हर्षद कशाळकर harshad.kashalkar@expressindia.com

कोकणात नारळाची लागवड मोठय़ा प्रमाणात होत असली, तरी त्यावर आधारीत प्रक्रिया उद्योग फारसे सुरू होऊ  शकले नाही. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांप्रमाणे कोकणातही नारळ प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

नारळाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. कारण नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागापासून उपयुक्त वस्तूंची निर्मिती होऊ  शकते. पण कोकणात कल्पवृक्षाची संकल्पना कालबा होत चालली आहे. शहाळी आणि नारळ विक्रीपलीकडे या पिकाचा फारसा वापर होतांना दिसत नाही. कोकणात ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर नारळाचे उत्पादन घेतले जाते. यातील ९० टक्के ठिकाणी या वृक्षाचा उपयोग केवळ नारळ आणि शहाळी विकण्यासाठी केला जातो. शहाळ्याची तसेच नारळाची चौडंही (शहाळय़ाची साल) फेकून दिली जातात. नारळाच्या इतर भागांचा वापर करून वस्तूंची निर्मिती करण्याचे प्रमाण नगण्य आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोकणात नारळावर प्रक्रिया करणारा एकही मोठा उद्योग सुरू होऊ  शकलेला नाही.

नारळावर प्रक्रिया करून विविध प्रकारची उत्पादने घेतली जाऊ  शकतात. प्रक्रिया करून टाकून देण्यात येणाऱ्या करवंटी आणि चोडांपासून दागिने, शर्टाची बटने, शोभेच्या वस्तू, चूल आणि तंदूरमध्ये  जाळण्यासाठी कोकोनट चारकोलच्या वडय़ा तयार केल्या जाऊ  शकतात. नर्सरी आणि गार्डनिंग उद्योगासाठी कोकोपीठ तयार केले जाऊ  शकते. जे मातीतील ओलावा टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. शहाळ्यातील नारळावर प्रक्रिया करून उच्च प्रतीचे तेल तयार केले जाऊ  शकते. या तेलाला सौंदर्यप्रसाधन उद्योगात मोठी मागणी असते.

कोकणात नारळ प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न सुरु आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. पण या प्रयत्नांना फारसे यश मिळताना दिसत नाही. विशेष बाब म्हणजे कोकणातील काही तरुणांनी याबाबतचे प्रशिक्षण सुरू केले असले तरी उद्योगांचे प्रशिक्षण घेतले असले तरी उद्योग सुरू होऊ  शकलेले नाही.

बागांची निगा राखण्यात झालेल्या दुर्लक्षामुळे नारळाच्या उत्पादनात मोठी घट होताना दिसते आहे. अशातच इरीयोफाईड आणि पांढरी माशीसारख्या रोगांच्या प्रादुर्भाव बागायतदारांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. पाडेकरी मिळणे दुरापास्थ झाल्याने बागांची निगा राखण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे अनेक बागायतदार या पारंपरिक पिकापासून दुरावले जाऊ  लागले आहेत.

नारळाचे उत्पादन वाढवणे गरजेच आहे. दुसरीकडे नारळापासून तेल, काथ्याउद्योग, जेली प्रॉडक्ट सुरु केले जाऊ  शकतात. याशिवाय काजू फेणीप्रमाणे नारळ फेणी बनवून मद्यनिर्मिती केली जाऊ  शकते. पण यासाठी गरज आहे ती सकारात्मक दृष्टिकोनाची. केरळच्या धर्तीवर नारळावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाले. तर कोकणातील नारळ बागायतदारांना चांगले दिवस येऊ  शकतील.

रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे काही वर्षांपूर्वी काथ्यावर आधारित एक छोटेखानी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला होता. मात्र त्यासाठी लागत असणाऱ्या काथ्या केरळमधून आणावा लागत होता. नारळाच्या चोडापासून काथ्या तयार करण्याचे तंत्रज्ञान कोकणात विकसित होऊ न शकल्याने हा उद्योग कालांतराने बंद पडला. अलिबाग तालुक्यातील शहाळ्याच्या पाण्यापासून कोकोनट जेली तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. शहाळ्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्यात नारळाचे तुकडे टाकून जेली तयार केली जात आहे. लहान मुले आणि पर्यटकांकडून या जेलीला चांगली मागणी होत होती. पण क्षमता असूनही या प्रकल्पाची व्याप्ती वाढू शकलेली नाही.

भारतातील काथ्या उद्योगाचा इतिहास

भारतात काथ्या उद्योगाची सुरुवात ब्रिटिश कालखंडात झाली. जेम्स डाराघ आणि हेन्री स्मेल या दोन ब्रिटिश नागरिकांनी काथ्या उद्योगाची सुरुवात केली. केरळ येथील अलेप्पी येथे देशातील पहिला प्रकल्प सुरु करण्यात आला. त्यानंतर तो तिथे बहरला, आज केरळमध्ये जवळपास चार लाख लोकांना काथ्यावर आधारित उद्योगातून रोजगार उपलब्ध झाला आहे. ज्यात ८४ टक्के महिलांचा समावेश आहे. देशात आज १५ हजारहून अधिक काथ्या प्रक्रिया उद्योग आहेत. ज्यातील बहुतांश उद्योग हे केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यात आहे. देशातील एकूण काथ्या उद्योगापैकी ५७ टक्के उत्पादन एकटय़ा केरळमध्ये होते. त्याखालोखाल तामिळनाडू मध्ये २५ टक्के, ओडीसात ५ टक्के, आध्रप्रदेशमध्ये ५ टक्के तर कर्नाटकमध्ये ४ टक्के काथ्यांचे उत्पादन घेतले जाते. क्षमता असूनही महाराष्ट्रात काथ्या उद्योग बाळसे धरू शकलेला नाही. कोकणात नारळ लागवडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथे कॉयर बोर्डाचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र कोकणात तरीही नारळ लागवड आणि नारळ प्रक्रिया उद्योग वाढीस लागलेले नाहीत.

नारळ प्रक्रिया उद्योगातील संधी..

कोकणात नारळ लागवडीला मोठा वाव आहे. समुद्रकिनारी आणि खाडीलगतच्या परिसरात नारळ लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाऊ  शकते. खारजमिनीतही नारळ लागवड शक्य असल्याचे जाणकार सांगतात. कमी जागेतही यातून चांगले उत्पादन मिळू शकते. नारळाच्या काथ्यांचा वापर करून दोऱ्या, पायपुसणी, ब्रश, झाडू यांसारख्या वस्तू बनविल्या जाऊ  शकतात. गाद्या, रजया यांची निर्मिती केली जाऊ  शकते. कोकोपिट, कंपोस्ट खत कृषी उद्योगासाठी उपयुक्त ठरू शकतात. जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच रस्ते निर्मितीसाठी काथ्याचा वापर केला जाऊ  शकतो. तर नारळावर प्रक्रिया करून अनेक खाद्यपदार्थ आणि तेल निर्मिती केली जाऊ  शकते.

कोकणात नारळ प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे. या उद्योगांसाठी  लागणारे तंत्रज्ञान आणि मशिनरी सहज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. शेतकरी आणि बागायतदारांना काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळत नाही. आणि बागायतदारांची नारळ आणि शहाळे यापलीकडे विचार करण्याची मानसिकता बदलत नाही तोवर यात फरक पडणार नाही.

अरविंद केळकर, संचालक. श्री कॉयर, मॅन्युफॅक्चरींग श्रीवर्धन