नरेंद्र दाभोलकरांचा आणि माझा परिचय साधारणत: ४५ वर्षांचा आहे. युवक क्रांती दलाची स्थापना झाल्यानंतर त्याने संघटनेमध्ये यावे म्हणून मी त्याला भेटण्यासाठी मिरजेला गेलो होतो. मिरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये तो शेवटच्या वर्षांला शिकत होता. साताऱ्यात तो कबड्डी संघ चालवत होता. त्यात सर्व पक्षांचे लोक असल्यामुळे तो युक्रांदमध्ये प्रत्यक्ष आला नाही. तथापि, युक्रांदच्या सर्व शिबिरांना साताराचे कार्यकर्ते येत असत. साधारणत: एकाच  धोरणाने आम्ही कार्यक्रम घेत असू. १९८०-८१ चा काळ. साताऱ्यामध्ये एक महाराज आले होते. अंधश्रद्धा रुजविणारी त्यांची प्रवचने लोकप्रिय होती. मुख्य वक्ता म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी मला बोलावले. साताऱ्यातील वातावरण तंग होते. डीएसपी राजवाडे ‘सभा घेऊ नये,’ अशी विनंती करीत होते. नरेंद्रचा स्वभाव तसा मवाळ व समन्वयवादी. त्याने मला विचारले, काय करायचे. मी म्हणालो, आपली सभा झालीच पाहिजे. सभा रद्द केली तर ही मंडळी प्रत्येक ठिकाणी आम्ही सभा उधळू असे वातावरण निर्माण करतील.  सनातनी मंडळींनी आमच्यावर अंडी फेकली पण शेवटी ती सभा पूर्ण झाली.
आज सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पाठीमागून गोळ्या झाडून पुण्यात हत्या झाली हे कळल्यावर माझ्या मनात सारखा विचार येत होता, की हा माणूस सर्वाना सांभाळून घेणारा, समन्वयवादी.. असे असून त्याच्या वाटय़ाला हा भयंकर प्रकार कसा आला. ही बातमी ऐकून मी सुन्न झालो होतो. ही घटना अगदीच अनपेक्षित होती. धर्माध व जात्यंध शक्तींना नरेंद्रची हत्या करून काही संदेश तर द्यायचा नसेल? तुम्ही सौम्य असा, समन्वयवादी असा; पण आमचा खेळ अंधश्रद्धेवर चालतो. त्याला तुम्ही हात घालता, त्यामुळे तुम्हाला आम्ही सोडणार नाही. पुरोगामी विचाराच्या चळवळीतील सौम्य माणसालासुद्धा आम्ही शिल्लक ठेवणार नाही..  मग इतरांची काय कथा.  नरेंद्र मोदी आल्यापासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा चालू झाली आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढय़ातून जाती-धर्मनिरपेक्षता, समता, बंधुत्व अशी जी मूल्ये उजळून निघाली तिचा अस्त करणे. मध्यममार्गी, पुरोगामी व डाव्या विचारांच्या पक्षांची लोकप्रियता कमी झाली आहे. त्याच्यामुळे धर्माध व जात्यंध  शक्तींचा धीटपणा वाढला आहे. धर्माध व्यक्ती वा शक्ती यांची वागणूक तर्कसंगत नसतेच कधी. प्रतिगामी विचार म्हणजे एक प्रॉपर्टीच असते. त्या प्रॉपर्टीला धक्का लावलेला सहन होत नाही. नरेंद्र दाभोलकरांशी वादविवाद करून त्यांना या शक्ती हरवू शकत होत्या, पण त्यांचा चर्चेवर विश्वासच नाही. शिवाय धर्माध शक्तींच्या लेखी माणसाची किंमत शून्य असते. म्हणून माणसांची हत्या  करणाऱ्याबाबत ना खेद ना खंत!
