राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स या सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील योजना याची माहिती या उद्योगाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक  आर. जी. राजन यांनी आमच्या प्रतिनिधीशी केलेल्या वार्तालापात दिली.
प्रश्न  : आपल्या कंपनीने देशाच्या आणि उद्योगाच्या क्षेत्रातील प्रगतीमध्ये चांगले योगदान कसे दिले आहे, याची माहिती  सांगा.
राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स, अर्थात आरसीएफ ही आमची कंपनी देशात खताचा उद्योग सुरू करणारी पहिली संस्था आहे. देशाची रासायनिक खतांची गरज भागविणे हे कर्तव्य आरसीएफने चांगल्या प्रकारे पूर्ण केले. त्यामुळे देशातील अन्नधान्यांचे उत्पादन वाढले व देशातील कोटय़वधी जनतेला अन्नसुरक्षा देण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला आरसीएफने मोठय़ा प्रमाणात मदत केली आहे.
१९६७ साली ‘सुफला’ या नावाने आम्ही प्रथम रासायनिक खते बाजारात आणली व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आरसीएफने पुढाकार घेऊन देशातील सर्वात प्रचंड आकारात खतनिर्मितीचा प्रकल्प थळ येथे १९८५ मध्ये स्थापन केला. त्यानंतर अनेक मोठे प्रकल्पही सुरू केले.
त्याआधी १९६६ मध्ये राष्ट्राच्या संरक्षणासंबंधीच्या आवश्यकतेला आरसीएफने प्रतिसाद दिला व देशातील पहिला मेथॅनॉल प्रकल्प स्थापन केला. त्यानंतर आरसीएफने आपल्या उत्पादनात विविधता आणली. औद्योगिक क्षेत्राला ज्यांची गरज आहे अशा रासायनिक पदार्थाची निर्मिती देशात आरसीएफमध्ये सुरू झाली. त्यामुळे आयात कमी झाली. हे आणखी एक आमचे योगदान आहे. आज डायमेथिल फॉर्मामाईड (DMF) आणि डायमेथिल अॅसेटामाईड (DMAC) या रासायनिक पदार्थाचे उत्पादन देशात फक्त आरसीएफमध्येच केले जाते. यावरून देशाच्या प्रगतीत आरसीएफचा वाटा कसा व किती मोठय़ा प्रमाणात आहे हे लक्षात येईल.
प्रश्न  : अलीकडे देशाची अर्थव्यवस्था काहीशी मंदावली असताना आरसीएफने त्यासाठी धोरणात काही बदल केले का?
होय. यासाठी आम्ही अनेक स्तरांवर प्रयत्न करीत आहोत. त्यातील पहिले महत्त्वाचे पाऊल म्हणजे आमच्या कारखान्यांतील ऊर्जावापर कमी करण्याकरिता आम्ही त्यांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करीत आहोत, तसेच आमच्या उत्पादन क्षमतेचा पुरेपूर १०० टक्के वापर करतानाच सर्व कामे अधिक विश्वासार्ह व सुरक्षितपणे कशी होतील यावर लक्ष देत आहोत. आमचा कच्चा माल व संसाधने वाया जाऊ नयेत म्हणून उपाययोजना केली आहे. शक्य तेथे अशा टाकाऊ पदार्थाचा पुनर्वापर करण्यावर भर देत आहोत. आमच्या मनुष्यबळाचाही जास्तीत जास्त चांगला वापर करीत आहोत. त्यातही काटकसर करीत आहोत.
प्रश्न  : आरसीएफ नवरत्न कंपनी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नेमके कोणते लाभ होतील?
आरसीएफ कंपनीची निवड ‘नवरत्न’ या श्रेणीसाठी झाली तर ती अधिक स्वायत्त होईल. कंपनीच्या संचालक मंडळाला गुंतवणुकीचे निर्णय लवकरात लवकर घेता येतील. कारण त्यांना त्यासाठी पब्लिक सेक्टर इन्व्हेस्टमेंट बोर्ड तसेच मंत्रिमंडळाची आर्थिक व्यवहार समिती यांची मंजुरी मिळवावी लागणार नाही. सध्या अशा मंजुरी मिळविण्यामध्ये लागणारा वेळ वाचेल.
प्रश्न  : आरसीएफचे भविष्यात नवीन प्रकल्प कोणते?
आरसीएफने काही नवे उपक्रम सुरू करण्याचे योजिले आहेत. यामुळे कंपनीचा दर्जा आणखी उंचावणार आहे. येत्या ५ वर्षांत आरसीएफ सुमारे रु. ६५०० कोटी एवढी भांडवली गुंतवणूक करणार आहे. थळ येथे ‘युरिया’ या प्रकल्पाचा विस्तार करून त्याची क्षमता १.२७ दशलक्ष करणार आहोत. याशिवाय तालचर येथे कोळशाच्या वायूवर आधारित असा दुसरा प्रकल्पही साकार होईल. त्याचीसुद्धा क्षमता १.२७ दशलक्ष टन असेल.
याशिवाय इराण व अन्य देशांत संयुक्त साहसी प्रकल्प सुरू करण्याची तयारी आरसीएफ करीत आहे. तेथे नैसर्गिक वायू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आफ्रिका व मध्यपूर्वेकडील देशांतील रॉक फॉस्फेट हा माल मोठय़ा प्रमाणात आहे. तेथे फॉस्फेटवर आधारित संयुक्त प्रकल्प सुरू करण्याचा आरसीएफचा प्रस्ताव आहे. तेथे तयार केलेली खते तसेच कच्चा माल भारतात आणता येईल व त्याचा येथील शेतीला उपयोग होईल. प्रश्न  : आरसीएफ सुरुवातीपासून मुंबई शहराच्या मध्य भागात कार्यरत आहे. यामुळे प्रदूषण व त्याचे नियंत्रण करणे याविषयी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले?
मुंबई परिसरात ट्रॉम्बे येथील आरसीएफचा कारखाना ५० वर्षांपासून तर थळ येथे ३० वर्षांपासून चालू आहे. मात्र या प्रदीर्घ काळात आम्ही पर्यावरणाचा चांगला दर्जा कायम राखला आहे. या सर्व काळात प्रदूषण कमी करण्यासाठी व पर्यावरणात सुधारणा करणाऱ्या योजनांत आरसीएफने मोठय़ा प्रमाणात खर्च केला. हरित चेंबूर या प्रकल्पात झाडे लावण्याची एक व्यापक मोहीम आरसीएफने राबविली, तसेच कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी (बेस्ट टू वेल्थ) कंपनीने विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये फोटो-जिप्सम या पदार्थापासून जड भार सोसण्याची क्षमता असलेले वॉल पॅनल्स आणि प्लॅस्टर तयार केले जातात. तसेच सांडपाण्यापासून पुन्हा वापरण्याजोगे पाणी निर्माण केले जाते. पर्यावरणाच्या संबंधातील माहिती व आधारसामग्री लोकांना कळावी म्हणून ती कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येते. आरसीएफ कंपनीने पर्यावरणाच्या क्षेत्रातील आयएसओ-१४००० अशी अधिमान्यता  मिळविली आहे आणि ती गेली १५ वर्षे अखंडपणे टिकविली आहे.

Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
Vijay Bhatkar
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
Decline in bad loans of public sector banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण