स्त्रीवादी चळवळीने भारलेल्या अशा ८० च्या दशकात नीलिमा शेख यांनी त्या काळातील मुद्दय़ांना हात घालणारी चित्रे काढली.  मातृत्वाचा आनंद साजरा करणारी सुरुवातीची चित्रं ते निर्वासितांच्या छावण्यांमध्ये मुलांना जन्म देणाऱ्या स्त्रियांच्या हालअपेष्टांचं चित्रण करणाऱ्या कलाकृती यातून त्यांचा प्रवास दिसून येतो..

१९८०च्या दशकात स्त्रीवादी चळवळींनी भारतात जोर धरला होता. स्त्री अत्याचाराला वाचा फोडण्यापासून सुरू झालेल्या या चळवळीत अधिक गुंतागुंतीच्या मुद्दय़ाचा विचार सुरू झाला होता. तेव्हा वेदनेनं भारलेलं स्त्रीचं शरीर याचं रूपचिन्ह बनलं. याच काळात नीलिमा शेख यांनी ‘व्हेन चंपा ग्रय़ुअप’ या त्यांच्या प्रसिद्ध चित्रमालिकेवर काम केलं. या दोन्हीत एक अदृश्य असं रसायन असल्याचं जाणवतं. शेख यांना जगभरातल्या कलाविश्वात वेगळी ओळख मिळवून देणारी ही बारा चित्रांची मालिका ही चंपा नावाच्या एका मुलीची कथा असली तरी त्या काळातल्या स्त्री चळवळीतल्या महत्त्वाच्या मुद्दय़ांना हात घालते. एका मुलीची ही कथा एकाच वेळी ती व्यक्तिगत आणि सार्वत्रिकही ठरते. या मालिकेत लहान चंपाच्या खोलीत सायकल लावलेली दिसते, ती मुक्तपणे झोपाळ्यावर खेळताना दिसते. ते या लहान मुलीच्या स्वातंत्र्याचं, तिला असलेल्या मोकळिकीचं प्रतीक बनतं. या चित्रात चंपाची आई घरकामात व्यग्र असली तरी चंपाची नजर मात्र दूरवर लागलेली दिसते. तिच्या रोजच्या जगण्यातून बाहेर पडण्यासाठी, स्वातंत्र्यासाठी आसुसलेली दिसते. त्यानंतरच्या दृश्यात मात्र लग्नाचे विधी, गोषा पांघरलेली नववधू, तिचं नव्या घरी आगमन, तिथल्या माणसांनी तिला न्याहाळणं, तिला छळणारे सासू आणि नवरा यांचं चित्रण येतं. स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात एकाकी बसलेली चंपा, तिच्याबद्दल कुचाळक्या करणारे घरातले लोक, भडक पिवळ्या ज्वाळा आणि शेवटी शोक करणाऱ्या बायकांचा घोळका. यात लघुचित्रातले रंग आणि आकार वापरत नीलिमा शेख यातले प्रसंग मात्र नाटकीय पद्धतीनं मांडतात.

