16 January 2019

News Flash

नक्षली हिंसा/ धमक्यांची कार्यपद्धती

नक्षलवाद संपवण्यासाठी नक्षल्यांची कार्यपद्धती आधी समजून घेणे

( संग्रहित छायाचित्र )

|| देवेंद्र गावंडे

नक्षलवाद संपवण्यासाठी नक्षल्यांची कार्यपद्धती आधी समजून घेणे आणि त्या कार्यपद्धतीचे दुवे खिळखिळे करणे गरजेचे आहे. नक्षली हिंसा व धमक्या त्यांच्या ‘प्रभावक्षेत्रा’तच प्रबळ असतात, हे ओळखणे आवश्यक आहे..

एटापल्ली तालुक्यातील कांदोडीची कमला आत्राम ही तरुण मुलगी आधी नक्षलवादी होती. दोन वर्षांनंतर पळून येत तिने आत्मसमर्पण केले. नंतरची चार वर्षे ती जिवाच्या भीतीने गावी न जाता गडचिरोलीतच वास्तव्याला होती. एका उन्हाळ्यात नातेवाइकाच्या लग्नाला हजेरी लावावी म्हणून एक दिवसासाठी गावात गेली. नक्षली तिच्या घरावरच चाल करून आले. कमलाची आई मध्ये पडली, पण तिला बाजूला करून कमलावर गोळ्या झाडण्यात आल्या. जबर जखमी कमलाला वेळेत उपचार मिळाले व ती वाचली. आठ वर्षांपूर्वीची ही घटना. तेव्हापासून कमला कांदोडीत गेली नाही, अहेरीत राहते. सांगायचे तात्पर्य हेच की, जे लक्ष्य निश्चित केले त्यापासून नक्षली अजिबात ढळत नाहीत व लक्ष्य कोण, याचा गवगवाही कधी करत नाहीत. त्यांनी चार वर्षे कमलाची वाट बघितली. ती सापळ्यात अडकल्यावर तिचे कुटुंब मध्ये पडले, पण त्यांना नक्षल्यांनी ठार केले नाही. या चार वर्षांच्या प्रतीक्षेची साधी कुणकुणसुद्धा नक्षल्यांनी कमला वा तिच्या गावाला लागू दिली नाही. हिंसाचार घडवताना वा कुणाचा खून करताना नक्षली अतिशय पद्धतशीरपणे काम करतात. विभागीय समिती सचिव व तिचे सदस्य सोडले तर इतर सहकाऱ्यांना मोहिमेचे स्वरूप काय, कुणाला लक्ष्य करायचे आहे, ठिकाण कुठे आहे किंवा स्फोटाचा सापळा कुठे रचला आहे, हेही ठाऊक नसते. अगदी ऐन वेळीच सर्वाना याची कल्पना दिली जाते. नक्षलवाद्यांचे शत्रू क्रमांक एक आहेत सुरक्षा दले व पोलीस. त्यानंतर या दलांना नियंत्रित करणाऱ्या अधिकाऱ्यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर राज्यकर्ते येतात. राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असोत, ते सापळ्यात अडकले तर त्यांना सोडायचे नाही, असे नक्षल्यांचे धोरण असते.

नक्षली असे सापळे नेहमी त्यांच्या प्रभावक्षेत्रात रचतात, बाहेर नाही. गेली अनेक वर्षे गडचिरोलीच्या जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या नक्षल्यांनी अजूनही गडचिरोली शहरात हिंसाचार घडवलेला नाही, यावरून ते प्रभावक्षेत्राच्या बाबतीत किती सजग असतात याची कल्पना येते. कुणाचीही हत्या करताना नक्षली ती उघडपणे करतात. साधारणपणे मागून वार करत नाहीत. हत्या झाल्यावर लाल सलाम जिंदाबादचे नारे देणे, ते शक्य नसेल तर एखादी चिठ्ठी मृतदेहाजवळ सोडून जबाबदारी घेणे, ही आजवरची ज्ञात नक्षलवादी कार्यपद्धती होय.

नक्षली ज्यांना शत्रू समजतात त्यांना लक्ष्य करण्यासाठी कधीही घाईघाईने निर्णय घेत नाहीत. योग्य वेळ व संधीची वाट बघणे हेच त्यांचे धोरण असते. छत्तीसगडचे महेंद्र कर्मा यांच्याशी नक्षल्यांची जाहीर दुश्मनी होती. ती दहा वर्षे चालली. कर्मा सोबत असल्यामुळे काँग्रेसच्या इतर अनेक नेत्यांना प्राण गमवावे लागले. या मृत्युकांडानंतर नक्षलवाद्यांनी इतरांना ठार केल्याबद्दल खेद व्यक्त केला. सलवा जुडूमचा बदला घेण्याच्या नादात अनावश्यक रक्तपात झाला. यावर नक्षल्यांच्या वर्तुळात नंतर बरेच मंथन झाले. भविष्यात लक्ष्य गाठताना सामान्यांना झळ पोहोचणार नाही, याची काळजी कशी घ्यायची, यावरही चर्चा झाल्याची माहिती नंतर समोर आली. हिंसाचार करताना नक्षली क्रौर्यच दाखवत असले तरी ते तेवढेच सजग असतात. बंदच्या काळात जाळपोळ करताना प्रवाशांना इजा होणार नाही, याची काळजी ते घेतात. ‘ही चळवळ जनतेच्या भल्यासाठी स्थानिकांची जल, जमीन, जंगल ही संपत्ती वाचवण्यासाठी आहे,’ या त्यांच्या प्रतिमेला तडा जाणार नाही, यासाठी ही काळजी घेतली जाते. तरीही सततच्या हिंसाचारामुळे स्थानिक जनता त्यांच्यापासून दूर जात असल्याचे चित्र देशाच्या बऱ्याच भागांत आता निर्माण होत आहे.

पोलीस, राज्यकर्ते यानंतर नक्षल्यांच्या शत्रूंमध्ये पोलिसांचे खबरी, स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले नेते, पोलीस पाटील, पोलिसांना जेवण देणारे, त्यांची कामे करणारे, लोकशाही व्यवस्था टिकावी म्हणून धडपड करणाऱ्यांचा समावेश होतो. या साऱ्यांना मिळतील तेव्हा ठार करा, असे नक्षलींचे धोरण नसते. प्रत्येकाच्या कृतीवर बराच काळ पाळत ठेवल्यावर मग मारण्याचा निर्णय घेतला जातो. त्यात बरीच वर्षेसुद्धा निघून जातात. शत्रूयादीत असलेल्या या लोकांच्या कुटुंबांना नक्षल्यांकडून सहसा लक्ष्य केले जात नसले, तरी याला अपवाद फक्त पोलिसांची कुटुंबे आहेत. ‘सी-६०’ मधील अनेक जवानांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही त्यांनी ठार केले आहे. त्यामुळे या जवानांची कुटुंबे आता दुर्गम भागात राहतच नाहीत.

सामान्य नागरिकांमधील जे चळवळीचे शत्रू आहेत, त्यांना ‘वर्गशत्रू’ संबोधले जाते व ठार करण्याच्या आधी गाव सोडा किंवा स्थानिक राजकारणातून बाहेर पडा असे सांगणे, विकासकामात सहभागी होऊ नका, पोलिसांना मदत करू नका, अशी तंबी नक्षल्यांकडून दिली जाते, त्यासाठी ‘जनता अदालत’सुद्धा भरवली जाते. मध्यंतरी नक्षलवादय़ांनी जिल्हाधिकाऱ्यांचे तसेच विदेशी पर्यटकांचे अपहरण करण्याचा सपाटा सुरू केला होता. परंतु यामुळे जनतेत रोष निर्माण होतो हे लक्षात आल्यावर हे प्रकार थांबवण्यात आले. पोलीस वगळता इतरांना मारण्याचा निर्णय हा ‘लक्ष्य’ कोण आहे हे बघून दलम, कंपनी अथवा विभागीय समितीच्या स्तरावर घेतला जातो. व्यक्ती मोठी असेल तर केंद्रीय समितीचे मत महत्त्वाचे ठरते. अशा व्यक्तीसंदर्भात वार्षिक बैठकीत बराच खल होऊनच निर्णय घेतला जातो.

