23 January 2018

News Flash

जपावा जनांचा प्रवाहो

मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर साधलेला हा संवाद.

अनिकेत साठे | Updated: October 8, 2017 4:26 AM

नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल

अवघ्या चार ते पाच किलोमीटरच्या परिघात वसलेल्या त्र्यंबकेश्वरसारख्या गावात २००३-०४ च्या सिंहस्थ कुंभपर्वात लाखो भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांच्याशी मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर साधलेला हा संवाद. डॉ. सिंघल यांनी नांदेड येथील ‘गुरू दा गद्दी’ सोहळ्यात बंदोबस्तासह गर्दीच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळली होती. मुंबईतील रेल्वे स्थानक व तत्सम ठिकाणच्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी सांगितलेले काही उपाय.

सिंहस्थ कुंभमेळ्यासह अन्य धार्मिक उत्सवांमध्ये उसळणारी भाविकांची गर्दी असो, की मुंबईतील रेल्वे स्थानक वा तत्सम ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने ये-जा करणारे प्रवाशांचे लोंढे असोत. अभ्यासांती उपाय योजल्यास चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना निश्चितपणे कमी करता येतील. गर्दी कुठलीही असली तरी तिची मानसिकता वेगळी असते. गर्दीला खळाळत्या पाण्यासारखे प्रवाही ठेवणे आवश्यक ठरते. या प्रवाहात छोटा जरी अडथळा आला किंवा अनपेक्षित काही घडले तर काहीही घडू शकते. हे लक्षात घेऊनच एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकासारख्या घटना रोखण्यासाठी गर्दीच्या व्यवस्थापनाचे तंत्र आपल्याला विकसित करावे लागणार आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये २००३-०४ च्या कुंभमेळ्यात पोलीस अधीक्षक असताना गर्दी नियंत्रणाची सूत्रे लक्षात घेऊन नियोजन केले. त्यामुळेच दुर्घटनांची शक्यता शून्यवत करणे साध्य झाले. कमी जागेत मोठय़ा संख्येने नागरिक जमण्याच्या कोणत्याही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आव्हानात्मक असते. गर्दीचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास व्यक्तींचा समूह दीड फूट वा त्याहून कमी अंतरावरून परस्परांना ढकलू लागतो, तेव्हा गर्दीची घनता चिंताजनक अवस्थेत पोहोचते.  गर्दीच्या लाटा तयार होतात. एका क्षणी दबाव इतका वाढतो की एखादी लाट फुटते अन् चेंगराचेंगरीला सुरुवात होते. वेगवेगळ्या ठिकाणच्या अशा घटनांचा अभ्यास केल्यास गर्दीचे ‘लक्ष्याप्रति आकर्षण’ आणि  ‘भयभीत’ या दोन गटांत वर्गीकरण करता येईल. यामध्ये एक गर्दी लक्ष्याकडे धाव घेणारी असते, तर दुसरी एखाद्या लक्ष्यापासून दूर पळणारी असते.  गर्दी अकस्मात निर्माण होणाऱ्या स्थितीला तोंड देण्याची विवेकबुद्धी गमावून बसते. एखादी लहानशी घटना गर्दीचा मानसिक तोल ढासळण्यास कारक ठरू शकते. अशा वेळी सामाजिक बंधन अर्थात इतरांचा विचार वा मदत करण्याची मानसिकता लोप पावते.  काही समजण्याच्या आत पळापळीला सुरुवात होऊन गोंधळ उडतो. अशी स्थिती निर्माण होणार नाही, यासाठी आपण काही गोष्टी करणे आवश्यक आहे.

