शैक्षणिक गुणवत्तेत ‘ड’ श्रेणीत असलेल्या नाशिकच्या देवळा तालुक्यातील फांगदर वस्तीशाळेचा दोन वर्षांमध्ये झालेला कायापालट थक्क
करणारा आहे. शाळेचे बाह्य़स्वरूपच नव्हे तर शाळेत विद्यार्थ्यांकरिता राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जाही उंचावला आहे. शिक्षकांनी घेतलेल्या कष्टांमुळे आज ही शाळा ‘आयएसओ’ मानांकन मिळवणारी नाशिक विभागातील पहिली वस्तीशाळा ठरली आहे.
वाडी, वस्ती, तांडा, पाडय़ावरील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत म्हणून महाराष्ट्र सरकारने जुलै, २००१ मध्ये राज्यात वस्ती शाळा सुरू केल्या. देवळा तालुक्यातील खामखेडय़ाजवळ फांगदर या आदिवासी वस्तीवरही शाळा सुरू करण्यात आली. इयत्ता चौथीपर्यंतच्या या शाळेला सुरुवातीला धड इमारतही नव्हती. कधी खासगी कौलारू घर, कधी याच परिसरातील कांदा चाळ, तर कधी पत्र्याचे शेड अशा ठिकाणी आसरा घेत शाळेतील मुले शिकत राहिली. सरकारकडून अनुदान मिळाल्यामुळे शाळेची स्वत:ची इमारत बनली आणि तेव्हा कुठे शाळेला कायमस्वरूपी पत्ता मिळाला. आता या शाळेचा बाह्य़ परिसर हिरवाईने नटला आहे. शाळेच्या आत पाय टाकताच इथला प्रत्येक कोपरा ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीची साक्ष देतो. शाळेत जमिनीवरच्या वेगवेगळ्या तक्त्यांत खडूने मराठी जोडाक्षरे लिहिणारी, गणिते सोडविणारे विद्यार्थी दिसतात. जणू शाळेची फरशीच विद्यार्थ्यांची पाटी झाली आहे.
क्षेत्रभेट हे शाळेचे आणखी एक वैशिष्टय़. क्षेत्रभेटीमुळे अभ्यासक्रमातील अनेक गोष्टी समजून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत होते. कधी कधी शाळेच्या चार भिंतीपल्याड मोकळ्या डोंगरावरही ही शाळा भरते. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या सोबतीला असते ते मोकळ्या आभाळाचे पुस्तक.

उपक्रमशील शाळा
सतत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांमुळे तालुक्यातील सर्वाधिक ‘उपक्रमशील शाळा’ असा नावलौकिक या शाळेने मिळवला आहे. दोन वर्षांपूर्वी गुणवत्ता विकासात शाळा ‘ड’ श्रेणीत होती. परंतु अवघ्या दोन वर्षांत शिक्षकांचे अथक प्रयत्न आणि लोकसहभाग यामुळे फांगदर शाळेने अंतर्बाह्य़ बदल घडवून आणत थेट आयएसओ मानांकनालाच गवसणी घातली आहे. मुळात ही शाळा द्विशिक्षकी. परंतु शाळेचा हा कायापालट करण्यास शिक्षक खंडू मोरे आणि आनंदा पवार यांचे अपार प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.

heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात

भिंती-फरशी झाल्या बोलक्या
विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर टाकण्यासाठी दररोज एक प्रश्न विचारला जातो. प्रयोगशील शिक्षणाच्या बाबतीत इतर शाळांपेक्षा फांगदर एक पाऊल पुढे आहे. शाळेतील दोन्ही वर्गात जमिनीवर मुळाक्षरे, गणिताचे तक्ते रंगविण्यात आले आहेत. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना बेरीज समजावी म्हणून बेरीज चिन्ह असलेला एक तक्ता आहे. चार अधिक चार बरोबर आठ. हे शिकविण्यासाठी फळ्याचा आधार घेण्याऐवजी जमिनीवरील बेरजेच्या तक्त्यात वरील बाजूस चार खडे आणि खालील बाजूस चार खडे ठेवण्यात येतात. एकूण खडे किती झाले हे दर्शविण्यासाठी उत्तराच्या बाजूस आठ खडे ठेवले जातात. अशाच पद्धतीने मुळाक्षरेही शिकविली जातात. शाळेत मुलांच्या क्षमतांनुसार तीन गट तयार करून त्यांच्या गरजेनुसार तयारी करून घेतली जाते. वाचन प्रेरणा दिन इतर शाळांमध्ये वर्गात चार भिंतींआड साजरा झाला. फांगदर शाळेने मात्र तो निसर्गाच्या सान्निध्यात टेकडीवर जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांस एकेक धडा वाचावयास सांगून साजरा करण्यात आला.

हिरवाईने नटलेली शाळा
शालेय आवारातील वृक्षसंपदा व शाळेचे मनोहारी रूप भुरळ घालते. टेकडीच्या माथ्यावर टुमदार अशी शाळेची इमारत आकर्षक रंगरंगोटीने लक्ष वेधून घेते. आज तालुक्यातील सर्वात स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून फांगदर शाळेकडे पाहिले जाते. पिण्यास पाणी मिळणे मुश्कील असलेल्या ठिकाणी खडकाळ माळरानावर शाळा हिरवाईने नटली आहे. शालेय आवारात तीनशेपेक्षा अधिक झाडे आहेत. त्यात औषधी वनस्पतींचा बगीचा शाळेने विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केला आहे. शाळेत वॉटर फिल्टरच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या शिवाय सुसज्ज ग्रंथालय, प्रत्येक वर्गातील खिडक्यांना पडदे, विद्यार्थी-शिक्षकांना ओळखपत्र यामुळे ही शाळा तालुक्यात उठून दिसते.
शालेय आवारात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी झाडांवर बाटल्यांच्या साहाय्याने सुविधा केली आहे. त्यामुळे चिमणी, साळुंखी, कावळे यांसह विविध पक्ष्यांचा किलबिलाट शालेय आवारात ऐकू येतो.