पत्रकांतील सूचकपणा

नक्षलवादी जाहीर पत्रके काढून तसेच ध्वनिफितीच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतात तसेच शत्रूंना इशारे देत असतात. या पत्रकांत भाषेचा वापर अतिशय चतुराईने केला जातो. त्यांचे सहकारी मारले गेले तर भाषेचा लहजा थोडा कडक असतो. बदला घेतला जाईल, युद्ध आणखी तीव्रतेने लढले जाईल असेच त्याचे स्वरूप असते. एखाद्या व्यक्तीला जिवे मारायचेच आहे, असा नेमकेपणा या पत्रकांमध्ये नसतो. राज्यकर्त्यांच्या बाबतीतसुद्धा तशी थेट भाषा कधीच नसते. दहशतवादी वगळले तर गनिमी पद्धतीने काम करणारी कोणतीही संघटना मृत्युदंडाचे फतवे काढून कुणाला कधी ठार करण्याचे जाहीर करत नाही. नक्षलीसुद्धा त्याचेच अनुकरण करतात. धमकीची पत्रकबाजीदेखील, प्रामुख्याने त्यांच्या प्रभावक्षेत्रातच केली जाते. जास्तीत जास्त प्रसारमाध्यमांकडे पत्रके पाठवते. त्यापलीकडे जात नाही. कुणाच्या घरी वा कार्यालयात धमकीपत्र पाठवले जात नाही वा तसे कधी निदर्शनास आले नाही. पत्रकातील मजकूर माध्यमांकडून जनतेपर्यंत तसेच शासनव्यवस्थेपर्यंत पोहोचवणे एवढय़ापुरतेच या पत्रकबाजीचे उद्दिष्ट मर्यादित असते. नक्षलवादी कोणताही हल्ला करताना चळवळीचे कमीत कमी कसे नुकसान होईल, याची सर्वप्रथम काळजी घेतात.

त्यामुळेच आत्मघाती हल्ल्याचा पर्याय या चळवळीने कधीच स्वीकारला नाही. नव्वदच्या दशकात नक्षल व लिट्टे यांच्यात संपर्क प्रस्थापित झाला होता. एकमेकांना प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रमसुद्धा पार पडले. त्या वेळी चळवळीत आत्मघाती हल्ल्याची पद्धत स्वीकारायची की नाही, यावर बराच खल झाला, पण यात शत्रूसोबत आपलीही माणसे गमवावी लागतील हे लक्षात आल्यावर हा विचार मागे पडला. लिट्टेच्या संपर्कानंतर नक्षल्यांनी बालकांना चळवळीत सहभागी करून घेण्याची पद्धत मात्र स्वीकारली. आजही सर्वाधिक बालके व किशोरवयीन मुले यांची भरती नक्षलवादय़ांनी केली आहे व संयुक्त राष्ट्रसंघानेसुद्धा याबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे.

प्रभावक्षेत्रातील सामान्य जनतेला दहशतीत ठेवण्यासाठी वर्गशत्रू ठरवून हत्या करायच्या, पण पोलीस जवान वगळता वर्गशत्रूंची सामूहिक हत्याकांडे करायची नाहीत. शत्रूविषयी कणव, आस्था निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करायचे नाही याची काळजी ही चळवळ घेत असली तरी नक्षलींकडून अनेकदा गंभीर चुकाही घडल्या आहेत. मध्यंतरी छत्तीसगडमध्ये त्यांनी एका चार महिन्यांच्या मुलीला ठार मारले. काही वर्षांपूर्वी लग्नाची वरात घेऊन जाणारे वाहन उडवले. त्यात बारा निष्पाप नागरिक मारले गेले. २००६ मध्ये एका चकमकीत ठार झालेल्या महिला शिपायाच्या प्रेताची विटंबना केली. असे प्रकार घडल्यावर माफीनामे अथवा स्पष्टीकरण देण्याचा प्रकार नक्षलवादय़ांनी अनेकदा केला आहे. अंतर्गत संवादासाठी सांकेतिक भाषेचा वापर कटाक्षाने करणे हे या चळवळीचे धोरण आहे. साईबाबा प्रकरणानंतर हा संवाद साधताना नक्षली जास्तच सतर्क झाले आहेत. बनावट नावाने संवाद, शस्त्र व दारुगोळ्याचा थेट उल्लेख न करणे ही पथ्ये या चळवळीकडून आवर्जून पाळली जातात.

शहरी भागात ही चळवळ शस्त्रधारी कॅडरचा वापर कधी करत नाही. शिवाय शहरी भागात शासनाविरुद्धच्या असंतोषाला हिंसाचारात परावर्तित करण्यासाठी पुढाकार घेणे, हा पुढाकार कुणाच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेणे, सरकारविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी लोकशाही मार्गाने जाणारी आंदोलने करणे, ही आंदोलने कशी चिघळतील यासाठी प्रयत्न करणे, लोकशाहीवादी संघटनांमध्ये घुसखोरी करणे, मुख्य म्हणजे असंतोषाच्या संधी शोधणे हेच काम नक्षलवादय़ांकडून आजवर होत आले आहे. लोकशाही व्यवस्थेला सर्वात मोठा धोका नक्षलींकडून आहे. त्यामुळे राजकारण न करता ही प्रवृत्ती वेळीच ठेचून काढणे हेच साऱ्यांच्या हिताचे आहे.

devendra.gawande@expressindia.com

First Published on June 14, 2018 2:30 am

Web Title: naxalite violence