संस्थाने केव्हाच खालसा झाली. पण त्यांची शान आणि त्याहीपेक्षा त्यांचा मान परंपराग्रस्त मनांमाणसांत अजूनही कायम आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील औद्योगिक प्रगतीने येथे तसे अनेक राजे-महाराजे आणि संस्थानिक जन्मास घातले. परंतु परंपरेने चालत आलेल्या घराण्यांची सर कोणी या नवश्रीमंतांना देण्यास तयार नाही. याचेही कारण पुन्हा परंपराग्रस्त मानसिकताच. ती टिकवून धरण्यात अर्थातच या घराण्यांनाही जास्तच रस असतो. म्हणूनच स्वतंत्र, सार्वभौम आणि लोकशाही भारतातही राजेरजवाडे आणि त्यांना मुजरे ठोकणारे पाहावयास मिळतात. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे म्हैसूर संस्थानात गेल्या गुरुवारी पार पडलेला राज्याभिषेक सोहळा. या सोहळ्याने २३ वर्षीय यदुवीर हा उच्चशिक्षित तरूण म्हैसूरचा राजा बनला. अर्थात त्यामागेही मोठे सुरस नाटय़ आहे..
हे संस्थान ‘खालसा’मधीलच. मात्र राज्य गेले असले तरी तेथील राजगादी मात्र कायमच राहिली. तेथील राजे होते जयचमराजेंद्र वडियार यांचे एकुलते एक पुत्र – श्रीकांतदत्त नरसिंहराज वडियार. ४१ वर्षांपूर्वी वयाच्या २१ व्या वर्षी ते राजे बनले. १० डिसेंबर २०१३ रोजी निवर्तले. ते निपुत्रिक होते. त्यामुळे राजगादी रिक्त झाली आणि अशा वेळी सर्वत्र होते तेच घडले. मालमत्तेवर हक्क सांगणारी मंडळी पुढे आली. आपणच वारसदार म्हणवून घेऊ लागली. अखेर म्हैसूर राजघराण्याच्या मालमत्तेचे प्रकरण न्यायालयात गेले. अजूनही तो खटला सुरूच आहे. पण दरम्यानच्या काळात महाराणी प्रमोदादेवी यांनी यदुवीरला दत्तक घेतले. या दत्तकविधानामुळे त्यांच्या न्यायालयीन दाव्याला बळ मिळणार आहे.
दत्तकपुत्र यदुवीर म्हणजे महाराजा जयचमराजेंद्र वडियार यांची ज्येष्ठ कन्या गायत्रीदेवी यांचा नातू. त्रिपुरासुंदरीदेवी आणि स्वरूपआनंद गोपालराज अर्स हे यदुवीरचे आई-वडील. यदुवीर हे अगदी नव्या पिढीचे प्रतिनिधी. बंगळुरूच्या शांतिनिकेतन स्कूलमध्ये आणि कॅनेडियन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेले. शालेय शिक्षणानंतर ते अमेरिकेत गेले. तेथे बोस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि इंग्रजी या विषयांतून पदवी घेतली. त्यांचा विवाहही ठरला आहे. त्यांची वाग्दत्त वधू त्रिशिकाकुमारी ही देखील राजस्थानातील राजघराण्यातील आहे. वर्षअखेरीस ते विवाहबद्ध होणार आहेत. तो सोहळाही अर्थातच शानदार होईल, यात काही शंका नाही. अखेर ते राजाचे शुभमंगल असणार आहे.
तर गेल्या गुरुवारी हे विलायतेत उच्चशिक्षण घेऊन आलेले यदुवीर म्हैसूर संस्थानचे २७वे वारसदार बनले. राजघराण्याच्या सर्व परंपरा व रीतीरिवाजानुसार अंबा पॅलेसमध्ये हा राजगादी ग्रहणाचा सोहळा झाला. दरवर्षी दसरा सोहळ्यासाठीच बाहेर काढण्यात येणारा चांदीचा खास मुकूट या सोहळ्याचा अपवाद करून बाहेर काढण्यात आला होता. पण या राजाच्या मस्तकी खरा शोभतो तो सोन्याचा मुकूट. तो खास दरबारातच चढविला जातो. त्यासाठी मात्र परंपराप्रिय मंडळींना दसऱ्याची वाट पाहावी लागणार आहे..