पक्षांचे युद्धकक्ष
निवडणूक म्हणजे युद्धच. प्रचाराची धुमाळी, टीकेच्या तोफा, आश्वासनांचे नगारे आणि घोषणांच्या तुताऱ्या अशा गदारोळात खेळली जाणारी लोकशाहीतील लढाई. या लढाईत हल्ली दूरचित्रवाणी आणि इंटरनेट यांना कधी नव्हे इतके महत्त्व आले आहे. म्हणूनच निवडणुकीचे डावपेच आणि धोरणे जेथे ठरतात त्या खलबतखान्यांमध्येही आज माध्यम आणि संगणकतज्ज्ञांशिवाय पान हलत नाही. किंबहुना जुन्या खलबतखान्यांची जागा या नव्या, आधुनिक तंत्रमंत्रावर चालणाऱ्या वॉर रूमने घेतली आहे.

कसे असतात हे युद्धकक्ष? कसे चालते तेथील काम? यावर एक नजर..
यंदाच्या निवडणुकीच्या हंगामात सोशल मीडिया आणि राजकीय पक्षांची संकेतस्थळे यांना भलतेच महत्त्व आले आहे. गेल्या दहा वर्षांत जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाइल पोहोचला. कार्यालयांत टेबलावर संगणक स्थिरावले आणि फेसबुक-ट्विटरची चलती झाली. त्यामुळे राजकीय प्रचारासाठी मोठय़ा प्रमाणात सोशल मीडियाचा वापर सुरू असलेली भारतातील ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. सर्वसाधारणपणे भाजप हाच या खेळात आघाडीवर असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. पण एरवी ग्रामीण भागातला पक्ष अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही यंदा तरुण मतदारांची वाढती संख्या आणि त्यांच्यावर असलेला सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेऊन एरवी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया’लाही (मनात) नाक मुरडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने या वेळी ‘टेक सॅव्ही’ पिढीला आपलेसे करण्यासाठी थेट एक व्यावसायिक कंपनीच कामाला लावली आहे. राजकीय प्रचारातील बदलते रूप व त्याची अपरिहार्यता यातून अधोरेखित होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, नेत्यांची भाषणे, महत्त्वाचे विधान, एखाद्या प्रश्नावरील प्रतिक्रिया, दुसऱ्या नेत्याच्या विधानावरील प्रतिक्रिया-प्रतिटोला तातडीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईत ३५ जणांची टीम कार्यरत आहे. पक्षनेत्यांनी एखादे महत्त्वाचे विधान केले, प्रचारसभेत भाषण झाले की लागलीच त्याची माहिती पोहोचते. पहिले काम होते ते भाषणाचा सारांश काढून १४० शब्दांत ‘ट्विटर’वर टाकला जातो. त्यानंतर लागलीच ४० ते ५० शब्दांत एक ‘पोस्ट’ तयार करून ती फेसबुकवर पडते. काही वेळात जवळपास ३०० शब्दांची माहिती बातमी स्वरूपात पक्षाच्या संकेतस्थळावर पडते. ध्वनिचित्रफीत असेल तर ती फेसबुकबरोबरच यूटय़ूबवर टाकली जाते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेले महत्त्वाचे विधान अशा रीतीने अवघ्या काही क्षणांत राज्यभरातील सुमारे दोन लाख ३० हजार फेसबुक वापरकर्त्यांच्या टाइमलाइनवर पडते.
हे सारे घडते ते राज्यभरात नेमलेल्या सुमारे १२ ‘स्ट्रिंजर’च्या आणि ई-कार्यकर्त्यांच्या मदतीने. प्रचारकाळातील ही सारी माहिती मिळवण्यासाठी दोन-तीन जिल्ह्य़ांत एक याप्रमाणे जवळपास १२ स्ट्रिंजर नेमण्यात आले आहेत. ते बातमी, छायाचित्र, ध्वनिचित्रफीत मुंबईत पाठवत असतात. अर्थात प्रचाराच्या या रणधुमाळीत इतक्या कमी माणसांत काम भागत नाही. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे ४०० कार्यकर्त्यांची ई-कार्यकर्ते म्हणून मदत घेत आहोत. ही मंडळी पक्षकार्य म्हणून ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या माध्यमातून झालेल्या घटनेची, भाषणांची माहिती तातडीने ‘शेअर’ करतात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे, असे ‘ड्रायव्हिंग माइंड्स इनोव्हेशन प्रा. लि.’चे मुख्य संपादक पराग पाटील यांनी सांगितले.