पण त्याआधी, सुरुवातीच्या काळात त्यांच्या चित्रात त्यांचा भवताल होता. भोवतालची माणसं, घरं, त्याचे कानेकोपरे, वस्तू, निसर्ग अशा साध्या साध्या गोष्टींचं अतिशय संवेदनशील चित्रण त्यांनी केलं. एक स्त्री कलाकार म्हणून आलेला अनुभव आणि जाणवणारा फरक, नीलिमा नेमक्या शब्दांत मांडतात- ‘‘शिकून बाहेर पडल्यावर बडोद्याला असताना बरेच कलाकार मित्र माझ्या अवतीभोवती होते. तोपर्यंत माझं लग्न झालं होतं, मुलं झाली होती. त्या मित्रांचं आणि माझं जगणं यात काही तरी फरक मला सतत जाणवायचा. माझ्याहून वयाने मोठय़ा असलेल्या कलाकारांबरोबरही मी प्रदर्शनं केली. ते माझ्या कामाचं कौतुक करायचे, पण ‘तू तुझ्या मुलांची चित्रं का काढतेस’ असंही विचारायचे. अशा प्रकारच्या टीकेनं मी माझ्या कामाबद्दल जास्त ठाम होत गेले.’’ खरं तर, त्यांच्या या चित्रातून सुरुवातीला घर आणि स्टुडिओ यातली सीमारेषा पुसट होत गेली. यातून आलेल्या मर्यादेचं त्यांनी संधीत रूपांतर तर केलंच, पण कलाशाळामध्ये आणि कलाक्षेत्रातल्या एकूण व्यवहारातून तयार झालेल्या खासगी आणि सार्वजनिक या विभागणीची त्यांनी समीक्षा केली. या विभागणीतून आकाराला आलेल्या कामाच्या वाटपाच्या संकल्पना आणि कलाक्षेत्रातलं स्त्री कलाकारांचं स्थान याकडेही लक्ष वेधलं. नंतर मात्र अधिक जाणीवपूर्वक त्यांनी या सगळ्याचा विचार आपल्या चित्रातून मांडला. मातृत्वाचा आनंद साजरा करणारी सुरुवातीची चित्रं ते निर्वासितांच्या छावण्यांमध्ये मुलांना जन्म देणाऱ्या स्त्रियांच्या हालअपेष्टांचं चित्रण करणाऱ्या कलाकृतीतून हा प्रवास दिसून येतो.

जे आजपर्यंत अव्यक्त आहे ते त्यांच्या चित्रातून, कलाभाषेतून व्यक्त कसं करता येईल, याचा पाठपुरावा नीलिमा शेख यांनी केला. काश्मीरमध्ये कधी राहिल्या नसल्या तरी काश्मीरशी त्यांची नाळ जोडलेली आहे. ते त्यांच्या चित्रातून आपल्या समोर येत राहातं. २००६ ते २००८ मध्ये चितारलेल्या ‘टेस्टीमनी’, ‘व्हॉट हॅपन्ड दॅट डे’ किंवा ‘मिड डे’ या चित्रांतून त्या काश्मीरचं जगणं दाखवतात. तिथल्या लोकांच्या रोजच्या जगण्यातला संघर्ष आणि अत्याचार हे तर त्यातून समोर येतंच, पण त्याचबरोबर, लोकांना बेदखल करताना, रोजच्या हिंसेला तोंड देतानाही त्यातही शिल्लक राहिलेलं त्यांचं दैनंदिन जगणंही येतं. या चित्रातल्या स्त्रिया स्वयंपाक, धुणी धुणं, भांडी विसळणं, भाज्या साफ करणं अशी साधी साधी काम करताना दिसतात. कुठल्याही घडामोडी न घडता रोजचं कंटाळवाणं आयुष्य आहे की काय असंच ही चित्रं पाहून वाटू शकतं; पण या छोटय़ा छोटय़ा कृतींतूनच, या अथक चालणाऱ्या रहाटगाडग्यातून त्या परिस्थितीत टिकाव धरणं, संघर्षांला तोंड देत उभं राहाणं आहे हेच मुळात धाडसाचं आहे, हे यातून प्रतीत होत राहातं. मुघल लघुचित्रांची आठवण देणारे गालिचे या चित्रांमध्ये दिसतात. त्यावर बसलेले लोक चुलीवर जेवण बनवताहेत, गप्पा मारताहेत, पण त्यांच्या आजूबाजूला कटय़ारींच्या फिकट आकृती दिसतात, रक्ताच्या चिळकांडय़ा पानाफुलांच्या आकृतिबंधात मिसळून जातात किंवा तलवारी परजलेल्या काळसर रंगातल्या तरंगत्या अक्राळविक्राळ आकृत्या दिसतात.

नीलिमा शेख मान्य करतात की, त्यांनी एका ठरावीक कलाभाषेला आपलंसं केलं असलं तरी सुरुवातीला मुख्य प्रवाहातल्या कलाभाषेत आपण व्यक्त होत नाही. यामुळे अपराधीपणाची भावना त्यांना होती; पण तिथेही त्यांची कलाभाषेविषयीची भूमिका ठाम होती. त्या म्हणतात की, स्वातंत्र्यानंतर राष्ट्राची उभारणी करताना एक प्रकारच्या आधुनिकतेचा विचार अंगी बाणवला गेला होता, पण त्यामुळे पारंपरिक कला आणि तंत्र यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यांचं या आधुनिकतेमधलं स्थान काय होतं? एका ठरावीक पद्धतीनं आशय व घाटाचा विचार करणं त्या काळात सर्वमान्य होतं. ते न करता, पाश्चिमात्य कलाभाषा न वापरता त्यांनी भारतातील लघुचित्रं, मौखिक परंपरेतून आलेल्या कथा, मिथकं, गाणी यांच्या भाषाव्यवस्थेचा अंगीकार केला. कासाइन आणि टेंपेराचं तंत्र वापरून त्या कागदावर चित्रं काढतात. कासाइन हा पटकन वाळणारा रंग, तर टेंपेरा हे रंग तयार करायचं अगदी प्राचीन तंत्र. बऱ्याचदा त्या हाताने तयार केलेला वस्ली कागद हा लघुचित्रांसाठीचा कागद वापरतात. उभ्या, लांबलचक कागदाच्या पडद्यांवर ही चित्रं आकाराला येतात. या चित्रांचे आकारही इतके प्रचंड, की दालनातलं अवकाश व्यापून टाकतात. मानवी शरीराच्या आवाक्यात न येणारे किंवा नजरेच्या पातळीत न मावणारे हे ताव अत्यंत परिणामकारक ठरतात. भित्तिचित्र, नाथद्वाराची पिछवई किंवा नाटकाचे नेपथ्य यांचे संदर्भ सतत जाणवत राहतात. बडोद्याला आधुनिक कलेचं शिक्षण झाल्यावरही लघुचित्रांचं तंत्र त्यांनी शिकून घेतलं. पिछवई बनवताना काय तंत्र वापरतात, चित्राचा पृष्ठभाग आणि रंग कसे तयार करतात हे काही काळ तिथे राहून त्या शिकल्या.

या तंत्राची त्यांचे व्यक्तिगत अनुभव, त्यांचं भावविश्व आणि आजूबाजूला असलेली परिस्थिती या सगळ्याशी सतत सांगड घालतात. पारंपरिक तंत्र वापरून त्यातून नीलिमा सद्य:परिस्थितीच्या भीषणतेवर भाष्य करतात. टेंपेरासारखं पारंपरिक तंत्र वापरताना त्या परंपरेच्या नावाखाली चालू असलेल्या शोषणावर, अत्याचारावर बोट ठेवतात. हे करताना परंपरेला डोक्यावर उभं करतात. तेच त्यांच्या कलाभाषेच्या बाबतीत. चित्रातील तरल रेषा, रंग आणि आकृतिबंधामुळे त्यांच्या चित्रांचं वर्णन कायम गेयतापूर्ण आणि काव्यात्मता असं केलं जातं. त्याला नीलिमांचा विरोध नाही, पण काव्यात्मकता, गेयता अशा पद्धतीनं वर्णन करताना त्यात विचारांवर भावनांचा पगडा आहे किंवा विश्लेषणाचा अभाव आहे असा काहीसा भाव व्यक्त होतो आणि हा भावनांवर असलेला भर हे ‘स्त्रीत्वा’चं लक्षण मानलं जातं; पण त्यामुळे ते स्त्रीच्या संवेदनशीलतेचं आणि अभिव्यक्तीचं केलेलं साचेबंद वर्णन ठरतं. नीलिमा नेमक्या याच साचेबंदपणाला छेद देतात किंवा खरं तर त्याही पुढे जाऊन गेयतापूर्ण चित्रकृती आणि स्त्रीवादी विचार यातला अन्योन्य संबंध दाखवतात. त्यांच्यासारखे कलाकार हे भूतकाळाचे आणि वर्तमानाचे साक्षीदार असतात. त्यांच्या भवतालात घडणाऱ्या घटनांना, इतिहासाला आणि अस्वस्थतेला चित्ररूप देणं आणि त्याचबरोबर कलाभाषेची, त्यातल्या रूपकांची बांधीव मांडणी करणं अशी दुहेरी भूमिका त्या निभावताना दिसतात.

 

– नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत.