12 November 2019

News Flash

बालशिक्षणाची नवी दिशा..

मुलांच्या बाबतीतला प्रौढ व्यक्तींचा दैनंदिन व्यवहार हा विषय जेवढा महत्त्वाचा, तेवढाच कालसुसंगत आहे

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे २६ वे वार्षिक अधिवेशन नाशिक येथे १ नोव्हेंबर रोजी सुरू झाले. या तीन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटक शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्या भाषणातील संपादित अंश..

बालविकास शास्त्रीय दृष्टिकोनातून होणे आणि त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने बालशिक्षण होणे, हे एक अतिशय महत्त्वाचे सामाजिक व राष्ट्रीय कार्य आहे. या कार्याचे व्यापक महत्त्व ओळखून, या बाबतीत समाजप्रबोधनाचे काम करीत राहणे, हा महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या कार्याचा मुख्य हेतू आहे. गेली २५ वर्षे परिषदेचे कार्यकर्ते हे काम आपल्या मर्यादित शक्तीच्या खांद्यांवर आजवर पेलत आले आहेत. सामाजिक स्वरूपाच्या संस्था सुरू करणे सोपे असते. परंतु त्या सातत्याने चालत्या आणि वाढत्या ठेवणे हे कार्यकर्त्यांचा कस पाहणारे, असे कठीण काम असते. माझा अनुभव असा आहे की, बालविकास आणि बालशिक्षण हे जगाच्या ऐरणीवर आलेले आणि अलीकडे महत्त्व पावलेले विषय, भारतात आणि महाराष्ट्रात अजूनही दुर्लक्षितच आहेत. व्यापक समाजपातळीवर हे विषय अजून पोहोचलेले नाहीत; त्यामुळे सार्वत्रिकरीत्या असावी तेवढी या विषयांची समज लोकांमध्ये रुजलेली नाही. त्यातून अर्थातच ती पालक, बालकांच्या शाळा, शिक्षक, संस्थाचालक किंवा अन्य क्षेत्रांतील जाणकार यांच्यापर्यंत पुरेशा गांभीर्याने पोहोचलेली नाही. साहजिकच या सर्व प्रौढ व्यक्तींचा दैनंदिन व्यवहार मुलांच्या गरजांच्या मानाने तोकडाच राहत आलेला आहे. लहान मुलांच्या भावी कालाच्या दृष्टीने ही गोष्ट घातक आहे.

मुलांच्या बाबतीतला प्रौढ व्यक्तींचा दैनंदिन व्यवहार हा विषय जेवढा महत्त्वाचा, तेवढाच कालसुसंगत आहे. ‘आज नाही, तर कधीही नाही’ अशा एका अपरिहार्यतेपाशी आणि म्हणूनच एका संधीपर्यंत आपण पोहोचलो आहोत. भारताचे सरकार आता बालशिक्षणाला त्याचे अपेक्षित स्थान आपल्या शैक्षणिक व्यवहारात द्यायला उद्युक्त झाले आहे. बालशिक्षण आणि प्राथमिक शिक्षण यांची एक सुरेख गुंफण केंद्र सरकारने प्रसृत केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात केली आहे. बालकाच्या घराबाहेरील शिक्षणाची एक नवी व्यवस्था ‘पायाभूत शिक्षणा’ची मानली आहे. वय वर्षे तीन ते आठ असा हा पाच वर्षांचा कालावधी यात गृहीत धरला आहे. म्हणजे यात वय तीन ते सहा अशी बालशिक्षणाची आणि पुढे सहा ते आठ अशी प्राथमिक शिक्षणातील पहिली व दुसरीची वर्षे घेतली आहेत. हा आठ वर्षांपर्यंतचा काळ हा बालकाच्या मेंदूविकासाच्या पहिल्या टप्प्याचा कालावधी आहे; वेगाने मेंदू विकास होण्याचा कालावधी आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेसारख्या प्रौढ संस्थेने देशासमोर वय वर्षे तीन ते आठ अशा बालवयासाठी एकसंध असा बालशिक्षणाचा नवा नमुना ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रौढ आणि पालक

बालकांच्या हितासाठी, आजच्या घडीला पालकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपला कार्यविस्तार करून पालकांना आपल्या मुलांचे अंतर्गत विश्व कळले पाहिजे, आणि मग त्याला अनुसरून त्याचे बा विश्व कसे असावे लागते, हेही कळायला हवे. बालकांची उपजत विकासाची अंतर्गत प्रक्रिया पालकांनी जाणून घ्यायला हवी आणि मग त्याच्यासाठीची बा शिक्षणरचना कशी असावी, याचीही जाण त्यांना आली पाहिजे. पालक मंडळी, आपापल्या घरी आपल्याच मुलांचे पालक असतात; परंतु शाळांतील शिक्षक व अन्य प्रौढ मंडळी एकाच वेळी अनेक मुलामुलींचे पालक झालेले असतात. समाजात वावरताना, मग ते व्यवसायात असो वा समारंभात असो, प्रवासांत असो अथवा रस्त्यांत असो, प्रत्येक प्रौढ हा आजूबाजूला आढळणाऱ्या आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येक बालक-बालिकेचा अप्रत्यक्षपणे ‘पालक’च असतो. सर्वसामान्यपणे, पालकांचा बालकांशी असलेला संपर्क व वागणूकव्यवहार हा समजूतदारपणाचा असावा, असा शास्त्रपूत नियम आहे.

मानवी मेंदूचा उलगडा

गेल्या ५० वर्षांमध्ये मानवी मेंदूच्या संशोधनांना वेग आला आहे. त्यांतून मेंदूची अंतर्गत रचना आणि मेंदूची दिवसरात्र चाललेली कार्ये यांविषयी बराचसा उलगडा झाला आहे. त्यांवरच्या अनेक संशोधनांतून, मेंदूचा मुलांच्या शिक्षणाशी असलेला संबंध स्पष्ट होत गेला आहे. आत्तापर्यंत मेंदू संशोधनांतून हाती आलेल्या ठळक गोष्टी अशा आहेत : (१) मेंदू हा माणसाचा शिकण्याचा अवयव आहे. (२) जन्मापासून अखेपर्यंत मेंदू शिकतच असतो. (३) मेंदूची स्वत:ची शिकण्याची एक नैसर्गिक पद्धती आहे. (४) मेंदू हा प्राप्त होणाऱ्या विविध अनुभवांतून शिकत असतो.

या ठळक गोष्टींवरून आपल्या लक्षात येईल की, आपल्या घरांमधील, शाळा-महाविद्यालयांमधील मुले शिकतात, म्हणजे त्यांचे त्यांचे स्वतंत्र असलेले मेंदू शिकत असतात. त्यामुळे आपले शिकविण्याचे सारे प्रयत्न हे मेंदूच्या शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियांना अनुसरून असले पाहिजेत, आणि हे करताना प्रत्येक मेंदू वेगळा आहे, वेगळ्या अनुभवांतून त्यांची घडण झाली आहे, याचीही जाणीव आपण ठेवली पाहिजे.

मेंदूआधारित शिक्षण

मेंदू व मुलांचे शिकणे यांच्या संबंधावर लेखन करणारे लेस्ली हार्ट हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी १९८३ साली प्रकाशित केलेला त्यांचा ‘ह्य़ुमन ब्रेन अ‍ॅण्ड ह्युमन लर्निग’ हा ग्रंथ या विषयावरील एक सुरुवातीचा ग्रंथ आहे. त्यात त्यांनी तीन नव्या संकल्पना देऊन शिक्षणविषयक विचारांत व त्यावर आधारित प्रत्यक्ष व्यवहारांच्या संदर्भात महत्त्वाची भर घातली आहे. एक ‘मेंदूआधारित शिक्षण’, दोन ‘मेंदूपूरक शिक्षण’ आणि तीन ‘मेंदूविरोधी शिक्षण’ या तीन संकल्पना आपल्याला दिशादर्शक ठरणाऱ्या आहेत. ‘मेंदूआधारित शिक्षण’ आणि तत्संबंधी ‘मेंदूपूरक शिक्षण’ आणि ‘मेंदूविरोधी शिक्षण’ या संकल्पना आता जगभरच्या शिक्षणात बऱ्यापैकी रुजू लागल्या आहेत. या संकल्पनांचा आपापल्या ठिकाणी वापर करून, शाळांमधील शिकण्या-शिकविण्याच्या कामांमध्ये होणारा बदल, विद्यार्थ्यांचे होणारे सहजसुंदर शिक्षण यांच्या अनुभवांवरही अनेक शास्त्राभ्यास प्रकाशित होत आहेत. एरिक जेन्सेन हे अशा अभ्यासांचा अभ्यास करून लेखन करणारे एक मान्यवर लेखक आहेत. त्यांनी ‘मेंदूआधारित शिक्षणा’ची एक सोपी आणि उपयुक्त अशी व्याख्या दिली आहे. त्यांच्या मते, ‘मेंदू समजावून घेऊन त्यातून निघालेल्या तत्त्वांनुसार मार्गक्रमण करणे म्हणजे मेंदूआधारित शिक्षण होय!’ ही व्याख्या हाच पालक-शिक्षक प्रबोधन कार्यातून इतरांना द्यावा, असा एक उपयुक्त संदेश आहे; याच्या तीनही पायऱ्या मात्र लक्षात घ्यायला हव्यात आणि त्या व्यवहारात उतरवायला हव्यात. एक, मेंदू समजावून घेणे-देणे; दोन, मेंदू-शिक्षणाची तत्त्वे समजावून घेणे-देणे आणि तीन, या तत्त्वांनुसार आपला, वर्गशिक्षणातील (अथवा घरचा) आणि समाजातला व्यवहार ठरवणे, त्याला आकार देणे.

