मोदी म्हणजे गुजरात आणि गुजरात म्हणजे मोदी.. गोध्राकांड आणि दंगलीनंतर झालेल्या २००२ मधील गुजरात विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या एकतर्फी विजयानंतर मोदीउदय झाला आणि २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदींच्या प्रतिमेने सर्वोच्च पातळी गाठली. सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांचा विजयरथ थांबवण्याची धमक कोणीही दाखवली नव्हती. लोकसभा निवडणुकांवेळी तर ‘गुजरात नो बेटा, देश नो नेता’ या ओळीवर राज्यातील सर्व २६ जागा जिंकण्याची किमया भाजपने केली. फक्त गुजरातमध्येच नाही तर देश-परदेशातही मोदींची ‘गुजरात नो बेटा’ प्रतिमा आहे. त्यामुळेच पंतप्रधान झाल्यावर ते पहिल्यांदाच अमेरिकेत गेले, तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही ‘केम छो’ म्हणत त्यांचे स्वागत केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभाही त्यांच्या प्रतिमेप्रमाणेच! प्रचंड जल्लोष, खचाखच भरलेली मैदाने, मोदी..मोदी या घोषणांनी दुमदुमणारा परिसर आणि प्रत्येक वाक्याला येणारी प्रतिक्रिया.. २०१२ च्या विधानसभा आणि नंतर २०१४ मधील लोकसभा निवडणुकांवेळी सभांमध्ये सहभागी झालेले लोक आजही त्या आठवणी काढतात. या सभांच्या आठवणी काढण्याचे कारण म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने गेल्या पंधरवडय़ात मोदींनी घेतलेल्या २०हून अधिक सभा आणि काही सभांमध्ये पाहायला मिळालेल्या रिकाम्या खुर्च्या… मोदींच्या सभांसाठी माणसे जमवण्याची गरज नाही, या आत्मविश्वासपूर्ण समजातून बाहेर येत कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. राजकोटमधील सभेत १५ हजार क्षमतेचे मैदान पूर्ण भरण्यात स्थानिक नेते यशस्वी झाले. मात्र दोन तासानंतर आलेल्या मोदींनी भाषणाला सुरुवात केली आणि प्रेक्षक खुच्र्या सोडून उठून जाऊ  लागले. मोदींचे भाषण सुरू होऊन १५ मिनिटे उलटल्यावर अर्धेअधिक मैदान रिकामे दिसू लागले. ही अपवादात्मक स्थिती म्हणावी तर भरूच, धंदुका अशा अनेक ठिकाणी हीच स्थिती होती. भरूचमध्ये तर अध्र्या खुच्र्याही भरल्या नव्हत्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी सूरतमध्ये मोदींच्या सभेसाठी प्रचंड गर्दी झाली होती. मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच त्याचा उल्लेखही केला. मात्र त्यानंतर पुढच्याच दोन मिनिटांमध्ये चित्र पालटले. आत येण्यासाठी धडपड करणारी गर्दी एकमेकांना लोटत बाहेर पडू लागली आणि मोदींना टीव्ही कॅमेऱ्यांकडे पाहात भाषण करावे लागले.

लोकांना घरबसल्या टीव्हीवर भाषण ऐकायला मिळत असल्याने सभांना गर्दी कमी होते, अशी सारवासारव भाजपकडून केली जाते. मात्र त्याच वेळी लोकसंख्येमध्ये साधारण दहा टक्के असलेल्या पाटीदारांच्या पाठिंब्यावर हार्दिक पटेल लाखा लाखांची गर्दी जमवताना दिसत आहे. मोदी दिवसातून चार सभा घेतात, त्या सर्व टीव्हीवर दाखवल्या जातात. मोदी गेली १७ वर्ष सभा घेत आहेत, त्यामुळे त्यांच्या भाषणाची सवय झाली आहे. मोदी लोकांना आवडत असले तरी पुन:पुन्हा ऐकण्यासाठी लोक येत नाहीत. हार्दिक नवा आहे त्यामुळे त्याच्या सभांना गर्दी होते, हा युक्तिवाद कदाचित खराही असेल, मात्र गुजरातमध्ये मोदींची ‘जास्तीची मात्रा’ होत आहे, हे निश्चित.