या घटनेनंतर दोन गोष्टी करणे आवश्यक आहेत. जिथे-जिथे किमान एक पुरोगामी माणूस असेल त्याने या प्रकारचा निषेध जाहीर रीत्या नोंदवला पाहिजे. त्यामुळे ही हत्या करण्यामागे जे सूत्रधार असतील त्यांना कळून चुकेल, की  समाजाला असे प्रकार आवडत नाहीत. दुसरी अपेक्षा आहे ती महाराष्ट्र शासनाकडून. गेली सतराअठरा वर्षे ही वा ती सबब सांगून दाभोलकरांनी मांडलेले जादूटोणा विधेयक अजून कायद्यात रूपांतरित झाले नाही. एका अर्थी त्या विधेयकाची ही थट्टाच झाली. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आवाहन करतो, की त्यांनी या घटनेनंतर जादूटोणा बिल विधानसभेत संमत कसे होईल हे पाहिले पाहिजे अन्यथा अशाप्रकारे हत्या केल्याने कार्यभाग साधला जाईल असा समज पसरेल. कठोरपणे जादूटोणाविरोधी बिल पास केले तर मात्र हत्या करून जनमानसाचा प्रभाव वेगळ्या दिशेने नेता येत नाही हे संबंधित शक्ती समजून घेतील.
कुठलाही विचार खोडून काढायचा असेल, तर त्याला प्रतिविचार हेच उत्तर असते. कोणाचीही हत्या केल्याने कुठलाही विचार दबल्याचा जगात इतिहास नाही. उलटपक्षी एखाद्या विचारासाठी बलिदान झाल्याने तो विचार अधिक तेजस्वी बनतो आणि जास्त काळ टिकतो. ही हत्या पुणे शहरात व्हावी याचे काही संदर्भ आहेत. पुण्यात जुन्या काळापासून एक विचारप्रवाह असा आहे, की विरोधी विचारांच्या माणसांची हत्या करावी. वारंवार सिद्ध झाले आहे, की  अशा हत्या करून विचार संपल्याचा पुरावा नाही. तरी ही प्रवृत्ती नष्ट होत नाही. महात्मा गांधींच्या विचाराला विरोध करणारे अनेक लोक देशभर होते, त्यांची हत्या करावी असा विचार पुणे शहरातीलच एका व्यक्तीच्या डोक्यात आला. जगामध्ये इतिहासाचे कितीतरी दाखले आहेत की चळवळीच्या नेत्यांचे खून केल्यानंतर ही चळवळ अधिक तेजस्वी होते. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये वंशीय भेदाभेद फार टोकाला पोहोचला होता तेव्हा मार्टीन ल्यूथर किंग या गांधीवादी नेत्याने मोठी चळवळ उभी केली. त्याची हत्या करण्यात आली. तथापि ती चळवळ दबली नाही. उलटपक्षी अमेरिकेतल्या गौरवर्णीयांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. यावरून नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याने तरुण महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ नष्ट करण्यात आपण यशस्वी होऊ असा भ्रम कोणी बाळगू नये. एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पुरोगामी लोकांनी बेसावधपणे फिरू नये. पोलिसांच्या संरक्षणाची गरज आहे, पण आपले कार्यकर्ते मात्र सावधान अवस्थेत आपल्याभोवती पाहिजेत. पुण्यामध्ये शाम मानव एकदा बालगंधर्व रंगमंदिरात अंधश्रद्धेवर भाषण करीत होते. मी पहिल्या रांगेत समोर बसलो होतो, मध्येच एक जाडाजुडा माणूस स्टेजच्या डाव्या पायऱ्या ओलांडून सावकाशपणे श्याम मानवांच्या पाठीशी आला. सगळ्या प्रेक्षकांना वाटले की, हा संयोजकांपैकी असावा त्याने शाम मानव यांच्या मानेभोवती आपल्या हाताचा विळखा घालून मान दाबायचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, हा प्रकार वेगळा आहे. तेव्हा मी स्टेजवर गेलो आणि शामच्या मागे उभे राहिलो. त्याला म्हणालो, ‘‘कोणत्याही परिस्थितीत भाषण पूर्ण झाले पाहिजे, अन्यथा ही मंडळी असे उद्योग करून वैचारिक प्रबोधन बंद पाडतील.’’ मी स्टेजवर गेल्यामुळे प्रेक्षागृहातली ८-१० माणसे आली आणि माझ्याजवळ उभी राहिली. काहींनी त्या गुंडाला पकडले, लाथा-बुक्क्याने बडवले नंतर पोलीस त्याला घेऊन गेले. नंतर कळले की तो माणूस नरेंद्रमहाराजांचा अनुयायी होता. दुसऱ्या दिवशी शाम मानव यांची सभा हडपसरला होती. नरेंद्रमहाराजांचे लोक पूर्वतयारीनिशी लाठय़ा-काठय़ांसह तिथे हजर होते. पोलिसांनी संयोजकाला सभा रद्द करण्यास सांगितले आणि त्यांनी ते मान्य केले. त्यानंतर मी एस. एम. जोशी फाऊंडेशनमध्ये शामची सभा घेतली. पोलिसांना निरोप पाठवला की, आज कृपया तुम्ही तिकडे फिरकू नका. आज आम्ही सभेत नरेंद्रमहाराजांचे जे लोक गडबड करतील त्यांना यथेच्छ मार देणार आहोत. त्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. आम्हीदेखील चार-पाच खुच्र्यानंतर एक-एक माणूस बसवला होता. आणि जो संशयास्पद आहे त्याच्या डोळ्यात आम्ही रोखून पाहात असू. आमची ती जय्यत तयारी पाहून नरेंद्रमहाराजांचे कार्यकर्ते हळूहळू सभागृहातून बाहेर निघून गेले. त्या जागी दुसरे लोक आले. यावरून एकच धडा शिकायचा की हिंसाचारात पुढाकार घेऊ नये; पण आत्मसंरक्षण करण्यास सदैव दक्ष असले पाहिजे. आपण अहिंसेचे पुजारी आहोत म्हणून हिंसाचारावर श्रद्धा असणारे लोक आपल्याला सोडून देतील, अशा भ्रमात कोणी राहू नये.
