डॉ. पंकज हासे, डॉ. मंजूषा पाटील

करोनामुळे सध्या अवघे जग विषाणूग्रस्त असताना आता जनावरांमध्ये ‘क्रायमिन कोंगो हिमोरेजिक फीवर’ या विषाणूजन्य आजाराची साथ पसरली आहे. गुजरातच्या काही भागात या आजाराने बाधित जनावरे आढळून आली आहेत. या आजाराबाबत महाराष्ट्रातील पशुपालकांनीही सावधानता बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

जगभरामध्ये सध्या विषाणूजन्य आजारांनी थैमान घातले आहे. माणसामध्ये असणारा करोना असो किंवा जनावरांमध्ये होणारा ‘लंपी स्किन’सारखा आजार असो, एकंदरीत विषाणूजन्य आजारांनी आज पशुपालन व शेतकरीसुद्धा हवालदिल झाले आहेत.

‘लंपी स्किन’ आजार जसा गोचिड, मच्छर यांसारख्या कीटकांमार्फत होतो तसाच सध्या चर्चेत आलेला नवीन आजार म्हणजे ‘क्रायमिन कोंगो हिमोरेजिक फीवर’ होय. गुजरात राज्याच्या बोटाद, कच्छ आणि इतर जिल्ह्य़ांत या आजाराने बाधित जनावरे आढळून आली आहेत. त्यामुळे साहजिकच भविष्यात या आजाराचे संक्रमण लगत असणाऱ्या महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होऊ शकते. या पार्श्वभूमीवर ‘क्रायमिन कोंगो हिमोरेजिक फीवर’ या आजाराची माहिती घेणे शेतकरी, पशू पालकांसाठी महत्त्वाचे ठरते.

सीसीएचएफ, म्हणजेच क्रायमिन कोंगो हिमोरेजिक फीवर हा एक विषाणूजन्य आजार आहे. नैरोव्हायरस प्रकारांतील हा ‘आरएनए’ विषाणू आहे. या आजाराचा प्रसार प्रामुख्याने हायलोमा गोचिडमुळे होतो. सन १९४४ मध्ये युरोप खंडातील क्रायमोसी प्रांतात हा आजार प्रथम दिसून आला.

आजाराचे प्रसारण

या आजाराचे संक्रमण गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढय़ा यामध्ये दिसून येते. यापूर्वी हा आजार चीन, इराण, हंगेरी, काँगो, बल्गेरिया, दक्षिण आफ्रिका व इतर काही पौर्वात्य देशात दिसून आला आहे. झोनोटिक म्हणजेच जनावरांपासून मानवाला व मानवापासून जनावरांना होणारा हा आजार आहे. बाधित जनावरांच्या संपर्कात आलेले शेतकरी, पशुपालक, व्यापारी, मजूर, मटण विक्रेते, पशुवैद्यक यांना हा आजार होण्याची शक्यता अधिक आहे. गोचिडमध्ये हा विषाणू खूप काळापर्यंत राहू शकत असल्याने त्याला विषाणू साठवणुकीचे केंद्र म्हटले आहे. हा विषाणू रक्त, मांस आणि अर्धवट मारलेल्या, गोचिडमध्ये मोठय़ा प्रमाणावर असतो. त्यामुळे कच्चे मांस खाणाऱ्या किंवा अर्धवट उकडलेल्या मांस भक्षणातून हा आजार मानव व जनावरांना संक्रमित होऊ शकतो. कत्तलखान्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना या आजाराची बाधा होण्याचा जास्त संभव असतो.

आजाराची लक्षणे

* जनावराला ताप येतो

* खाणे-पिणे बंद करतो

* रवंथ करत नाही

* रक्तक्षय झाल्याची लक्षणे असे की डोळ्याचा श्लेषमल पांढरा होणे

* शरीरावरील त्वचा निस्तेज दिसते

आजाराचे निदान

* जनावराच्या अंगावर व गोठय़ात गोचिड प्रादुर्भाव स्पष्ट दिसून येतो.

* रक्ततपासणीत रक्तक्षय लक्षणे

* प्रयोगशाळेत सूक्ष्म जीवशास्त्रीय तपासण्या करणे

* रक्त तपासणीत कमी हिमोग्लोबिन आणि प्लेटलेटची अधिक संख्या

आजारावरील उपचार

* विषाणूजन्य आजार असल्याने प्रतिजैविके फारशी काम करत नाहीत. तरीसुद्धा दुय्यम संसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैविके दिली जातात.

* पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वेदनाशामक, तापशामक आणि गोचिड नायनाट करण्यासाठी इंजेक्शन दिली जातात.

प्रतिबंधात्मक उपाय

* गोचिड निर्मूलन करणे.

* जनावरांच्या शरीराची ब्रशने नियमित स्वच्छता करणे.

* गोठा व गोठय़ासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे.

* शेतकरी, पशुपालक, कत्तलखान्यात काम करणारे कर्मचारी यांनी पूर्ण शरीर झाकेल असा पोशाख करावा.

* गोठय़ातील फटी बुजविल्यास गोचिडांच्या प्रजननास पायबंद घालता येतो.

* गोठय़ाच्या भिंतींवर मोठे गोचिड अथवा गोचिडाची लहान लहान पिले दिसल्यास ‘बमो लँप’ने गोठय़ाच्या भिंती जाळून घ्याव्यात.

* जनावरांवर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार Permethrin, Cypermenthrin आणि Deltamethrin यांची फवारणी करावी.

* बोटाच्या चिमटीत धरून गोचिड मारण्याचा प्रयत्न करू नका.

* आजाराने बाधित जनावरांना इतर जनावरांपासून दूर बांधा, त्यांचा चारा-पाणी वेगळा ठेवा.

* बाजारातून विकत घेतलेल्या जनावराला इतर जनावरांमध्ये मिसळण्यापूर्वी गोचिड नसल्याची खात्री करून घ्या.

* अंगावर गोचिडांचा प्रादुर्भाव अधिक असल्यास Ivermectin सारखी औषधे पशुवैद्यकाकडून देऊन घ्यावीत.