उदाहरण सांगतो. माझ्या बालपणी गोकरू मैदानावर संघाची शाखा भरावयाची. त्या वेळी चार-पाचच शाखा बडोद्यात होत्या. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री साऱ्या शाखा एकत्र यायच्या. त्या निमित्ताने खुद्द सयाजीराव महाराजांची सूनच संघाच्या स्वयंसेवकांना बदामाचे पेलाभर दूध देत असे! असले लाड आणि असले कोडकौतुक फक्त बडोदे संस्थानच करू जाणे!
मेहेंदळे नावाचे माझे कम्युनिस्ट मित्र सावरकरांना भेटले. साम्यवादी तत्त्वज्ञानानुसार त्यांनी राजेरजवाडय़ांवर तोंडसुख घेण्याचे चालू केले. त्याच्या पाठीवर थोपटत सावरकर म्हणाले, ‘बाळा, अजून तू लहान आहेस, पडद्यापाठीमागे काय राजकारण चालते याची तुला कल्पना नाही. ज्याची आपल्याला माहिती नसते त्याविषयी शहाणी माणसे चूप बसतात.’ मेहेंदळ्यांनी शेवटपर्यंत राजेरजवाडय़ांना शिव्याच दिल्या. मी मात्र डोळे व कान उघडे ठेवून पडद्यामागे राजकारण का, कसे व कोणते घडते, त्यावर लक्ष ठेवून आहे.
ही पाश्र्वभूमी ज्यांना माहीत नाही त्यांना मोदी समजणे अशक्य आहे.
लोंढे नावाचे पुण्याचे एक इंजिनीयर राजकोटला काम करीत व सायंकाळी संघशाखेवर नियमित जात. एकदा मुख्यमंत्री मोरारजी देसाई कामानिमित्त राजकोटला गेले होते. लोंढे त्यांच्या सेवेत होते. मोरारजी लोंढे यांना म्हणाले, या संघवाल्यांचा उदय या सौराष्ट्रातूनच होणार आहे. लोंढय़ांनी ‘तुम्ही असे का म्हणता?’ असा प्रश्न करताच मोरारजी म्हणाले, ‘ ‘गुजराती माणसाचा धंदा व्यापार करणे, पैसा कमावणे व मजेत संसार करणे. तुम्हा मराठा ब्राह्मणांचा धंदा देशसेवा करणे, देशाच्या हिताचा विचार करणे. तुम्ही पोटापाण्यासाठी येथे आलात; पण संध्याकाळी संघात जाण्याचे सोडीत नाही. हा वेडेपणा तुम्हीच करू जाणे. आणि हळूहळू तुम्ही आमच्या लोकांत ते वेड पसरवू पाहत आहात. धन्य आहे तुमच्या लोकांची!’
मोरारजीभाईंच्या दूरदृष्टीचे मला आश्चर्य वाटते. ज्या वेळेस हे संभाषण घडले त्या वेळी राजकोटमध्ये केशुभाई पटेल व शंकरसिंह वाघेला संघशाखेचे काम बघत व उरलेल्या वेळी सायकलवरून फिरत समाजसेवा करीत. त्यांना बाकीचा गुर्जर समाज ‘बे गांडाओ’ (दोन वेडे) म्हणून ओळखत होता.
राजकोटच्या दक्षिणेस मेहेसाणा जिल्हा. विसनगर व वडनगर ही त्यातली दोन छोटी शहरे. दोघांमधील अंतर पाच किलोमीटर्सचे. विसनगरला माझे काका ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट होते. मेहेसाणा गायकवाडी मुलुखातला. म्हणून तेथे आगगाडी होती. ‘दळणवळण व संदेश व्यवहार आधी पाहिजे’ यावर सयाजीराव महाराजांचा जास्त भर होता. प्रत्येक गावात नळाचे पाणी, शाळा व लायब्ररी पाहिजेच, हाही त्यांचा आग्रह होता. त्यांच्या तुलनेत ब्रिटिश इंडियातील गावांत कसलाच पत्ता नसे. म्हणून बऱ्याच वेळा गायकवाडी मुलखातील स्त्री घरी सून करवून घ्यायला नकार असे. कारण ती शिक्षित असे आणि सासू निरक्षर!
अशा वडनगरात ‘तिजो गांडो पाक्यो’ (तिसरा वेडा जन्मला). त्याचे नाव नरेंद्र मोदी. त्यांना वेड लावणारा मोठा वेडा- त्याचे नाव काशिनाथपंत दामले. हा तरुण सातारा जिल्ह्य़ातला. कोठे सातारा व कोठे वडनगर! वडनगरमध्ये ते एकुलते एक मराठी. त्यामुळे गुजराती, आपोआप शिकावेच लागले. ‘कॅच देम यंग’ हा संघाचा पायाचा सिद्धांत! मूळ कल्पना ऑलिम्पिक खेळाची. ती केरळच्या सर्कसवाल्यांनी उचलली. ती सर्कशीच्या माध्यमातून देवलांकडे, तेथून पं. सातवळेकरांकडे व तेथून हेडगेवारांकडे! कल्पना कोणाची, ते महत्त्वाचे नसते; ती कशी व कोण राबवतो, यावर सारे अवलंबून असते. मार्क्‍स जर्मन ज्यू, तेथून हाकलून  दिल्यावर ब्रिटिश लायब्ररीत काम करे व त्याचा वापर रशियाने करून रशियन क्रांती घडविली. साताऱ्याच्या दामल्यांनी नरेंद्रावर संघाचे संस्कार केले व संघाचे ‘वेड’ लागलेला हा मुलगा १९६२ साली रेल्वे स्टेशनावरून जाणाऱ्या सैनिकांना चहापाणी उत्स्फूर्तपणे देऊ लागला. का, तर ते भारत देशासाठी लढतात, म्हणून! दामल्यांनी नरेंद्रला आणखी एक वेड लावले. ते होते वाचनाचे वेड! सयाजीराव महाराजांमुळे सुदैवाने तेथे बऱ्यापैकी चांगले ग्रंथालय होते. चुकलेला फकीर मशिदीत सापडतो, तसा चुकलेला नरेंद्र वाचनालयात सापडे.
या वेडय़ास हिमालयात जाऊन साधना करावी असे आणखी एक वेड लागले. सुदैवाने ते दोनच वर्षे टिकले. सुभाषचंद्र बोस असोत, माधवराव गोळवलकर असोत की नरेंद्र मोदी असोत; यांना चांगले मार्गदर्शक साधू संन्याशी मिळूच नयेत असा ईश्वरी संकेत असावा. ईश्वरास त्यांच्याकडून अन्य काही कार्य (मिशन) करवून घ्यायचे असेल, काहीही म्हणा; पण ही सर्व मंडळी सुखरूप घरी परत आली व ‘एक जीवन, एक मिशन’ या न्यायाने आपल्या डय़ुटीवर परत रुजू झाली. हिमालयात नाही, पण गुजरातेत त्यांना सच्चा मार्गदर्शक लाभला. साताऱ्याचे व मोदींचे काही नाते असावे. कारण हा मार्गदर्शकही साताऱ्याचा! त्याचे खरे आडनाव खटावकर. शाहूने त्यांच्या पूर्वजांना काही गावे इनाम म्हणून दिली. म्हणून ते लक्ष्मणराव इनामदार झाले. १९३८ सालच्या हैदराबादच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. १९४३ ते १९७३ अशी तीन दशके त्यांनी गुजरातेतच संघाच्या प्रचारासाठी समर्पित केली. बडोद्यास असताना प्रथम डॉक्टर म्हणून व नंतर मित्र म्हणून मला त्यांचा चांगला स्नेह लाभला. इनामदार म्हणून त्यांना कोणी ओळखीत नसे. ‘वकीलसाहेब’ हीच त्यांची ओळख. सर्वसामान्य गुजराती माणूस साधेपणानेच राहतो. त्यामुळे त्यांची साधी राहणी लोकांसाठी निराळी नव्हती. पण कोणीही सल्ला मागितला तर सत्य, शक्य व हितकारक सल्ला ते देत. ते वकीलसाहेबांचे वैशिष्टय़ ठरले.
वकीलसाहेबांना माणसांची खूप छान पारख होती. प्रचारक नरेंद्र मोदींची प्रवृत्ती राजकीय चळवळीकडे आहे, हे त्यांच्या तेव्हाच ध्यानात आले होते. म्हणून ते नरेंद्रला सांगीत, ‘बेटा नरेंद्र, तुला वर यायचे असेल तर तुला चांगले शिक्षण घ्यावेच लागेल. नाही तर तुला नेहरू घराण्यात जन्म घ्यावा लागेल. ते आता शक्य नाही. उच्च शिक्षण घेणे मात्र शक्य आहे. आज ती सोय उपलब्ध आहे. पूर्वी नव्हती.’ लक्ष्मणराव वकिलांसारखा थंड डोक्याचा माणूस मी आजवर पाहिला नाही. ते नेहमी म्हणत ‘मला घाई नाही. मजजवळ खूप वेळ आहे.’ यावरून त्यांचा व माझा नेहमी वाद होई. मी म्हणत असे, ‘तुमच्यासारखे मी म्हणू लागलो तर सकाळपासून रात्रीपर्यंत मला पेशंट्सशीच बोलत बसावे लागेल.’ ते थंडपणाने म्हणत, ‘काय हरकत आहे?’ मोदींनाही ते आवडत नसे. पण गुरूविषयी एकही उलटा शब्द बोलण्याचे त्यांचे संस्कार नव्हते.