गुजरात राज्याच्या निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदी वैयक्तिकरित्या लक्ष घालत आहेत. हे खरे तर येथील भाजपसाठी व भाजपच्या मतदारांसाठी लाजिरवाणे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचा निष्ठावंत मतदार असलेल्या व्यक्तीने दिली. राष्ट्राकडे लक्ष द्यायचे सोडून पंतप्रधानांना येथे यावे लागते, सभा घ्याव्या लागतात. त्यांच्याशिवाय राज्यात नेतृत्व करणारा चेहरा नाही, असे सांगताना मोदींच्या नावाआधी ‘मिस्टर’ किंवा ‘पीएम’ आणि नंतर ‘जी’ लावायला ते विसरले नाहीत. मोदींबद्दलचा आदर असो वा भय, पण सार्वजनिक ठिकाणी बोलताना गुजरातमध्ये मोदींचे नाव उपाधीसह येते. मोदी काहीही करू शकतात, आपण जे बोलतो तेही त्यांच्यापर्यंत पोहोचते, ही सुप्त भीती व्यावसायिकांच्या बोलण्यातून जाणवते आणि त्यामुळेच कोणीही सहज मोदीविरोध करत नाहीत. अगदी नोटबंदी आणि जीएसटीने व्यापाराचे कंबरडे मोडले असले, तरी भविष्याच्या दृष्टीने मोदींनी योग्य तोच निर्णय घेतला असल्याचे व्यापारी सांगतात. मोदी केंद्रात असले तरी राज्यात त्यांची व अध्यक्ष अमित शाह यांचीच सत्ता आहे आणि समजा राज्यातील सत्ता गेली तरी केंद्रातून ते अडचणी निर्माण करू शकतात, याची जाणीव येथील व्यापारी, व्यावसायिकांना आहे. भाजपलाच मत देणार असे येथील प्रत्येक व्यक्ती सांगते आणि त्यामुळेच निवडणुकांच्या निकालाबाबत आधीच भाष्य करणे कठीण आहे.

गेल्या नोव्हेंबरमधील नोटबंदीनंतर दोन महिने अंगडियांचा व्यवसाय पूर्ण बसला. त्यांच्या व्यवसायात सौराष्ट्रमधील काठियावाड प्रांताची मक्तेदारी आहे. संपूर्ण देशात कुठेही पैसे, दागिने आणि हिरे तात्काळ आणि अत्यंत कमी शुल्कात पोहोचवण्याचे अनधिकृत जाळे असलेल्या अंगडियांना व्यवसायात खोट आली. मात्र तरीही या व्यवसायातून अतिश्रीमंत झालेले व्यावसायिक आजही मोदींच्या बाजूने उभे आहेत. कारण मोदींसोबत राहिले तरच निवडणुकांनंतर व्यवसाय करता येईल, याची त्यांना जाणीव आहे, असे या सगळ्यांशी जवळून संबंध असलेल्या राजकोटमधील एका व्यक्तीने सांगितले. हीच जाणीव व्यापार, व्यवसायात पुढे असलेल्या गुजरातमधील शहरी भागात आहे. मोदींबद्दल जेवढा आदर आहे, तेवढेच त्यांच्याबद्दल भयही.

मोदींचे हे भय मोडत पहिल्यांदा त्यांना जाहीरपणे विरोध केला तो हार्दिक पटेलने. दोन वर्षांपूर्वी मेहसाणामधील त्याच्या सभेला लोटलेल्या गर्दीने त्याचे बळ वाढवले. आपलाच मुलगा आहे, असे समजत पाटीदार समाज मागे उभा राहिल्याने हार्दिक हे धाडस करू शकला. त्यासाठी त्याचे वय हेदेखील एक कारण आहे. बंडखोरी करण्याचे धाडस याच वयात येते. विशी-पंचविशीच्या या पिढीने गेल्या पाच वर्षांतील मोदी पाहिले आहेत. त्यामुळे मोदींचा करिश्मा त्यांना मान्य नाही. त्यामुळे पाटीदार समाजातील इतर तरुणही मोदींना समाजमाध्यमातूनही विरोध करतात. ज्या विकासाच्या प्रारुपावर मोदींनी भारत जिंकला तो ‘विकास गांडो थयो छे’ (विकास वेडा झाला आहे) असे सांगण्याचे धाडस याच तरुणांनी केले. गेल्या काही वर्षांत जल्पकांमुळे हैराण होण्याची वेळ विरोधकांवर येत असे. मात्र समाजमाध्यमांवर वर्चस्व असलेल्या या तरुणांनी मोदीसमर्थकांना भंडावून सोडले. गुजरात निवडणुका चर्चेत येण्यासाठी हा विरोधही कारणीभूत ठरला आहे. जीएसटीविरोधात व्यापाऱ्यांची संघटना रस्त्यावर उतरली होती. शेतकरी, दलित, ओबीसी, मच्छीमार संघटनाही सरकारी धोरणांना विरोध करत असल्या तरी त्यात मोदींवर वैयक्तिक टीका होणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र तरीही हळूहळू मोदीविरोधाला आवाज फुटू लागला आहे. मोदींच्या ‘हू छू गुजरात’ (मी गुजरात आहे) या प्रतिमेची उंची आणि भय कमी होते आहे.

प्राजक्ता कासले

prajakta.kasale@expressindia.com