शरद पवारांचे विधान-प्रतिक्रिया पडली की जवळपास ६० ते ७० हजार लोक ते काय म्हणत आहेत हे पाहतात.
तरुणाईच्या या सोशल मीडियात थोरल्या पवारांपेक्षा अजितदादांचा बोलबाला अधिक आहे. त्यांचे एखादे भाषण फेसबुकवर पडते. एखादे विधान-प्रतिक्रिया पडली की अजितदादा काय म्हणतात या उत्सुकतेपोटी जवळपास लाखाहून अधिक फेसबुक मंडळी ते पाहतात असे दिसून आले आहे.
सर्वसाधारणपणे राजकीय पक्षांचे संकेतस्थळ व त्यावरील माहिती प्रचारकी असते. आता हे तर स्वाभाविकच की असा प्रश्न कोणीही विचारेल. पण राष्ट्रवादीच्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर त्यात प्रचाराबरोबरच संवादावरही भर असल्याचे दिसते. ‘हाऊ टू’ नावाचा एक पर्याय यावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. पॅन कार्ड कसे काढावे, ऑनलाइन बँकिंग कसे करता येईल अशा दैनंदिन उपयोगाच्या गोष्टींचा त्यात समावेश आहे. केवळ पक्षाची बातमी, माहिती असली की लोक कंटाळतात याचे भान ठेवून राजकारणात ज्याप्रमाणे लोकांच्या उपयोगाची चार कामे केली जातात त्याच धर्तीवर संकेतस्थळावर आलेल्यांना काही उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. लोकांचा असा विचार हा साहजिकच वेगळा ठरतो.
राजकीय पक्षाचे संकेतस्थळ वा सोशल मीडियाचे माध्यम हे केवळ प्रचारकी नसावे असा आमचा हेतू होता. ते लोकांशी संवाद साधणारे हवे तरच पक्षाबद्दल लोकांबद्दल आपुलकी निर्माण होऊ शकते. पुण्यातील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांने अडगळीत पडलेल्या सायकली गोळा केल्या. त्यांची दुरुस्ती केली आणि शाळा सुमारे नऊ किलोमीटर दूर असलेल्या एका गावातील मुला-मुलींना जाऊन त्या दिल्या. आम्ही याची माहितीही संकेतस्थळापासून फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली. त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियाचा वापर करताना निव्वळ प्रचार नको तर संवाद हवा या भूमिकेला लोकांची मिळालेली ती पसंती होती, असे ‘ड्रायव्हिंग माइंड्स’चे संचालक नितीन वैद्य यांना वाटते.
‘वॉररूम’ म्हणूनही वापर
या सोशल मीडिया छावणीचा वापर काही प्रमाणात पक्षाची वॉररूम म्हणूनही होतो. राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या राज्यातील २१ लोकसभा मतदारसंघांत जनमानस काय आहे? त्यांच्या दृष्टीने कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत? याचा कानोसा घेण्यासाठी ‘तुमच्या मतदारसंघातील प्रमुख पाच प्रश्न कळवा’ असे आवाहन करण्यात आले. प्रत्येक मतदारसंघातून जवळपास सातशे ते आठशे लोकांनी प्रतिसाद दिला. लोकांकडून आलेल्या या प्रश्नांची माहिती आणि हे प्रश्न कळवताना उमटलेल्या प्रतिक्रिया आणि लोकांनी लगावलेले टोले हा सारा ‘फीडबॅक’ पक्षाला कळवला गेला.

‘लाइव्ह चॅट’ जोरात
फेसबुकवरील ‘लाइव्ह चॅट’ या माध्यमाचा वापरही ‘राष्ट्रवादी’ने जोरकसपणे सुरू केला आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचे सहा, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचा एक आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचा एक असे आठ ‘लाइव्ह चॅट’ पार पडले आहेत. प्रत्येक वेळी १२०० ते दोन हजार प्रश्न लोकांकडून या नेत्यांना विचारले गेले.