लक्ष्मणराव वकीलसाहेबांचा लकडा नसता तर नरेंद्र मोदी प्रत्यक्ष कॉलेजात न जाता ‘एम. ए. विथ पॉलिटिकल सायन्स’ होऊच शकले नसते. इंदिरेनी आणीबाणी पुकारली. लक्ष्मणराव त्याला शिकवायचे, ‘नरेंद्रा, खरा राजकारणी संकट आले असताना त्या  ‘कलॅमिटी’ चे ‘ऑपॉच्र्युनेटी’त रूपांतर करतो. ही तुझ्यासाठी सुवर्णसंधी आहे. प्रचारकाला आणीबाणीत काहीच काम नसते. तू आता पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण पुरे कर. माझे ऐक. सोनियाला माहीत नाही, की राजकारणाचे धडे त्यांच्या सासूच्या कृपेने मोदींना लाभलेले आहेत. नाही तर ‘मौत का सौदागर’’ सुखासुखी पंतप्रधान होऊ शकतो का? अगदी खरे सांगायचे तर मोदींचे खरे गुरू अहमदाबादेचे वसंतराव गजेंद्रगडकर. ते तेथील जनसंघाचे प्रमुख होते. नाथालाल झगडा, कांशीराम राणा, नरसिंह पडियार, केशुभाई पटेल, सूर्यकांत आचार्य, सुरेश मेहता, मकरंद देसाई, चिमणभाई शुक्ल हे सारे पहेलवान उस्ताद वसंतरावांचे शागीर्द. नरेंद्र मोदी त्या तुलनेत बच्चा. पण वसंतरावांनी बच्चाचे लाड खूप केले. वसंतराव इतर जनसंघीयांपेक्षा खूप वेगळे. पक्के राजकारणी. नानाजी देशमुखांप्रमाणे. एकाने जेपींना पोलीस लाठीमारापासून वाचविले. वसंतरावांनी नवनिर्माण चळवळीला ‘वापरून’ जनसंघास काँग्रेस-ओ व स्वतंत्र पक्षाबरोबरचे स्थान दिले. १२ जून १९७५ रोजी जनता मोर्चास यश प्राप्त झाले. २६ जूनला आणीबाणी जाहीर झाली. आणीबाणी ही नरेंद्रची खरी गुरू. मॅनेजमेंटचे त्या दोन वर्षांत त्याने खरे शिक्षण मिळविले. सत्ता मिळविणे हे नवे वेड तेव्हापासून सुरू झाले. पहिल्यांदा अहमदाबाद कॉर्पोरेशनसाठी, मग गुजरातच्या जनसंघासाठी, नंतर भाजपसाठी व आता देशासाठी! वसंतरावांचा मंत्र होता, ‘सत्ता मिळाली तर इतर सारी बांधणी करता येते. आमच्या लोकांना नेमके तेच कळत नाही.’
आणीबाणीत माझे घर गेस्ट हाऊस बनले होते. मोहन धारिया माझ्या घरातच राहत होते. ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, डॉ. लिमये वगैरे अनेक मंडळी माझ्याकडे राहून गेली. हुकूमशाहीच्या सागरात गुजरात व तामिळनाडू ही दोनच लोकशाही बेटे उरली होती. आमच्या घरी अखंड चर्चा चाले. तेथे एक तरुण कोपऱ्यात शांतपणे बसे व सर्व चर्चा ऐकत असे. चहापाण्यानंतर कपबशा विसळून स्वच्छ करी व पाहुण्यांना दाखवी. ‘साफ झाल्या आहेत ना?’ तेही ‘छान, एकदम स्वच्छ!’ म्हणून पावती देत. मी त्यास दाटत असे, ‘नरेंद्रा, तू प्रचारक. हे कपबशा धुण्याचे काम तुला शोभत नाही.’ तो म्हणे, ‘ही सारी समाजवादी मंडळी. आपण हिंदुत्ववादी. माझ्या या कामाने या दोघांतील अंतर कमी झाले तर तमने कांई वांदो छे?’ मी त्यावर म्हणे, ‘तुझा हेतू चांगला आहे. मग चालू दे तुझी नाटकबाजी.’
१६ तारखेला बडोदेकरांनी पावणेसहा लाख मताधिक्याने मोदींना निवडून दिल्याबद्दल आभाराचे भाषण झाले. भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद, और जोरसे बोलो, जयहिंद,’ अशी आपल्याला सवय झालेली आहे. पण मोदींनी ‘वंदे मातरम्’ अशी नवीन सुरुवात (शेवट) करून लोकांना ‘जग बदलत आहे’ याचा सुखद अनुभव दिला आहे. त्या भाषणात त्यांनी सयाजीराव महाराजांचे आभार मानले व ‘मला साऱ्यांना माझ्याबरोबर घेऊन पुढे जायचे आहे,’ असेही आश्वासन दिले. मला सुरेश भटांचे शब्द आठवले,
‘हे असे आहे
तरी हे असे असणार नाही,
दिवस अमुचा येत आहे
तो घरी बसणार नाही.’