लोकसहभागातून प्रगती
शाळेच्या प्रगतीत लोकसहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे. कोणत्याही शासकीय मदतीविना शाळेने लोकसहभागातून एका वर्गात ‘ई लर्निग’च्या माध्यमातून अध्ययन-अध्यापनाची सोय केली आहे. या शिवाय शाळेसाठी प्रोजेक्टर, संगणक, अ‍ॅम्प्लिफायर, हातपंप असे साहित्य ग्रामपंचायतीमार्फत मिळाले आहे. शाळेचे क्रीडांगणही लोकसहभागातूनच तयार झाले आहे. उमाजी देवरे, भाऊसाहेब देवरे, प्रभाकर शेवाळे या गावातील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून चारशे फुटावरून शाळेसाठी स्वत:च्या विहिरीवरून जलवाहिनी उपलब्ध करून दिली आहे. तर संजय बच्छाव यांनी शालेय कमान तयार करून दिली.

पहिली डिजिटल शाळा
तालुक्यातील पाहिली डिजिटल शाळा म्हणून फांगदर शाळेचा लौकिक आहे. संगणक, इंटरअ‍ॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टरवर शाळेत अध्यापन केले जाते. ई लìनग सुविधा शाळेत आदिवासी वस्तीवरील विद्यार्थी टॅबलेटच्या साहाय्याने शिक्षण घेत असल्याचे परिसरात मोठे अप्रूप आहे.

क्षेत्रभेटीला महत्त्व
अध्ययन व अध्यापन प्रक्रिया विविध उपक्रमांच्या माध्यमांद्वारे फांगदर शाळेत रंजक बनविण्यात आली आहे. पारंपरिक ‘खडू फळा’ या पद्धतीला फाटा देण्याचा प्रयत्न सुरू असून क्षेत्रभेट उपक्रमामागे चार भिंतींच्या आड मिळालेले ज्ञान बाहेरील जगाशी जोडणे हा उद्देश आहे. घोकंपट्टी पद्धतीच्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी त्यांना स्वयंअध्ययनास प्रवृत्त केले जात आहे. कधी टेकडीवर, कधी उघडय़ा मैदानावर विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उद्देशाने नेऊन विद्यार्थी व शिक्षकांमधील अनामिक भीती दूर कशी होईल, ते पाहिले जात आहे. नदी, घाट, लघु उद्योग, बायोगॅस प्रकल्प, आदर्श आधुनिक शेती, प्राथमिक आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, बँक, वीटभट्टी, कुक्कुटपालन उद्योग, साखर कारखाना, पोलीस ठाणे अशा अनेक ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. क्षेत्रभेटीमुळे अभ्यासक्रमात असलेल्या अनेक गोष्टी समजून घेण्यास मदत होते. या शिवाय विद्यार्थ्यांच्या माहितीतही भर पडते. शिक्षकांच्या धडपडीमुळे व ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा इथपर्यंतचा विकास घडून आला आहे. ही शाळा म्हणजे शिक्षण विभागासाठी भूषण असल्याची जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांची प्रतिक्रियाच शाळेविषयी सर्व काही सांगून जाते.

अक्षरांची रांगोळी
‘अक्षरधारा’ या उपक्रमांतर्गत गारगोटीच्या दगडांपासून, शंख-िशपल्यांपासून विद्यार्थी अक्षरांची रांगोळी रेखाटतात. या शब्दांना काना, मात्रा, वेलांटी, उकार यांची जोड देत नवीन शब्द तयार करण्यास शिकविले जाते. त्यांच्या नेहमीच्या खेळातल्या या वस्तू वापरून जोडशब्द शिकविण्याची ही न्यारी पद्धत विद्यार्थ्यांना भावते. प्रत्यक्ष कृतीतून शब्द तयार करण्याची अक्षरधारा पद्धत विद्यार्थ्यांवर लहान वयातच भाषेचे उत्तम संस्कार करते, असे शाळेचे शिक्षक खंडू मोरे सांगतात.

प्राणी-पक्षी-फुले आम्ही शाळेची वर्गात हजेरी लावण्याची
पद्धतीही मजेशीर आहे. हजेरीच्या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नाव पुकारल्यानंतर ‘हजर सर किंवा यस सर’ म्हणण्याऐवजी विद्यार्थी फळांची, फुलांची, प्राण्यांची, पदार्थाची मराठी अथवा इंग्रजी नावे घेतात. त्यामुळे दररोजची हजेरी कंटाळवाणी होत नाहीच; शिवाय विद्यार्थी वेगवेगळ्या फुलांची, फळांची, प्राण्यांची नावे शिकून येत असल्याने त्यांचा शब्दसंग्रह वाढण्यासही मदत होते. साधा हजेरीचा कार्यक्रमही शाळेने ज्ञानरचनावादी केला आहे.

 

संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com

अविनाश पाटील