खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..
पुढील रविवारी
ईशान्य मुंबई,  
उत्तर-पश्चिम मुंबई

काँग्रेससाठी सोपा आणि सुरक्षित मतदारसंघ
कुर्ला, कलिना, वांद्रे हा मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा असलेला भाग किंवा उच्चभ्रूंची वस्ती असलेला जुहूचा परिसर तसेच मराठी मध्यमवर्गीयांचे लक्षणीय प्रमाण असलेले विलेपार्ले अशा संमिश्र मतदारांचा भरणा असलेला उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ हा मुंबईतील काँग्रेससाठी सर्वाधिक सोपा आणि सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांच्या निधनानंतर त्यांची कन्या प्रिया दत्त या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. अ. भा. काँग्रेसच्या सचिवपद भूषविणाऱ्या प्रिया दत्त या मतदारसंघांकडे फारसे लक्ष देत नाहीत, अशी त्यांच्यावर टीका केली जात असली तरी स्वत: दत्त यांना हा आरोप मान्य नाही. काँग्रेससाठी सुरक्षित असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसला आव्हान देण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. प्रिया दत्त यांचे बंधू संजय दत्त यांना १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी झालेली शिक्षा हा विरोधकांमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळेच प्रिया दत्त या संजयच्या वादापासून लांब राहण्याचा अलीकडे प्रयत्न करतात. या मतदारसंघातील जनार्दन चांदूरकर, कृपाशंकर सिंह आदी नेत्यांशी प्रिया दत्त यांचे फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. मुंबईत गेल्या वेळी मनसेच्या मतविभाजनामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सहाही जागाजिंकणे शक्य झाले होते. अगदी यंदा मनसे महायुतीत सामील झाला तरीही या मतदारसंघात विरोधकांना विजय मिळविणे मोठे आव्हानच आहे. भाजपच्या नेत्यांकडून अद्याप उमेदवारीसाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. सद्यस्थितीत तरी काँग्रेसला मुंबईतील अन्य पाच मतदारसंघांच्या तुलनेत तेवढे आव्हान नाही.
लोकसभा मतदारसंघ : उत्तर मध्य मुंबई
विद्यमान खासदार : प्रिया दत्त (काँग्रेस)
मागील निकाल :  महेश जेठमलानी (भाजप), पराभूत
जनसंपर्क
जनसंपर्कासाठी वांद्रे येथे कार्यालय असून कोणाच्याही तक्रारी तेथे स्वीकारल्या जातात. वेबसाइटच्या माध्यमातूनही अनेकांशी त्या संपर्क ठेवून असतात.
मतदारसंघातील कामगिरी :
*नर्गिस दत्त मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शिष्यवृत्त्या
*शाळांना संगणक पुरविणे. पाण्याची पाइपलाइन, शेकडो सार्वजनिक शौचालये उभारली
लोकसभेतील कामगिरी
*प्रत्येक जिल्ह्य़ात विशेष आरोग्य केंद्र उभारणे आणि त्या संदर्भात राष्ट्रीय धोरण तयार करणे
*गोवामुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा प्रश्न माडला
’निराधार मुलांचे पुनर्वसन आणि कल्याण विधेयक आणले. लेखक आणि कलाकारांसाठी सामाजिक सुरक्षा विधेयक सादर केले.
*नाबार्डचे डेअरी धोरण, इंदिरा गांधी वयोवृद्धांसाठी   निवृत्तिवेतन योजना आदींबाबत प्रश्न उपस्थित केले.

लोकसभेतील कामगिरी
उपस्थित केलेले प्रश्न १४९, तारांकित प्रश्न-९, अतारांकित प्रश्न १४० ल्लएकूण हजेरी २०१ दिवस (३३५ दिवसांपैकी) चर्चेत सहभाग १८ वेळा
खासदार म्हणजे शोभेची बाहुली!
‘शोभेची बाहुली’ असलेल्या प्रिया दत्त यांचा जनसंपर्क नाही. विमानतळाच्या जागेवरील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासह मतदारसंघातील प्रश्नांवर झालेल्या आंदोलनांमध्ये त्या कधी सहभागी झाल्या नाहीत. रेल्वेप्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही. खारदांडा ते बँडस्टँडपर्यंतच्या घरांच्या पुनर्विकासाच्या प्रश्नात त्यांनी कधीही लक्ष घातले नाही.
आशीष शेलार (भाजप)

लोकहितासाठी प्रयत्नशील
जनतेचे हक्क आणि अधिकार यांच्यासाठी मी लढेन, त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणे आणि स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन काम करीन, असे वचन मी निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिले होते. मी माझ्या कामाबद्दल कधीही समाधानी नसते, नाही तर मी आत्मसंतुष्ट होईन. त्यामुळे मी नेहमीच अधिक चांगले काम करण्यासाठी आणि मतदारसंघातील जनतेचे विषय प्रभावीपणे मांडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते.
प्रिया दत्त