हत्या केल्याने तरुण महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ नष्ट करण्यात आपण यशस्वी होऊ असा भ्रम कोणी बाळगू नये.

शंकराचार्य पळाले..
सामाजिक झुंजी अधिकच अवघड असतात. त्यात समोरची व्यक्ती जनमानसात पूजनीय असली तर भलतीच जोखीम. कांची कामकोटीचे शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती स्वामी महाराज यांचा लौकिक ‘वॉकिंग गॉड’ असा. हा देव पण सदैव हिंडणारा. एका ठिकाणी तीन दिवसांपेक्षा जास्त न राहणारा. सातारच्या शंकराचार्याच्या मठात आला आणि तब्बल नऊ महिने राहिला. मग सातारा जणू भाविकांची आधुनिक पंढरीच बनली. दर्शनासाठी राष्ट्रपती संजीव रेड्डी आणि इंदिरा गांधी येऊन गेल्या. या गुरूंना भेटायला दुसरे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामीमहाराज आले आणि सातारा हे परिवर्तनाच्या केंद्राऐवजी शंकराचार्याचे पीठा बनणार का अशी साधार भीती वाटू लागली. सभा- निदर्शने या नेहमीच्या मार्गाचा फायदा नव्हता. पहिल्यांदा शंकराचार्याचे भांडे हुशारीने फोडून मग बोंब मारायला पाहिजे होती. आम्ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीजींच्या समवेत शंकराचार्याची मुलाखत मागितली. प्रश्न आधी दिले. मुलाखत चालू झाली आणि चातुर्वण्र्य, दलित  वगैरे प्रश्न समोर आल्यावर शंकराचार्याची टय़ूब पेटली. त्यांनी पहिल्यांदा दिलेली परवानगी नाकारून टेप बंद करायला सांगितले. आम्ही होकार देत पिशवीत टेप चालूच ठेवला. शंकराचार्याचे सारे सनातन समर्थन टेप झाले. बाहेर येऊन मग पुराव्यानिशी बोर्ड लावले. प्रचंड खळबळ माजली. आता पुरता निकाल लावायचा असे ठरवून जाहीर समा बोलावली.  पोलिसांनी परवानगी नाकारली. अगदी शेवटच्या क्षणी यासाठी अटकही होण्याची आमची तयारी बघून पोलिसांनी परवानगी दिली. सभेत दंगल होईल, नंतर आमची घरे जाळतील, ही भीती निराधार ठरली. शंकराचार्याशी आमचे भांडण कशाकरता आहे हे मी सांगितले. घोषणा देऊन, अंडी फेकून एका गटाने दंगल माजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. लोकांनी त्यांना अजिबातच साथ दिली नाही. सामान्य माणूस समजून घेतो, विचार करतो, याचा तो सुखद प्रत्यय होता. बघता बघता वातावरण बदलले. तळ ठोकलेल्या गुरुशिष्यांना आठ दिवसांत पोबारा करावा लागला.
(‘संकल्प’ या ग्रंथालीच्या पुस्तकातील नरेंद्र दाभोलकरांच्या लेखातून साभार)