बालकांची त्यांच्या वयोमानानुसार होणारी मेंदूची वाढ आणि मेंदूचे बदलते स्वरूप यांचा संबंध मुलांच्या दैनिक वागणुकीशी, त्यांच्या वेळोवेळच्या मन:स्थितीशी आणि त्यांच्या भाषेसारख्या गोष्टी शिकण्याशी कसा असतो, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बालशिक्षण, प्राथमिक-माध्यमिक शिक्षण, आणि उच्च शिक्षण यांमध्ये वेळोवेळी असणाऱ्या मुलांची वये, वयोमानांनुसार मेंदूची संरचना आणि सर्व स्तरांवरील प्रत्यक्ष शिकण्याची पद्धती यांची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आमूलाग्र बदल होत आहेत. शालेय वर्गामधून आणि त्यातही प्रामुख्याने बालशाळांतून मुलांच्या मेंदूंची काळजी आपण घेतली, तर मुलांचे मेंदू आपल्या स्वत:च्या शिक्षणाची काळजी घेतात, असे मेंदूआधारित शिक्षणाच्या पद्धती वापरणाऱ्यांना आढळून येत आहे.

मेंदू आणि मुले

घरी काय किंवा शाळांतून, रोज जे काही घडत असते, त्याचा लागलीच मुलांच्या मेंदूवर परिणाम होत असतो. त्यांतील ज्या गोष्टी मेंदूपूरक असतात, त्यांचे परिणाम चांगले होऊन मुलांचे शिकणे बळकट होते. पण बऱ्याच गोष्टी अशा असतात की, ज्या मेंदूविरोधी किंवा मेंदूघातक अशा असतात, आणि त्या मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण करतात. त्यामुळे शाळांमधून अगदी रोजचा दिवस तपासला जावा. कारण प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे मुलांच्या मेंदूमध्ये बदल घडवून आणत असतो. जेनसेन यांनी, वर्गजीवनाशी असलेला मेंदूचा हा संबंध स्पष्ट केला आहे. मेंदूमध्ये अब्जावधी चेतापेशी असतात. त्यांची परस्परांशी जुळणी होऊन, त्यांच्यात विद्युत संदेशांची देवाणघेवाण होऊन मेंदूची दैनंदिन कार्ये चालत असतात. जेनसेन म्हणतात की, मानवी मेंदूत नवीन पेशी जन्माला येत असतात. त्यांचा संबंध शिकण्याशी, शिकलेले लक्षात ठेवण्याशी आणि त्या-त्या वेळच्या मन:स्थितीशी असतो. त्यामुळे याबाबत आपण प्रौढ मंडळी काय करतो, कसे वागतो, हे महत्त्वाचे ठरते. आपल्याला हेही माहीत करून घ्यायला हवे की, मुलांची शारीरिक हालचाल खूप होत राहिली, त्यांना खेळायला खूप मिळाले, तर मेंदूतील पेशींची ही बौद्धिक कामे चांगल्या प्रकारे होतात. मुलांनी दिवसभरात अभ्यासाएवढाच वेळ खेळांना द्यायला हवा. त्यांनी रोज घाम फुटेस्तो खेळले पाहिजे. असे झाले तर मेंदू खूप तरतरीत होतो; अधिक चांगले शिकायला उद्युक्त होतो.