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकाची स्थिती वेगवेगळी आहे. यामुळे स्थानकनिहाय स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. सकाळचे काही तास आणि सायंकाळचे काही तास या वेळी त्या त्या स्थानक आणि सभोवतालच्या परिसरावर गर्दीचा सर्वाधिक दबाव असतो. त्या वेळी किती प्रवासी ये-जा करतात, फलाट व आसपासच्या परिसराची गर्दी सामाविण्याची क्षमता किती, याचे सर्वेक्षण करावे लागेल. एखादी लोकल रद्द झाली वा विलंब झाल्यास फलाटावरील गर्दीची घनता वाढते.  या स्थितीत स्थानकात नव्याने येणाऱ्यांना काही काळासाठी नियंत्रित करण्याची व्यवस्था करावी लागेल. बहुतांश रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना ये-जा करण्यासाठी एकच पादचारी पूल आहे. प्रवेशद्वारावर वेगळी स्थिती नसते. गर्दीचे परस्परांच्या विरुद्ध दिशेने धावपळ करणारे दोन प्रवाह असे मार्गस्थ होणे धोक्याचे आहे. अनेक ठिकाणी जिने दोन्ही फलाटांच्या मधोमध उतरतात. लोकलमधून उतरणारे आणि जिन्यांमधून ये-जा करणारे प्रवासी यांचाही असाच सामना होतो. पादचारी पूल, रेल्वे स्थानक प्रवेशद्वार या ठिकाणी ये-जा करण्याचे मार्ग स्वतंत्र ठेवण्याचा विचार गांभीर्यपूर्वक व्हायला हवा.  त्याकरिता ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा, स्वयंसेवक व दिशादर्शन फलकांची मदत घेता येईल.

स्थानकावर कोणत्याही फलाटावर जाण्यासाठी सर्वाना एक-दोन पुलांचा पर्याय आहे. इतकी गर्दी सामावण्यासाठी पुलांची संख्या कमी पडते. बाहेरील बाजूने त्या त्या फलाटावर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केल्यास गर्दीची विभागणी होऊन दबाव कमी करता येईल. प्रत्येक ठिकाणच्या अडचणी जोखून पायाभूत व्यवस्थेत मोठे बदल करण्याची तयारी ठेवावी लागेल.अकस्मात गर्दी वाढल्यास त्या मोकळ्या जागेचा उपयोग होईल. कमीतकमी वेळेत लोकांना आत घेणे आणि बाहेर काढण्यासाठी आतमध्ये येण्याचे व बाहेर पडण्याचे मार्ग सतत खुले राखण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वे पादचारी पूल आणि सभोवतालच्या फेरीवाल्यांना सरसकट हटविणे अनिवार्य आहे. स्थानकावरील अडथळे असेच दूर करावे लागतील. जिन्यातील एखादी तुटलेली फरशी दुर्घटनेला निमंत्रण देणारी ठरू शकते. कुठे तीव्र उताराची जागा असल्यास तो उतार कमी करण्याची आवश्यकता आहे. पाण्यामुळे जागा निसरडी होऊन एखाद्याचा पाय घसरला तरी अनर्थ ओढवू शकतो. अशा बारीकसरीक बाबींकडे लक्ष देऊन त्या अनुषंगाने नियमित दुरुस्ती व दक्षता घ्यावी लागेल. गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. उद्घोषणेद्वारे स्थितीनुरूप प्रवाशांना माहिती देता येईल. आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रबोधन करून तो शिक्षणाचा भाग व्हायला हवा, जेणेकरून आपत्तीला तोंड देतानाचे प्राथमिक ज्ञान अवगत राहील. अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये चढण्यासाठी येणाऱ्यांना गाडी सुटण्याच्या काही मिनिटे आधीच फलाटावर येण्यास सूचित करता येईल. अखेरीस गर्दीमुळे उद्भवू शकणारे धोके टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न, प्रबोधन व लोकसहभाग महत्त्वाचा आहे.

शब्दांकन – अनिकेत साठे

First Published on October 8, 2017 4:26 am

Web Title: nashik cp dr ravindra singhal observations on controlling crowds and avoiding stampedes
  1. No Comments.