मेंदूसाठी, त्याच्या दैनंदिन कार्यक्षमतेसाठी पौष्टिक अन्न, भरपूर पाणी, प्राणवायूची ऊर्जा आणि मुख्य म्हणजे दररोज रात्रीची शांत व भरपूर झोप या साऱ्यांची अनिवार गरज असते. पालकांना आणि शिक्षकांना या गोष्टी नीटपणे माहीत असायला हव्यात. या अर्थातच मेंदूपूरक गोष्टी आहेत, त्यांच्यामुळे शिकणे सहजसुंदर होते.

शाळांतून आणि घरांतून अशा अनेक गोष्टी असतात, की त्यांचाच एक ताण सतत येऊन मेंदू नीट चालेनासा होतो. सततच्या परीक्षा या ताण निर्माण करणाऱ्या असतात. याशिवाय सततचा निर्थक शिस्तीचा आग्रह, शिस्तीसाठी शिक्षांचा वापर, गृहपाठांची निर्माण झालेली निरुपयोगी पठडी, घोकंपट्टी, स्पर्धा किंवा सततचा उपदेश या साऱ्या अशा गोष्टी असतात की, ज्या मुलांच्या मेंदूवर हकनाक आणि जबरदस्त ताण निर्माण करीत असतात. ताणांमुळे मेंदूचे बौद्धिक कामच मंद होते; मेंदू उदासीन होतो. ही उदासीनता जीवनावर अनिष्ट परिणाम करते. त्यामुळे याला मेंदूविरोधी अथवा मेंदूघातक शिक्षण, असे म्हटले जाते. हे ताण-तणावांचे शिकणे दैनंदिन शिकण्यात अडथळे निर्माण करते. शिकणे कष्टप्रद आणि अपुरे होते.

पालक प्रबोधनाची रीत

मेंदू आधारित शिक्षण, मेंदूपूरक शिक्षण आणि मेंदूविरोधी शिक्षण या तीन संकल्पनांना आधाराला घेऊन आपण बालशिक्षणाची व प्राथमिक शिक्षणाची, म्हणजे त्यांतील दैनंदिन उपक्रमांची शहानिशा करू शकतो. एवढेच नव्हे, तर याच संकल्पनांचा खोलवरचा आशय व त्यावर बेतलेल्या वर्गातील शिक्षणपद्धती आधाराला घेऊन मुलांच्या शिक्षणात पूर्णत: परिवर्तन करू शकतो. मुलांच्या शिक्षणात परिवर्तन करणारी ही सूत्रे पालकांच्या प्रबोधनात आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणात उतरणे गरजेचे आहे. त्यामुळे आता प्रबोधनाच्या आणि प्रशिक्षणांच्या आशयाबरोबरच त्यांच्या पद्धतीमध्येही फरक घडवून आणला पाहिजे.

‘परिवर्तन’ ही नेहमीच आतून, आपल्या मनातून होणारी प्रक्रिया असते. आधी मन:परिवर्तन आणि मग प्रत्यक्ष आचरणात परिवर्तन, अशा या दोन पायऱ्या आहेत. साऱ्या समाजाला ज्ञानाने प्रौढ करणाऱ्या या पायऱ्या किंवा ही सूत्रे आहेत. आपल्याच मुलांना विकासाच्या वाटेवर पुढे नेणारी ही सूत्रे आहेत. प्रौढांनी मुलांच्या बाबतीत माहीतगार व ज्ञानी असणे, सौम्य, संयमित आणि प्रोत्साहित करणारी भाषा वापरणे, आपली वागणूक मुलांच्या विकासाच्या आड येणार नाही असे पाहणे आणि मुख्य म्हणजे, मुलांच्या वाढत्या वयांतील गरजांनुसार त्यांच्या बाबतीत संवेदनशील राहणे, यात यशस्वी पालकत्व दडलेले आहे; समाजहितकारक प्रौढत्व लपलेले आहे. तीच बालशिक्षणाची नवी दिशा आहे! तीच बालविकासाची आणि त्याकरवी होणाऱ्या राष्ट्रीय विकासाची पायाभरणी ठरणार आहे!

First Published on November 3, 2019 12:48 am

Web Title: new directions for child education abn 97